Skip to main content

कथेतला लेखक

लेखकात कथा कुठे उगम पावते? कथा त्याच्या कल्पनेत असते का त्याच्या अनुभवाची घुसळण होऊन ती जन्माला येते? कथेच्या मुळाशी निर्मिनार्याचे अनुभव अपरिहार्यपणे असतात का? का निव्वळ कल्पनेच्या सदिश मुक्ततेत कथा उमटत जाते? लेखकाची मनोवस्था आणि आयुष्य दुसर्या कोणाला पूर्णपणे उलगडणे शक्य नाही, आणि म्हणून ह्या प्रश्नांच्या बाबतीत काही ढोबळ अनुमानेच करतं येतील. पण कथेत लेखक कुठे असतो असं विचार केला तर काही सापडू शकेल असं मला वाटतं. मला भावलेल्या काही कथांच्या ( इथे कथा म्हणजे पानांची मर्यादा अशी व्याख्या न ठेवता कथानक अशा ढगळ अर्थाने कथा हा शब्द वापरला आहे) आधारे मी कथेत सापडणारा लेखक मांडणार आहे. अर्थात हा मी घेतलेला, किंवा आपसूक घडलेला शोध आहे आणि ह्यात कोणत्याही साहित्यिक सत्याचा दावा नाही.
ज्या कथांत असं लेखक मला दिसलेला आहे त्या माणसाच्या वागण्यातले विरोधाभास, काही मुल्यांवर विश्वास असणाऱ्या माणसांतला वैचरिक संघर्ष आणि स्वतःच्या विचाराने जागू पाहणाऱ्या माणसात, मध्यवर्ती पत्रांत येणारी घुसळण आणि द्वंद्व मांडणार्या कथा आहेत. John Steinbeck ची In Dubious Battle वाचताना मुळात लेखकाचे असे प्रतिबिंब कथेत असू शकते अशी कल्पना माझ्या मनात डोकावली. In Dubious Battle हि John Steinbeck ची तशी मध्यम दर्जाची कृती म्हणता येईल. California मधल्या सफरचंद बागांत सफरचंद झाडांवरून उतरवण्याचे काम करणाऱ्या मजुरांचा संप संघटीत करणाऱ्या, मालकांच्या संघटीत आणि पूर्वनियोजित विरोधापुढे हरणाऱ्या अमेरिकन कम्युनिस्टांची हि कथा. Mack आणि John Nolan हि दोन मध्यवर्ती पात्रे आहेत. Mack अनुभवी संघटक आहे. पार्टीत नवा असलेल्या नोलानाला तयार करण्याच्या हेतूने Mack त्याला सोबत घेऊन शेतांत जातो. तो अनुभवी असला तरी त्याची मते काम्युनिझामावाराच्या श्रद्धेतून बनलेली आहेत. नोलान पार्टीत नवीन असला तरी तो मजुराचा मुलगा आहे. त्याचे वाचन आणि स्वतःच्या अनुभवांचे विश्लेषण करण्याची क्षमता दांडगी आहे. ह्या दोघांच्या कल्पनेपेक्षा वेगळी परिस्थिती त्यांना अनुभवायला मिळते. सुरुवातीला ते मजुरांच्या असंतोषाचा सहज वापर करत संप सुरु करतात. पण नंतर ह्या मजुरांना साम्पातल्या नव्या नव्या कामांसाठी उमेद देत राहणे आणि त्यांची रहायची व खाण्या-पिण्याची व्यवस्था, त्यांचे ढासळते मनोधैर्य आणि स्थानिक प्रशासन हाताशी धरून पद्धतशीर दबाव वाढवणारे बागमालक ह्या सगळ्या आघाड्यांवर लढताना त्यांच्या विचारांचा, जमत जाणार्या मैत्रीचा आणि इतरांबरोबर असणाऱ्या संबंधांचा कस लागतो