Friday, March 2, 2018

वाचलेले-पाहिलेले काही

वाचलेले 
१. एम. जे. अकबर ह्यांचे 'Kashmir: Behind the Vale'. 
इस्लामच्या माझ्या आकलनाची सुरुवात हे अकबर ह्यांच्या 'Shade of Swords' ने झाली होती. त्यानंतर त्यांचं 'Pakistan: A Tinderbox' हे पुस्तक वाचताना संदर्भ आणि प्रवाही लिखाण ह्या दोन्हीची सांगड घालण्याच्या त्यांच्या कौशल्याची मला जाणीव झाली होती. काश्मीरबाबतचे त्यांचे पुस्तक हे २००२ सालचे आहे. त्यामुळे मागच्या १७ वर्षांतील घटना त्यांत नाहीत. पण काश्मीरच्या दीड हजार वर्षाच्या इतिहासाची एकदम ओघवती मांडणी त्यांनी केलेली आहे. 
मध्ये 'पटेल असते तर कसा काश्मीर प्रश्न आलाच नसता' अशी चर्चा चालू होती. नेहरू हे काश्मीरबाबत किती आग्रही होते, त्यांनी प्रश्न युनोत नेला (आणि ही चूक होती हे नंतर त्यांना जाणवलं) पण तिथल्या भारतीय प्रतिनिधीने तो चुकीच्या पद्धतीने कसा मांडला आणि पटेलांच्या हिशेबात मुस्लीम बहुसंख्य काश्मीर हे भारतात येणार नाही हेच होते ह्या गोष्टी एम.जे. अकबर ह्यांनी पुस्तकात सविस्तर मांडलेल्या आहेत. 
इट्स अ गुड रीड. Must to get a soberer perspective on Kashmir issue. 
२. 'When Crime Pays' by Milan Vaishnav 
लोकप्रतिनिधी आणि गुन्हेगारी ह्यांच्या संबंधांची चिकित्सा करणारे हे पुस्तक आहे. पुस्तक semi-academic स्वरूपाचे आहे. त्यामुळे भव्य मांडणीपेक्षा नेमकी पण सखोल मांडणी असलेले आहे. 
वैष्णव ह्यांचे मुख्य मुद्दे असे आहेत: 
भारतीय लोकशाहीचे गुन्हेगारीकरण हे १९५०-६० पासूनच सुरू आहे. पण तेव्हा गुन्हेगार हे राजकारणी म्हणून अस्पृश्य होते. पण राजकीय नेत्यांना त्यांचे उपद्रव मूल्य टिकवायला लागणारी मसल पॉवर आणि गुन्हेगारी जगताला लागणारी पोलीस अभयाची स्पेस आणि ह्या पोलीस दलाचा राजकीय नेतृत्वाकडे असणारा कंट्रोल ह्यामुळे लोकप्रतिनिधी आणि गुन्हेगार अशी लिंक बनली. ह्या काळात गुन्हेगार हे प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांच्या छायेत होते. 
१९७० पासून कॉंग्रेस राज्यांच्या स्तरावर दुर्बल बनली. गुन्हेगारांच्या कारवाया स्थानिक असल्याने त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे अभय गरजेचे होते. सतत बदलू शकणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे गुन्हेगारांना आपला व्यवहार सुरळीत ठेवणे कठीण झाले. त्यामुळे आपणच लोकप्रतिनिधी बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 
राजकीय पक्षांची रिसोर्सेसची गरज आणि मतदारांची जात आणि सरकारी कामे होण्यासाठी कोणा बाहुबलीचा रेफरन्स लागण्याची गरज ह्या दोन्हीचे पर्याय गुन्हेगार बनले. म्हणजे मतदारांनी त्यांना जाणीवपूर्वक (भीतीच्या पोटी नव्हे!) निवडून दिले. 
पण गुन्हेगार लोकप्रतिनिधी झाल्याने त्यांनी आपली परत निवडून येण्याची शक्यता जास्त राहावी म्हणून सरकारी यंत्रणा दुबळी राहील आणि सामाजिक भेगा जिवंत राहतील अशाच स्वरूपाचे राजकारण केले/करतात. त्यामुळे त्यांच्या आसपासचे काही थोडे लोक वगळता अन्यांचा तोटाच आहे. 

