Tuesday, February 16, 2016

ब्लड टेलीग्राम

अमेरिकन डिप्लोमॅट आर्चर ब्लड, जे १९७१ मध्ये ढाका मध्ये होते त्यांनी त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्याने बांगलादेशात (त्यावेळचा ईस्ट पाकिस्तान) जे अत्याचार केले त्याबाबत वेळोवेळी आपल्या अमेरिकेतील वरिष्ठांना माहिती कळवली. एका टप्प्याला त्यांनी आणि त्यांच्या ढाका कौन्सुलेटमधील सहकाऱ्यांनी अमेरिकेच्या धोरणाचा निषेध करणारा संदेशसुद्धा आपल्या वरिष्ठांना पाठवला. त्यावरून ‘ब्लड टेलीग्राम’ हे नाव Gary Bass ह्यांनी आपल्या पुस्तकाला दिलेले आहे.
       हे पुस्तक १९७१च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाबद्दल आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे सहकारी किसिंजर ह्या दोघांनी जाणीवपूर्वक बांगलादेशातील अत्याचारांकडे दुर्लक्ष केले, पाकिस्तानची पाठराखण केली आणि भारतावर दबाव आणला. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी हुकूमशहा याह्या खान हे अमेरिकेला चीनसोबत परराष्ट्र संबंध पुनरुज्जीवित करण्यात मदत करत होते आणि अमेरिकेसाठी ही चीनी संधी महत्वाची असल्याने निक्सन आणि किसिंजर ह्यांनी याह्या खान ह्यांच्या बांगलादेशमधील असंतोष चिरडण्याच्या क्रूरतेकडे दुर्लक्ष केले. किसिंजर आणि निक्सन ह्यांना तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये काय चालू आहे ह्याची माहिती होती, पण त्यांनी पाकिस्तानची पाठराखण करण्याचा, आणि पर्यायाने मुजीब रेहमान आणि भारत ह्यांच्या लोकशाहीविरुद्ध उभा रहायचा निर्णय घेतला अशी मांडणी हे पुस्तक करते.
       किसिंजर आणि निक्सन ह्यांच्या टेप्सचा अभ्यास करून केलेली त्यांच्या निर्णयांची छाननी हा पुस्तकाचा महत्वाचा भाग आहे. पण त्याचसोबत भारतीय राजनैतिक अधिकारी, भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी, भारतीय आणि अमेरिकन मिडिया ह्या सर्वांच्या भूमिकांचीही पडताळणी ह्या पुस्तकात आहे.
       पुस्तकाची मांडणी उत्कंठावर्धक आहे. पण कुठेही सांगण्याचा सोस हा होलसेल विधाने करण्यात रुपांतरीत होत नाही. (हे साऱ्याच वेल रिसर्चड आणि वेल रिटन पुस्तकांचे वैशिष्ट्य असते!). अनेक मुलाखती आणि राजकीय कागदपत्रे ह्यांच्या सहाय्याने ही गोष्ट उलगडत जाते.(अर्थात इंदिरा गांधी ह्यांचे पेपर्स हे अजून रिसर्चसाठी उपलब्ध नाहीत!) पुस्तक frank आहे, म्हणजे बांगलादेशमध्ये मारले गेलेल्यांमध्ये आणि भारतात निर्वासित म्हणून आलेल्यांमध्ये प्रामुख्याने हिंदू होते आणि असे अर्ग्युमेंट आर्चर ब्लड ह्यांनी थेट आणि भारतीय सरकारने अप्रत्यक्षपणे केले होते हे पुस्तक सांगते. त्याचवेळी पाकिस्तानकडून अधिकृतरित्या(!) युद्ध सुरु व्हायच्या अगोदरच भारतीय लष्कराने तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील मुक्तीबाहिनीला प्रशिक्षित करणे आणि वेळप्रसंगी सीमारेषा ओलांडून मुक्तीबाहिनीला मदत करणे ह्या गोष्टी सुरु केल्या होत्या अशीही मांडणी पुस्तकात आहे.
--
       मी खरंतर किसिंजरचं ‘वर्ल्ड ऑर्डर’ वाचत होतो. चूक-बरोबर माहिती नाही, पण किसिंजर ह्यांची शैली आणि वाचकाला ग्रीप करण्याची क्षमता जबरी आहे. मी ‘वर्ल्ड ऑर्डर’ वाचायला लागलो कारण मार्क झुकरबर्गबद्दलच्या एका फोटोत मला हे पुस्तक दिसले. त्याबद्दल बोलताना एका मित्राने मला ‘ब्लड टेलीग्राम’ बद्दल सांगितले. आता मला किसिंजर ह्यांचं ‘वर्ल्ड ऑर्डर’ वाचायला थोडी शंकाच आहे. आपल्या चुका आणि आडाखे बरोबर होते हे ठरवण्यासाठी तर त्यांनी पुस्तके लिहिली नाहीत ना ह्या शंकेनेच मी ते वाचेन.
--
       देशभक्ती आणि देशद्रोह ह्यांच्या (बहुतांशवेळा वेळा निरर्थक) वाद-विवादात काही महत्वाचे प्रश्न, गृहीतके असतात. उदारमतवादी लोकशाही का बहुमत दहशतवादी लोकशाही हा असाच एक महत्वाचा प्रश्न आहे. भारतासारख्या देशात, जिथे सामाजिक आणि आर्थिक प्रक्रियांच्या विरोधाभासात राजकीय आणि सामाजिक उदारमतवाद रोपण करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नांची तात्विक पार्श्वभूमी समजून घेणे मला महत्वाचे वाटते. ही तात्विक पार्श्वभूमी समजून घेताना घटनांची होईल तितकी न्युट्रल मांडणी लक्षात येणे महत्वाचे असते. पुढे दिलेली पुस्तके मी ह्या अर्थाने, माहिती आणि चिकित्सा, वाचण्याचा बेत करतो आहे किंवा मी वाचली आहेत. आणि ही यादी एकदम तोकडी आहे.
१.       इंडिया आफ्टर गांधी : इट इज अ मस्ट बुक. आणि तुम्हाला गुहांची मते पटतात किंवा नाही म्हणून नाही, तर १९४७ नंतरच्या देशाच्या प्रवासाचे factual ओघवते प्रवासवर्णन अशा अर्थाने हे पुस्तक फार महत्वाचे आहे.
२.       आयडिया ऑफ इंडिया : सुनील खिलनानी – छोटे पण डेन्स पुस्तक. सध्या वाचतो आहे.       
३.       1971- A Global History of the Creation of Bangladesh : श्रीनाथ राघवन
४.       India’s China War – Nevil Maxwell : हे तसे जुने पुस्तक आहे.


वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...