आहे. त्या दोघांबरोबर संपामध्ये बर्टन नावाचा डॉक्टर आहे. तो फारसा बोलत नाही. संपूर्ण कादंबरीत दोनदाच तो त्याचे विचार काहीश्या स्पष्टपणे मांडतो आणि सम्पातल्या कोसळत्या टप्यात अचानक पकडला जाऊन नाहीसा होतो. तो पार्टी वर्कर नाही. पण तरीही डॉक्टर त्या संपाच्या जिवंत राहण्यातला एक महत्वाचा घटक आहे. आता या सगळ्यात लेखक कुठे येतो? वरकरणी नोलानामध्ये किंवा Mackमध्ये लेखक आहे असं वाटतं. पण बर्टन एका ठिकाणी संप, लढा याबाबत बोलताना शरीरातले आजार आणि त्यांच्याशी लढणाऱ्या पेशी अशी तुलना करतो. डॉक्टर मानवी वागण्याच्या निर्विकार निरीक्षक आहे. चांगलं किंवा वाईट अशी विभागणी करणं हे त्याला माणसांच्या वागण्याला मर्यादित करण्यासारखा वाटतं. तो Mackच्या विचारातली विसंगती दाखवू शकतो आणि त्याचवेळी संघर्षाची अपरिहार्यताही ओळखतो. डॉक्टर मला लेखकाचं प्रतिबिंब वाटतो. Steinbeckचा खरोखर एक डॉक्टर मित्र होता आणि त्याच्या बरोबर होणार्या अनेक भेटी आणि प्रवास ह्यात त्याला अनेक कथा सापडल्या. Cannery Rowsमध्ये असाच एक डॉक्टर आहे. तो सगळ्यांपासून सारख्याच अंतरावर आहे. तो स्वतःच्या biological specimen गोळा करण्याच्या कामात दंग आहे. पण त्याचवेळी चवीने जगायला तो विसरत नाही. सगळ्या गावाचं तो लाडका डॉक्टर आहे, खरतर तो संशोधनातून डॉक्टर झालं आहे, वैद्यकीय शिक्षणातून नाही. पण लोकांनी त्याला आजारपण बरं करणारा इलाज केला आहे. डॉक्टरनेही हि जबाबदारी आणि प्रेम स्वीकारले आहे, प्रसंगी त्यात त्याला नुकसान होत असूनही. थोड्याफार सारख्या प्रकाराने चित्रित केलेले हे 'डॉक्टर' फारसा बोलत नाहीत. त्यांच्या मनात इतरांबद्दल असणारी कळकळ त्यांच्या वागण्यातून दिसते, पण त्यांच्या मनाचे पीळ फारसे उलगडत नाहीत.
हे दोघे मला त्या त्या कथांमधले लेखक वाटतात. Steinbeckला कम्युनिस्ट विचारसरणीचा असणारं आकर्षण In Dubious Battle मध्ये जरी लपत नसलं तरी त्याचवेळी सामान्य कष्टकरी माणसे ह्या वावटळीत टिकू शकणार नाहीत, त्यांची लहान आयुष्ये तत्वनिष्ठतेचे ओझे पेलू शकत नाहीत हेही तो जाणून होता. त्याच्या कथा ह्या नुसतंच हे ताण आणि विरोधाभास टिपणं नाही. त्याला स्वतःचा एक सूर आहे. आणि तो लेखकाने डॉक्टर च्या पात्रांतून व्यक्त केला आहे. हा सूर एकांगी असणं शक्य नाही. तसा असतं तर त्या कथाही एका निश्चित शेवटाकडे झुकल्या असत्या. कोणीतरी हरलं असतं, कोणीतरी जिंकला असतं. त्या तशा न जातं एका अबोल करणाऱ्या शांत शेवटला जातात, कारण त्यापाठी लेखकाची एक भूमिका आहे. आणि Steinbeckने मोठ्या खुबीने ती काही ठिकाणी उतरवली आहे.
