Thursday, June 1, 2017

हंपी

       कुटुंब-कबिला घेऊन आनंदी वाटायला जाण्यासाठी हंपी नाही. संपन्न होणारी, विस्तार पावू इच्छिणारी, प्रतिस्पर्धी साम्राज्यांना धुळीस मिळवू इच्छिणारी किंवा सामावून घेऊ पाहणारी साम्राज्ये, त्यांच्या पाठच्या धार्मिक-सांस्कृतिक-आर्थिक प्रेरणांचा इतिहास, शिल्पे, त्यातील मिथके, शिल्पांतून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या सर्वात रस असेल तर हंपी एक खजिना आहे. पण तसं नसेल तर ‘फन’ साठी आलेल्याला हंपी बोअर होऊ शकतं. अशी बोअर झालेली काही कुटुंबे आमच्या हॉटेलात होती, सोबत फिरत होती.
ह्याशिवाय हंपीला अनेक परदेशी प्रवासी येतात. हंपीजवळचा एक भाग, विरूप गड्डे, हा हिप्पी आयलंड म्हणून प्रसिद्ध आहे. पण मेच्या शेवटी हा सगळा भाग सुनसान होता.ते का येतात हे ठाऊक नाही. पण मला दोन क्युरियस प्रश्न हंपीमध्ये विचारले गेले (जसे पूर्वी सी.एस.टी. मध्ये फिरताना कुजबुजत विचारले जायचे, ट्रिपल एक्स, ट्रिपल एक्स, तसे!). ते प्रश्न म्हणजे, ‘डू यू वॉंट वीड, बेस्ट क्वालिटी वीड?’ आणि ‘डू यु वॉंट टू डू स्टफ?’ ह्यांत काही हिंट असावी असं वाटतं. अर्थात हे जनरलायझेशन आणि छोट्या संपलवर आधारित असल्याने चुकीचं असण्याची भरपूर शक्यता आहे. कारण मला असेही परदेशी प्रवासी भेटले जे हंपी चालत किंवा सायकलने फिरत होते आणि त्यांना माहितीचे औत्सुक्य पुरेपूर होते. अर्थात ह्यातले बहुतेकजण अनेक महिने भारतात होते. विविध ठिकाणांना भेटी देऊन ते हंपीत आले होते. ‘कल्चर’ हे कारण त्यांच्या प्रवासाच्या कारणात होते.
मी स्वतः का हंपीला गेलो? खरंतर असा विविध ठिकाणांना भेट देण्याचा प्रवास का करावा ह्या माझ्यासाठी एक फिलोसॉफीकल पझल आहे. म्हणजे स्थळबदलाने मनोरंजन होऊन आपण रुटीनच्या चक्रात फिरायला सज्ज होतो हा प्रवासाचा भाग आहेच. पण मग हे मनोरंजन दुसऱ्या ठिकाणी जाऊन केवळ तंगड्या फैलावून पुस्तक वाचत बसल्यानेही मिळेल, मग गाडी, मोटरबाईक, सायकली, घोडे असे उपद्व्याप करून फिरा कशाला? पण माझ्या ह्या थिअरीला हंपीत तडा गेला. आपल्याला परिचित नसलेल्या, निवांत अशा भवतालात चालत, सायकलीने फिरून दमण्यात असलेली मजा (जी खरंतर च्युत्याप प्रश्न पडण्याच्या आधीच्या दिवसांत मी आपसूक करत होतो 😊) मला रि-डिस्कव्हर झाली. कोरीव कामातील, शिल्पांमध्ये रुची असू शकते, त्यात समजून घेण्यासारखं स्ट्रक्चर्ड झालेलं ज्ञान आहे हे त्याबद्दल वाचताना समजलं.
