Saturday, December 18, 2010

वेगवेगळ्या 'मी' ची गोष्ट

तो घरातून बाहेर पडला. नेहेमीच्या सवयीने काहीकाळ आपल्याच पायात नजर घुटमळवून त्याने बाजूला पाहिलं आणि तो चमकलाच, किंवा उडालाच... हे सगळे शब्द तोकडे पडावेत.... रस्त्याच्या बाजूंच्या मैदानात तो खेळत होता... आणि तो म्हणजे तोच जो पहिल्या वाक्यात घरातून बाहेर पडला होता.... काही वर्षापूर्वी तो इथे खेळायला यायचा... आत्ता तसंच तो तिथे खेळत होता मैदानात... अनवाणी, घामाघूम, ओरडणारा, धावणारा... आणि तो स्वतःलाच बघत होता खेळताना.... त्याने डोळे चोळले, आणि काही पावलं पुढे जाऊन तो निरखून पाहायला लागलं.... तेच कपडे, तो आवडता निळा टी-शर्ट, चपला मैदानाच्या कोपर्यात भिरकावलेल्या, हात कमरेवर ठेवून खेळाच्या पुढच्या टप्प्याची वाट बघणारा... तपशीलात काहीच फरक नाही... पण मग हा बघतोय तो कोण... आणि त्यांची वये एकसारखी नाहीत, मग हे काय.... संभ्रम, स्किझोफ्रेनिया, काल घेतली तर नव्हती, आणि असती तरी एव्हाना.... त्याने मैदानावरची नजर काढून बाजूला पाहिलं, तर मैदानाच्या भिंतीला हनुवटी टेकवून आणि हाताचे तळवे त्या हनुवटीभोवती टेकवून तोच उभा..त्याने मैदानात नजर टाकली तर कबड्डीच्या आखलेल्या पटांगणात उजव्या कोपर्यात तो उभा... वाकून...चढाई करणाऱ्याच्या पायाकडे बघत.... त्याने मैदानच्या बाजूच्या गर्दीत पाहिलं,,,, तो उभा टाळ्या पिटत ,ओरडत.....
    घामाघूम होत तो मटकन खाली बसला.... त्याच्या खांद्यावर त्याला हात जाणवला, त्याने वर बघून बघितलं, आणि तेच.... तोच.... आणि एक साधा प्रश्न.... मित्रा, काय झालं.... पाणी वगैरे हवंय का? त्याच्या, म्हणजे स्वतःच्या चेहेर्यावर आपल्या प्रतीबिम्बासाठीपण ओळखीची एक रेषापण नाही.... पण कोण कुठला हाअशी  रखरखपण नाही....
   भिरभिरल्यासारखी  त्याने चारीकडे नजर टाकली.... तोच.... आईचं बोट धरून चाललेला लहान मुलगा.... शाळा सुटल्यानंतर वर्गातल्या मुलींच्या मागे जाणार्या घोळक्यात..... चहाच्या टपरीपाशी मित्रांशी बोलत.... त्याच्या ओठांना कोरड पडली.... तो चालायला लागला आणि त्याला तोच भेटत राहीला.... काहीवेळा त्याला टक्क आठवत होता तिथे असणं.... पण काही क्षणी तिथे असण्याची पुसत आठवणही सापडत नव्हती.... उदाहरणार्थ ८व्या मजल्याच्या घराच्या खिडकीतून दूरवर पहात उभा असलेला, किंवा वेगात चारचाकी हाकतजाणारा , ओठावर एक वरचढ हसणं ठेवून....
   हे कोण आहेत सगळे... आणि ह्यातल्या एकालाही मी दिसत नाहीये का... त्यांच्या चेहेर्यावर मला पाहून काहीच कसं लकाकत नाही...  आपण थांबलो तर कदाचित संभ्रमाच्या जाळ्यात अजून खोलवर फसू असं काही वाटल्याने तो चालायला लागलं.... वाहनांची गर्दी, आणि धक्के, माणसांचे आणि त्याचे स्वताचेच, खात तो दूरवर आला. आता गर्दी विरळ झाली होती. वार्याची निवांत झुळूक जीवाला थंडावा देत होती. त्याने समोर पाहिलं. समोरून कोणीतरी चालत येत होता. आणि यावेळेला स्वताचाच चेहेरा समोर पाहून तो फारसा भांबावला नाही. आश्चर्य ही थोडावेळ टिकणारी गोष्ट असते, सवय झाली कि ती उरत नाही.
   पण यावेळेला समोरचा चेहेरा त्याच्याकडे पाहून हसला. त्याच्या हसण्याची स्वाभाविक प्रतिक्रिया म्हण, किंवा इतक्या वेळाने ओळ्ख सापडल्याचा परिणाम म्हणून म्हणा हसण्याच्या चार चुकार रेषा त्याच्याही चेहऱ्यावर आल्या. 'अर्थ लागत नाहीये का ह्याचा?' समोरच्याने विचारलं. 'हे इतके 'मी' दिसतायेत मला आणि तेही काळाच्या गतीशी सुसंगती नसलेले. कोणी ५ वर्षापूर्वीचा, तर काही ठिकाणी मी असण्याची सुतराम शक्यता नसतानासुद्धा. आणि आता तुला प्रश्न पडलाय कि हे सगळं मला कसं कळलंय'. त्याने (म्हणजे जो पहिल्या वाक्यात घराबाहेर पडला आहे त्याने) फक्त होकारार्थी मान डोलावली.
