Tuesday, March 18, 2014

बघ्या, जयंती आणि झीट

संस्कृती आजींना दरदरून घाम फुटला होता. दरदरून, म्हणजे भरभरून. आणि अजूनही ते स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं. ते आलेले स्वप्नात, ते.. शेकडो वर्षांतून एकदा येणारं स्वप्न. ती आवळलेली, उगारलेली मूठ, ती दाढी, ती छप्पन इंची, मिलियन संकटे झेलून, परत त्यांच्याच देशी मेकच्या उर्फ स्वदेशी तीक्ष्ण गोळ्या करून शत्रू गारद करेल अशी छाती.
       ह्या आधी आजी कार्यरत होत्या तेव्हा ते गेले, मग त्यांच्या सावलीत असलेले ते, ते आणि ते गेले. होन संपले. धावत्या घोड्याची कणसे संपली. मग मोती, हिरे आणि अशर्फ्या संपल्या. प्रेरणा विधवा झाली, परंपरा सती गेली, संस्कार परागंदा झाला, यवन बुडले, आंग्ल चढले. त्यांच्या मेकॉले नावाच्या शिलेदाराने नोकरी नावाची तोफ डागली, तिच्या धुराळ्यात संस्कृती आजी केव्हातरी बेशुद्ध पडल्या, त्या ह्या स्वप्नानेच जाग्या झाल्या.
       आजी गुडघ्यावर हात ठेवून उठल्या, तेव्हा त्यांचे गुडघे आर्ष करकरले. मग त्यांनी सिंधू नदीच्या साठवून ठेवलेल्या पाण्याने तोंड धुतलं, गंगेच्या पाण्याने चुळा भरल्या, यमुनेच्या पाण्याने शौच संमार्जन केलं आणि नर्मदेच्या पाण्याने नाश्त्याची भांडी धुवून घेतली. दंडकारण्यमधील लाकडांची चूल पेटवली आणि ती लाल फुंकणीने चांगली भडकवली. अखंड, अविरत आर्यावर्ताच्या नेमाड्यात, सॉरी कोनाड्यात ठेवलेले बत्तीस लक्षणी सतत सुवासित बासमती तांदूळ घेतले. मग भीमा, कृष्णा, गोदावरी ह्यांच्या जमेल तश्या पाण्याने त्यांचा भात करायला ठेवला. महानदीच्या काठच्या आणि सुदूर ईशान्येकडच्या कंद आणि स्वच्छंद भाज्या उकडायला ठेवल्या. त्यावर अहोम देशाचे तेल शिंपडले, कलिंग आणि आन्ध्र देशाचे मसाले छिडकले. बस्, चितळ्यांचे श्रीखंड राहिले.
       मग काळाच्या खडबडीत आणि कुठेकुठे माहितीच्या पेव्हर ब्लॉक्स मध्ये हरवलेल्या रस्त्यांवरून ‘एकं सत विप्रा बहुदा वदन्ति’ असं सुरुवातीला म्हणत, तद्नंतर क्रमाक्रमाने मनुस्मृती, पुरुषसूक्त घेत, सरतेशेवटी ‘पुरातन प्रभात’ चा अंक वाचत संस्कृती आजी चौकात पोचल्या.
       आणि पर दिग्मूढ, कालमूढ झाल्या. चुरालीया बिल्डर्स नावाच्या माणसाने प्रायोजित फ्लेक्स वर त्यांचा फोटो, तसाच, जसा स्वप्नात दिसला. संस्कृती आजींना गदगदून आलं.
       म्हातारी रडते पाहून एक पोक्त गृहस्थ त्यांची चौकशी करू लागले. आजींना त्यांना विचारले, वत्सा, ह्या साऱ्या कोलाहलाचे प्रयोजन काय? तेव्हा त्या पोक्त गृहस्थांस भोवळ आली. (त्या गृहस्थांचे नाव बघ्या असे असून ते अतिशय उद्विग्न मनस्थितीत असत असे कळले.) तसे त्यांच्यावर आपल्या जीर्ण परंतू तेज कायम राखलेल्या चीनांशुक वस्त्राचा अंगठीतूनही जाईल असा तलम धागा फिरवून आजीने त्यांना उठते केले. आपल्या खडबडीत हाताने त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, तसा नोस्टाल्जिया आणि सटायर ह्यांचा अंधेरा पडदा विरतो आहे असे झाले.
       ‘आजे, अद्यवासरे वर्षातील त्यांची ‘एन’ वी जयंती असून त्याची मिरवणूक त्याजी चुकातून सुरू होऊन, त्याजी चौकातून जाऊन त्याजी पुतळ्यापाशी संपणार आहे. सांप्रत आपण त्याजी चौकात उभे आहेत. लौकरच मंगलवाद्य, घोषवाद्य, रणवाद्य, बासवाद्य ह्यांचा निनाद करत अविवाद्य अशी ‘बोला....’ अशी घोषणा देत मिरवणूक येईल.’
       आजेने त्याच्याकडे पाहून प्राकृतात अलाबला घेतली.
       तेवढयात ‘ हे राजे, जी जी’ असा त्रिलोक दुमदुमून टाकेल असा ध्वनी निर्माण झाला. त्यापाठोपाठ जसे कुरुक्षेत्रावर एकामागोमाग एक शंख निनाद होऊन कौरवांचे धैर्य खच्ची झाले तसे ढोलपथकांचे दुर्दम ध्वनी निर्माण होऊन जे कोणी शंकित, लिबरल, सेक्युलर, कम्युनिस्ट अशा नावाचे शत्रू उपस्थित होते ते सारे गर्भगळीत झाले.
       त्या पाठोपाठ देशोदेशीच्या आयात तेलावर चालणारे मत्त ट्रक्स आले. त्यावर दहशतवाद आणि कोणताही आपल्याला न पटणारा वाद असाच संपवायचा असतो ह्याची फ्लेक्स होती. ट्रक्सच्या बाजूंना होऊ घातलेल्या धर्मयुद्धात आम्ही आमची शीरकमले अर्पण करण्यास सज्ज आहोत असे दर्शवणारे फ्लेक्स होते. ट्रक्स च्या आजुबाजुला स्मार्ट फोन्स घेऊन या बाजूची गर्दी त्या बाजूचे आणि त्या बाजूची गर्दी ह्या बाजूचे फोटो घेत होती.