हंपी, किंवा हंपीचे अवशेष हे केवळ aesthetic अनुभव म्हणूनही बघता येऊ शकतात. पण मग त्यातला सौंदर्यशास्त्राचा भाग समजून घ्यायची सोय हवी. हंपीत गाईड आहेत, पण ते प्रामुख्याने हंपीच्या पाठचा राजकीय इतिहास, वंशावळी, कोणी कुठले मंदिर केव्हा व का बांधले ह्यातल्या रंजक बाबींवर बोलतात (आणि काहीवेळेला ढाचेच देतात असं मला पाखंडी माणसाला वाटलं! उदाहरणार्थ, विठ्ठल मंदिरातील म्युझिकल पिलर्सची कारणीमिमांसा आणि प्रात्यक्षिक). पण ‘नरसिंह’ हे प्रतिक साऱ्या कोरीव कामांत का आढळते? ‘याळी’ ह्या प्राणीसंयुगाची कल्पना कशी आली? अशा प्रश्नांना ते उत्तरे देऊ शकत नाहीत. अर्थात ते सांगतात ते संदर्भही रोचक असतात आणि गाईड्सचे ट्रेनिंगही standardize केलेले वाटते. गाईड हा व्यवसाय किफायतशीरही असावा, कारण आमचा विठ्ठल मंदिरातील गाईड हा शिक्षणाने वकील होता.

हम्पी फिरताना कर्नाटक पर्यटन विभागाने प्रशिक्षित केलेले अधिकृत गाईड घेणं चांगलं ठरतं. पण हे गाईड कामचलाउ प्रशिक्षित असतात असं जाणवतं. विरुपाक्ष मंदिरात हरि-हर मंदिर दाखवताना आमचा गाईड म्हणाला कि हंपीला ‘दक्षिण काशी’ असं म्हणतात. आता दक्षिण काशी नेमकं कुठलं शहर हे एक गूढ आहे. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर, तामिळनाडूमधील कांचीपुरम किंवा रामेश्वर ह्यांच्या संदर्भात मी ह्याआधी ‘दक्षिण काशी’ हे संबोधन वाचलेलं आहे. आता त्यात हंपीची भर.
अर्थात शिल्पांच्या माहितीसाठी गाईड घेणं आवश्यक आहेच असं नाही. हम्पीच्या शिल्प आणि कलेबद्दल सविस्तर माहिती देणारी ही दोन पुस्तके आहेत:
१)     HAMPI VIJAYANAGARA by John M Fritz and George Michell
२)     HAMPI by Subhadra Sen Gupta
३)     ह्याशिवाय Archaeological Survey of India ने प्रकाशित केलेलं HAMPI नावाचं पुस्तक छोटं पण शिल्पांच्या संबंधित अनेक टर्म्स वापरून लिहिलेलं आहे. पण ह्या टर्म्सच्या व्याख्या पुस्तकाच्या शेवटी पुरवलेल्या नाहीत.
पहिल्या दोन पुस्तकांत उत्तम रंगीत फोटोज आणि अवशेषांच्या प्रमुख वैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गाईड जे सांगू शकेल त्याहून थोडं जास्तच ह्या पुस्तकांतून कळू शकतं. हंपीत फिरताना ही पुस्तकं सोबत ठेऊन फिरणं बेस्ट. मी एका परदेशी प्रवाश्याला असं करताना पाहिलं. बाकी गाईड घेणारेही लोक फार थोडे असतात. बहुतेक लोक असेच फिरत असतात. स्थानिक, जवळच्या भागांतून येणारे पर्यटक रिक्षातून मेजर अॅट्रॅक्शन्स फिरतात तेव्हा रिक्षावाला देतो ते ढाचेच ते ऐकून घेतात. बेसिक माहिती देणारे फलक जवळपास सर्वत्र लावलेले आहेत. कन्नड, हिंदी आणि इंग्रजी ह्या तीन भाषांत त्यावर माहिती आहे. गाईड देतो त्या प्राथमिक माहितीशी असलेले फलकांचे साधर्म्य खूप जास्त आहे. कदाचित प्रमाणीकरण केलेल्या गाईड प्रशिक्षणाने हे घडत असावं.
