Saturday, May 24, 2014

X-MEN

       सकाळी सकाळीच अचानक मी X-MEN: DAYS OF FUTURE PAST नावाचा चित्रपट बघून आलो. हा X-MEN साखळीमधला माझ्या माहितीप्रमाणे ६वा चित्रपट आहे. ह्या सिरीजची सेंट्रल थीम आहे म्युटंट. थोडक्यात, म्युटंट म्हणजे माणसासारखेच पण काही ना काही एकदम स्पेशल क्षमता असलेले. मानवी शरीरात म्युटेशन घडताना काही एक वेगळं घडून हे म्युटंट बनले आहेत.
       चित्रपटात त्यांच्या क्षमता ह्या एकदम हिरॉईक आहेत. त्यांच्या वर्णनापेक्षा त्या पहाव्यात, त्यात मजा जास्त आहे. पण ह्या क्षमता काही दैवी योगाचा भाग म्हणून आल्या आहेत असं नाही. तर मानवी उत्क्रांतीचा तो टप्पा आहे असं काहीसं त्यांचं स्पष्टीकरण चित्रपटांत येतं. माझा रस आहे तो ह्या स्पष्टीकरणात आणि त्याच्या आजूबाजूने इकड-तिकडच्या गोष्टींचे पतंग उडवण्यात.
       चित्रपट आणि सिरीजमध्ये असं म्हटलं आहे की हे म्युटंट जगभर आहेत. काही ना काही प्रमाणात, मागच्या काही शतकांपासून कुठे ना कुठे असे म्युटंट बालक जन्माला येत आहे. पण त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण ठाऊक नसल्याने आपण त्याला चमत्कार किंवा विकृती ठरवत आलो आहोत.
       आता म्युटंट जगभर आहेत म्हणजे भारतात असतील का नाही हा एक प्रश्न आहे म्हणा. कारण सारी दुनिया एक तरफ आणि भारत एक तरफ अशा प्रकारे वाटत असते. त्यातच इथल्या ऋषी मुनींनी प्रतीसृष्टी, नवी भूमी अशा इन्फ्रास्ट्रक्चर कामांत कायम पुढाकार घेतला असल्याने भारताला कायम बाकी पृथ्वी हा एक डीसकनेक्टेड प्रकार वाटत असे. त्यांना दया बुद्धीने काही वस्तू, कपडे एक्सपोर्ट कराव्यात, आपले ज्ञान त्यांवर उधळून लावावे, आणि उगाच त्यांच्या मारामारीत ढवळाढवळ करू नये असा खरा येथील खाक्या असे. सध्याचे पाखंडी विद्वान ह्याला शिव्या घालत असतील, अज्ञान म्हणत असतील पण त्यापाठी जी उपजत दयाबुद्धी आहे ती थेट म्युटंट प्रोफेसर चार्ल्स झेवियर ह्यांच्याशी जुळणारी आहे. आणि त्यामुळे असे समजण्यास प्रचंड वाव आहे की जसे कृष्णविवर, सापेक्षता, स्ट्रिंग थिअरी, क्लाउड कम्प्युटिंग अशा क्षुल्लक शोधांच्या बाबतीत आहे तसेच म्युटंटच्या बाबतीत आहे. ते म्हणजे हा सगळा प्रकार भारतात इतक्या आधीपासून चालत आलेला आहे की त्याकडे लक्ष देऊन त्यावर सिनेमा, नाटके, गेला बाजार अग्रलेख लिहावेत असेही वाटत नाही. चमत्कार हा येथील वातावरणाचा इतका स्थायीभाव आहे की म्युटंट वगैरे थिअरी मांडून त्याला उलगडण्याचे सोपे काम आपण, कायम आपला पाठलाग करीत असलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीवर सोडून दिले. माझ्यासारखे अडाणचोट लोक आज चित्रपट बघून ह्यावर चर्चा करतात.
       पण तरीही समजा भारतात कोण कोण असे म्युटंट होऊन गेले असं आपण म्हटलं तर आपण मागच्या ५० वर्षातली, म्हणजे आपल्या परंपरा आणि संस्कृती ह्यांच्या न संपणाऱ्या याद्या बाजूला ठेऊन, काही नावं काढायची म्हटली तर कोणती नावं येतील? मला तीन नावं सुचली.
१.       सत्यजित रे. हा लेख वाचा. ह्यात त्यांचा एक मास्टर स्ट्रोक आहे जेव्हा ते समजावतात की त्यांनी चित्रपट हे माध्यम का निवडले. मी त्यांचे तीनच चित्रपट पाहू शकलो आहे. आणि त्यातला ‘प्रतिद्वंद्वी’ हा मला सर्वात आवडलेला चित्रपट आहे. पण त्यांच्या मास्टर स्टोरी टेलर असण्याबाबत मला खरी मिळालेली किक म्हणजे फेलुदा.
मी फेलुदा वाचलं ते वयाच्या २७व्या वर्षी. पण त्याचा इंटेंडेड वाचक गट हा ‘कुमार’ गट आहे. आणि ह्या १२-१४ वर्षाच्या (म्हणजे हाच गट कुमार गट असावा असं मी मानतो. कदाचित हा माझा सुमारपणा असेल.) वाचकाला जे थ्रील हवे असेल, जे आपल्या कक्षेबाहेर असलेल्या जगात डोकावण्याची, जमेल तशी गायडेड टूर करण्याची खुमखुमी असेल त्यात फेलुदा खूप जास्त उतरतं.
