Tuesday, January 28, 2020

मराठीतील फिक्शन क्षीण होते आहे का: चारचौघांची चर्चा आणि हौशी क्ष-किरण

(मराठीतील फिक्शन, म्हणजे कथा आणि कादंबरी, क्षीण होते आहे का ह्यावर पॉडकास्ट सदृश्य काही बनवावं असा विचार मेघना, आदित्य, नंदन आणि मी केला. त्यातून बनलेले तीन ऑडिओ 
मेघनाने घेतलेली पंकज भोसलेची मुलाखत 
फिक्शन क्षीण होते आहे का – बेसिक मांडणी 
मागच्या 25 वर्षातील लक्षणीय फिक्शन 
ह्या चर्चा रेकॉर्ड करण्याच्या आधी मी मला नेमकं काय वाटतं ह्याबद्दल काही नोट्स काढल्या होत्या. त्या पुढे शेअर करतो आहे. )

मराठी फिक्शनबाबतचा प्रश्न मी माझ्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ च्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा मांडला. माझ्या मनात आलेला प्रश्न हा प्रामुख्याने मराठी कादंबऱ्याबाबत होता. त्यातही मी मला झपाटून वाचाव्याश्या मराठी कादंबऱ्या फारच कमी येत आहेत अशा प्रकारची मांडणी केलेली होती. कथा हा विषय माझ्या डोक्यात अजिबातच नव्हता. ह्याचं कारण, subconsciously मला मराठीत फारच जास्त कथा लिहिल्या जातात असं वाटतं हे होतं हे नंतर स्वतःच्या निरीक्षणातून माझ्या लक्षात आलं. 
मी पेशाने समीक्षक नाही. (समीक्षक असणं हे सौंदर्य निर्माण करण्याची कुवत नसल्याने सौंदर्याबद्दल बौद्धिक मैथुन करून आनंद घेण्यासारखं आहे असं काहीकाहीवेळा मला वाटतं. पण अर्थात आनंद नसण्यापेक्षा कसलाही आनंद बराच!) त्यामुळे माझं माझ्या ह्या साहित्यिक प्रश्नाकडे बघायचं फ्रेमवर्क हे माझ्या सामाजिक शास्त्रातील संशोधक असण्याच्या पेशाने प्रेरित झालेलं आहे. ‘मराठी फिक्शन क्षीण होते आहे का? मरू घातली आहे का?’ ह्या प्रश्नाचं उत्तर डिमांड-सप्लाय फ्रेमवर्कमध्ये आणि डिमांड-सप्लाय बनण्याचा प्रक्रियेत आहे असं मला वाटतं. पण मराठीत फेमस असलेले व्यक्तीसापेक्ष क्ष-किरण टाकून व्यक्तीसापेक्ष निदान करण्यापेक्षा वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांचा हार्ड डेटा घेऊन ह्या प्रश्नाचा अभ्यास केला पाहिजे असं माझं मत आहे. माझ्या ह्या टिपणाच्या शेवटी मी ह्याबाबत जास्त बोलेन. 
मी, मेघना, नंदन आणि आदित्य, हा जो आमचा गट आहे ज्याने थोडा अधिक पद्धतशीर धांडोळा घ्यायचा ठरवला आहे त्या चर्चेत आणि मेघनाने पंकज भोसले ह्यांच्यासोबत केलेल्या चर्चेत फिक्शन घटली आहे ह्यावर एकमत आहे आणि त्याची काही कारणेही पुढे आलेली आहेत. 
त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे: -फिक्शन हे प्रामुख्याने मनोरंजनासाठी केलं जाणारं वाचन आहे. आणि मनोरंजनाचे नवे पर्याय (टीव्ही, स्ट्रीमिंग) हे निर्माण झाल्याने पुस्तकांची स्पेस घटली. हे सारे बदल लक्षणीयरित्या घडले ते १९९० च्या आर्थिक उदारीकरणानंतर. 
 मला स्वतःला हे कारण सुरुवातीला पटलं. पण नंतर विचार करता त्यात थोडी विसंगती आहे असंही वाटलं. 
