Sunday, December 30, 2018

अजिंठा-वेरूळ-औरंगाबादबद्दल काही टुरिस्ट निरीक्षणे


१. फार प्रखर नसलेला, पण चांगला फोकस होऊ शकणारा टॉर्च ही अजिंठामधील चित्रे बघण्यासाठी एकदम आवश्यक गोष्ट आहे. मोबाईलचे टॉर्च अजिबात उपयोगी नाहीत.

२. अजिंठामधील गुहा क्रमांक १ आणि २ ह्यांतच बहुतेक कुटुंबासोबत आनंद मिळवायला आलेल्या लोकांची करमणूक संपते. ‘अरे, इथेपण तसंच आहे’, ‘इथे काहीच नाही’ अशी आंबट द्राक्षे देत देत ते १ ते २६ हा अजेंडा पूर्ण करायच्या मागे लागतात. त्यामुळे लोकांच्या प्रचंड सेल्फी उत्साहाने सुरुवातीला पकलात तरी सब्र का मीठा फल मिळणार.

३. अजिंठामध्ये फर्जी गाईड गुहे-गुहेत मिळतात. ते खरेतर गुहेतील प्रवाश्यांचे वर्तन नियंत्रित करण्यासाठी नेमलेले स्टाफ आहेत. पण गाईड काय बोलतात हे ऐकून ऐकून आणि त्यात थोडी दंतकथा आणि थोडा आपलाच मीठमसाला मिसळण्याचे कसब असं करून ते आपलं एक दुकान उघडून आहेत. गुहेतील चित्रांबाबत काहीच न माहिती पडण्यापेक्षा त्यांचे सुरस कथन जरा हिंट देते. पण हे चित्र कोणते आहे ही वस्तुनिष्ठ माहिती सोडली तर बाकी प्युअर ढाचे! आणि त्यांची ही वरकड कमाई करताना गुहेतील लोकांच्या वर्तनावर, विशेषतः कॅमेऱ्याचे फ्लॅश ह्याबद्दल ते काहीच करत नाहीत. गुहा १ व २ मध्ये १५ मिनिटांच्या कालावधीसाठी ४० लोक सोडावेत असा निर्देश आहे. पण तोही पाळला जात नाही.

४. अजिंठाबद्दल बेस्ट टुरिस्ट रेफरन्स भारतीय पुरातत्व विभागाने काढलेले पुस्तक आहे. हे पुस्तक सोबत घेऊन विजेरीच्या प्रकाशात ते वाचत वाचत गुहा पाहणे हे थोडे कष्टाचे असले तरी मजेदार आहे. हे पुस्तक नसेल तर स्थानिक प्रकाशनाची संक्षिप्त पुस्तके मिळतात. तीही ठीक आहेत. त्या पुस्तकांची छापील किंमत १०० असेल तर पुस्तक ३०-४० लाही मिळते. 

 
पुरातत्व विभागाचे अजिंठाबद्दलचे पुस्तक 

५. अजिंठाजवळचे MTDC उपहारगृह हे निर्लज्ज मोनोपोली शोषण आहे. त्यात ते जी.एस.टी. नंबर छापलेल्या प्रिंटेड पावत्याही देत नाहीत. स्वच्छताही जेमतेम आहे.

६. पाण्याची बाटली आणि काही ग्लुकोज बिस्किटे/तत्सम सोबत असणे फायद्याचे आहे. कारण १ ते २६ गुहा निवांत, रवंथ बघणे हा सहज ४ तासांचा कार्यक्रम आहे.

७. अशी अफवा आहे कि २०१९ मध्ये अजिंठा पर्यटकांसाठी बंद केले जाणार आहे! 😊

८. वेरूळ बघण्यासाठी एकदिवस ठेवणे आवश्यक आहे. केवळ कैलाश मंदिर (गुहा क्रमांक १६) म्हणजे वेरूळ नाही. अर्थात अनेक भाविक पर्यटक तेवढेच बघून कलटी मारतात हे पथ्यावर पडू शकतेच.

९. कैलास मंदिर नीट समजून बघून घ्यायला २ तास लागतात. गाईडला पर्याय नाही. अन्यथा १५ मिनिटात दर्शन आणि बाहेर.