अशा लेखकाच्या प्रतीबिम्बाचे मला आवडणारे उदाहरण म्हणजे 'रारंग ढांग' मधला मिनू खंबाटा. अर्थात 'रारंग ढांग' ला इतके पदर आहेत कि त्यात अनेकात तो लेखक सापडेल. रूढार्थाने विश्वनाथ 'रारंग ढांग' चा नायक किंवा मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. तिला टोक आहे, धार आहे, स्वतःच्या विवेकाने स्वीकारलेल्या मार्गावर चालताना येणारे ओरखडे सहन करायची हिम्मत आहे. पण हि लेखकाची निर्मिती आहे, तो स्वतः नाही. कारण विश्वनाथाच्या सहज स्पर्शणार्या आणि ठाम वाटणार्या आयुष्याला प्रत्यक्षात जगणं काय असेल हे कर्नल राईट किंवा शेवटच्या कोर्ट मार्शलच्या प्रसंगात लेखकाने दाखवलं आहे. 'तुला जे स्वातंत्र्य हवं आहे ते तुला बाहेरच्या जगात तरी मिळेल का? ' हा विश्वनाथला विचारलेला प्रश्न नाही, तर लेखकाला जाणवलेली मर्यादा आहे. मिनू खंबाटा आनंदात जगण्यापलीकडे कोणताच तत्वज्ञान सांगत नाही. आपल्या सभोवतालच्या माणसांच्या अडनिड्या किंवा तर्हेवाईक स्वभावांशी तो फिट होऊन गेला आहे. पण तरीही त्याचे डोळे उघडेपणाने माणसांकडे, त्यांच्या चांगल्या-वाईट वागण्याकडे, प्रसंगी कातडी बघतायेत. त्याचं स्वभाव खरतर शिस्तीच्या रुक्ष धबडग्यात कोमेजायाचा. पण त्या शिस्तीच्या दडपणातही पुटू करण्याची मोकळीक तो बनवू शकतो. काचत जाणार्या शिस्तीत स्वंतंत्र माणसावर येणारा ताण त्याला म्हणूनच कदाचित समाजात असावं, नव्हे समाजालाच, म्हणून तर तो 'friend of accused' म्हणून स्वतःहून नाव देतो. त्याचं आनंदी एकांडेपण आणि त्याचवेळी तो आनंद वाटायची आणि दुसर्याच्या अडचणीत निशब्द साथ द्यायची वृत्ती हि कथेतल्या कुठल्याही तात्विक भागापेक्षा मला अधिक खरी वाटते. मेजर बंब, कर्नल राईट आणि विश्वनाथ यांसारखी प्रसंगी विरोधी तर पूरक व्यक्तिरेखा उभं करणारा लेखक या सगळ्यात मिनू खंबाटा बनूनच सामावून जाऊ शकेल ना!