       ‘हे तंत्रज्ञान जब्बू ऋषींनी निर्माण केले. त्यांच्या समासंगपिट्ट ह्या ग्रंथात त्याच्या उत्पत्तीचे आणि यंत्राधारित विराट उत्पादन प्रक्रियेचे वर्णन आहे.’ असे आजी म्हणाल्या. तेवढ्यात कोणीतरी त्यांच्यावर फ्लॅश मारला. पुढे ‘त्यां’ना सुयश चिंतणारी अजाण वृद्धा अशा नावाने त्यांचा पिक ट्रेण्डी बनला.
       पाठोपाठ ‘पुरातन प्रभात’ ची औक्षोहीणी आली. त्यांनी ‘... की जय’ ही घोषणा कंठ दुमदुमवून दिल्याने पौरुष ग्रंथी जागृत होऊन आणि विरश्रीयुक्त कंपने निर्माण होऊन कशी तेजस्वी संतती उत्पन्न होऊ शकते ह्याची पत्रके वाटण्यास सुरुवात केली. ती भरभर संपली.
       आणि मग एकच जयघोष ऐकू येऊ लागला. ‘आले, आले, आले’ असे जनसमर्द कुजबुजू लागला. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर लागलेले सारे दिवे जसे आजींच्या डोळ्यात एकवटले.
       अर्जुनाला जसे विश्वरूपदर्शन साहवले नाही तसे बघ्यालाही नाही. तो निश्चेष्ट पडला. पण ह्यावेळी आजीचे त्याच्याकडे लक्षही नव्हते.
       खास ऐरावत फॉर्ममध्ये तयार केलेल्या रथावर बसून ते आले. चौकातल्या त्यांच्या अश्वारूढ दूर क्षितिजाकडे पाहणाऱ्या पुतळ्याला त्यांनी पुष्पमालिका (हार हा शब्द नाहीच आता) अर्पण केली. आणि मग रथाच्या केशरी ध्वजाच्या जवळ येऊन ते बोलू लागले.
       त्यांची एक एक ऋचा आजींच्या कानात गुंजू लागली. भवभूतीने म्हटलेलं समानधर्मा आजींना हा हा समोर दिसू लागला. मेरे सपूत म्हणून आजी धावू लागल्या. तसे रक्षक त्यांना अडवू लागले, त्यांचावरून मेटल डिटेक्टर फिरवू लागले, त्यातून एक एक सूक्ते उमटू लागली.
       संस्कृती आजींना असे धावत येतांना पाहून रथाच्या पश्चचक्राच्या आड असलेल्या प्रेरणा आणि परंपरा (म्हणजे तिचे पांढऱ्या साडीतील सात्विक असणारे प्रारूप) येऊन आपल्या आईला बिलगल्या. रथाचे सुकाणू सोडून आलेला संस्कार आईच्या पाया पडला.
       हे महन्मंगल मिलन घडते तोच रथ पुढे सरकू लागला. त्याची कमलपुष्पांनी बनलेली आणि उद्योग कुटुंबांच्या लगामांनी जोडलेली चाके रोरावू लागली. एकच धूळ उडली, अगदी काळाची गती कुंठीत करणारी. आत्ता कुठे एकत्र झालेले कुटुंब परत विखुरले, काळाच्या पेव्हर ब्लॉक्सवर नव्या नव्या रुपाने आले.
       संस्कार आलोक बनला. आधी त्याने परदेशात नोकरी केली. मग त्याने संस्कारक्षम संध्यामालिका बनवायची वाहिनी उघडली.
       प्रेरणेचे हजारो तुकडे झाले. नव्हे, पावडर झाली. ड्रग्स घ्यावेत तशी लोक ती जमेल तेव्हा, जमेल तिकडून घेवू लागले. परंपरेने पांढरे सोडून खाकी कपडे घेतले आणि तिने प्रेरणेचे डीलिंग सुरू केले.
       ‘पुरातन प्रभात’ च्या साठवले महाराजांनी संस्कृती आजींना आपल्या सोबत घेतले. त्यांचे जमेल तसे स्नॅप शॉटस् ते देऊ लागले.
       बघ्या बेशुद्धच राहिला.
--
       ह्याचवेळी स्वराज्यातील हजारो किल्ल्यांवर आय’टी. मावळे सज्ज होते. त्यांनी आपापल्या सोशल मिडिया अकाऊंटवर लॉग इन केले आणि प्रतिक्रियांच्या तोफा गर्जू लागला.
       बहिर्जीने फोटो शॉप सुरू केले आणि वेगवेगळी माणसे आणि वेगवेगळी वाक्ये, किंवा चित्रे ह्यांचे जम्बुरके तो टाकू लागला.
       शेअर मार्केटच्या भिंतीला दडून बसलेली बिनीची फौज सावध झाली. तिने अस्वलाचे सोंग टाकले. आणि बैलांच्या पलीत्यांना चूड बाधून त्यांना पुढे पाठवले. आता गनिमी कावा. काँग्रलखानाचा कोथळा आणि केजीरेखानाची सारी बोटे. मग लाल किल्ला मोकळा.
--
       राजांच्या पुतळ्याला जयंती निमित्त घातलेले सारे हार काढून पुतळा परत नीट नेटका करावा म्हणून सफाई कामगार घेऊन आलेले उजवेकर आणि पुतळा आणि महानगर पालिका ह्यांच्या मध्ये चुरालीया बिल्डर्स आणि राजकारणी ह्यांच्याविरोधात निदर्शने करायला आलेले डावेकर ह्या दोघांनाही तिथे बेहोश पडलेला बघ्या दिसला. उजवेकर वाकून सुंगले, पण काही वास नाही आला. डावेकर आले, खिसा-पाकीट पाहिलं, त्यात एक अॅन्हिलेशन ऑफ कास्ट आणि सारामागो. उजवेकर सफाई कामगारांना घेऊन पुतळा साफ करू लागले. निदर्शनाला आलेल्या लोकांनी बघ्याला उचलून कडेला ठेवला.
       तिथे गुरवार म्हणून साईबाबांच्या मंदिराजवळ सारे भिकारी आणि बिगारी कामगार जमले होते. त्यांनी बघ्याला जागा केला. त्याच्या पाकिटातले सुट्टे रुपये काढून घेतले, त्याच्या हातात चहाचा कप ठेवला.