गाईड घेतल्याचा फायदा होतोच, पण काहीवेळा त्यांची चर्पटपंजरी कंटाळवाणी होते किंवा अविश्वसनीय वाटते. तुमचा गाईड आणि तुमच्या आजूबाजूच्या पार्टीने घेतलेला गाईड अगदी सारख्यांच शब्दांत समजावत असतात. तुमच्या माहितीच्या अभावाची एक लेव्हल त्यांनी गृहीत पकडलेली असते आणि तुमची पातळी त्याच्या खाली असेल तर एकतर तुम्ही बोअर होता किंवा त्यांच्या बोलण्यातला उथळपणा जाणवून व्यथित होता.
अशाच एका गाईडला आम्ही विचारलं कि इथल्या पुरातत्व विभागात ह्या शिल्पांची आणि इतिहासाची अधिक तपशीलवर माहिती देऊ शकणारे कोणी आहे का किंवा इथे इतिहास संशोधक किंवा कला-इतिहास संशोधक भेट देत असतील तर ते कुठे आहेत का. त्यावर गाईड म्हटला कि तो आजवर अशा कुणाला भेटलाच नाहीये. त्याचं ट्रेनिंग हंपी विद्यापीठात झालं, जिथे त्याला बेसिक इतिहास आणि शिल्पांची माहिती दिलेली आहे. पण त्याचा संशोधक वगैरे कोणाशी परिचय नाही.
गाईड हे हंपीमधल्या कुतूहल असलेल्या पर्यटकांसाठी महत्वाची भूमिका बजावतात. पण केवळ प्राथमिक कुतूहलापलीकडे जाऊन थोडी अधिक डुबकी मारायची असेल तर काय करावं हा प्रश्न आहे.                
--
हम्पिमध्ये फिरताना आणि नंतर हंपी आठवताना आलेले काही तुकडे:
१.     हम्पीमधील रिक्षावाल्यांकडून आलेली अंतरे ही ही डिस्काऊंट करून घ्यावीत. अनेकदा त्यांनी सांगितलेले १० किलोमीटर अंतर हे प्रत्यक्षात २ ते ३ किलोमीटर असते. एक प्रकारे हा एक मानसिक प्रयोग आहे. चालताना चढ-उतारांचे २-३ किलोमीटर अंतर हे सुद्धा खूप जास्त वाटू शकते.
२.     रिक्षावाल्यांना अवशेष काय आहेत ह्याची माहिती विचारणे धोक्याचे आहे. Courtesan Market नावाने ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांबद्दल एका रिक्षाचालकाने आम्हाला इथे कामसुत्रातील चित्रांसारखी शिल्पे आहेत असं सांगितलं. रिक्षा ही केवळ दळणवळण साधन म्हणूनच वापरावी. बाकी इन्टरनेट, पुस्तके आणि गाईड.
३.     हंपीमध्ये जी स्मारके/अवशेष खूप प्रसिद्ध आहेत त्यात विरुपाक्ष मंदिर आहे. हम्पीच्या अन्य मंदिरांत एकतर मूर्तीच नसते किंवा भग्नावस्थेतली मूर्ती असते. ह्या अन्य मंदिरांत पूजा-अर्चा चालत नाही, काही ठिकाणी भाविक फुले वाहताना आढळतात. पण विरुपाक्ष मंदिरात पूजा-अर्चा चालू आहे आणि ऐतिहासिक मंदिर ह्यापेक्षा धार्मिक स्थळ अशा अर्थानेच विरुपाक्ष मंदिरात जास्त गर्दी आढळली. ह्या मंदिरांच्या छतावर सुंदर चित्रे आहेत. (अन्य मंदिरातही आहेत, पण ह्या मंदिराइतकी चांगल्या अवस्थेत ती उरलेली नाहीत.) [1]
४.     तिथल्या कोरीव कामांत याळी’ ह्या सात प्राण्यांच्या शरीराने बनलेल्या एका प्राण्याचा (ज्याला ‘व्याल’ असेही म्हणतात) खूप उपयोग आहे.