आर्थिक उदारीकरणानंतर मराठी शिकलेले लोक आणि त्यांची क्रयशक्तीही वाढली. शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोचले, महाराष्ट्रातील मुंबई-पुणे-नाशिक त्रिकोणात मध्यमवर्गी आर्थिक सुबत्ता आली. मग हे नवे लोक आणि त्यांचा पैसा वाचनाकडे आलाच नाही का? का फिक्शनकडे आला नाही, पण बाकी मराठी साहित्याकडे विशेषतः सेल्फ-हेल्प, प्रेरणापर, माहितीपर साहित्याकडे गेला? 
समीक्षक आणि क्रिटीकल वाचकांच्या वर्तुळात नावाजली जाणारी फिक्शन आणि बाकी वाचकांना वाचावीशी वाटणारी फिक्शन वेगळी आहे का? उदाहरण घ्यायचं असेल तर ‘कोसला’ चं घेता येईल किंवा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ चं. ‘कोसला’ वर म्हटलेल्या क्रिटीकल वर्तुळात नावाजलेली आहे. पण माझी आजी, जी तिच्या आयुष्याची ७०+ वर्षे सातत्यपूर्ण वाचक होती तिने कोसला वाचलेलं नव्हतं. माझे वडील दर आठवड्याला एक मराठी पुस्तक, प्रामुख्याने फिक्शन(!) वाचतात, त्यांनी कोसला वाचलेली नाही. (त्यांना एकदा देऊन बघावी वाचायला असा प्रयोग डोक्यात येतो आहे!)
म्हणजे कदाचित माझ्या डोक्यात असलेली फिक्शन, जिला आपण ‘तात्विक फिक्शन’ म्हणूया, ती आणि बऱ्याचश्या वाचकांच्या वाचनातली फिक्शन वेगळीच असू शकते. 
ही तात्विक फिक्शन घटली आहे का वाढली आहे हे बघायचं झालं तरी कसं बघणार? एक प्रकार म्हणजे मराठीत १९९५ च्या आधी किंवा १९९० च्या दशकाच्या अगोदर काय अवस्था होती? तेव्हा खरोखरच, उपलब्ध क्रिटीकल वाचकांच्या डिमांडच्या प्रमाणात अशी फिक्शन बरीच येत होती का? का तेव्हाही तोकडी जाणीव होतीच? 
मेघना, नंदन आणि आदित्य ह्यांनी बनवलेल्या यादीत १४२ कादंबऱ्या आहेत. २५ वर्षांत १४२ कादंबऱ्या म्हणजे सरासरी साधारण ६ दरवर्षी. पण ह्या यादीत लोकफिक्शन नाही, म्हणजे विश्वास पाटीलांची ‘चंद्रमुखी’ नाही, ‘लस्ट फॉर लालबाग’ नाही, रहस्यकथा, भयकथा नाहीत, वसंत वसंत लिमये नाहीत. त्यांत आहेत ती सिरीयस वाचकांना भावलेली पुस्तके. 
मग वर्षाला ६ हा आकडा कमी का जास्त? मला स्वतःला असं वाटतं कि माझ्या मराठी वाचनाच्या भुकेला हा आकडा वाईट नाही. पण एखाद्या अधिक कमिटेड वाचकाला तो कमी वाटेल. आणि मुळात प्रश्न आहे कि १९९५ च्या आधी अशी सरासरी काय होती? 
दुसरी तुलना अशी शक्य आहे कि मराठीसारख्या दुसऱ्या भाषेत मागच्या २५ वर्षांत काय अवस्था आहे. मला वाटतं कि कन्नड आणि तमिळ ह्यांची मराठीशी तुलना योग्य राहील. ह्या दोन्ही ताकदवर प्रादेशिक भाषा आहेत, त्यांना मोठा भूभाग आहे, ह्या राज्यांतील शहरीकरण आणि मध्यमवर्ग ह्यांचा महाराष्ट्राशी सारखेपणा असण्याची दाट शक्यता आहे. इंग्रजी शिकणं ही उन्नतीची शिडी हे ह्या राज्यांतील मध्यमवर्गाने मानलेलं असावं. मध्यमवर्गाचा उपजीविकेचा प्रकारही सारखा असावा. पण ह्या राज्यांत भाषिक वैविध्य कमी आहे कारण हिंदी भाषिक कमी आहेत. त्यामुळे ह्या भाषांतील साहित्य व्यवहार अधिक ताकदवान असण्याची शक्यता आहे. म्हणजे ह्या भाषांची अवस्था ही चांगले टोक (upper bound) अशा अर्थाने वापरता येऊ शकते. 