हरमान हेस्सेच्या 'सिद्धार्थ' मध्ये वसुदेव नावाचा नावाडी आहे. त्याचं नावाडी असणं हीच मुळात खुबीने केलेली निवड आहे. ज्या नदीवर तो नावाडी आहे, ती नदी म्हणजे संसाराचे पाश तोडून एकांत साधनेत स्वतःला शोधू पाहणारे साधक आणि उपभोगांच्या नव्या नव्या सुखसंवेदनात स्वतःच्या शोधाची बोचरी जाणीव हरवलेलं जग ह्याच्या मधला प्रवाह आहे. वसुदेव नदीच्या एका तीरापासून दुसर्या तीरावर जाण हे काम करतो आहे, व्यक्तिगत सुख-दुख, कंटाळा, बदलाची गरज अशा कशानेही त्याच्या ह्या व्रतस्थतेत खंड पडलेला नाही. आणि त्याचा एकमेव अविरत संवाद, खरतर स्वतःशीच, चालतो तो त्याच्यासारख्याच अविरत वाहणाऱ्या नदीशी. 'नदी कधीच सारखी नसते. जरी एकच प्रवाह आपण नेहमी पहात असलो तरी तो प्रवाह वाहता असतो.' हि जाणीव त्याने त्याच्या नदीबरोबर चालणाऱ्या संवादांतून मिळवलेली. वेदविद्या पारंगत तेजस्वी ब्राह्मण युवक, शरीराच्या सगळ्या इंद्रियांना जिंकण्याचा प्रयत्न करणारा साधक, 'Will you give me kiss for my poem' असं म्हणून भोगांच्या लालस जगात स्वतःला शोधू पहाणारा, 'That is why I am going my own way not seek another or better doctrine, for I know there is none, but to leave all doctrines and all teachers and to reach my goal alone- or die' असं Illustrious One ला सांगून बाहेर पडणारा अशा विविध रुपात चितारलेला सिद्धार्थ अखेर येवून स्थिरावतो तो वसुदेवापाशी. वसुदेव त्याला काहीच शिकवत नाही, फक्त सांगतो जे त्याने नदीच्या या तीरापासून त्या तीराला जाताना आणि परत येताना केलेल्या संवादातून त्याला गवसलंय. कथा सिद्धार्थची आहे, कथेत सिद्धार्थाने घेतलेला, वरकरणी निष्फळ वाटणारा शोध आहे, त्याने स्वतःला विचारलेले भौतिक जगात निरुपयोगी पण टोकदार प्रश्न आहेत, उत्तरांचा आभास आणि नंतर त्या आभासानच स्वतःपुरती शाश्वतता म्हणून शरण जाणे आहे. ग्रेसने 'मितवा' मधल्या लेखात हे 'सिद्धार्थपण' छान मांडलं आहे. पण हेस्सेला जे सांगायचं ते सिद्धार्थ कुठेच सांगत नाही. किंवा हेस्सेला मुळात काही सांगायचाच नाहीये. त्याला दाखवायचाय तो निरंतर प्रवास, वरकरणी एका वर्तुळाच्या परीघावर असल्यासारखा पण खरतर खोली वाढत जाणार्या विवारासारखा. आणि वसुदेवासारखा नावाडी त्याने ठेवलाय, आभासी जाणिवांच्या सतत बदलत्या नदीवरचा स्थिर साथीदार.
वर उल्लेखलेल्या ३ कथांपैकी, खरा तर कोणतीच नाही, पण 'रारंग ढांग' आणि 'सिद्धार्थ' ह्या नायकप्रधान कथा आहेत. अर्थात हे दोन्ही कथाकार इतक्या ताकदीचे आणि समजाचे आहेत कि वास्तवात अशी एका बाजूने नेहेमी योग्य असणारी स्थिती शक्य नाही हे त्यांना जाणवणार नाही. 'सिद्धार्थ' लिहिण्यागोदर हेस्से भारतात आलेला ते पौर्वात्य तत्वज्ञानातील अनुभूतीची ओढ घेऊन. ती त्याला मिळाली नाही, पण वैदिक तत्वज्ञान, त्यातले न पटणारे सिद्धांत नाकारून उभा राहू पहाणारा बौद्ध धर्म, त्यातही हेस्सेला जाणवलेली पोकळी, कदाचित पाश्चिमात्य विचारसरणीच्या पायाने नाकारता न आलेल्या ऐहिक प्रेरणा पण त्यात न गवसणारे अंतिम साध्य, आणि हेस्सेच्या वैवाहिक जीवनात त्यावेळी असलेली अशांतता ह्या सार्या सरपणावर 