कुमारसाहित्य (मला वांग्मय म्हणायचं होतं पण मला हा शब्द नीट टाईप करता येत नाही.), मराठीतील कुमार साहित्य, अमर चित्र कथा आणि लॉर्ड्स ऑफ द रिंग अशा अनेक नाजूक जागा खाजवण्याचा मोह मी आवरतो आहे. पण दोन मुद्दे आहेत: एक म्हणजे फेलुदा मध्ये हिरो सहज स्मोकिंग करतो. आणि त्यातला प्रामुख्याने हिरोईन रोलमधल्या स्त्रीपात्रांच्या , स्त्री-पुरुष संबंधांच्या संदर्भाचा अभाव. हे दोन्ही मुद्दे फेलुदा लिहिण्यामागे असलेले उद्दिष्ट आणि त्यावर नैतिक चौकटीचा प्रभाव दर्शवू शकतात(वजनदार झालं!). जर आज कोणी ‘फेलुदा’ शेरलॉक होम्ससारखा री-क्रिएट करायला घेतला तर?
२.       सचिन तेंडूलकर. ह्याबद्दल काही सांगायला नको. म्हणजे हा वूल्व्हरीन आहे भारतीय एक्स-मेन मधला अशी तुलना करता येईल जास्तीत जास्त.
३.       तिसरं नाव का मी सांगायला हवं. त्याच्या म्युटंटलीला जाणून घ्यायच्या तर नेट अपुरं पडेल. पण झलक हवीच असेल तर हा पाखंडी रिव्ह्यू. संग्रही ठेवण्यासाठी.
ह्या अत्यंत प्रभावी म्युटंटस् शिवाय कमी पण स्थिर प्रभावाची दोन जालीम म्युटंटस् आहेत असा माझा अंदाज आहे. ती कायम एकमेकांशी लढत असतात. ते म्युटंटस् का असू शकतात ह्याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे:
१.       गट पहिला: लेखक, प्राध्यापक, कवी, समीक्षक, कलाकार आणि विशेषतः भारतातील महानगरांत, मोक्याच्या ठिकाणी, मोक्याच्या पालकांमुळे किंवा मोक्याच्या ओळखींमुळे किंवा काही नाही तर सरकारी नोकरीमुळे वगैरे राहणारे किंवा परदेशी युनिव्हर्सिटीमध्ये असलेले संवेदनशील म्युटंटस्. मुख्य म्युटंट क्षमता म्हणजे कोणत्याही सामाजिक समस्येचे निराकरण लेख लिहून करणे. अधिक क्षमता असल्यास फेसबुक पोस्टमध्येच ते करणे. त्याहून जास्त क्षमता असल्यास नेमका मुद्दा न मांडता, त्यामुळे नेमका गट न कळल्याने सतत सर्वत्र असण्याची क्षमता. सर्वाधिक क्षमता असलेला गट म्हणजे भावनेला बुद्धी(इंटेलेक्ट) आणि बुद्धीला नैतिकता समजणारा.  
२.       इंटरनेट हिंदू राईट म्युटंटस्. हा गट वरील गट एकच्या क्षमतांवर आधारित आहे. मुख्य म्युटंट क्षमता म्हणजे केवळ एका कमेंट मध्ये राजकारण, जागतिक षडयंत्रे, इतिहास अशा कितीही ज्ञान शाखांना टारझन प्रमाणे लोंबकळून गट एकला चीत करणे. मुख्य म्युटंट अस्त्रे: ते करतात त्यांना का नाही बोलत असा प्रश्न विचारणे. त्यांनी केलं मग आम्ही का नाही असे प्रश्न. जे सर्व चांगले ते भारतीय आणि जे नाही ते पाश्चिमात्य अशी व्याख्या करणे, ती कोणाला न सांगणे आणि नन्तर त्यानुसार पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण सिद्ध करणे. इंटरनेटवरील पुरावे हवे तसे देता येणं. कोणत्याही वर्तमान घटनेचे समर्थन किंवा टीका ही भूतकाळ वापरून करणं. अत्यंत डिसिव्हींग म्युटंट. गट एकच्या वेब अस्तित्वात आपोआप म्युटंटजागृती. पण त्याचा भौतिक हसऱ्या, साध्या राहणीच्या कपडेराखू आणि सेव्हिंगवाढवू अस्तित्वावर परिणाम होऊ न देणं.
वरील दोन गटांतील एका अशाच टिपिकल लढाई बाबत माहिती हवी असल्यास इथे. गट पहिला साठी मुख्य लेख आणि दोन साठी कमेंट्स हे सांगायला नकोच.

बाकी आपल्या जिन्समध्ये असे काही भलते घडले नसल्याने आपण आपल्या महिनाभर न धुतलेल्या जीन्स पॅंट घालून असे सिनेमे पाहतो आणि मग असे कल्पनारम्य चोटरे चाळे करतो. वाईच गंमत.              

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...