       झिरक्या साडीवर फाटका शर्ट घातलेली एक निम वयस्कबाई त्याला काहीतरी म्हणाली, बघ्याला तो कालचाच प्रश्न ऐकू आला,..ह्या कोलाहलाचा अर्थ काय...

Friday, March 14, 2014

बघ्या: प्रोलॉग आणि झवती गाढवं

      बघ्या त्रस्त आहे, म्हणजे दर काही दिवसांनी त्याला असं वेगवेगळ्या प्रकारच्या वैचारिक प्रकारचं झवतं गाढव पाठी लावून घ्यायची हौस आहे. किंबहुना थोडा थेरॉटिकल दृष्टीकोन घेतला तर बघ्या हा आपल्याला जे केलं पाहिजे ते न करणं, त्याऐवजी भलभलत्या गोष्टींकडे असं नाही तर तसं असं बघणं आणि मग त्या पाहण्याला उगाच काहीही प्रश्न विचारणं ह्या स्थिर अवस्थेत स्वतःला कायम ठेवायचा प्रयत्न करून असतो.
      दिवसभर बघ्या त्याच्या वैयक्तिक स्पेसमध्ये सिगारेटी फुंकत, कॉफ्या किंवा चहा पीत, जमेल तसे जेवत, सिनेमे किंवा सिटकॉम बघत स्वतःला कसलीतरी फंडामेंटल प्रेरणा यायची वाट बघत असतो. बघ्यासाठी हे एक जेन्युइन पाउल पुढे जावं म्हणून अनेक पावलं चालायची टाळणं आहे, म्हणजे स्वतःबद्दल मजेशीर वाटण्याच्या अवस्थेत त्याला असं वाटतं. ही अवस्था नसते तेव्हा बघ्याला बहुतेकदा जीव द्यावासा किंवा दारू प्यावीशी वाटत असते.
      ह्याशिवाय बघ्या मांजरी पाळतो आणि त्याच्या घरच्यांकडून पाळला जातो. मांजरी बघ्याच्या मांडीवर निवांत झोपतात, त्याच्या गादीत तो नसताना हागतात आणि तरी त्या त्याच्या पावलाला मान घासायला लागल्या कि बघ्या त्यांना काहीही करून दूर लोटू शकत नाही. म्हणजे तो तसं करू शकतो, पण त्याने उगा तसं नाही करायचं असं ठरवलं आहे. नाहीतरी कामू म्हटला होता, माणसं देवावर विश्वास ठेवतात, लग्न करतात किंवा प्राणी पाळतात.
      बघ्याची चाळ त्याच्या आजीसारखी ८० वर्षाची आणि तशीच जर्जर आहे. दोघींचं कंबरडं मोडलं आहे, दोघी अंथरुणाला खिळून आहेत, आणि दोघी जबरी मौल्यवान आहेत.
      बघ्याची आजी २३००० पेन्शन घेणारी खडूस म्हातारी म्हणून बॅंकेत फेमस आहे. बघ्याची चाळ मोक्याची जागची भरपूर भाव येईल अशी जागा म्हणून. दोघी अजून असण्याचं मुख्य कारण सरकार आहे, चाळीला रेंट कंट्रोल आणि आजीला पे कमिशन देऊन.
      बघ्याला दोघीही मरतील ह्या भीतीचे पोपडे काढण्याचा गंमतीचा खेळ खेळतो. आजी मेली तर आपल्या भूतकाळाचा मोठा तुकडा कापला जाऊन आपण एकदम वर्तमानकाळात फेकले जाऊ असं बघ्याला वाटतं. तो आजीची बडबड तासंतास ऐकतो, उगाच मानसोपचारतज्ज्ञ कशाला म्हणून बाकीचेही काही म्हणत नाहीत. चाळ मेली तर मांजरी कुठे जातील ही बघ्याची भीती आहे. चाळ आणि बिल्डींग ह्यांच्यातले काही फरक बघ्याने हेरले आहेत, त्यातला एक मुख्य म्हणजे चाळीला विद्रूप असण्याची साहजिक गरज असते तशी बिल्डींगला देखणं असण्याची. बिल्डींगचा अजून एक मुख्य गुणधर्म म्हणजे ती त्यातल्या प्रत्येकाला आपापला घाण, ओंगळ, विसविशीत आणि नागडा भाग झाकण्याची मुभा देते. त्याचा फायदा उन्मुक्त होऊ घातलेल्या कामजीवनास किंवा असहाय्य होऊ चाललेल्या म्हातारपणास होतो. पण ह्या मुभेची दुसरी बाजू म्हणजे बिल्डींग मधील जिना, पार्किंग, कंपाऊंड अशा सर्व गोष्टींना सार्वजनिक महत्व प्राप्त होते, त्यामुळे त्याच्या स्वच्छतेचे नैतिक दडपण सर्वांस घ्यावे लागते. ह्या नैतिक आणि आर्थिक उन्नत अवस्थेचा स्वाभाविक परिणाम म्हणून केवळ पाळीव माणसे आणि कुत्रे किंवा पाळीव माणसे आणि पाळीव कुत्रे अशांनाच बिल्डींग हा स्टेट्स प्राप्त होतो.
      जेलस बघ्या! आंबट द्राक्ष्यांच्या बागेचा रखवालदार बघ्या!!
      सिरीयसनेस अपार्ट, मांजरी ह्या स्वतंत्र असतात, आणि एकाच वेळी निष्पाप आणि संधिसाधू होण्याचे नाजूक आणि पारदर्शक कसब त्या ठेवू शकतात. किंबहुना हा निष्पापपणाचा आपोआप येणारा भाग आहे कि निष्पाप असणाऱ्या गोष्टींमध्ये जीवघेणा त्रास द्यायची प्रचंड क्षमता असते. त्याचमुळे शाळा, स्पर्धा, संस्कार अशा यंत्रांमधून निरागसपणाला व्यवहारकुशल निब्बरपणात बदलायचे कारखाने चालवले जातात.