याळी 

५.     हजारराम मंदिर (हजार हा कानडी शब्द आहे, ज्याचा अर्थ प्रांगण असा होतो): ह्या मंदिराच्या भिंतींवर तीन स्तरात रामायणाची कथा कोरलेली आहे. सर्वात खालच्या स्तरापासून कथा सुरू होते आणि हा स्तर बघत बघत मंदिराची प्रदक्षिणा करत आपण कथेत पुढे पुढे जाऊ शकतो. प्रत्येक पॅनेल रामायणातील एक प्रसंग दर्शवते.
पुत्रकामेष्टी यज्ञाची हजारराम मंदिरातील प्रतिमा   

हजारराम मंदिर ज्याला Royal Enclosure म्हणतात त्या भागाजवळ आहे. दरबार प्रांगण, भूमिगत शिवमंदिर, महानवमी दिब्बा असे अनेक महत्वाचे अवशेष जवळपास आहेत. जर एखाद्याला हे काय आहे, ह्यातल्या कोरीव कामाचा काय अर्थ आहे, हे अवशेष अवशेष का झाले अशा कसल्याही प्रश्नांत इंटरेस्ट नसेल तर असा मनुष्य बोअर होतो. असेच एक कुटुंब आम्हाला हजारराम मंदिरात भेटले.

    समृद्ध नोकरदार/व्यावसायिक पती, पत्नी आणि मुले असे वाटावे असे हे कुटुंब होते. तिघेही कंटाळून गेले होते. पण त्यांचा ड्रायव्हर त्यांना ठिकाणांची यादी दाखवणार होता ती त्यांना पुरी करणे भाग असल्यासारखे ते फिरत होते. अगोदर बंगलोर ते होस्पेट ह्या ट्रेन प्रवासात माझी कुटुंबप्रमुखाशी तोंडओळख झाली होती. आम्ही फिरून कोणकोणते प्रसंग कोरले आहेत हे बघायचा प्रयत्न करत असताना आधी ह्या कुटुंबाने फोटो काढून घेतले, अन्य कुटुंबाना फोटो काढायला मदत केली. नंतर मला कुटुंब प्रमुख भेटला तो म्हणाला, ‘एक मंदिर से दुसरे मंदिर जा रहे है.’ मी त्याला हे काय कोरीव काम आहे, इतिहासात विजयनगरचं काय स्थान आहे अशा अनुषंगाने बघा म्हटलं, तर तो म्हणाला, ‘पास मे कही घुमने जाना था तो चल दिये’.
    हे तो एक शाश्वत सत्य बोलला. पर्यटन हा काही काही काळाने टिक करण्याचा एक बॉक्स आहे आणि त्यातले टिक-मार्क्स हे स्क्वेअर फीटसारखे सुख मोजण्याचे एकक आहे. हम्पीमध्ये जी कुटुंबे फिरताना दिसली ते असे टिकबॉक्स होते. आई-वडील मुलांना ह्या अवशेषांच्या संदर्भात काही समजावून सांगतायेत असं दिसत नाही. फोटो काढणे (सर्व भाषा,प्रांत ह्यातली युनिव्हर्सल क्रिया) किंवा ‘ए ज्यादा भागो मत’ अशा विविध शेड्स प्रेमळ दटावण्या (वेगवेगळ्या भाषेतल्या) हेच मला दिसलं. कशी भारतीयांना इतिहासाची पर्वा नाही असा उजवा आरडाओरडा मी करणार नाही.
