Friday, July 9, 2010

स्थिरचित्र

एक क्षण असा वेगळा काढता येत नाही। पण तरीही कुठल्या तरी एका क्षणाशी थांबून काय चाल्लय सभोवती असा बघायचा प्रयत्न असतोच। स्कॉलरशिपच्या परीक्षेत 'चित्रवर्णन' असा एक १० मार्कांचा प्रश्न असायचा. एखादं दृश्य असायचं त्यात. एका क्षणाशी बांधलेलं . वाहणारी नदी, झाडं आणि नदीवरचा घाट. गजबजलेला बाजार आणि त्यात चित्राच्या मध्यभागी असणारा फुलविक्रेता. शाळा सुटल्यानंतर बाहेर येणारी मुले आणि त्यांना घ्यायला आलेले पालक. किंवा नदीच्या घाटावर चाललेलं कपडे धुणं, अंघोळी आणि कोपर्यात एक मंदिर. मग आईचा हात धरून चालेल्या एखाद्या मुलाचा दुसरा हात हवेतच आहे, कपडे धुणार्या बाईने एक ओला कपडा हवेत वर उचललेला आहे, किंवा नदीच्या प्रवाहावर असणाऱ्या रेषा. मग शाळेत स्थिर चित्र असा विषयच होता चित्रकलेत. अर्थात काही न काढताच स्थिर रहायचं या चित्रकलेबद्दलच्या प्रेमाने आणि शाळेतील शिक्षकांच्या शाररीक शिक्षणाच्या अंगाने चित्रकला शिकवण्याच्या अभिनव पद्धतीने एकूणच स्थिर काय किंवा अन्य कोणत्याही चित्रप्रकाराबद्दल स्थिर अज्ञानच निर्माण झाले. पण एक गोष्ट लक्षात राहिली. स्थिर चित्रात केलेलं प्रकाशाचा चित्रण. अर्थात स्थिर चित्रांमधला रस तिथेच थांबायचा.
खरा तर कुठलही चित्र स्थिरच आहे. प्रवाहाचा एक क्षण त्या रेषात, रंगांत, वळणात आणि मर्यादेत पकडू पाहिला आहे. जो क्षण चितारला आहे तो मागच्या आणि पुढच्या क्षणांमधला एक थांबा आहे. त्या क्षणाला त्याच्या मागच्या क्षणांनी एक अर्थ आला आहे आणि पुढच्या क्षणांनी हेतू. अगदी एकच जागी ठेवलेली फुलदाणी जरी असली तरी कोणीतरी ती ठेवली आहे, तिला घासली पुसली असेल, तिच्यात ताजी फुलं ठेवली असतील किंवा फुलं ठेवायची, बदलायची विसरली असतील. तिच्यावर पडणारा प्रकाश एखाद्या झरोक्यातून, किंवा खिडकीतून येतोय. हे सगळं त्या एका क्षणात नाहीये. पण त्या फुलदाणीची स्थिरता हि त्या क्षणांमधल्या अस्थिरतेतून, कृतीतून आली आहे.
'क्रॉस सेक्शन' नावाचा एक प्रकार असतो statistics मध्ये. म्हणजे एका क्षणी, एका स्थिर मानलेल्या क्षणी, नोंदवलेली निरीक्षणं. म्हणजे एखाद्या वर्षाच्या शेवटी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची उंची, भारतातील सर्व राज्यातील गरिबांचे प्रमाण, वेगवेगळ्या देशात जन्माला आलेली मुले असा काही. म्हणजे काळाच्या एका तुकड्यावर उभं राहून सभोवती पाहणं. म्हणजे परत स्थिरचित्र.