वर केलेल्या विवेचनाचा दुसरा एक भाग असा कि मी मुळात क्षीण होण्याचा प्रश्न हा तात्विक फिक्शनलाच लावून पहावा. किंवा ‘मला झपाटून टाकणाऱ्या अशा तात्विक फिक्शनलाच’ लावून पहावा. इथे फारच व्यक्तीसापेक्षता आहे आणि त्याची मला जाणीव आहे. झपाटून टाकणं हे बदलत राहू शकतं आणि झपाटल्यागत वाचलं जाणं हाच काही पुस्तक आवडायचा एकमात्र निकष नाही. पण तो एक जोरदार निकष मात्र नक्की आहे. 
--
मी माझ्या ब्लॉगवर सुरु झालेल्या प्रश्नाचा नीट विचार केला. तो प्रश्न अशा मांडणीतून आला कि ७०० ते हजारभर पानांची कादंबरी मराठीत पुढच्या काही वर्षांत निर्माण होण्याची शक्यता काय? असे प्रोजेक्ट किमान २-३ वर्षांचे असू शकते. तेवढा वेळ आपल्या उपजीविकेला सांभाळून देऊ शकतील असे कोण मराठी लेखक आहेत? तेवढी बौद्धिक क्षमता असणारा मनुष्य मराठी कादंबरीकडे वळण्याची काय शक्यता आहे? असं होणार नाहीये असं मला म्हणायचं नाहीये. माझा संशोधकी पेशा मला ठाम विधाने करण्यापासून परावृत्त करतो. ‘असं व्हायची शक्यता कमी आहे’ असा माझा सुरुवातीचा कयास (null hypothesis) आहे. 
असं मला वाटतं ह्याचं कारण मुख्यतः सप्लाय साईडला, म्हणजे लिहिणाऱ्या लोकांच्या बाजूला आहे. वर म्हटलं तसं ज्या पद्धतीने उपजीविकांचा दाब (त्यात घालवायला लागणारा वेळ, शहरी प्रवास, टिकून राहण्यासाठी लागणारे उत्पन्न इ.) वाढतो आहे त्यापासून स्वतःला insulate करून लिहिणारे किती येतील? मागच्या काही दशकांत प्राध्यापकी पेशाने ही मुभा दिली असावी, पण नव्या काळात तशी मिळणार आहे का? आणि ज्यांना मिळणार आहे त्यांना लिहायचे आहे का? 
मला असं वाटतं कि मराठीत लिहू शकणारे लोक प्राध्यापकी पेशांत जायची शक्यता १९९० नंतर कमी झाली आहे. क्षमता असलेल्या मनुष्याला भौतिक उन्नती साधणं हे उदारीकरणाने सोपं करून सोडलं आहे. महाविद्यालयीन शिक्षणाच्या निवडीतच ही बाब दिसून येत असावी. थोडीही समज असणारा मनुष्य हा विज्ञान, कॉमर्स अशा शाखा निवडू पाहतो आणि अशी महाविद्यालये खालपर्यंत बनलीही आहेत. (माझ्या मांडणीचा अर्थ आज अकॅडेमिक उपजीविका असणारे मराठी लेखक हे कमी प्रतीचे आहेत असा नाही. आज असे करणारे लोक 1990 च्या आधीच्या प्रमाणाहून कमी आहेत असा आहे.)
हा कयासही तपासता येई. कला शाखेत नावाजलेल्या महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेचा डेटा पाहून हे सांगता येईल. 
मराठीत लिखाण हा हौसेचा मामलाच आहे, विशेषतः मजबूत लोकप्रियतेच्या प्रतलाच्या खाली असलेल्या लेखकांना. (म्हणजे अच्युत गोडबोले, पु.ल. देशपांडे अशी लोकप्रियता!) पंकज भोसल्यांनी त्यांच्या ऑडीओमध्ये हा मुद्दा मांडला आहे. हौस ही वेळेवर आणि स्पेसवर अवलंबून असते. ही वेळ आणि स्पेसच दुर्मिळ झाली आहे. केवळ उपजीविकेच्या दाबानेच असं नाही. कदाचित व्यक्ती म्हणून आपण अधिक impatient झालो आहोत, आपल्याला अधिक रंजक आकर्षणे उपलब्ध आहेत, समविचारी लोकांसोबत वेळ घालवणे शक्य आहे आणि सोशल मिडिया आहे. 