    आम्ही royal enclosure आणि अन्य काही ठिकाणांची सायकल ट्रीप करत होतो. १८ वर्षाचा एक सोलो traveller ठाणेकर, आम्ही दोघे, एक इंग्लिश पेंटर (जो नेपाळ, दिल्ली, राजस्थान, गोवा असं करत करत हंपीमध्ये आला होता) आणि एक जर्मन तरुण (ज्याची गर्लफ्रेंड भारतात एका स्वयंसेवी संस्थेत उन्हाळ्याच्या काळात काम करत होती आणि हा तोच वेळ फिरत होता) असे आम्ही पाचजण होतो. आमच्या सोबतचे दोन परदेशी हे काही इतिहासात फार रस घेणारे नव्हते. ते दोघं ज्याला ‘चिलिंग आउट’ म्हणता येईल अशा अवस्थेत भटकत होते.
    पण हजारराम मंदिरात आम्हाला असेही दोघे भेटले ज्यांत एकजण प्रत्येक पॅनेलसमोर रामायणातला एक एक प्रसंग सांगत होता आणि सोबतची परदेशी व्यक्ती ऐकत होती/प्रश्न विचारत होती. नंतर एक दिवसासाठी हंपी भटकायला आलेला एक परदेशी प्रवासी मला भेटला ज्याने कोरलेल्या प्रसंगातला हनुमान (आणि हा व्यक्ती मंकी-गॉड वगैरे नाही, तर हनुमान असेच म्हणाला) ओळखला होता. त्याला रामायणाचा प्लॉटही माहिती होता.   

६.     ह्या सायकल ट्रीपच्या सुरुवातीला आमच्या ट्रीप-गाईडच्या वागण्याचा एक नमुना. हम्पीमध्ये सर्रास दिसतात त्या लाईटवेट पांढऱ्या सायकल्स (मी मुंबईत त्या फारश्या पाहिलेल्या नाहीत.). अर्थात आम्ही ऑफ सिझनला गेल्याने सायकल चालवणारे कमीच होते. पण आमच्या गाईडने आमच्या सायकल ग्रुपमधल्या ३ भारतीय लोकांना दिल्या अशा सायकली ज्या आपण नेहमी पाहतो आणि २ परदेशी प्रवाश्यांना दिल्या त्या लाईटवेट सायकल्स. त्याने असं का केलं हे मी त्याला विचारलं नाही. मला मिळालेली सायकल वाईट होती अशातलाही भाग नाही. पण असे दोन गट करावेत असं गाईडला वाटलं हीच बाब माझ्या लक्षात राहिली आहे.
    अर्थात हे discrimination अधिकृत स्तरावरही आहे. Lotus Mahal आणि सभोवतालचे अवशेष बघायला भारतीयांना तिकीट आहे ३० रुपये तर परदेशी व्यक्तींना ५०० रुपये. (ह्याला Economics मध्ये Third Degree Price Discrimination म्हणतात जी अधिकाधिक फायदा कमवायची एक क्लृप्ती (युक्तीपेक्षा जास्त ‘यो’ शब्द 😊)) आमच्या सोबतच्या परदेशी दोघांनी तिकीट काढले नाही. ते असेच सावलीत बसून गाईडशी चर्चा करत राहिले.
७.     मंगो ट्री हे हंपीमधलं एक नामचीन रेस्टॉरंट/रेस्तराँ आहे. अर्थात ह्या प्रसिद्धीतला बराचसा भाग ‘सगळेच ह्याला फेमस म्हणतात, आपण कुठे वेगळं म्हणा’ असाही आहे. हंपीतल्या सगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट, रिक्षा ह्या पर्यटकांसाठीच असल्याने तिथे हंपीचे नकाशे, मुख्य आकर्षणे ही सगळी माहिती असतेच. मंगो ट्री काही त्याला अपवाद नाही. पण तिथे एक मराठीतले विजयनगर साम्राज्यावरचे पुस्तक सापडले. पुस्तकाला बाबासाहेब पुरंदरे, देगलूरकर आणि अजून काही जणांचे अभिप्राय सुरुवातीलाच जोडलेले आहेत. पुस्तक काय आहे हे मला फार समजून घेता आलं नाही. पण एकदम मराठी पुस्तक गवसणं हीच सुखद धक्क्याची बाब होती. अर्थात जेवढी पाने चाळली त्यावरून विस्मृतीत गेलेला, प्रेरणादायी इतिहास, वैभवकाळ ह्याच बाबी प्रामुख्याने नजरेत भरल्या.
