Sunday, April 18, 2010

अर्थविभ्रम

मी देणार तरी काय तुला. मी घेत असतो फक्त माझ्या आवर्तात ओढल्या जाणार्या आणि मग विरून जाणार्या प्रत्येकाकडून. आणि बोलू नये खरं असं स्वताच्याच्याच कोशाला गहिरा करणारं, पण हे आवर्त इतका सोपा नाही जितकी सहज समजतीयेस तू. माझं असणं खूपच फसवं आहे, आणि एकदा असण्याच्या विभ्रमाचे रंग उमटले ना तुझ्या तळहातांवर कि मी नसताना तुला कोराच दिसेल तुझा तळहात. मग प्राक्तनाच्या अदृश्य शब्दांची वाट पाहणं आणि आठवणींचे रावे आवरून धरणं अस्तकालीन उद्रेकांच्या दाहापासून. आता लिहितोय हेही विरोधाभासाच्या प्रत्ययी लयीत. ग्रेस आहे खरा ह्या शब्दांत, पण त्याचे शब्द तरी त्याचे कुठे होते?
हे असं कोणाला सांगण्याची सवय असणं वाईटच. कुठेतरी हरवतोच नितळ आपलेपणा. नाहीतर चांदण्याच्या कुंडलीत हवा जन्म, कि जे माणूस गवसाव तेच असावा सार्या सादांचा प्रतिसाद. आपल्यातच जेव्हा ओळख-अनोळखीचा जीवघेणा खेळ असतो ना, तेव्हा समोरचा माणूसही तेच राहत नाही कायम. कधी मौनाला अर्थ बिलगून येतो आणि कधी मौनात सारेच संवेद तडकून जातात, शब्दाच्या जन्माचं भाग्य न मिळाल्याने. तुला परिणीती हवीये माझी तर्कशुद्ध, का संद्याहीन आकारातही तू पाहू शकतेस रचनेचं मूळ. दुर्बोध होत असावेत माझे शब्द, पण स्वतःला सोप्या गोष्टीत उलगडू गेलो, तर अजून कोणाची गोष्ट बनेल, माझी नाही आणि मग तुझीही नाही.

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...