      मांजरी नसणं हा आपला का नेमका लॉस आहे ह्याचा विचार बघ्या करतो. १. सवय मोडण्याचे दुःख २. त्यांचे आग्रही म्यांव म्यांव न ऐकता येणे ३. नेमके ज्या दिवशी बघ्या त्याचे घर सोडेल नेमके त्या दिवशी मांजरी काय करतील हा इमोशनल ताण, म्हणजे समजा त्याच्या मांजरींचा ताफा दरवाज्याशी आला, लोळला, पाय ताणून आळोखे पिळोखे देऊन ओरडू लागला, मान पुढच्या पायांवर ठेवून, मध्ये मध्ये कूस बदलून बदलून झोपला आणि तरीही कोणी दार उघडले नाही तर? ४. तसे बघ्या अनुभवातून शिकला आहे कि माणसासारखा तद्दन पाळीव प्राणीसुद्धा कितीही सवयी तुटल्या, सोबत संपली तरी आपोआप परत नव्याने पाळीव होतो आणि सरासरी जगात जातो तिथे मांजरे जगणार नाहीत काय! पण तरीही बघ्याला एक गोष्ट टोचत टोचत जाते, जशी काफ्का ऑन द शोअर मधल्या नकाटाला टोचते, कि सुरक्षित अवस्थेतून एखाद्याला परत व्हल्नरेबल अवस्थेत ढकलणं ह्यात काहीतरी चूक आहे, आणि तेही मांजरींना ज्यांना आपण सांगू पण शकत नाही पुरेशे अगोदर कि अमुचा रामराम घ्यावा. ५. आणि समजा जेव्हा जिथे मांजरी निवांत हुंदडल्या, सावलीत झोपल्या, अंधारात जुगल्या, कोपऱ्यांत व्यायल्या, कोवळ्या वयांत मेल्या तेव्हा झाडांखाली पुरल्या गेल्या, चोरट्या आणि रतीबाच्या दुधावर सुस्तावल्या तो चाळीचा आकार कोसळून मलबा बनेल तेव्हा मांजरी तिथे काही शोधतील का, का त्या नुसत्याच ओरडतील, मूक बघत बसतील, आणि एका क्षणाला पाठ फिरवून, शेपूट वर करून जातील, जसा बघ्या आणि बाकीचे करत आले.
--
      हा बघ्याचा सेन्स ऑफ लॉस. एवढंच बघ्याचं होऊ घातलेलं विस्थापन. बघ्या ज्या छटाकभर शहरात वाढला त्याचं गर्दीने तट्ट फुगून गेल्याने जिकडे तिकडे गर्दीच्या साचलेपणाआड येणारा शांततेच्या, निवांत रस्त्यांवर चालत गेल्याने येणाऱ्या स्तब्ध अवस्थेच्या अकाली मृत्यूचा सडेल वास आणि त्याने होणारी बघ्याची घुसमट एवढीच बघ्याची डेव्हलपमेंटबद्दल तक्रार.
--
      तरी बघ्या विचार करतो कि डेव्हलपमेंट मॉडेलचं आपण नेमकं काय करायचं, आपल्या कोणकोणत्या गरजा छाटायच्या का आपणच इथून दुसरीकडे कलम व्हायचं. मग बघ्या बिन इस्त्रीचे कपडे घालतो, महिनाभर एक जीन्स घालतो, बादलीतून अंघोळ करतो, हाताने कपडे धुतो. ह्या झ्याटू डिसीजन्स.
      बघ्या ठरवतो कि गर्दी नको. दररोज माणसांच्या एका गतिमान गोळ्याला चिकटून घ्या, सुट्टे व्हा, काही तास आपल्यासारख्या माणसांच्या महत्वाकांक्षा आणि समस्या ह्यांच्या गॉसिपात घालवून मध्ये मध्ये आपला ज्याच्याशी संबंध नाही अशा काही गोष्टी करा, परत माणसांच्या थकलेल्या, चिडचिड्या गोळ्याला डकवून घ्या, एक गोळा संपला कि दुसरा पकडा आणि मग परत तंतू तंतूमय अलग होत आपल्या काडेपेटीत हुकमी काडी बनून कधीही पेटात्से झोपा, ७०-७५% दिवस असं करा आणि उरलेल्या वेळात आहार, निद्रा, भय, मैथुन, प्रजनन, प्रतिक्षिप्त क्रिया, बाल संगोपन, मतदान, देशभक्ती, निसर्गरम्य स्थळी मानवेल अशी गर्दी करून आनंदी फोटोग्राफ्स आणि वारसा मागे ठेवून अहेव इच्छांसह मरण. बघ्या त्याच्या अॅबस्ट्रॅक्शनने थरथरतो. सही काळ,वेळ,मित्र असते, बघ्या प्रतिथयश असता. परत द्वेषमूलक बघ्या, खुसपट्या बघ्या!!
      बघ्याचा निश्चय पाहून शहर खदखदून हसतं. आणि आपल्या लक्झरी आणि नेसेसिटी नावाच्या दोन शुडांनी उचलून त्याला गरगर फिरवतं.
--
      बघ्याचा मित्र आणि बघ्या फुफ्फुसात टार भरायला बसतात, तेव्हा मित्र त्याचा टाय काळजीपूर्वक काढून ठेवतो. परवा हेड ऑफिसला जायचंय, तेव्हा लागेल म्हणून.
      त्यांच्या बाजूच्या टेबलावर ३ बाया आणि ४.५ पोरांचा कळप येतो, आणि टोटल ६ कटिंग मागतो. ०.५ मुलगी अर्धा चहा आणि स्वतः सांडते तेव्हा जेष्ठ बाई म्हणते, जीयेगी या मारेगी रांड. अब येहीच जिंदगी अपनी.
      बघ्या मोबाईलवर ताज्या बातम्या आणि नित्य नियमित पौष्टिक लेख बघतो.
      निर्भया खटल्यात चौघांची फाशी हायकोर्टात कायम. सत्यमेव जयते. क्लीशेड, क्लीशेड..
      मित्र म्हणतो, कोण आपल्याकडून, अर्धे का मुर्धे? बघ्या म्हणतो १५ मारले नक्षलवाद्यांनी, मित्र म्हणतो छपन्न इंच येईल तोच काहीतरी देईल करारा जबाब.
      बघ्या ह्याला मानवतावादी ऑब्जेक्शन घेऊ शकतो, बघ्या वाद टाळतो, होळीला करू म्हणतो
.
      बघ्याचं स्मार्टफोन, बघ्याचं वाढदिवसाचं गिफ्ट, त्याने मार्क केलेला लेख दाखवतं. लेख खुळचट विकासवादाच्या केविलवाण्या बळींबाबत बोलतो.