एकूणच का लिहावं (त्याचे आत्मिक-भौतिक फायदे) आणि काय लिहावं (शहरी मराठी लेखकांचे एकजिनसी विश्व आणि ग्रामीण-शहरी किंवा ग्रामीण अशा लेखकांचे वेगळे पण परत एकजिनसी विश्व ह्यांत नाविन्य येणार ते कुठून? बरं, ह्या दोन्ही गटांत फिक्शनला वैयक्तिक साठमारी, जात आणि इतिहास ह्यांवर प्रहार करायचे अस्त्र म्हणून वापरायची ही खास मराठी खुमखुमी आहे तो वेगळा एकजिनसीपणा.) ह्या बेसिक घटकांत आलेला कमकुवतपणा हाच क्षीण प्रवाहाचे कारण असेल का?   
का लिहितात आणि काय लिहितात हे मोठेच तात्विक प्रश्न आहेत. त्यांची ठाम उत्तरे आपल्याकडे नाहीत. पण जगभरातल्या अभ्यासावर हे दिसतं कि जर लेखकांची सांपत्तिक स्थिती बरी होत असेल तर ते अधिक आणि अधिक गुणवत्तेची निर्मिती करतात. आणि त्यांना ही बरी अवस्था पुस्तकांच्या मानधनातूनच मिळत असेल असे नाही. शिष्यवृत्त्या, पाठ्यवृत्त्या ह्यांतूनही त्यांना लिखाणाला लागणारी स्पेस मिळू शकते. अशा सपोर्ट स्ट्रक्चरची उपलब्धता ही समाजाच्या भौतिक आणि बौद्धिक संपन्नतेवर अवलंबून असावी. 
मराठी वाचक, विशेषतः मध्यमवर्गीय वाचक हे भौतिकदृष्ट्या तर संपन्न आहेत. मग वाचनाची डिमांड का घटते आहे? डिमांड घटते आहे हे तसं स्पष्ट आहे. मागच्या दोन महिन्यांत दोन नियतकालिके बंद पडली. (अक्षरधारा आणि अजून एक, ज्याच्या संपादकाने फेसबुकवर आपली भूमिका मांडली होती.) माझ्या शहरातील खाजगी वाचनालये बंद पडली. 
वाचनालयांचा प्रश्न मराठीपुरता मर्यादित नाही. शहरातील जागांचे भाव बघता वाचनालय हा जागेचा वाईट बाजारी उपयोग ठरतो. जागेचा अपव्यय वाचवावा म्हणून मुंबईतील ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीनेही आपली लायब्ररी केवळ ऑनलाईन कॅटलॉग चाळून पुस्तके मागवणे अशी मर्यादित केलेली आहे. 
डिमांड घटण्याचा सर्वात मोठा घटक आहे तो म्हणजे इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची घटती गुणवत्ता. मध्यमवर्ग इंग्रजी माध्यमाकडे वळल्याने मराठी पुस्तकांची, लेखकांची शालेय वयात होणारी ओळख कमी होते. घरातून वाचनाचे बाळकडू असेल तर काही अपवाद असू शकतात. पण फिक्शनमध्ये वापरली जाऊ शकणारी लवचिक मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या मराठी पाठ्यपुस्तकातील बाळबोध मराठी हे एकमेकांशी जुळत नाहीत. त्यात जर विद्यार्थी अप्रादेशिक बोर्ड्स (जसे CBSE) असेल तर मराठीची पालकांमुळे तोंडओळख एवढाच प्रकार उरतो. मुंबईतील दाक्षिणात्य कुटुंबातील प्रादेशिक इंग्रजी माध्यमांत शिकणाऱ्या मुलांचा जसा त्यांच्या मातृ-पितृ भाषेशी प्रामुख्याने संवादभाषा म्हणून संबंध राहतो तसं ह्या मुलांचं होतं. नवे मराठी वाचक बनण्याची शक्यता कमी होते किंवा बनतच नाहीत. 
