Friday, November 23, 2018

हरारी ह्यांचे Homo Deus आणि बाकी काही वाचलेले-पाहिलेले

जसं पिकेटीचं ‘Capital in 21st Century’ तसं हरारीचं ‘सेपियन हे गाजलेलं पुस्तक. सेपियन ही मानवाच्या आजवरच्या अस्तित्वाची दास्तान आहे. हरारी ह्यांनी ‘Homo Deus’ (देव होऊ घातलेला माणूस अशा अर्थाने) हे पुढचं पुस्तक लिहिलं आहे.
Image result for homo deus
       आपल्या विचारांच्या पद्धतीवर खोलवर प्रभाव पाडणारी, तिला आकार देणारी पुस्तके अशा पुस्तकांच्या यादीत मी ‘Homo Deus’ चा समावेश करेन. (ह्या अगोदरचे असे पुस्तक म्हणजे ‘Being Mortal’) Homo Deus मध्ये हरारी प्रयत्नपूर्वक सद्यकालीन प्रभावांपासून मोकळे होऊन भविष्याचा वेध घेतात. लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य ह्या अनेकदा गृहीतक पद्धतीने मांडल्या जाणाऱ्या संकल्पनाचीही ते चिकित्सा करतात. ‘माणूस स्वतंत्र आहे हे सत्य आहे का भ्रम’ हा भाग मला प्रचंड आवडलेला आहे. पुस्तकात कॉन्शसनेसवर एक प्रकरण आहे. हरारी ह्यांच्या विपश्यनेच्या साधनेचा त्या प्रकरणावर प्रभाव असावा असं वाटतं.
       आपण वेगाने डेटायुगाकडे जात आहोत. माणसे शारीर स्तरावर अपग्रेड होणार आहेत, पण त्याचवेळी त्यांच्या निर्णयांचे नियंत्रण अल्गोरिदमकडे जाणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत थोड्या लोकांना प्रचंड महत्वाचे बनवून सोडणार आहे. व्यक्तिवादी रचनेतून उभ्या राहिलेल्या संस्था ह्या नव्या युगात बिनकामाच्या ठरणार आहेत. प्रत्येक माणूस हाच त्याच्या-तिच्या निर्णयांचा रचयिता आहे हे व्यक्तीवादाचे प्रधान गृहीतक कोलमडणार आहे. अल्गोरिदम आपल्याला समजून घेतील आणि सरतेशेवटी नियंत्रित करतील. अल्गोरिदमना जाणीव नसली तरी त्यांना प्रचंड बुद्धिमत्ता असणार आहे आणि त्याजोरावर ते (आणि पर्यायाने ह्या अल्गोरिदमचे मालक) जगावर नियंत्रण आणू शकतात अशी त्यांची मांडणी थोडक्यात सांगता येईल.
       हरारी जे जग मांडतायेत ते नेमकं कधी येईल हे माहित नाही. ऑटोमेशनने हजारो-लाखो लोक बेकार होतील असे आपण मागची १० वर्षे ऐकतो आहोत, पण असे अजून कुठे झाल्याचे माहिती नाही. गुगल, फेसबुकचे कोड्स सर्वव्यापी झालेले आहेत, आपणच त्यांना स्मार्टफोनने आपला डेटा दिलेला आहे. पण अजूनही माणसे हा कोड manipulate करत आहेत आणि कोड माणसाच्या ताब्यात आहेत असेच दिसते आहे. कदाचित काही वर्षात हा बदल जाणवू लागेल. जेनेटिक इंजिनीरिंगबद्दलही आपण ऐकून आहोत, पण प्रचंड श्रीमंतानाही डिझायनर बेबीज शक्य आहेत असे दिसत नाही. ही सगळी टोके आजच्या अल्गोरिदमना शक्य आहेत, पण राजकीय प्रणाली त्यांना ताब्यात ठेवते आहे का ह्या शक्यता अजून सैद्धांतिक आहेत आणि कालांतराने प्रत्यक्षात येतील हे गुलदस्त्यात आहे.
       हरारी ह्यांच्या भाकीतापेक्षा त्यांची तात्विक चर्चा मला अधिक भावते. हरारी ह्यांचे ‘स्केरी न्यू वर्ल्ड प्रत्यक्षात येईल का, कधी येईल आणि त्यातून काय गुंतागुंती होतील ह्याचा विचार करणे रंजक आहे.
              हरारी ह्यांचे व्हिडीओज सहज उपलब्ध आहेत. पण व्हिडीओजमध्ये उहापोह कमी आहे. भाषणे, व्याख्याने ह्यांच्या बाबतीत माझे एक मत आहे: जेवढा विषय व्यापक, तेवढी व्याख्यानाची उपयुक्तता कमी. पुस्तके वाचायला व्हिडीओ substitute तर अजिबात नाही.

