Saturday, April 17, 2010

Nightingale

मला 'Nightingale' ऐकायचय तुझ्यासोबत. मंदपणे लहारायचं सुरांवर, व्हायोलीनच्या तरंगावर दूर दूर जायचय जिथे तू आहेस, पहाट उमलून येताना रात्रीच्या पोटातून, मला तुझ्या कुशीत शिरून ऐकायचंय शरीराचं स्पंदन बहरून येताना.
आठवतं तुला पहिल्यांदा ऐकवलेला हा सुरांचा आर्त अर्थ. आणि मग तू म्हणालेलीस या नंतर नको वाटतं काही,कुठे जाण, बोलणं, अगदी तूही.
रात्रभर जागू, आधी कसे शब्द शब्द असतील नुसते,ग्रेसच्या कविता, आरती प्रभूंच्या शब्दांची वळणे. सगळं सगळं सांगू ना एकमेकांना. कदाचित सुचणारच नाही काही बोलायला, मग असेच बसून राहू, तुझं माझं जवळ असणं अनुभवत. मग रात्र येईल ना उताराला, तार्यांच्या अंगणात मंद गारवा प्रवेश करेल, तेव्हा हातात हात गुंफून तळ्याकाठी चालायला जाऊ. समोरच्या स्तब्ध, निश्चल पाण्यात प्रतीबिम्बांचे विभ्रम किती काय कोडी घालतील, आपण नुसतीच पाहू. तुझ्या माझ्या असणाच्या कोडयापुढे बाकी सगळीच सोपी आहेत. झाडाशी शेवटची गुजगोष्ट करून काही पानं गळत असतील, वारा उडवत नेईन त्यांना, तेवढ्यापुरता झाड हलेल कदाचित आणि मग नव्या पालवीच्या हर्षाने हरखायला मोकळाही होईल.
मग जेव्हा एकटा वायोलिन वाजेल ना, तेव्हा खूप दिवस सलत राहिलेले काही व्रण पुन्हा जिवंत होतील. श्वासांचा नाद एक लय चुकेल, डोळ्यांच्या कडेशी अलगद चुकार अश्रू येईल, कोण कुठला...
मला ऐकायचं तुझ्यासोबत आपलंच गाणं आणि मग निघून जायचय कधीच परत न यायच्या मौनाच्या देशात....

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...