३. सुजाता गिडला ह्यांचे Ants among Elephants 
हे पुस्तक आधी यु.एस. मध्ये प्रकाशित झाले. तिथे भारतातील जातीव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे पुस्तक असा त्याचा गवगवा झाला. त्यानंतर ते भारतात आले. 
लेखिकेच्या आधीच्या दोन पिढ्यांची आणि विशेषतः तिच्या मामाची ही गोष्ट आहे. लेखिका ही आंध्रातील ख्रिश्चन दलित आहे. ती हे पटवून देते कि कितीही विसंगत वाटलं तरी तिला, विशेषतः तिच्या आधीच्या दोन पिढ्यांना  ख्रिश्चन असूनही दलित असण्याचेही भोग वाट्याला आलेलेच आहेत. अर्थात तिला ख्रिश्चन म्हणून काही नेटवर्क बेनिफिट मिळाला आहे का ह्याबाबत काही स्पष्टीकरण नाही. 
लेखिकेचा मामा हा नक्षल चळवळीत होता. पण तिथेही त्याला सामाजिक भेदभावांचा सामना करावाच लागला. 
लिखाणात आणि मुळातल्या अनुभवांत जो प्रामाणिकपणा आहे तो पुस्तक वाचताना भिडत राहतो. लेखिकेच्या आईची शिकायची आणि त्यानंतर मुलांना चांगले आयुष्य द्यायची धडपड हा भाग प्रचंड ताकदीने आला आहे. 
जाती आणि त्यातून लाखोंच्या आयुष्यांची झालेली परवड ह्याबद्दल मोठे भाष्य करणारे हे पुस्तक नाही. पण अन्यायाच्या ह्या अजस्त्र backlog ला टक्कर देताना 'परतावा देणारे शिक्षण' हा किती मोलाचा मार्ग आहे ह्यावरचा विश्वास वाढवू शकेल असे पुस्तक आहे. 

पाहिलेले
१. लव्ह पर स्क्वेअर फीट - विकी कौशलचा हा चित्रपट नेटफ्लिक्स वर रिलीज झाला आहे. थोडा पसरट आहे आणि उथळही. मी विकी कौशलसाठी पाहिला. 

२. क्राऊन सिझन २ - इंग्लंडच्या राणीवर बेतलेली ही सिरीज आहे. सुरुवाताचे काही भाग एकूणच सिरीजला कौटुंबिक मालिका करून सोडतात कि काय असे वाटतात, पण नंतर सिझन ग्रीप पकडतो. संवादात वापरलेले शब्द हा सुद्धा ह्या मालिकेचा एक विशेष म्हणायला लागेल. त्यांतला राणीने कसं वागावं ह्याबाबत लिखाण करणाऱ्या एका स्तंभलेखाकाबद्दलचा एपिसोड एकदम विशेष आहे. आपल्याला जे बोलायचं आहे ते ठाम, पण व्यक्तीशः टीका टाळून  आग्रही आणि समर्पक शब्दांतून कसं सांगता येतं आणि कसं सांगावं ह्याचं उत्कृष्ट उदाहरण हा भाग आहे. 

३. Black Mirror - सिझन ४ 
Black Mirror बद्दल फार काही सांगायला नको. कारण जे ह्या पंथात आहे त्यांनी हा माल सेवन केलेलाच असणार आहे आणि जे ह्या पंथात नाहीत त्यांनी हा प्रयोग करूच नये! 

४. Inside Edge 
Amazon Prime वर ही हिंदी-इंग्लिश मालिका आहे. क्रिकेटमधील लीग, त्यातील डावपेच आणि फिक्सिंग अशा चविष्ट घटकांवर सेक्स, रहस्य आणि ग्रीप ठेवणारी पटकथा असा मसाला आहे. सुरुवातीच्या काही भागांनंतर ती नेहमीचे रस्तेच गिरवते. पण तरीही वेगळा प्रयत्न आहे. रिचा चढ्ढा आणि विवेक ओबेरॉय ह्यांनी चांगलं काम केलेलं आहे. 

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...