Tuesday, May 4, 2010

प्रश्न

अजमल कसाब दोषी जाहीर झाल्याचे वृत्तपत्रे ओरडून सांगत आहेत. दोन दिवसापासून ह्या निकालाची उत्सुकता प्रसारमाध्यमे जागवत आहेत. आणि आज ब्लौग, फेसबुक अशा सार्या स्व-अभिव्यक्ती माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ह्या प्रतिक्रियांचा सूर समान आहे, हताश.
कसाब दोषी आहे हे सुमारे दीड वर्ष खटला चालवून का सिद्ध करत बसायचा? न्यायदानाची प्रक्रिया सर्वांसाठी समान हवी हे मान्य आहे. पण हे 'सर्व' म्हणजे ह्या देशाचे नागरिक. कसाब हा परकीय नागरिक असून त्याने भारताविरुद्ध युद्ध छेडले हा जर त्याचा गुन्हा असेल तर त्याच्यासाठी भारतीय नागरिकाला लागू असणारी न्यायदान प्रक्रिया का वापरायची? त्याला फाशीची शिक्षा दिली कि कदाचित मानवाधिकार प्रेमी सर्वोच्च न्यायालयात जातील. काही जणांना अशा पद्धतीने एका परकीय नागरिकाला फाशी देता येईल का असा आंतराराष्ट्रीय प्रश्न पडेल. कदाचित त्याला २-३ जन्मठेपांची शिक्षा मिळेल आणि राजीव गांधीना मारणाऱ्या नलिनीच्या कोठडीत सापडला तसं त्याच्या कोठडीत मोबाईल सापडेल. का व्हायचं नाही हताश? माझ्या एका मित्राने कदाचित ह्याच प्रश्नाच्या किंवा ह्याच्या मुळाशी असणाऱ्या काही प्रश्नांना पकडून एक लेख लिहिला आहे.