८.     ह्या बाबी हंपीशी निगडीत नसतील असे नाही, किंबहुना हंपीबाबत माहिती ठेवणाऱ्या अनेकांत मुस्लीम आक्रमकांच्या विस्ताराला पायबंद घालत सुमारे २२५ वर्षे टिकलेले आणि वैभवशाली अशा हिंदू साम्राज्याची राजधानी हाच हंपीचा संदर्भबिंदू आहे. हा संदर्भ एकदम योग्यही आहे. पण मला हंपीत फिरताना हा संदर्भ टोकदारपणे जाणवला नाही. हंपीत फिरताना मला झालेली जाणीव ही मानवी स्वभावाच्या काही  मूलभूत प्रेरणेबाबत आणि मानवी समाजरचनेबाबत प्रश्न पाडणारी होती:
पहिलं म्हणजे, गोष्टी सांगण्याची तहान
दुसरं म्हणजे, विजयनगरच्या समृद्धीची कारणे, म्हणजे करपद्धती, शेतीची उत्पादकता, व्यापारउदीम ह्याबद्दल कळून घेण्याचे कुतूहल.
अर्थात ह्यामुळे हंपीच्या नाशाला मी काहीच खास नाही असं मानतो असं नाही. असा विध्वंस झालाय हे आहेच. पण इतक्या विध्वंसानंतर एक स्तब्ध, उदाससुंदर शहर तरीही आपल्याला गवसतं.
नाश के दुःख से कभी मिटता नही निर्माण का सुख
प्रलय की निस्तब्धता मे सृष्टी का नवगान फिर फिर
नीड का निर्माण फिर फिर, नेह का आव्हान फिर फिर
ह्या हरिवंशराय बच्चनांच्या ओळी आठवाव्यात असं. अर्थात इथे सृष्टी नाही तर माणसाची रचना उभी करायची आणि उद्ध्वस्त करायची, एकमेकांशी कायम द्वंद्वात असलेली वृत्तीच हा नाश आणि निर्माणाचा खेळ करते आहे. मला कुतूहल आहे ते माणसाच्या ह्या वृत्तीचे.    
९.     उन्हाळ्यात हम्पीतील बहुतेक खाण्याच्या ( पिण्याच्या म्हणता येणार नाही कारण दारू हंपीमध्ये ऑफिशियली विकली जात नाही) जागा गोव्याप्रमाणे बंद असतात. एकाच हॉटेलात वारंवार खाणे किंवा सरासरी दर्जाच्या थोडक्या सुरू असलेल्या हॉटेलात खाणे हाच पर्याय उरतो. वर म्हटलेलं मँगो ट्री आहेच, जवळच श्री व्यकंटेश्वरा आहे. कमलापूरमध्ये (हंपीपासून ४ किमी) साई हॉटेल आहे जिथे ६० रुपयांत (मे २०१७ मध्ये) उत्तम थाळी मिळते.
१०.   इन्टरनेटवर हंपीबद्दल बरीच माहिती आहे. त्यातल्या दोन लिंका
१)     http://hampi.in
२)     हंपीत काय बघावे, काय खावे, कसे फिरावे ह्याची चांगली आणि अद्ययावत माहिती (मे २०१७मध्ये) http://wikitravel.org/en/Hampi   
११.   विजयनगर साम्राज्य ही अर्थातच हंपीच्या संदर्भांची पार्श्वभूमी आहे. दुर्दैवाने १९०० साली लिहिलेल्या Forgotten Empire ह्या Robert Sewell च्या पुस्तकाशिवाय विजयनगरच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे पुस्तक मला मिळाले नाही. अर्थात माझा शोध तसा त्रोटक होता. Robert Sewell हा १९व्या शतकात हंपीमध्ये कार्यरत ब्रिटीश अधिकारी होता. त्याचं पुस्तक माहितीपर असलं तरी चिकित्सेची तऱ्हा जरा रुक्ष आहे आणि मुळात २०व्या शतकात विजयनगरच्या इतिहासाबद्दल झालेले नवे संशोधन त्याच्या पुस्तकातून कळत नाही.