जे मराठी माध्यमांत आहेत तिथे रोल मॉडेल क्रायसिस आहे. मुले इतरांचे पाहून शिकतात. आज मराठी माध्यम हे बहुतांश हुकलेल्या पालकांचे आहे. (पुण्या-मुंबईचे काही अपवाद सोडून!) हे पालक स्वतः फिक्शनवाचक असण्याची शक्यता नाही. ह्या हुकलेल्या पालकांतील महत्वाकांक्षी पालक वाचनाकडे भौतिक उन्नतीची शिडी वेगाने चढायचे साधन म्हणून पाहतात. फिक्शन ह्या शिडीत येईल का, जितके माहितीपर किंवा सेल्फ-हेल्प लिखाण येईल? 
मराठी माध्यमांच्या सुरकुतत चाललेल्या शाळांमधून कसे आणि किती वाचक येतील? प्रादेशिक इंग्रजी माध्यमातून किती येतील? आणि अप्रादेशिक माध्यमातून किती येतील? ह्याची उत्तरे आपल्याला माहित नाहीत. पण ती नकारात्मक असावीत असं मला वाटतं. 
--
मी वर मांडलेले मराठी फिक्शनच्या एका उपविभागाबद्दल मांडलेले कयास हे कदाचित सगळ्याच मराठी फिक्शनला लागू पडत असावेत. पंकज भोसल्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित लोकफिक्शनलाही तो लागू पडत असावा. त्यांनी दिलेलं शृंगारिक साहित्याचे उदाहरण चपखल वाटते. मराठी शृंगारिक साहित्याच्या घटत्या निर्मितीला दृश्य माध्यमाची वाढती उपलब्धता जबाबदार असावी असं वाटतं. डिमांड घटली आणि मग सप्लाय घटला. 
वाचनाची क्षमता असणाऱ्या व्यक्तीची वाचनाची स्पेस घटली आहे. ही घट दोन प्रकारची आहे, फोकस आणि वेळ. लोकांच्या उपजीविका ह्या अधिकाधिक बौद्धिक ताण देणाऱ्या होत आहेत, ज्याने फोकस घटतो आहे. वाचन ही श्रमाची बाब आहे, तात्विक फिक्शन वाचणं ही अधिक श्रमाची. उपजीविकांचा वेळ वाढलेला आहे आणि गंभीर व्यक्तीलाही तात्विक रंजनाच्या बऱ्याच जास्त गोष्टी उपलब्ध आहेत. पण अर्थात वाचनाला रंजन म्हणून घेऊ शकणारे लोकही वाढले आहेत. त्यामुळे नक्त इफेक्ट काय आहे हे एखाद्या सर्व्हेनेच समजू शकेल. नितीन रिंढे ह्यांनी नेमकी हीच गरज त्यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत व्यक्त केली कि वाचणाऱ्या लोकांच्या वर्तनावर अधिक प्रकाश पडायला हवा आहे.
--
मराठी साहित्य, भाषा ह्यांच्याशी आधारित उद्दिष्टांवर कार्यरत संस्था, अशा विषयांत स्वारस्य असणारे लोक ह्यांनी फिक्शनच्या निर्मितीबाबतच्या प्रश्नांना डेटा वापरून उत्तरे देता येण्यासाठी रिसोर्स उभे केले पाहिजेत. विशेषतः वाचकांची निर्णयप्रक्रिया आणि वाचकांच्या विविध उपस्तरांची निर्णयप्रक्रिया समजून घेण्यासाठी विविध भौगोलिक-सामाजिक स्तरात पोचणारे सर्व्हे आवश्यक आहेत. 
का करावा असा अभ्यास? वर म्हटलं तसं, बौद्धिक रंजन म्हणूनच. त्यातून भाषा आणि व्यक्ती संबंधावर अधिक प्रकाश पडेल हे नक्की. पण आपण मराठी भाषा, मराठी लिखाण ह्यांना वृद्धिंगत करणारे फार काही करू शकू असे नाही. 
लोक धोतर सोडून विजारी वापरू लागले, सहावारी सोडून नववारी साडी, साडीच्या ऐवजी ड्रेस वापरू लागले कारण अधिक सोयीचे आहे. तसे लोक भाषेशीही करतील. एकदम प्रोफेटिक व्हायचं झालं तर, मराठी प्रामुख्याने बोलीभाषा होण्याच्या प्रवासात (म्हणजे पुढच्या शतकभरात वगैरे) त्यातली गंभीर/तात्विक फिक्शन कशी क्षीण होऊन एके दिवशी संपली ह्या ह्रासाचा वारसा लिहिणं ही बौद्धिक गंमत, पण उदास करणारी!   

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...