Tuesday, April 27, 2010

विरत जाणारे हळवे सुख. सकाळपासून हि ओळ माझ्या सोबत आहे. रिक्षात बसून येत होतो. पाठी वळून न बघता आईचा निरोप घेतला होता. खरतर ५-६ दिवसांसाठी घरापसून दूर जाणार. घर ते पण काय, स्वतचा कोंडमारच जिथे जास्त जाणवला ती जागा, पण तरीही आई अशी निरोप द्यायला बाहेर आली कि तुटत राहत. काहीतरी ठेवून चाललोय मागे असं जाणवत राहता. आईचे वाटेकडे पाहणारे डोळे जाणवत निघालो. रिक्षा तिच्या गतीने धावत होती. शहरही जागा होऊन धावायला तयार होत होतं. अर्धवट झोप, करायच्या कामांची काळजी, आणि सदैव चालू असणारे बिन लाग्याबंध्यांचे विचार याच्यामध्ये एक सुखद झुळूक जाणवली वार्याची. एक मस्त गार लहर अंगभर. खरतर तासाभरात उन्हाची तल्खली सुरु होणार, मग हा गारवा कुठला. हि येणाऱ्या पावसाची चाहूल का गेलेल्या थंडीची चुकार आठवण. मग हि ओळ आली, कोपर्यात घर कार्रोन बसली, आयुष्याचे संदर्भ आणि ज्या माणसांच्या आठवणीनी प्रत्येक वळण लक्षात ठेवला त्या सार्यांचा अर्थ ह्या ओळीतच उलगडायला लागला.
पण आता रात्र झाली. तशी प्रत्येक दिवसालाच बिलगूनच रात्र येते. पण रात्र म्हणजे दिवसाच्या जाणिवेची वाढ नाही, तिला स्वताचा असा मंथर काळोख असतो, त्या काळोखाला आठवणींच्या डोहाची खोली, आणि त्या खोलीत सापडणारे सल. हि अशी रात्र आली कि कठीण असतं. पर्याय नसतो ह्या अबोध वेदनांचा कैफ दारूमध्ये उतरवण्यावाचून. आता हेही पळून जाणच आहे म्हणा, त्या आठवणीना त्रयस्थपणे पाहू पाहणं चुकीचाच आहे ना. त्यांचा ओझा वागवत राहिला पाहिजे मात्यावर, म्हणजे जगण्याला आकार येतो, आणि एक स्थिर प्रकारही बनतो एकूणच जगण्याचा परिघाचा.
असो.
आता एवढा एकू यात नाहीये कुठलही आवाज माझ्या सभोवतालचा. म्हणजे खूप माणसे आहेत, त्यांचा काही ना काही चालू आहे. नेहेमीच असतं. मी वेगळाही पडलो नाहीये, पण माझ्यापुरता माझा एक जग आखल्यासारखा झाला आहे. माझ्या एका मित्राने कालच स्फिअर थिअरी मांडली. म्हणजे आपला जगणं वेगवेगळ्या स्फिअर मध्ये असतं. एका स्फिअर मधून दुसर्या मध्ये जाण, याच्या मध्ये जे पोकळी असते ना तोच कंटाळा असतो. हे स्फिअर एका केंद्राशी जोडले असले म्हणजे कंटाळा नसतो, कारण तुम्ही कोणत्या ना कोणत्या स्फिअर मध्ये असताच कायम. पण जर असे स्फिअर वेगवेगळे सतील तर मात्र कठीण असतो प्रकार. बरी वाटते ना एकूणच ही थिअरी. तर असा आता माझ्या शब्दांच्या जगात घुसलो आहे. उद्या पार लांब वाटतो आहे, आणि म्हणून जे आहे ते आत्ताच जागून घ्यावा, किमान लिहून घ्यावा असा वाटतं आहे. हे जे येतं ना ते पार तळातून येतं, कुठलेही सोयीस्कर पापुद्रे न चढवता. आता जगण्याचीच नशा झाली असती एवढी तर असा दुसरा काही चढवायला लागलाच नसतं, पण जगणं थेंब थेंब येतं आणि मध्ये एक स्तब्ध कंटाळा, कुठलाच पैल नसणारा. मग ह्या अशा चोरवाटा शोधायला लागतात.