       ह्याच पुस्तकाच्या अनुषंगाने मध्ये वाचनात-पाहण्यात आलेल्या काही गोष्टी:
१. येल विद्यापीठातील प्राध्यापक स्टीव्हन स्मिथ ह्यांचा ‘Introduction to Political Philosophyह्या कोर्सची लेक्चर्स युट्युबवर आहेत. सॉक्रेटीस, प्लेटो, Aristotle, माकियाव्हेली, हॉब्ज, जॉन लॉक, रुसो आणि टोक्व्हेल ह्या राजकीय विचारवंतांच्या मांडणीची चर्चा आहे. स्मिथ ह्यांची विषयमांडणी उत्कृष्ट आहे. (व्हिडीओज बघताना आपल्याला असे शिक्षक न लाभल्याची रुखरुख मला जाणवली! अनेकदा वर्गात stand-up कॉमेडी सदृश्य हसा पिकवणाऱ्या किंवा डेरेदार, गुंगीबाज भाषणे करणाऱ्या शिक्षकांना आपण चुकून चांगले शिक्षक समजून बसतो. तात्विक विषयांचे लेक्चर हे तर अनेकदा रसाळ भरकट प्रवचन किंवा रटाळ नोट्स/स्लाईड पोथी अशाच प्रकारात जाते.) राज्य करण्याचे निकष आणि माणसासाठी चांगले-वाईट काय आहे ह्याचा खल ह्या राज्यव्यवस्थेच्या आकलनाशी कसा निगडीत आहे ह्या कोर्सच्या मुख्य थीम आहेत.  
२. बाबा भांड ह्यांची दशक्रिया आणि तंट्या ही पुस्तके किंडल अनलिमिटेडवर आहेत. भांड ह्यांचा अभ्यास जबरी आहे, पण लिखाणाची शैली, विशेषतः प्रसंगाची लय थोडी गडबडते.
३. किंडल अनलिमिटेडवर ‘उचल्या’ हे लक्ष्मण गायकवाड ह्यांचे आत्मचरित्र वाचले. सुरुवातीचा भाग जबरी वाटला, मग पुस्तक घरंगळत जाते. चोर म्हणून शिक्का मारलेल्या जमाती ह्या खरंतर चोरी करत नसत असा माझा समज होता. पण ह्या पुस्तकात लेखकाच्या जमातीत चोरीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणच कसे दिले जात असे ह्याचे वर्णन आहे. सेल्फ-फुलफिलिंग प्रोफेसी सारखा प्रकार असावा. ‘भंगार असे अजून एक  आत्मचरित्र वाचायला सुरुवात केली, पण मग तोच-तोच पणाने सोडून दिले. जयवंत दळवी ह्यांचा ‘एलिस नावाचा कथासंग्रह तर जामच बोअर झाला. किंडल अनलिमिटेडने बरीच मराठी पुस्तके आणली आहेत. श्री.ना. पेंडसे ह्यांचे ‘कामेरू वाचलं. एककाळ मराठी साहित्यिक conservative right पोझिशन बिनधास्त घेत हे बघून मजा वाटली. गंगाधर गाडगीळांच्या कथा वाचल्या. गाडगीळांच्या काही कथा, विशेषतः त्यांचं मनस्थिती वर्णन, भारी आहे.
४. हृषीकेश पाळंदे ह्यांचे ‘भरकटेश्वर वाचलं. कोसलाची आठवण अपरिहार्य आहे. काही ठिकाणी एकदम brilliant आहे कादंबरी, विशेषतः ‘भरकटेश्वर’ ची गोष्ट. कादंबरी एकदम संपली असं वाटलं, पण अशा स्वरूपाचं लिखाण असं खटकन संपू शकतं किंवा चालूच राहू शकतं. कादंबरीतला dystopia मला तेवढा समजला नाही. भारतात आधुनिक सिस्टीमच उभी नसताना, त्याच्या पुढच्या dystopia ची प्रतिमा रुजत नाही असं वाटतं. ह्याच प्रकारात अवधूत डोंगरे ह्यांचं ‘भिंतीवरचा चष्मा वाचलं. कादंबरी महाराष्ट्राच्या बाहेर घडते आणि त्या परिसराचे बारकावे कादंबरीत आहेत. कादंबरीला लय आहे, पण गोष्ट नाही. स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस, पण अधिक त्रयस्थपणे आणि आजूबाजूच्या सामाजिक-राजकीय संदर्भाने असंच.  

अजिंठा-वेरूळ-औरंगाबादबद्दल काही टुरिस्ट निरीक्षणे

१. फार प्रखर नसलेला, पण चांगला फोकस होऊ शकणारा टॉर्च ही अजिंठामधील चित्रे बघण्यासाठी एकदम आवश्यक गोष्ट आहे. मोबाईलचे टॉर्च अजिबात उपयोगी ना...