      बघ्याने फावल्या वेळेत वाचून ठेवलंय डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. आणि सहृदय होत तो म्हणू चाहतो कि शहरीकरण आणि कामगार कायदे बदलणे ह्यांना पर्याय नाही, हिंसेने काही सुटणार नाही. बघ्या ह्यावर रेफरन्स देऊ शकतो.
      बघ्या संपूर्ण शहरी बनावटीचा आहे. त्याला शेत, सावकार, भूमिहीन शेतमजूर, प्रकल्प, विस्थापन आणि पुनर्वसन ह्या सगळ्याबाबत काय करायचं हे कधी कधी उमगत नाही, मग तो आपत्कालीन एक्झीट शोधतो, ती उघडतो तेव्हा माहितीचा लोट येतो आणि बघ्याला लांब घेऊन जातो.
      दर सकाळी बघ्या हिरीरीने बसतो त्याच्या प्रश्नांचा साकल्य आणि नाविन्य अशा तेजस्वी तरीक्याने सुलझाव करायला. मग तो लिटरेचरच्या ढोलक्याचा दोन्ही बाजूंनी आनंद घेतो, ढोलकं थांबतं तेव्हा बघ्या नव्याने दिग्मूढ होतो.       
--
      बघ्या बघतो तेव्हा त्याच्या इमारतीच्या कळपातले नव म्हातारे-म्हाताऱ्या त्यांच्या नव नातवांना शाळेत सोडतात-आणतात. येताना मुले पेप्सी मागतात, मोठी मुले डेरी मिल्क, त्याहून मोठी एक छोटा.
      म्हातारे मध्ये मध्ये कट्ट्यावर बसतात, रेल्वे, राजकारण, पेन्शन, महागाई अशी चर्चा करतात. त्यावेळी ते समोरून जाणाऱ्या भिन्नलिंगीय तरण्या प्रजातीस न्याहाळतात.
      त्यांचे नातू संध्याकाळी त्या कट्ट्यावर बसतात तेव्हा त्यांच्या वर्गातल्या मुलीला ते चिडवतात. ती सलज्ज हसते आणि जाते. त्यावेळी मुलांच्या आया, आज्या आणि उरलेले ‘होणार सून मी ह्या घरची’ बघतात. त्याचवेळी भारतात काही एक सांख्यिकी वेगाने स्त्रियांवर अत्याचार होतात.
      बघ्या आपल्या फुफ्फुसात टार भरत त्या मुलांना पुढच्या टाइममध्ये प्रोजेक्ट करतो. त्यातला एक होतो नगरसेवक, एक चाईल्ड मॉलेस्टर, एक सरकारी नोकर, एक आय टी वर्कर, एक सी.ए. आणि एक बेवडा. सलज्ज हसणारी मुलगी अमेरिकेत निघून जाते.
--
      बघ्या घाबरून आपल्या सिगारेट कडे बघतो, गांजा तर नाही ना? तेव्हा नेपाळी गुरखा त्याला सलाम करतो.
--
      दोन बीअर आणि वर एक कॅन मध्ये, सोबत काही दर्दभऱ्या गाण्यांसह बघ्या आपले चिंधी दिवस आंबवत ठेवतो. त्यावर भरघोस दिलदार टीप देऊन, साऱ्या ओरिसीअन वेटर्सचे अदबी सलाम घेत बघ्या पिवळ्या सुस्त रस्त्याला येतो.
      चायनीजवाल्याने कचरा कुंडीपाशी फेकलेल्या हाडांना कुत्री आशेने न्याहाळतात, कुत्र्यांना एकमात्र छुपा बोका मत्सरयुक्त भीतीने. पोलिसांच्या थांबलेल्या गाडीला मघाच्या गुराख्याचा चुलत भाऊ सलाम करतो आणि त्याचा मुलगा चटपटीत पणे एक आर.सी. आणि स्टार्टरचे पार्सल गाडीत आणून ठेवतो. गाडी छू.
      बघ्याचा स्मार्ट फोन म्हणतो ‘चिन्मया सकलहृदया’. बघ्याच्या आईने परवा टी.व्ही.वर ऐकलान आणि बघ्याला शोधायला लावलान.

      आणि मग आपल्या अल्कोहोलिक उमाळ्याचे आरपार अश्रू बघ्या पुसतो, तेव्हा चुलत गुरखा नेपाळी गाण्यावर मान डोलावतो, मुलगा कोंबड्यांना उचलून आत ठेवतो, एक कलकलते. 

Saturday, March 8, 2014

गांडू असण्याचे साक्षात्कार

    बघ्या ट्रेन मधून प्रवास करत होता. त्याच्या सोबत त्याची ९२ वर्षाची, न मेलेली आणि अजून हे हवं, ते हवं असं म्हणणारी, स्मरणशक्ती शाबूत असलेली आजी होती. त्याने अगोदर रिझर्व्हेशन केल्याने सुखावह वाटत बघ्या आपल्या वरच्या बर्थवर सिकुडत होता. त्याची आजी सर्वात खालच्या बर्थवर स्वेटर, कानटोपी, शाल असे थंडीचे जामनिमे चढवत होती. तेवढ्यात भांडणाचे आवाज यायला लागली.
      ट्रेनमध्ये भांडणाचे आवाज येतातच. मालकी हक्क दाखवणे आणि त्यासाठी झगडणे हे मानवाचे मूलभूत कर्तव्य आहे. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने या मूलभूत हक्काच्या बजावणीचा सुनहरा मोका येतो. त्यातून जमलेच तर थोडे शारीरिक शिक्षणाचे प्रकारही पहावयास मिळतात. बघ्या नावाला जागून, बर्थवरून उतरून भांडण बघण्यास पोचला.
      एक धष्टपुष्ट मनुष्य, त्यासोबत धष्टपुष्टता आणि जाडेपणा ह्यांच्या सीमेवरचा एक, हात फाकवून बलिष्ठ उभा असलेला एक तरुण आणि एक तरुणी हे डब्याच्या दारात बसलेल्या एका कुटुंबाला हुसकावून लावत होते. हुसकावून लावण्याचे मुद्दे म्हणजे, बिना तिकीट येणे, तेही रिझर्व्हेशन डब्यात येणे, वर तिथे अंघोळ न करता येणे आणि त्याने प्रचंड दुर्गंधी निर्माण करणे, त्यासोबत विडी-गांजा ह्यांचे सेवन आणि सर्वात महत्वाची चूक म्हणजे ह्या सर्व बाबी असताना हे कुटुंब हुसकावून लावण्याची क्षमता आणि रिझर्व्हेशन केल्याने आलेला अधिकार असलेल्या ह्या तिघांजवळ कुठेतरी आले.
