Sunday, August 29, 2010

मरायचं हेच वय...

काल एका मित्राची आई गेली. मग मेल्या माणसानंतर उरणारे हम्बरडे, रडून रडून लालसर डोळे, दाबून ठेवलेले हुंदके, पाठीवर फिरणारे धीराचे सोयीस्कर हात. गेलेला माणूस ज्यांचा थेट आतड्याचा कोणीच नवता त्यांची पुढच्या तयारीची धावाधाव. मरणाची फिरवून फिरवून सांगितली जाणारी गोष्ट, मध्येच आई गेली ह्या जाणीवेने कोसळणारा मित्र, त्याच्या पुढ्यातला त्याच्या ६० वर्षे वयाच्या आईचे प्रेत, नाका-तोंडात कापूस, अंगावर चादर. निलगिरीचा वास, खाली मान घालून बसलेले नातेवाईक, 'आजी अशी का झोपलीये, मला कडेवर का घेत नाही' असं म्हणणारी ४ वर्षे वयाची नात, तिला दिली जाणारी तेवढीच बालिश स्पष्टीकरणे, आणि मग तिचं सगळ्यांनी मिळून टाळलेला प्रश्न, 'ती मेली म्हणजे'? ' .... कोणालाच माहित नाही, अर्धा आयुष्य स्वयंपाक घरात राबलेली, मग हृदयातला कळा होईल तेवढा वेळ आपल्याच काळजात ठेवलेली, आणि मग मेलेली त्याची आई, ती मेली म्हणजे काय? कोणाची आई, कोणाची बायको, कोणाची आजी, कोणाची बहिण, सगळी नाती 'आहे' मधून 'होत्यात' जाणे. आठवणींचा हळूहळू धूसर होत जाणारा ढीग ह्यात नवीन भर पडणार नाही.... हे सगळे 'साईड इफेक्ट' मरणाचे. त्यात उत्तर नाहीच. 'मरतात म्हणजे?' जिवंत राहतात म्हणजे तरी काय? मागे राहणारे अनुतरित्त प्रश्न, बोथट होत जाणारा दुख, आणि आठवणी....
हे असं का मरायचं, आपलं शरीर एके दिवशी गाफील पकडून हल्ला करणार, मग नळ्या, सुया, गोळ्या, तपासण्या, प्रार्थना... मग हळूहळू जवळच्या माणसात येणारा निब्बरपणा, मग एका दिवशी सारे प्रयत्न व्यर्थ दिसत असतानाही करायचे, आणि एका निश्चित टोकाकडे जायचं, एक एक संवेदना झिजणार, संपणार, आणि एका क्षणी सुख-दुख कशा कशाचीही जाणीव, आपले-परके थांबणार. असं का मरायचं?
.... मरायचं हेच वय. जेव्हा प्रश्न मेंदूला बोचातायेत. त्यांची अपुरी का होईना तड लावायची धग अंगात आहे, जगणं भोगायची तीव्र असोशी आहे, पाउस रंध्रात शिरून कविता म्हणतो आहे, चांदणं रात्रभर भिनत आहे, कोणाशी बोलायची कधीची अपुरी हुरहूर आहे, स्वताचीच स्वतःला न सुटलेली कोडी आहेत, कोणाचही दुख डोळ्यांच्या कडा ओलावू शकेल एवढी ओल बाकी आहे, आणि एक दिवस तरी आपल्याच मनाशी पेरलेल्या स्वप्नांना पूर्ततेचे एखादे फूल येईल एवढी आशा टिकून आहे.. मरायचं हेच वय..
कंटाळलेल्या दमट शेवटापेक्षा आयुष्यभराचा व्रण ठेवून जाणारी अपूर्णता जिथे हवीहवीशी वाटते, तेच मरायचं वय.... म्हणजे हेच मरायचं वय.....

विझल्यानंतर आपल्यातली ठिणगी कोणी तरी आठवेल असंच संपावं,
शमा बुझ गयी उसकी गिला नही
बुझता वही जो कभी जला था
अशा बर्याच ठिणग्या जिथवर आहेत, त्यातूनच स्वतःची न दिसणारी वाट उजळावी एवढं वेड जिवंत आहे तेच मरायचं वय. हेच मरायचं वय.

आपले लिहिलेले, न लिहिलेले शब्द आठवत राहातायेत, समोरच्या आभाळात येणारी संध्याकाळ हळूहळू निशब्द शांततेत संपणार आहे, त्याधी उरलेला रंगबिलोरी आसमंत,
समुद्रावर जावं, पार पुढे जाऊन जिथे लाटा स्पर्श करतात त्या ओलसर वाळूत बसावा, शेजारी कोणी नसताना कधीतरी एका संध्याकाळी अशा कोणाशी मारलेल्या गप्पा आठवाव्यात, मग सार्या आठवणींचा निर्माल्य समोरच्या लाटांच्या संथ तरंगांवर सोडून द्यावा, त्याला दूर दूर जाताना पाहावा, आपल्या आतला तृप्त रिकामपण जाणवावं, मागचा गलका हळूहळू शांत होताना, समुद्र अधिक अधिक जवळ येताना शेजारी आलेल्या बिन चेहेर्याच्या, बिन शब्दांच्या मरणाकडे पाहून ओळखीचा हसता यावा....
असं हसता येतं तेच मरायचं वय. . हेच मरायचं वय....

दिवाळी अंक २०१७ -२

५. एडीट मित्र  प्रकाशन , ग्रंथ व्यवहार ह्या विषयाला वाहिलेला आणि चोखंदळ वाचक ह्यांनाच लक्ष्य करू पाहणारा हा अंक. सुरुवातीचाच ‘ विद्येच्...