Thursday, July 29, 2010

'हिन्दू' अणि पुन्हा एकदा Stream of Consciousness

'कोसला' ची आणि पर्यायाने नेमाड्यांच्या 'stream of consciousness' ची ओळख म्हणजे १० वीच्या मराठीतला 'बुद्धदर्शन' धडा. अजूनही कोणाशी, म्हणजे ज्याला दहावितले धडे आठवतायेत अशा कोणाशी बोलला, कि मी ऑप्शनला टाकलेला तो धडा असे सांगणारेच भेटतात. मला तरी काय कळलेला तेव्हा? पण ती सरळ रेशेसारखी, किंवा टोकदार सुईसारखी समोर दिसणारं दृश्य आणि त्याच्या सोबत मनात उमटणारा अर्थ सलगपणे एकमेकांना शिवत जाणारी नेमाड्यांची भाषा लक्षात राहिली. पुढे कोसला वाचलं, एकदा, दुसर्यांदा, मग एखाद दुसर्या संवाद किंवा ओळींसाठी परत परत. पुढे कुठेतरी 'Catcher in the Rye' आणि कोसला एकच धाटणीचे आहेत असं वाचलं, Catcher बद्दल अजूनही ऐकलं होता म्हणून Catcher हि वाचलं. सारखेपणा वगैरे फारसा काही जाणवला नाही, पण सभोवतालचा जगणं आणि लहानपणापासून आपल्यावर छापले जाणारे संस्कार, त्यातून आणि स्वतःच्या जाणीवेतून भोवतालात घडणार्या आणि जाणवणाऱ्या घडणांची मनात उठणारी वर्तुळे यांच्याकडे कुठलीही चौकट न घेता दिसेल तसा बघणारा 'Stream of Consciousness' डोक्यात गेला, म्हणजे माझ्या लिहिण्याच्या पद्धतीत आला, बोलण्याच्या प्रकारात आला. त्याची चीडही आली, पण तो आहे तसा आहे म्हणून तसा बघत रहायची, स्वतःमधल्या स्वतःच्या निरिक्षकाशी बोलायची सवयही लागली.
मागचे ३ रात्री 'हिंदू' वचन म्हणजे कोसलाचा गारूड, चांगदेव पाटलाच्या चातुष्ट्यामधली धुंद आणि बघणार्याचा सार्वकालिक निश्चित एकटेपणा आणि तरीही सभोवतालच्या माणसांच्या, वस्तूंच्या, परिसराच्या त्याच्याशी जोडले जाण्यानं आणि नंतर तुटले जाण्यानं त्याला होणारी अविभाज्य दुखाची मूलभूत जाणीव. कोसला मधला पांडुरंग सांगवीकर शिकाऊ पहाणारा आहे. त्याचं भवताल प्रामुख्याने त्याचं कॉलेज आणि त्याच्या कुटुंबात असलेली त्याच्या कडू-गोड आठवणींची मुळे एवढाच आकाराला आलेला आहे. तो वाचणारा आहे, लेखकाने दडवू पाहिली तरी त्याच्यात जगणं चवीने घेण्याची आसक्ती आहे. जगाला लाथाही मारलेली नाही आणि मिठीही नाही अशा विचित्र अवस्थेत सापडलेला पांडुरंग सांगवीकर. 'ती गेली. तिच्यापाठोपाठ तिचे इवलेसे गर्भाशय. तिच्यापाठोपाठ येणारी खानेसुमारीची एक मोठी ओळच वाचली.' अशा संक्षिप्त शब्दांत बहिणीचा मृत्यू मांडणारा पांडुरंग अजन्ठ्माधली लेणी पाहताना ह्या बहिणीच्या जाण्याच्या दुखानेच बुद्धाला जाणवलेल्या दुखाशी नाळ जोडून घेतो. 'हिंदू' मध्ये हा बघणारा रापला आहे. म्हणजे तो जेव्हा स्वतःचे लहानाचे मोठे होणे पाठी वळून पाहतो तेव्हा त्याच्या संदर्भांची चौकट त्याच्या कुटुंबाच्या, गावाच्या किंवा जातीच्या अक्षांना ओलांडून मोठी होते. पुरातत्व संशोधक खंडेराव आपल्या जगण्याची आणि जगण्यापाठी असेल तर असणाऱ्या अर्थांची संगती त्याला आलेल्या आणि येत असणाऱ्या अनुभवांचे तुकडे त्याने वाचलेल्या किंवा विचाराने मिळवलेल्या अर्थाने जोडून लावून पाहतो. अर्थात कादंबरीच्या निर्मितीचा काल लांबल्याने आणि मधल्या काळात लेखकाच्या वाढत-घाटात जाण्याच्या काम-अस्सल प्रक्रियेचा अपरिहार्य प्रभाव खंडेराववर आहे. त्यामुळे त्याची संदर्भ चौकट फार काल माणसाच्या अस्तिवात येण्याच्या आणि संस्कृती,संस्कार, समाज, चाली-रिती बनण्याच्या शोधत टिकत नाही. दरवेळी इतक्या खोलवर शोध घेणं हे 'Stream of Consciousness' ला न पेलवणारा आहे आणि त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी 'हिंदू' केवळ बघण्याकडे येते. पण काही ठिकाणी तिने अफलातून उंची गाठली आहे. अर्थात तेही अनपेक्षित नाही.