      हुसकावून लावण्यात येणाऱ्या कुटुंबातील पुरुषांना काही उमगत नव्हते. त्यात एक पुरुष एक संपूर्ण आणि बाकी थोटका पाय असलेला होता. तो तर निव्वळ लोळत होता. अजून एक पोरसवदा बाई एका मुलाला पकडून बसली होती. आणि उरलेली एक बाई भांडत होती.
      त्या बाईच्या मते आम्ही तुम्हाला काही त्रास तर देत नाहीये, तुमच्या जागेवर तर येऊन बसत नाहीये. मग तुम्ही आम्हाला कशाला त्रास देताय.
      ह्यावर हुसकावून लावणारे परत वास, गांजा, बिना तिकीट,
      परत ती बाई, आम्ही त्रास तर देत नाही..
      मग हुसकावणारे, आता निघता का नाही असे निर्वाणीला येवून, त्यांच्यातला मूळ धष्टपुष्ट पुरुष त्या थोटक्या माणसाची काठी खेचू लागला. तशी भांडणारी बाई अजून हिरीरीला आली.
      तोवर बघ्या सोबत अजून काही लोक हे सारे भांडण बघत होते. बघ्या नुसते बघत नव्हता, तर तो नेहमीप्रमाणे रीकामचोट तात्विक खाजवाखाजवी करत होता, स्वतःशीच. तेवढ्यात बघणाऱ्यांमधला एक जण त्या भांडणात पडला आणि धष्टपुष्ट पुरुषाला थांबवून राहिला. ह्या नव्या कृतीचा फायदा घेऊन बघ्या पुढच्या डब्यात गेला, अजून पुढच्या डब्यात गेला आणि तिथे असलेल्या रेल्वे पोलिसाला त्याने वरील भांडणाची बघिकत सांगितली. त्यासरशी रेल्वे पोलीस, कमालीच्या कार्य तत्परतेने त्याच्या सोबत आला.
      बघ्या आणि रेल्वे पोलीस मूळ ठिकाणी पोचले तेव्हा धष्टपुष्ट आणि त्याचे साथी, भांडणारी बाई आणि मध्ये पडलेला माणूस ह्यांनी आपापली पोझिशन मेंटेन ठेवली होती. पोलीस येत क्षणी धष्टपुष्ट माणसाला आगळा हुरूप आला. त्याने लगेच आपण कोण आहोत हे दर्शवले, तसेच सोबतचे आपले साथी हेही सद्रक्षणाय काम करतात हेही स्पष्ट केले. एवढी मोरल अॅथॉरिटी पाहून रेल्वे पोलिसानेच त्या कुटुंबाला हाकलायला सुरुवात केली. भांडणाऱ्या बाईने हा बदललेला बॅलन्स पहिला, मध्ये पडलेला माणूस गप्प झाला, धष्टपुष्ट माणसाने परत काठीला हिसका द्यायला सुरुवात केली. भांडणाऱ्या बाईने त्या सगळ्यांना डोळ्यानेच उठायची खूण केली. आणि मग सावकाश आपली बोचकी, पोरे सावरीत ते कुटुंब डब्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला गेले. पोलीस धष्टपुष्ट माणसाशी बोलत तिथेच बसला, धष्टपुष्ट माणूस आणि त्याचे साथी ह्यांच्यासोबत असलेल्या बायका तमाम कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागल्या. बघणारे परतले. एव्हाना थंडीशी मुकाबला करायला जय्यत तयार आजीनेही आपला नातू कुठे गेला ह्याची चौकशी सुरू केली होती. बघ्या परतला.
      मग बघ्या नेहमीप्रमाणे पश्चात उंगली करू लागला. म्हणजे जे घडलं ते चूक का बरोबर हे त्याला उमगेना. पण आता तो ह्या रिडल्सना सरावला आहे. त्याने हे नीट ठरवलं कि जे घडलं त्यातली दांडगाई चूक होती. आणि मग एकदम आपल्या गांडू असण्याचा भपकारा त्याला आला. दांडगाई घडली आणि आपण ती पहात राहिलो. आपण एकदाही त्या धष्टपुष्ट माणसाचा हात अडवला नाही. आपण त्याला एकदाही तो जे करतोय ते चूक करतोय असं मध्ये पडून सांगितलं नाही. कारण त्याने जर आपल्याला मारलं, आपल्याला एखाद्या कायदेशीर बखेड्यात अडकवलं तर काय ह्या भीतीने. आपण उगा कनवाळू आव आणून जे घडलं ते पहात राहिलो, बाकी चुकचुकले.
      आपल्याकडे स्मार्ट फोन असायला हवा होता, मग आपण हा व्हिडियो व्हायरल केला असता असं मलम बघ्या लावू लागला. आणि मग तर्काच्या पारंब्या पकडून टारझन सारखा उड्या मारत बघ्या स्मार्ट फोन कसा घ्यावा ह्याचाच विचार करू लागला. तोपर्यंत धष्टपुष्ट आणि त्याचे साथी चादरी ओढून झोपले, त्याची आजी शालीत गुरफटली. बघ्या परत उतरून डब्याच्या दुसऱ्या टोकाला गेला तोपर्यंत ते कुटुंबही निवांत पथाऱ्या पसरून झोपलेलं. बघ्या बर्थवर आला, आपले सामानसुमान चाचपून राहिला आणि मग निवांत स्वतःला तात्विक उंगली करू लागला.
      पहिले बघ्याने आपले संवेदनशिलतेचे साधा लूक दिलेले महागडे कपडे उतरवले, त्यासरशी गांडू असण्याचा बोचरा वारा त्याला झोंबायला लागला. त्याला इथे संवेदनशील कपड्यांचा खरा फायदा जाणवला. त्याने ते कपडे उलटे-पालटे करून पहिले. कुठे सामजिक जाणिवेचे अस्तर लावलेले, कुठे वैयक्तिक संघर्षाची टीप मारलेली, मूळ कपडा फुकट्या रिकाम्या वेळेचा, त्याला जमेल तसा लिबरल, ह्युमॅनिटेरियन रंग मारलेला, वर एक जाकीट, विदेशी पुस्तकांच्या वाचनाचं.