http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/05/blog-post.html

परवा 'रंग दे बसंती' पहात होतो. त्यातले मित्र हे काही देशाच्या प्रश्नांची फारशी चिकित्सा करणारे नाहीत. पण स्वतःच्या मित्राच्या मृत्यूने ते त्यांना व्यापणाऱ्या सामाजिक वास्तवाशी, त्यातल्या विरोधाभासांशी लढायच्या पातळीवर येतात आणि त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला पटणारा मार्ग स्वीकारतात. अजमल कसाब चा विचार करताना मला हाच प्रश्न पडतो. कि त्याच्या गोळ्यांनी मेलेल्या कोणाच्याच कोणाला हा प्रश्न सोडवावासा वाटला नाही? त्यांना नसेल, मला का नाही पडला? का जिवंत राहीला अजमल कसाब २६/११ नन्तर दीड वर्ष? न्यायव्यवस्थेला नसेल, पण बाकी कोणाला तरी, मला तरी त्याला संपवण्याचा, त्याच्या रूपाने वावरू पाहणाऱ्या विघातकाना इशारा देण्याचा निर्णय घेता आला असता ना? प्रश्न न्यायव्यवस्था, सरकार असा नाहीच आहे, प्रश्न माणसांच्या मनातून संपत जाणार्या बांधिलकीचा आहे.
असं का होतंय? म्हणजे देश हि गोष्ट आधी किती मूलभूत वाटायची, पण नन्तर ती एक सोयीची रचना इतपतच वाटायला लागली. तसं असेलही. पण मग ती रचना, जी अनेकांच्या कल्पकतेतून, नेतृत्वातून निर्माण झाली आहे, मानवी अस्तित्व टिकवायचं, फुलवायचं काम तिने केलं आहे, तिच्या मुळाशीच घाव घालतोय का आपण? आणि हे घाव कसले आहेत? ते कोण घालतंय?
दुपारी रस्त्यावरून चालताना उन्ह भाजत होतं. एका रसाच्या गुऱ्हालापाशी थांबलो. रस विकणारे उत्तर प्रदेशातून आलेला एक कुटुंब आहे. उन्हाळ्याचे २ महिने ते हा व्यवसाय करणार. मग दुसरा काहीतरी. चोरून घेतलेली वीज, कुठून तरी मिळवलेलं पाणी, पण त्या रणरणत्या उन्हात ४ रुपयात मिळणारा उसाचा रस हि सर्वात स्वस्त चीज. मला आठवतं पूर्वी एप्रिल-मे महिन्यात रस्त्याच्या कडेला 'प्याऊ' असायचे. लाल ओला कपडा गुंडाळलेले माठ आणि सोबत ठेवलेली तोटी. आज हे दिसत नाहीत. रस्त्यावरून चालणारी माणसे कितीतरी पट वाढली, बिसलेरीच्या बाटल्याही आणि आवृत्याही, पण त्या पाणपोयांच्या रूपाने उमटणारी बांधिलकी हरवली.
जग जोडला जातंय. एकमेकांचा अस्तित्व ठाऊक नसलेले कितीतरी प्रदेश आता व्यापाराच्या धाग्याने एकमेकांशी पक्के जोडले गेलेले आहेत. पण उपभोगांच्या या विस्तारत प्रश्न उथळ होऊन बसले आपले. मी कोण ह्या प्रश्नांची रेडीमेड उत्तरं स्वीकारतात अनेकजण. हि उत्तरं मोहक आहेत, सोयीची आहेत, पण त्यांच्या शेवटाला एकाकी रिकामेपण आहे. पण हे लक्षात येईल इतकी उसंत नाही. एका गोड ग्लानीत पळायचं, हेच.
वेगळी माणसे नाहीयेत असं नाही. पण त्या वेगळेपणाचा, त्यापाठी असणाऱ्या मानसिक द्वंद्वाचा जो आदर आधीच्या समजत होतं तो संपत चालला आहे. त्यामुळे सोक्रेटीस म्हणायचा तसं समाजाच्या सुस्त बैलाला चाबूक मारणारे कोणी उरलेच नाहीयेत. जे मारू पाहतात ते चाबूक मारल्याने बैलाला होणार्या वेदनेची काळजी करतायेत. पण सुस्तीने बसला तर बैलाचं अधिक नुकसान होईल, त्यापेक्षा चाबूक मारल्याचे वळ दोन दिवस राहतील, पण बैल हलेल तर. कोण मारणार? आणि कसला चाबूक मारणार? वृत्तपत्रांच्या माध्यमात हि ताकद होती पण आज पेड न्यूजच्या लोभाने ते मिंधे बनलेत आणि समाजाच्या सुस्त बैलावरची गोचीड एवढीच त्यांची ओळख उरलीये. मग कोण?
समाजाच्या ह्या बैलाला वेळोवेळी हलवायचा, मार्गी ठेवायचं तर त्या बैलाच्या परिश्रमातून निर्माण होणार्या धनसंपदेचा मोह नसणारे, व्यक्तिगत आशा- आकांक्षा समाजाच्या मोठ्या स्वार्थात सामावून दिलेले नेतृत्व हवे. आणि हे नेतृत्व सतत बनत राहण्याची प्रक्रियाही हवी. कसाबच्या निमित्ताने किंवा छत्तीसगढ, झारखंड मध्ये मरणाऱ्या आदिवासींच्या निमित्ताने आपण ह्या विचारला पोचलो तरी काही बदलेल. हा कुठल्याहीतत्वाद्यानाचा प्रश्न नाही, वैयक्तिक जगणं ह्या ज्या अनुल्लेखित, न दिसणाऱ्या सामाजिक नेपथ्यावर अवलंबून असता त्याला जपण्याचा हा सोपा स्वार्थ आहे.
आपल्या सभोवती बघायची, त्या सभोवतालाला आकळून घ्यायची आणि जे कळतंय त्यानुरूप कृती करायची इतक्या सोप्या आणि सहज मानवी वृत्तीचा हा प्रश्न आहे.

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...