    'तू नेहेमीच असतोस तुझ्या गोष्टींमध्ये.  गोष्टीच्या केंद्राशी फिरणाऱ्या नाम-सर्वनामाला तुझं चेहेरे असतो, कधी निनावी, कधी बेमालूम लपवलेला. कधी-कधी तुझे अस्वस्थ उद्रेकच तो कल्पनेच्या चौकटीत सोडतोस. गोष्ट जो सांगतो त्याचीच असते, त्याने स्वतःला कितीही वजा केलं तरी. आणि सगळ्या गोष्टी काही सांगितल्या जात नाहीत. काही जन्म घेतात, त्यांचे तलम स्पर्श काहीकाळ सुखावतात तुझे तुलाच, आणि मग तुझ्या स्मरणाच्या पिंजर्यात न अडकता ती पाखरे सहज संपून जातात. '
   'पण मग हे इतके मी कसे सभोवती. ' (जो पहिल्या वाक्यात.....)
   'कारण तूच बनवले आहेस ते. काही वेळा आठवणी म्हणून, काही वेळा कल्पनांचे उनाड खेळ म्हणून, काहीवेळा फक्त कोणाला तरी सांगायची खोड म्हणून. ते तू आहेस हे फक्त चेहऱ्यावर आहे त्यांच्या. पण त्यांचं असणं हे तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं ह्याच्या खोलीवर अवलंबून आहे. जा मागे जाऊन पाहिलास तर त्यांच्यातले अनेक जण एव्हाना संपले असतील. त्यांच्या चेहेर्यावर जाऊ नकोस. ह्या सगळ्या तू स्वतःला किंवा इतरांना सांगितलेल्या गोष्टी आहेत, आणि आत्ता त्या दिसतायेत तुला एवढंच. ' 
   'पण ते मला ओळखत का नाहीयेत? ' (जो पहिल्या.... )
  'कारण गोष्टीत तू नाहीयेस, तू दुसरा काही चेहरा पांघरला आहेस. आणि म्हणून त्यांना तुझा चेहेरा जो दिसतोय तो ओळखीचा नाहीये, अगदी तो त्यांचाच असला तरी'
  'मग तू का मला ओळखलंस? '
  'कारण मी तुझ्या गोष्टीतला पात्र नाहीच आहे,,, इथे तू दुसर्या कोणाच्या तरी गोष्टीतला एक आहेस आणि मी त्यात भेटतोय तुला.... '
   'म्हणजे ...'
'म्हणजे तुझ्या गोष्टी, किंवा तू जे जगतोयेस त्या काही समांतर रेषा नव्हेत. दुसरा कोणीतरी त्यांना सहज छेदून जावू शकतो'
' पण एकदा गोष्ट जन्माला आली कि....'
'आलीच.... ती मागे फिरणार नाही. तिचा शेवट बदलणार नाही. अगदी तू टाळला असशील करायचा शेवट तिचा तरी ती एका टोकाला पोचून लटकत राहिलंच.... जसं तिथे आहे' त्याने बाजूला बोट दाखवले....
   तो आणि ती तिथे थांबलेले.... त्याचे डोळे तिच्या चेहेर्यावर खिळलेले... आणि ती सरळ त्याच्या डोळ्यात बघत.... तोच प्रश्न.... आणि त्याने टाळलेले उत्तर... तिच्या डोळ्यांशी कडांशी येऊनथांबलेलं पाणी..आणि त्याच्या चेहेर्यावर खूप प्रयासाने काही-बाही कारण देताना यावेत तसे आलेले कृत्रिम भाव....
   ' तू संपवलीच नाहीस ही गोष्ट. '
   त्याने (म्हणजे जो...) समोर पाहिलं... कोणीच नव्हतं, आणि तरीही मगाशी ऐकलेला आवाज स्पष्ट होता... आता त्याला भास किंवा खरं अशा शंका उरल्याच नव्हत्या.... त्याने परत बाजूला पाहिलं.... तेदोघं ... स्थिर तिथेच.... तो त्याच्या बाजूला जाऊन उभा राहीला.... काहीवेळ थांबून त्याने काही बोलू पाहिलं... त्याच्या बाजूच्या त्याचेच ओठ हलले क्षणभर.... पण तेवढंच....
       तो तिथून निघाला.... आता तो कुठे बघत नव्हता... त्याला जाणवत होतं कि तो जिथे बघेल त्याचा अर्थ लावू पाहील.... आणि तो अर्थ लावताना तो एक गोष्ट रचेल मनाशी ... कदाचित ती गोष्ट त्याला लहानपणापासून जी कळली आहे तशी आहे.... किंवा त्याने वाचलेल्या एखाद्या गोष्टीशी जुळणारी....  जर त्याला एक निस्तब्ध, शांत क्षण अनुभवायचा असेल तर त्याला त्याच्या मनाच्या तळाशी तिथे पोचला पाहिजे जिथे आयुष्याचा अन्वय लावण्याचा, किंवा एखादा छोटासा निर्णय घेण्याचा प्रयत्न नाहीच आहे. बस, जो आहे तो नितळ, निरागस जगतो आहे... 
   अशी कुठली जागा सापडतच नाहीये.... आहे तो असा गुंत्यांचा खेळ आणि त्यात हे आपले एवढे चेहरे... पण तरीही ह्याच्या पार जायची गोष्टही आपणच लिहायला हवी... गोष्ट संपण्याची गोष्ट...
    स्वतःशी हसून त्याने बाजूला पाहिलं....
    एक लहान मूल मातीत रेघोट्या मारत बसलेलं....आपल्यात हरवलेलं.. त्या रेषांचा पुढे काय होईल याच्याशी त्याला काहीच नव्हतं...थोड्या वेळाने ह्या खेळाचा कंटाळा येऊन ते निघून गेलं...
त्या रेघांत जन्माला येणाऱ्या गोष्टी पहात तो तिथेच उभा राहीला....

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...