१२.   Robert Sewell आणि Alexandar Greenlaw ह्या दोघांनी अनुक्रमे १८८३ आणि १८५६ साली काढलेल्या हम्पीच्या अवशेषांच्या छायाचित्रांचे आणि त्याच अवशेषांच्या सद्यस्थितीचे एक छोटेखानी प्रदर्शन हंपीत आहे. फोटोंचे वर्णन करताना ज्याने कोणी वर्णने लिहिली त्याला फारच थोडी इंग्रजी विशेषणे येतात हे वर्णने वाचताना कळतं.
१३.   हंपीत फिरताना का कुणास ठाऊक, मला Westworld सिरीयल आठवत राहिली. कदाचित हंपीच्या साऱ्या दिशांना दिसणाऱ्या बोल्डर्सचा (एकावर एक असे रचले पडलेले तपकिरी रंगाचे मोठे मोठे दगड) परिणाम असावा.     
--
मंदिरांच्या प्रवेशद्वाराशी असणारी गंगा-यमुना शिल्पे (गाईडच्या माहितीनुसार) 
Royal Enclosure मधील पुष्करणी 
विठ्ठल मंदिरातील एक शिल्प 

वाली आणि सुग्रीव (विठ्ठल मंदिर)

प्रसिद्ध प्रस्तर रथ (स्टोन चॅरिअट) विठ्ठल मंदिर 

विरुपाक्ष मंदिर, मातंग टेकडीवरून संध्याकाळी 
अच्युतरायपेठ येथील मंदिरातील खांबावरील शिल्प 
हजारराम मंदिर, बुद्धशिल्प, दशावतारापैकी एक म्हणून 

हंपीच्या प्रवासाचा शेवट आम्ही माल्यवंता रघुनाथ मंदिराच्या पाठी असलेल्या टेकडीच्या टोकाशी बसून सूर्यास्त पहात केला. आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा तिथे प्री-वेड शूट चालू होतं. एक ड्रोन लांबून उडत उडत आलं आणि एकमेकांच्या मिठीत (फार काळ झाल्याने आणि सतत ड्रोनकडे बघून अवघडून) असलेल्या वाग्दत्त वर-वधू ह्यांच्यावर फोकस झालं.
हंपीच्या अवशेषांत प्री-वेड करून हे नवपरिणीत जोडपं काय समजून घेणार आहे? कि हे साम्राज्य जिथे आज फक्त अवशेष बनून राहील तिथे आपलं लग्न काय XX? असं तर नसेल. हा तर मला आलेला कुत्सितपणा आहे.
पण जसं मुंबईत एशियाटिक सोसायटी इमारत ही ब्रिटिशांनी प्री-वेड शूटसाठीच मागे ठेवली असा एक समज काही दिवसाने पसरणार आहे, तसं हंपीच्या अवशेषांचं झालं तर? एखादी जागा टुरिस्ट व्यापून टाकतात तेव्हा ती जागा एका बॉक्स टिक करण्याच्या समाधानी भावनेने भरून जाते आणि बाकी सगळं हद्दपार होतं. हंपीमध्ये जी तिकिटं लावून बघायची फेमस ठिकाणे आहेत तिथे हेच जाणवतं. विठ्ठल मंदिरातील दगडी रथाच्या एक एक भागांना टेकून लोक ग्रुप फोटो काढतात, सेल्फी काढतात. पण मंदिराच्या खांबांवर, छतांवर, भिंतींवर कोरलेल्या गोष्टी एकमेकांना सांगणारे फार कोणी दिसत नाहीत.
