Skip to main content

इस्लाम, आय.एस. आणि पाकिस्तान ह्याबद्दलची ३ पुस्तके


       मी अमेरिकन लायब्ररीचा मेंबर होतो, जवळपास ११ वर्षांमागे तेव्हा तिथे दहशतवादावरच्या पुस्तकांचं एक आख्खं सेक्शन होतं. मी त्या सेक्शनला फार हात लावत नव्हतो. मुळात तेव्हा मला वाटायचं की काही लोक आहेत जे दहशतवादी आहेत आणि येन केन प्रकारेण त्यांना मारून टाकणं हे अगदी बरोबर आहे. लादेन हा त्यांचं म्होरक्या आहे आणि एका ठराविक धर्माच्या लोकच दहशतवादी असतात. गेले ते दिवस.
       ११ वर्षानंतर लादेन मारला गेलेला आहे, पण इस्लामिक स्टेट नावाचा प्रकार त्याहून भयंकर तबाही माजवतो आहे. हे दोघे वेगळे आहेत. देश, धर्म आणि आर्थिक उद्दिष्टे ह्या सगळ्याचा झांगडगुत्ता झालेला आहे. हे एवढं मला समजलेलं आहे.
       श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारी कृत्याची प्रेरणा हे मला कुतुहलाचे विषय वाटतात. अनेकदा बुद्धीजीवी माणसे श्रद्धाळू माणसांच्या गटाचे स्पष्टीकरण देताना श्रद्धाळू गटाचे नेते कसे भोंदू आहेत, कसे विसंगत आहेत आणि कसे त्यांच्या स्वार्थासाठी अन्य लोकांच्या श्रद्धेचा वापर करून घेत आहेत असे मॉडेल वापरतात. माझ्या मते हे तसे तोकडे स्पष्टीकरण आहे. बुद्धीणे विचार करणारा  हे श्रद्धा पटकन समजू शकत नाहीत आणि त्यातून येणारी कृतीची प्रेरणासुद्धा.
       असो. मला इथे ३ पुस्तकांचा उल्लेख करायचा आहे.
१.       The Shade of SwordsM.J.Akbar  
२.       The ISIS Apocalypse  - William McCants
३.       Pakistan: A Hard County – Anatol Lieven

The Shade of Swords ह्या पुस्तकात अकबर ह्यांनी इस्लामची स्थापना आणि पुढे त्याचा झालेला भौगोलिक आणि राजकीय विस्तार मांडलेला आहे. त्यांची भूमिका तटस्थ संशोधक अशी नसून बिलीव्हर अशीच आहे हे त्यांनी लपवलेलं नाही. पुस्तकाचे उपशीर्षक मुस्लीम आणि ख्रिश्चन ह्यांच्यातल्या संघर्षाचा, म्हणजे जिहादचा इतिहास असे आहे. २००३ मध्ये लिहिलेले हे पुस्तक तसे जुने आहे.
ISIS Apocalypse बद्दल मला एका ब्लॉगवर माहिती मिळाली. ह्या पुस्तकातळी जवळपास निम्मी पाने संदर्भ आणि स्पष्टीकरणे आहेत! इस्लाम मधील प्रोफेसीस( भाकिते) आणि इस्लामिक न्याय (hadud) ह्या दोन घटकांचे चांगले स्पष्टीकरण ह्या पुस्तकात आहे. अल-कैदा आणि इस्लामिक स्टेटमधला फरक, सिरियाची दुटप्पी भूमिका आणि क्रूर, हिंसक आणि कडवे असणे ही सुद्धा कशी व्हायेबल राजकीय/धार्मिक. जिहादी चाल असू शकते हे मुद्दे ह्या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
Pakistan: A Hard Country हे एक खास पुस्तक आहे. खरंतर भारतात अशा पुस्तकाबाबत बोलणं म्हणजे वहाबी हिंदूंचा राग ओढवून घेणं. पण पाकिस्तान काय आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्वाचे पुस्तक म्हणजे Pakistan: A Hard Country. पाकिस्तान सरकार (प्रामुख्याने पंजाबी राजकारणी), पाकिस्तान तालिबान आणि अफगाण तालिबान, पाकिस्तानी सैन्य, आय.एस.आय, बलुचिस्तान, सिंध इथले असंतुष्ट गट आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन आणि फेडरली अॅडमिनिस्ट्रेड ट्रायबल रिजन ह्यांचे प्रश्न आणि ह्या सगळ्याच्या वर गंभीर होत चाललेला लोकसंख्या आणि रिसोर्सेसचा प्रश्न अशा अनेक अंगांनी पाकिस्तान बद्दल हे पुस्तक स्पष्टीकरण देते.      