रडायलाही येत नाहीये. म्हणजे खूप पलीकडचा स्थिर वाटतंय अशातला भाग नाही. थोड्या वेळाने येईलच सारा गुंता परत. पण आता एक थंड अलिप्तपणा आहे. मी पाहू शकतो, जमेल तेवढा लिहू शकतो. एका मैत्रिणीचा मेसेज आलेला. ती निरव रात्री चंद्र पहात बसलेली. तिलावाटलं मी कविता लिहीन आणि म्हणून तिने मला मेसेज केला. मी लिहिलं बसलोय दारू पीत. दुखावली ती. म्हणजे एकदा चांगला असणं सुरु केला कि ते बदलायची सोय नाही. आता चंद्र आणि कविता वगेरे ठीक आहे. तशी तीही ठीक आहे. झोपली ती आता. पण तिला कुठून कळणार कि काही मिनिटांपूर्वी मला तिचीच आठवण आलेली. आणि कळला तरी ते कळल्याने काय. जी तडफड आहे आत, जिला या क्षणासाठी सोयीस्कर अमली गुंगारा दिला आहे, तिचं काय.
हे मरणच, लघूमरण. इंद्रियांची जाणीव अस्पष्ट होत जाण, सभोवताल माझ्यावर जे चरे पडतो आहे ते न जाणवणं आणि उद्या नावाचा एक प्रश्नचिन्ह आ वासून उभा राहणार आहे थोड्याच वेळाने त्याचाही विसर पडणं. मरणच. पण म्हणून सगळे सल संपत नाहीत.
.... तुला काहीच सांगू शकणार नाही मी यातलं. माझ्या शब्दांत सापडणारा माझं अधुरं मीपण, त्याचा तू अर्थ लावू पाहशील. मी या जगण्याची एक उन्मुक्त परिभाषा आहे, जी माणसे जगत आली होती. आता आपण संकेतांच्या आणि परंपरांच्या विळख्यात आहोत आणि म्हणून एवढी तत्वाद्य्नाने उभी करतो आपल्याभोवती. पण हे समजणार नाही तुला. तू सार्या वेदना गिळत मूक राहशील, आणितुझं हे अबोल तडफडणं मला जाणवत राहील. पण जाणवूनही मी येवू शकणार नाही तुझ्या परिघात. तू निग्रहाने बाजूला ठेवशील मला. टोकदार संदर्भांचे भाले वापरून मला घायाळ करशील, आणि मग स्वताच्या वेदनांमध्ये हरवून जाशील. आणि जर तुला ह्या आवर्तातून बाहेर काढता येत नाही तर तुला स्पर्शण्याचा मोह मी केलाच का एवढा एक प्रश्न आरपार जात राहील माझ्या. काहीच उत्तर नाही माझ्याकडे, आहे तो एक असहाय्य करुण सल. आणि म्हणून प्रयाणपार जाणवला तरी ह्या सलाचा गुंता सुटणार नाही. माझीच उकल मला होत नव्हती , आणि म्हणून तुझं अठरावा उंट झाला ना. आता कितीही म्हणून कोरडं व्हायचा म्हटला तरी आठवतंय तुझं निर्व्याज हसणं, स्वतात हरवून जाण आणि कधीतरी कोरडठक्क होऊन माझ्याकडे पाहणं.
ग्रेस म्हणून गेला ना,
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया...
तसं ह्या सलांचे कोंभ उगवून येवोत, एकदा तुझ्या निरागस असण्यात मलाही माझं मूळ सापडो आणि मग कुठचाही सुख जाणावताना त्याच्या शेवटच्या टोकाचा विरत जाणारा स्पर्श सोबत करतो ना तसं हे आयुष्य विरत जावो.
तुझ्या आठवणीच्या साठी आता हे एवढंच...

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...