एकदा असाच रस्त्याच्या कडेला बसलो होतो. म्हणजे मी स्पेसमधला एक तुकडा स्थिर केला. आणि मग एकदम समोर नजर ठेवून पाहू लागलो. मग थकलेल्या सायकल वरून जाणारा दमलेला मजूर, गरम चहा घेऊन लगबगीने जाणारा अण्णा, ऑफिसमधून परतताना फोनवर बोलत लाजणारी तरुणी, पुढे चालणाऱ्या मुलींकडे बघत टोमणे मारत जाणारे तरुण, आईचा हात धरून आणि मान इकडे तिकडे वेळावत जाणारा शाळेतला मुलगा, अंगावर एकही कपडा नसणाऱ्या बहिणीला घेऊन हलवायाच्या दुकानापुढे उभं रहायला निघालेला आणि अंगावर प्रचंड ढगाळ शर्ट तेवढा घातलेला आणि केस अस्तावस्त्य पिंजारलेला मुलगा, दाढी खाजवत आणि समोरच्या प्रत्येकाला 'देखा क्या अपने उसे' असं विचारात निघालेला वेडा, वेल्डीन्गच्या ठिणग्या, रंगाच्या दुकानातले रंगांचे डबे, रिकामी हातगाडी, सावकाश जाणार्या बसेस, सुळसुळीत बाईक्स, आणि अनेक एकसारखे एक चालणारे. अर्थात ह्यात मी स्थिर आहे. आणि माझ्या पुढे वेळ वाहतो आहे किंवा उगाच निवांत सरकतो आहे.
आता याक्षणी बाहेर गेलो आणि flash मारला तर काय दिसेल? थेंब, थेंब आणि थेंब. बहुतेक हवेच्या अधान्तरात तोललेले. सोडियम दिव्यांचा फिकट पिवळा प्रकाश, त्या दिव्यापांशी क्षणभर झळाळून उठलेले थेंब, काही थेंब पानांवर विसावलेले, काही त्यांना स्पर्शण्याच्या किंचित दूर, वारा दिसणार नाही चित्रात पण त्याने बदवलेले थेंबांचे आकार किंवा त्यांना दिलेला तिरकस कोन, रस्त्यावर साचलेल्या डबक्यात जाणारा थेंब, चालणाऱ्यांची पावले, काही उचललेली काही अर्धवट, त्यांच्या छत्र्या आणि रेनकोट यातून ओघळणारे आणि रस्त्याच्या पृष्ठभागावर पडून मिटून जाण्याआधी मिळालेले अल्प आयुष्य साजरे करणारे थेंब, वळचणीच्या पाण्याची धार, पाउस थांबण्याची वाट पहात वर पहात उभे असलेले चुकार वाटसरू, सिगारेटच्या धुराची ओलसर हवेत रेंगाळणारी वलये, खडबडीत, ओलसर आणि मध्ये मध्ये चमकणारा रस्ता आणि या सगळ्याच्या न जाणवणाऱ्या पार्श्वभूमीला असणारा प्रकाशाच्या छिद्रांचा अंधार.
असा 'एक क्षण' सापडत नाही. स्वतःचं अस्तित्व आणि क्षण वेगळा काढता येत नाही. काहीतरी एकच जाणवू शकतं.
स्वतःच्या आतले विचार याक्षणी पॉज केले आणि रेखाटायला घेतले तर? एखादं प्रवाह असेल, ज्यात हे जे लिहितो आहे त्याचे विचार असतील, त्याच्या विरुद्ध दिशेने वाहणारा 'काय यार, काय बकवास लिहीतोयस? हे काय लिहिणं आहे? साला, यात काय दम नाही. पुचाट' हा एक प्रवाह. चित्राच्या कोपर्यात राहिलेलं वाचन, करू करू म्हणत उगाच गेलेला दिवस, ह्याला-त्याला सांगायचा काही-बाही , रेंगाळणारी कामे, नुसतेच ऐकू येणारे आवाज, मधेमधे असलेली शांततेची विरळ बेटे आणि या सगळ्या दृश्याला सावरणारा आणि त्यात मिसळूनगेलेला कंटाळा.

जेरी पिंटो ह्यांचे 'Murder in Mahim'

मला ह्या कादंबरीमध्ये सर्वात जास्त काय आवडलं असेल तर रोमन भाषेत येणारे हिंदी आणि मराठी शब्द. छ्या/छे असा उच्चार असलेली इंग्लिश कादंबरी अजून...