या कादंबरीत सांगितलाय ते हिंदू धर्माचे निखालस सत्य आहे असं लेखकाचं दावा नसावा. आणि ह्यात लेखकाने सांगितलाय ते आणि तेच असं माझं आंधळा समर्थनही नाही. ६०० पानांच्या विस्तारात आणि कोणा एका खंडेरावच्या आत्मशोधात सापडेल इतका उथळ हिंदू धर्म नक्कीच नाही. मुळात साहित्य हे तत्वज्ञान नाही की ते होईल तितक्या निरपेक्षपणे एखाद्या शक्यतेचा तार्किक उहापोह करेल. आणि हिंदू धर्मासारख्या आकार, उगम आणि व्याख्याहीन वस्तुस्थितीवर तत्वाज्ञानातही भाष्य करणे कठीण. 'हिंदू' ची गम्मत अशात आहे की खंडेराव जेव्हा जेव्हा त्याच्या हिंदू असण्याशी, त्याच्या आजूबाजूला घडणार्या घटना ज्यांची मूळे बर्याच अर्थाने हिंदू असण्याशी अथवा नसण्याशी संबंधित आहेत अशा घटनांकडे पाहताना, पुरातत्व संशोधक म्हणून इतिहासाचे प्रसंगी लयबद्ध आणि प्रसंगी विस्कळीत संबंध जोडताना त्याची जाणीव मांडतो त्यात आहे. त्याने जे मांडलाय ते त्याला जाणवलेला आहे. 'Stream of consciousness' म्हणजे केवळ एका झापडे लावलेल्या जगात राहणे नाही तर Consciousness चा आवाका जिथवर जातो आहे तिथवर तो Consciousness मांडणं. 'कोसला' मध्ये शेतकरी वडील, अजंठाची लेणी आणि पुण्याचे कॉलेज, होस्टेल आणि सिंहगड एवढ्यात मावणारी जाणीव 'चांगदेव चातुष्ट्यात' महाराष्ट्र, जाती, शिकणं आणि शिकवणं, कार्या माणसाच्या तीव्र पण दबलेल्या लैगिक आणि वैयक्तिक जाणीवा आणि खूप वाचून, शिकून आयुष्यावर काहीच स्थिरतेने उमटवू न शकलेला 'चांगदेव' अशी विस्तारते. 'हिंदू' मध्ये ती तत्कालीन काळातला खंडेरावच्या आयुष्याचा परीघ व्यापातेच पण त्याचबरोबर इतिहासाच्या अंधुक विवरात आणि अभिव्यक्तींच्या दाट जाळ्यांत विस्तारते. हा विस्तार एका अपूर्ण वर्तुळात फार खुबीने ठेवला आहे. जिथे जाईल तिथल्या अवकाशाशी ठाम निगडीत माणसे, त्याच्या भाषा आणि जाणीवा आणि हे संबंध टिपणारा इतिहास 'हिंदू' च्या ६०० पानी विस्तारात प्रकटत जातो.
खंडेरावचा मोहोन्जो- दडो ते मोरगाव प्रवास, क्षय पावणाऱ्या यक्षाचे आणि खंडेरावचे यक्षप्रश्न, खंडेरावचे भावडूला पत्र, खंडेरावचे फेलोशिपचे भाषण आणि 'हिंदू' ची सुरुवात, सिगारेटी, टक्क जाग्या रात्री, कविकुलगुरू गालिब....
'हिंदू' वाचत असताना एके ठिकाणी हिंदू असण्याच्या संदर्भात काही तात्विक वादावादी झाली. त्याच्या मध्ये कुठेतरी असं वाटलं की वाटेल त्या अंगाने धांडोळा घेता येणं हे वैशिष्ट्य किती वेगळे आहे. लोकपरम्परा, लिखित आणि मौखिक साहित्य, ऐतिहासिक जय-पराजय, प्रथा, रूढी, चाली-रिती, खाद्यपदार्थ, सण, आणि झाकून ठेवलेल्या पण अपरिहार्य मानवी लालसा, इच्छा, समाधान आणि तृष्णा. ह्या धर्माच्या अस्तित्वाची कुठलीही मोठी खूण दररोजच्या जगण्यावर न बाळगताहि तो जगत आलेली कोट्यावधी लहान-थोर माणसे, त्यांच्या जाणीवा, त्यांचं प्रकटीकरण आणि त्यावर फिरणारा काळाचा निबर हात. आणि तरीही ह्या सगळ्यात 'मी कोण आणि हा माझ्या भोवतालचा पसारा भरणारी हि अडगळ किंवा संदर्भ म्हणजे काय' हे शोधायची विचार करणाऱ्या माणसाची आकांक्षा. हे ज्याचं-त्याचं. Stream of Consciousness. भूतकाळ समृद्ध असण्याचा अभिमान आणि त्या संदर्भांची रसद आणि अडगळ. येणाऱ्या दिवसांची हुरहूर आणि मानवी आयुष्याच्या चक्रीयेतेची जाणीव होऊन येणारी सुन्न शांतता आणि पायाखालच्या टीचभर वर्तमानावर मस्तीत उभं राहून बघत राहणं, जाणिवांचे परीघ आणि पंख विस्तारणं, कोसळणं आणि तरी परत उठणं...
है कहाँ तमन्ना का दूसरा कदम यारब
हमने दश्ते-इम्काँ को यक नक़्शे पा-पाया

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...