      आता दात वाजतील एवढा गांडू असण्याचा वारा झोंबून राहिला. आपल्या इंटेलेक्चुअल चड्डीला घट्ट पकडून बघ्याने एखाद्या गर्भावस्थेत असलेल्या अर्भकासारखी पोझिशन केली.
      तेवढ्यात कुठूनतरी आशावादाची उबदार शाल त्याच्यावर उडत उडत येवून पडली, आणि केव्हातरी आपण असे गांडू राहणार नाही अशी फिकट स्वप्ने पहात बघ्या झोपी गेला.
---
      बघ्या आपल्या वेळ घालवणे ह्या मूलभूत कामांत गर्क होता, म्हणजे तेव्हा तो त्याला आवडलेला एक चित्रपट परत दुसऱ्यांदा बघत होता. तो बघून झाल्यावर बाहेर पडताना त्याच्यासोबत साक्षात्कार घडला.
      एक सहा-सात वर्षाचा मुलगा बाबाला म्हटला कि बाबा, पिक्चर मध्ये मजा येईल म्हटलेला तू, कुठे आली मजा. मुलाची आई आपल्या आपल्यात हसली. आपल्या सोबत असलेल्याला दिग्दर्शकाने जन गण मन चा सीन कसा परफेक्ट घेतला आहे असं समजावणारा बाबा उगा पाडून हसला. बघ्याने पार्किंगमधून आपली बाईक काढली आणि तो झोपायच्या जागी पोचला.
      आता जसं बहुतेकांचं आहे तसं बघ्या जिथे झोपतो तिथे त्याचे आई-बापही झोपतात. बघ्या तिथे खानावळीसारखं जेवतो, जमेल तिथे परतफेड करतो, आणि बहुतेकदा आपल्या तद्दन तात्विक चोदू विवंचना लपवत राहतो.
      तो जेवताना आई त्याला पिक्चर बद्दल विचारते. बघ्या सांगतो तेव्हा आई म्हणते, आमच्या गावातही असायचे ते लोक आणि काय वास यायचा त्यांना, जाम दूर पळायचो आम्ही.
      मघाच्या साक्षात्काराची किक उतरावी एवढा डोस बघ्याला होतो. तो परत सरावी बनेल रीस्पोंस देतो आणि फुफ्फुसात टार भरण्यास निघतो.
      बघ्या पाहतो तो त्याला अनेक चेहरे खिडकीत उभे दिसतात. त्यातल्या एका चेहऱ्याजवळ तो जातो. तेव्हा तो चेहरा त्याला म्हणतो कि मला पण असं नव्हतं रे व्हायचं, पण काय करू, आई-बाबांना आवडलं नसतं, दुसरा चेहरा म्हणतो त्यांची जबाबदारी होती माझ्यावर, तिसरा म्हणतो, संस्कृती आहे आपली, चौथा म्हणतो, शेवटी त्यांना कोण आहे आपल्याशिवाय. पाचवा चेहरा तर त्या मागच्या मजा न आलेल्या मुलाच्या बापाचा असतो. एक एक करून चेहरे मागे जातात, मुखवटे होतात, आणि सिरीयल बघू लागतात, सजातीय, सक्लासीय, सनोकरीय विवाहांच्या वेबसाईट बघू लागतात, फेसबुक करू लागतात, आणि काही सेक्स वगैरे करून झोपी जातात. बघ्याही परत येतो आणि घालून ठेवलेल्या अंथरुणात पडतो. परत तात्विक उंगली जागी होते. बघ्याला झोपू देत नाही. बघ्या ‘द डॉक्टर अँड द सेंट’ वाचू लागतो. ऐतिहासिक संदर्भांच्या खुंटीवर कधीच्या टांगून ठेवलेल्या सोशल रिव्होल्युशनच्या तुतारीकडे पहात बघ्याला निखळ वैयक्तिक झोप लागते.
----
      बघ्या एका मित्राकडे आहे. मित्र ‘सत्यमेव जयते’ बघतो आहे. बघ्याला अमीर खान बघवत नाही. बघ्याला ‘रंग दे बसंती’ मधला डीज्जे जाम आवडतो, गेट के इस पार आणि उस पार मध्ये पूर्ण बदलून जाणारा डीज्जे.
      एक वकील म्हणते, कि आठवीची परीक्षेला गैरहजर राहिलो तर परत देऊ देत नाहीत, मग न्याय नावाच्या गोष्टीच्या बाबतीत घरी सत्यनारायण आहे, कुत्रा आजारी आहे असं सांगून वकील टाळाटाळ करू शकतात हे कसं. ती म्हणते कि ह्या दिरंगाईमुळे न्याय व्यवस्थेचा दरवाजा ठोकणाऱ्या महिलांत एक आग धगधगते आहे. कि ह्या न्यायावर विसम्बण्यापेक्षा आपणच काहीतरी करून टाकावे. त्या वकील बाईच्या शांतपणे सांगितलेल्या शब्दांनी बघ्याचा तात्विक निष्क्रिय बेस डूचमळतो. परत अमीर खान चे जाणीवपूर्वक उच्छ्वास आणि हरकती चालू झाल्यावर तो त्या डूचमळल्या बेसकडे बघतो.
      बघ्याच एक मित्र मागे म्हटला होता कि बलात्काराच्या केसमध्ये आरोपीला कठोर, झटपट शिक्षा व्हावी असं मागणारे लोक आदिवासींच्यासाठी अशीच न्यायालये चालवणाऱ्या नक्षलवाद्यांना का पाठींबा देत नाहीत. अर्थात त्याच्या ह्या फेसबुक स्टेटसवर बरीच धूळ, बरीच गरमी आणि किंचितसा प्रकाश निर्माण करणारी चर्चा झाली.
      एक बाई सांगते कि तेरा वर्षे झाली घटनेला, पण आरोपी फरार म्हणून न्याय नाही.