१०. कैलास मंदिरात असणारी erotic शिल्पे हा माझा अशा शिल्पांशी आलेला पहिलाच संबंध. It is mind-blowing.
आमच्या गाईडच्या म्हणण्यानुसार हे शिल्प म्हणजे भारतीयांनी फ्रेंच किसचा शोध लावला ह्याचे प्रमाण! 
Erotic शिल्पे: कैलास मंदिर 


११. हम्पीमधील मंदिरांवरील शिल्पे आणि कैलास मंदिराची शिल्पे ह्यांत बरंच साम्य आहे, विशेषतः हजारराम मंदिर (हम्पी) येथील रामायणाची कॉमिक्स स्ट्रीपसारखी मांडणी आणि कैलास मंदिरामधील मांडणी. गोष्ट सांगण्याची मानवी तहान आणि तिची पूर्तता शिल्पांनी अजरामर केलेली आहे. 
रामायण: कैलास मंदिर 

१२. वेरूळ आणि अजिंठा येथल्या बुद्ध लेण्यातील फरक निरीक्षक नजरेला जाणवण्यासारखा आहे. बौद्ध,जैन आणि हिंदू धर्ममते आणि त्यांच्या अनुषंगाने फिरणारे लोकजीवन आणि राजकारण हेच लेण्यांच्या निर्मितीच्या पाठी असणारे मूळ कारण आहे असा आता माझा वर्किंग हायपोथेसिस आहे.

१३. देवगिरी/दौलताबाद किल्लाच्या सुरुवातीलाच चांद मिनारपाशी असणाऱ्या पर्यटकांनी दुर्लक्षित संग्रहालयात काही लक्षणीय भग्नमूर्ती आहेत. 
देवगिरी/दौलताबाद किल्ल्याजवळील संग्रहालय 

१४. भारतातील शिल्पांमध्ये असणाऱ्या स्त्री शिल्पांची शारीरिक वैशिष्ट्ये, विशेषतः स्तन आणि कंबर/कमनीयता हाही एक कुतूहलाचा विषय आहे.

१५. बीबी का मकबरा हे एक प्रीवेड शूटचे डेस्टिनेशन आहे. कबरीपाशी प्रीवेड शूट हा जबरी तात्विक जोक आहे. जीवनाची सांगता वाग्दत्त वधू-वरांनी भिनवूनच संसार करावा असा काही प्रकार असावा किंवा त्यांना काही पडलेलीच नसावी. अजंठाला असला काही प्रकार दिसला नाही. पण यशोधरा आणि राहुलसमोर भिक्षापात्र घेऊन उभ्या असलेल्या बुद्धाच्या गुहेसमोर प्रिवेड शूट ही कल्पनाच रोमांचक आहे! केवळ पोचलेले किंवा हुकलेले लोकच हे करू शकतात.

१६. बीबी का मकबराच्या आजूबाजूला असणारी उदासी पांघरलेली उद्याने आणि त्यात ‘जाडे कि नर्म धूप’ मध्ये वावरणे
बीबी का मकबराच्या परिघातील उद्यान

१७. एकूण- आपल्याशेकडो वर्षे अशी आपल्यासारखेच लोक वावरत होते. आपण पुढे आलो आहोत ही गलतफैमी आहे. आपण स्पायरलमध्ये वर किंवा खाली जात आपल्याच काही मितींना री-व्हिजीट करत आहोत हे जास्त बरं मॉडेल आहे.

१८. कॅमेरा ही गोष्ट उत्पन्नाच्या मिती ओलांडून पसरली आहे. लोकांचे टीपकागद झाले आहेत आणि ते कशाच्याही पार्श्वभूमीवर स्वतःलाच शोषून घेत आहेत. 

आपणही वाट पहावी आपल्या पाण्याने आपल्याला पोटाशी घेण्याची

पाऊस पडतोय बाहेर. म्हणजे मी तो बघतही नाहीये. त्याचा आवाज ऐकायला येतोय फक्त , इमारतींच्या पत्रा-झडपांच्या वरून अनेकगुणित होणारा पावसाचा मूळ ...