मात्र हंपीच्या रस्त्याने थेट अक्सेस नसलेल्या किंवा थोड्या कमी प्रसिद्ध ठिकाणांत एक eerie भावना जाणवली. फारशी गर्दी नसताना, टळटळीत दुपारी किंवा कलत्या प्रकाशाच्या संध्याकाळी अवशेषांत फिरताना, अच्युतराय मंदिर, सुळे मार्केट (देवदासी बाजार, देहविक्रयाचा बाजार किंवा courtesan market) आणि पुष्करणी, वराह मंदिर, पट्टाभीराम मंदिर ह्या ठिकाणी अशी वेळ आली की ही मागे उरलेली मंदिरे, त्यातले बारकाईचे कोरीव काम, त्यातल्या घाटदार स्तनांच्या आणि निमुळत्या कंबरा असलेल्या स्त्रिया, त्यातले घोटीव शरीराचे किंचित बुटके वीर, वारंवार येणारा नरसिंह, ह्या मंदिरांची निखळती गोपुरे आणि रिकामी गर्भगृहे, बाजारपेठांच्या गाळ्यांचे उरलेले, तुटलेले कोरीव शिस्तबद्ध खांब, पुष्करणीच्या लयबद्ध कन्व्हर्ज होणाऱ्या पायऱ्या, त्यात उगवून आलेले गवत, बाजूचे अजस्त्र आकारांचे एकमेकांवर तोललेले पत्थर ह्या साऱ्यांची अवशिष्ट निस्तब्धता आपल्याला जाणवते. हंपी सोडून पुढे दोन दिवस झोपेच्या अर्ध्या-मुर्ध्या अवस्थेतही आपण ह्या आपल्याला अवगत नसलेली भाषा बोलणाऱ्या विजानात फिरतो आहोत अशी, खूप वेळ ट्रेन मध्ये बसून उतरल्यावरही काही काळ ट्रेनचे कंप जाणवत राहावेत अशी, जाणीव मला होत होती. माझ्यासाठी ही निस्तब्धता, ही जाणीव आक्रंदत नाही, किंवा गदागदा हलवून जागंही करू पहात नाही.
कदाचित काही दिवसांनी उपजीविकेच्या जुमल्यात ह्या साऱ्या जाणीव हरवूनही जातील किंवा त्यांचा एक अर्क एखाद्या अपरिचित तळाशी जाऊन बसेल. पण आज काय वाटतं आहे? आज मला ही निस्तब्धता माणसाच्या भौतिक जीवनाच्या समृद्धीला अधिकाधिक संपृक्त करण्याचा जो एक अनिवार प्रयास चालू आहे त्याची तटस्थ आठवण करून देणारी वाटते. त्या बाजारांच्या अवशेषांत, शिल्पांमध्ये कोरून दीर्घायुषी केलेल्या, जो कोण येऊन ह्या शिल्पांसमोर उभा राहिल त्याला कळवायची अशी, भोगायची आणि सांगायची असोशी उरलेली आहे. आपल्याला केव्हातरी वाटलं की ही असोशी आपण मागच्या काही दशकांतच जगू लागलो कि काय, आणि आधी काही वेगळेच होतो कि काय, तेव्हा हंपी सांगेल कि असं नाही, असं नाही.
--
     [1] काही दिवसांनी केरळातील पेरूमल मंदिरात सुद्धा अशाच प्रकारच्या रंगातील चित्रे बघायला मिळाली. अर्थात भाविकांच्या गर्दीमुळे ती निवांत पाहता आली नाहीत आणि अर्थातच त्यांचे फोटोही घेता आले नाहीत. 

अजिंठा-वेरूळ-औरंगाबादबद्दल काही टुरिस्ट निरीक्षणे

१. फार प्रखर नसलेला, पण चांगला फोकस होऊ शकणारा टॉर्च ही अजिंठामधील चित्रे बघण्यासाठी एकदम आवश्यक गोष्ट आहे. मोबाईलचे टॉर्च अजिबात उपयोगी ना...