      एक बाई सांगते, कि दरवेळी विचारतात, घटनेचे तपशील, सविस्तर वर्णन कर
      वकील बाई म्हणते कि कुठल्याही सभ्य समाजात अशी अपेक्षा असेल कि ज्या महिलेबरोबर असं काही घडलं ती ते विसरेल, परत मोकळी जगू लागेल. पण इथे आपण तिला सांगतो कि लक्षात ठेव बाई, मुली, तुला हे वारंवार बोलायचं आहे, तेव्हा एक क तपशील लक्षात ठेव. हा ह्या बायकांचा प्रश्न नाही, पण कोणत्या प्रकारचा समाज आहोत त्याचा प्रश्न आहे.
      तेव्हा बघ्याच मित्र व्हॉटसॅप करत असतो, तिथे तो एका स्त्रीच्या पार्श्वभागाचा बहुचर्चित फोटो पहात असतो, त्याखाली कमेंटची रीघ असते. मग मित्र परत सत्यमेव जयते’ पाहू लागतो.
      पुढे अजूनही पुस्तके, सिनेमे, चर्चा आणि शब्द ह्यांनी धक्का बसण्याचे पंगुत्व राहिलेल्या किंवा तसे दाखवू इच्छिणाऱ्या लोकांसोबत बघ्या चर्चा करू लागतो.
      एक म्हणतो, आपण कुठल्याही मुलीबद्दल काही गैर बोलणंच थांबवलं पाहिजे, त्यातूनच पुढे चुकीचे पर्स्पेक्टीव्ह निर्माण होतात.
      दुसरा म्हणतो, पण आधी आपण असे का बोलायला लागतो, तर आपल्याला कोणी का कोणी पॉर्न दाखवतो.
      तिसरा म्हणतो, कि ज्याच्या त्याच्यात नंतर शहाणपणा येतोच कसं बघावं बाईकडे, आणि मुख्य म्हणजे कसं वागावं. त्या मर्यादांच्या बाहेर येणारा पशूच. त्याला मारलाच पाहिजे. दोन महिन्यांची मुलगी आणि ९४ वर्षाची बाई ह्यांबाबत असं वाटूच कसं शकतं.
      परत पहिला म्हणतो, कि चोरी आणि बलात्कार ह्यात हिसकावून घेणं हेच आहे. त्यामुळे त्या स्त्रीची अवहेलना करणं चुकीचं आहे. ते थांबायला हवं. सेक्शुअल लिबरेशन यायला हवं.
      दुसरा म्हणतो, आपल्यात कोणाच्या बहिणीबरोबर काही झालंय, किंवा आपण असं करणाऱ्या कोणाला ओळखतो का, तसे बाकीचे थोडे कमी-जास्त माना हलवतात.
      तिसरा म्हणतो, माझी बायको बाईक चालवते तिच्या एन. जी. ओ चं काम करताना, तिचा फोन नाही लागला संध्याकाळी    कि आपली फाटते. मग मी फोन करायलाच जात नाही तिला.
      पहिला म्हणतो, म्हणून का लोक सतत एवढे एकमेकांना फोन करत असतात.
      बघ्या एकदम म्हणतो कि डोळ्यास डोळा हाच न्याय, त्याने सारं जग काही आंधळं होणार नाही, उलटे बरेच फुटणारे डोळे वाचतील. बघ्याच्या डोळ्यांना काय बोटालाही कोणी कधी धक्का लावलेला नाही, त्याच्या परीचयातही नाही.
      बघ्याला शाळेत असताना एका मित्राने गर्दीचा फायदा घेऊन काय काय करता येतं हे दाखवलं होतं, आणि मग त्याचा एकपात्री प्रयोगपण.
      बघ्याच्या मैत्रिणीने त्याला एकदा बोलावलेलं रेल्वे स्टेशनला तिच्यासोबत सहप्रवाश्याने केलेल्या चुकीच्या प्रकाराबाबत. तेव्हा तो माणूस म्हटलेला हवं तर कानाखाली वाजवा पण पोलिसांत नका जाऊ. पुढे त्या माणसाची आई आणि बहीणही असं म्हटल्या. मग मैत्रीण म्हटली, जाऊ दे, माफी मागतोय ना. नंतर टी.सी. म्हटला कि तुमची मैत्रीण नसेल, पण काही मुलीच उठवळ असतात. आम्ही बघतो ना एक एक प्रकार.
      बघ्याने काहीही प्रकार बघितलेले नाहीत. बघ्याने त्या माणसाला, त्या टी.सी. ला कानाखाली तरी मारायला हवी होती असं म्हणतो एक जण.
      बघ्याला वाटतं उगीच बोललो, मग बाकीच्यांनाही वाटतं. ते सर्व मिळून आपण गांडू आहोत ह्यावर मुंडी हलवतात.
-----
      अरे ला कारे म्हणायचं, का ‘काय झालं भाऊ’ म्हणायचं का काहीही न म्हणायचं...
      आपल्यासोबत झालं तरच म्हणायचं, का कोणाच्याही सोबत झालं तरी म्हणायचं...
      सूडाचे समाधान हे जेन्युईन समाधान आहे का सर्वात निष्क्रिय समाधान...
      सूड आपापला घ्यावा का एकमेकांसाठीही घ्यावा..
बघ्या आपल्याशी काहीतरी घडण्याची आणि मग त्याला प्रतिसाद देण्याची निखारी उमेद बाळगून आहे. त्याला आपल्या भवतालाच्या बाहेरच्या जगाची केवळ गंमत वाटते, त्याच्याशी जिवंत घेणं-देणं वाटत नाही.
      बघ्याने व्यवस्थेशी पंगा घेतला नाही. तिच्या दुर्लक्षित आचळांना चुपत बघ्या तगून आहे. पोट भरतं तेव्हा बघ्या गम्मत बघतो.
      केव्हातरी व्यवस्थेची दुभती गाय गोचिडीसारखी बघ्याला झटकून देईल. तेव्हा बघ्याची गंमत होईल.
      तोवर बघ्या आपल्या गांडू असण्याचे प्रत्यय घेत राहील आणि हे केव्हातरी बदलेल अश्या उबदार धाबळीत हात-पाय दुमडून झोपेल.           

जेरी पिंटो ह्यांचे 'Murder in Mahim'

मला ह्या कादंबरीमध्ये सर्वात जास्त काय आवडलं असेल तर रोमन भाषेत येणारे हिंदी आणि मराठी शब्द. छ्या/छे असा उच्चार असलेली इंग्लिश कादंबरी अजून...