'सिद्धार्थ' उभी आहे. त्यात नायक हा सादरीकरणाची गरज, सोय म्हणून आहे. आणि हेस्से, जो तत्वज्ञानाचा विद्यार्थी होता, तो सिद्धार्थ केवळ जे घडत आहे ते पाहून मांडण्याचे माध्यम म्हणून उभा करत नाही. खरेतर कोणीतीही साधी गोष्ट, अगदी आद्य चिऊ-काऊची गोष्ट, हि पण काहीतरी सांगण्यासाठीच बनते. त्यामुळे 'सिद्धार्थ' चा प्रवास खरतर कुठेच न जाणारा ठरला तरी त्यात हेस्सेला काही सांगायचाच नाहीये, किंवा नुसती व्यर्थता दाखवायची आहे असं वाटत नाही. व्यर्थता दाखवायला एवढं तात्विक उहापोह का? माणसे एवढ्या-तेवढ्यावरून सुस्कारे टाकताच असतात. पण हे सांगणं थेट नाहीये, किंबहुना चांगला लेखक कधीच एखाद्या निर्विवाद सत्याचा सेल्समन नसतो. तो मुळात एक जागा पकडतो, तिथून चालायला लागतो, चालताना दिसणारं जग, भेटणारी माणसे, वाटांचे गुंते, थकवा, कंटाळा, आनंद, भ्रम, चीड, वैफल्य मांडतो आणि त्यात कुठेतरी स्वतःला जे सांगायचं ते खुबीने ठेवून देतो. 'जे बरोबर आहे ते दर्शवता येत नाही. चूक गोष्टीच दाखवता येतात.' ह्या तत्वाज्ञानातल्या falsification सिद्धान्तासारखं कथांमधले वरकरणी वाटणारे नायक-नायिका हे शोध मांडतात, त्या शोधाचा शेवट नाही. ते बरोबर नसतात, ते काहीतरी बरोबर शोधण्याच्या अविरत प्रवासातली अजून एक पायवाट दाखवतात. त्या पायवाटेचा अर्थ त्या वाटेवर न चालता ती वाट पाहणाऱ्या दुसर्या कोणाला गवसलेला असतो. मग तो Steinbeck चा डॉक्टर असतो, मिनू खंबाटा असतो किंवा नदीशी बोलणारा वसुदेव असतो.

Popular posts from this blog

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.        माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणत…

हंडाभर चांदण्या

मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता. नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि …

एका मेटाफिजिकल कारस्थानाची दास्तान – १

एकदा एक नवा नवा कवी आपल्या बॅचमेटच्या गाडीतून बॅचमेटच्या इगतपुरीच्या फार्महाउसला चाललेला असतो. नवा नवा कवी आणि गाडीचा मालक हे एका प्रथितयश कॉलेजात एकत्र असतात. पुढे तिथून त्यांना नोकऱ्या लागतात. पुढे तिथून ते परदेशात जातात. पुढे तिथून ते अशा मोडला येतात जिकडे त्यांच्याकडे मुबलक पैसा जमून गेलेला असतो, त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांचे आई-वडील त्यांच्याशी विकली फोनवर आणि क्वार्टरली किंवा बाय-अॅन्युअली समोरासमोर फॅमिली हॉलिडेजना भेटत असतात. मग ह्या प्रदीर्घ का-या पण मुमुक्षू अवस्थेत त्यांना त्यांचा एक सुपर सिनियर भेटतो, जो मॅरेथॉन रनर असतो आणि व्हेन्चर कॅपिटलिस्ट. त्याला भेटल्यावर गाडीवाला मित्र एथनिक ठेपले आणि आचार विकण्याचा स्टार्ट-अप काढतो आणि उरलेला मित्र, ज्याला आपण नवा नवा कवी म्हणत आहोत, तो म्हणतो, आय विल आल्सो फॉलो माय कॉलिंग, मग तो कवी बनतो.        म्हणजे तो एका कॉलेजात व्हिजीटींग शिकवायला लागतो. बाकीच्या वेळात तो कविता करू लागतो, वाचू लागतो, फिरू लागतो. मग फेसबुक अनहर्ड व्होईसेस नावाच्या पेजला तो फॉलो करतो. मग ते सगळे पेजचे लोक महिन्यातून एकदा एकेका नामचीन ठिकाणी भेटून एकमेक…