      ही तीन पुस्तके संपूर्ण स्पष्टता देतील असे नाही. पण अनेकदा सोप्या भडकाऊ थिअरीमध्ये आपण महत्वाचे पॅटर्न विसरून जातो. फाळणीबद्दल व्हिलन ठरवायची अहमहमिका असताना ‘थॉटस ऑन पाकिस्तान’ ची स्पष्ट मांडणी लक्षात राहते.
       पाकिस्तान आणि इस्लामिक दहशतवादाचे प्रश्न हे दीर्घकाळ चालणार आहेत. आणि त्यामुळे अशी काहीतरी कृती असेल ज्यामुळे एका दमात हा प्रश्न सुटेल ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे कुठल्याही देशाला दीर्घकालीन उपाययोजना आखावी लागणार आहे. ही उपाययोजना करताना आपल्या समोरच्या प्रश्नांचे कंटिन्युअस अॅनालिसिस करत रहावे लागणार आहे. आणि कॅरट आणि स्टिक ह्या दोन्ही गोष्टी वापराव्या लागणार आहेत. त्यामुळे थंड डोक्याने होणारा रिसर्चला पर्याय नाही.

       एका कॉलमात सर्व प्रश्नांची उत्तरे द्या अशा आजच्या स्पर्धेत शेकडो संदर्भ, बरीच वर्षे आणि अपूर्ण उत्तरे अशा लिखाणाची आवड आपल्याला उरो.   

Popular posts from this blog

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.        माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणत…

हंडाभर चांदण्या

मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता. नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि …

एका मेटाफिजिकल कारस्थानाची दास्तान – १

एकदा एक नवा नवा कवी आपल्या बॅचमेटच्या गाडीतून बॅचमेटच्या इगतपुरीच्या फार्महाउसला चाललेला असतो. नवा नवा कवी आणि गाडीचा मालक हे एका प्रथितयश कॉलेजात एकत्र असतात. पुढे तिथून त्यांना नोकऱ्या लागतात. पुढे तिथून ते परदेशात जातात. पुढे तिथून ते अशा मोडला येतात जिकडे त्यांच्याकडे मुबलक पैसा जमून गेलेला असतो, त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांचे आई-वडील त्यांच्याशी विकली फोनवर आणि क्वार्टरली किंवा बाय-अॅन्युअली समोरासमोर फॅमिली हॉलिडेजना भेटत असतात. मग ह्या प्रदीर्घ का-या पण मुमुक्षू अवस्थेत त्यांना त्यांचा एक सुपर सिनियर भेटतो, जो मॅरेथॉन रनर असतो आणि व्हेन्चर कॅपिटलिस्ट. त्याला भेटल्यावर गाडीवाला मित्र एथनिक ठेपले आणि आचार विकण्याचा स्टार्ट-अप काढतो आणि उरलेला मित्र, ज्याला आपण नवा नवा कवी म्हणत आहोत, तो म्हणतो, आय विल आल्सो फॉलो माय कॉलिंग, मग तो कवी बनतो.        म्हणजे तो एका कॉलेजात व्हिजीटींग शिकवायला लागतो. बाकीच्या वेळात तो कविता करू लागतो, वाचू लागतो, फिरू लागतो. मग फेसबुक अनहर्ड व्होईसेस नावाच्या पेजला तो फॉलो करतो. मग ते सगळे पेजचे लोक महिन्यातून एकदा एकेका नामचीन ठिकाणी भेटून एकमेक…