Saturday, December 24, 2016

काही कोरलेल्या शब्दांचे तोंड फिरवलेले देशीकरण

फेसबुकवर विद्याधर दाते ह्यांचा हा लेख वाचताना Statue of Liberty च्या खाली कोरलेल्या काही ओळी मिळाल्या. मला सुनील तांबे ह्यांनी फेसबुकवर शेअर केल्याने हा लेख मिळाला, अन्यथा मिळाला नसता. माझे मराठी भाषिक फेसबुक मित्र हे असा लेख वाचण्याची शक्यता थोडी आणि अमराठी भाषिकांना शिवाजी महाराज ह्याविषयाबाबत फारच आदर असतो/माहिती असते/ माहिती घ्यायची आवड असते हा राष्ट्रीय सांस्कृतिक सेवक वर्गाने पसरवलेला साजूक गैरसमज आहे असं असल्याने मी लेख वाचण्याची शक्यता अन्यथा फार थोडी होती. अर्थात मराठीत असा लेख प्रसिद्ध करून स्वतःचीच हानी (आणि परत लेख दुसऱ्या दिवशी मागे घ्यायची क्षुल्लक मानहानी) करून घ्यायला कोणी IE का कुबेर धजावला नसता हेही खरं आहे.

Statue of Liberty सोबत  ज्या कवितेतील ओळी कोरलेल्या आहेत ती मूळ कविता:

 The New Colossus
Emma Lazarus, 1849 - 1887

 Not like the brazen giant of Greek fame,
With conquering limbs astride from land to land;
Here at our sea-washed, sunset gates shall stand
A mighty woman with a torch, whose flame
Is the imprisoned lightning, and her name
Mother of Exiles. From her beacon-hand
Glows world-wide welcome; her mild eyes command
The air-bridged harbor that twin cities frame.
“Keep, ancient lands, your storied pomp!” cries she
With silent lips. “Give me your tired, your poor,
Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore.
Send these, the homeless, tempest-tost to me,
I lift my lamp beside the golden door!”

(कविता https://www.poets.org/poetsorg/poem/new-colossus ह्या लिंकवरून घेतलेली आहे)

ह्या कवितेला धरून, पण आशयाच्या दृष्टीने पूर्ण वेगळ्या काही ओळी (अर्थात मी लिहिलेल्या)

अरे कसला आलाय statue of liberty, म्हणे ज्योत स्वातंत्र्याची
आम्ही पसरली आमच्या अंगावर सुबक पैठणी इतिहासाची
सर्वात उंच, घोड्यावर सज्ज, दूर जमिनीवर त्याची प्रजा
समुद्रात उभा एकाकी मिथकांच्या अंधारात जाणता राजा
मग उरे का ना मूल उपाशी, आणि बाप गळफ़ाशी
त्यांना दावू टोक ज्वलंत तलवारीचे दूर समुद्राशी
अरे, लोकशाहीच्या देशांनो, जावो भोसड्यात तुमचे दंभ
कल्पित माणसाचे स्वातंत्र्य, खरा तेवढा आमचा विजयस्तंभ
असतील जरी लोक भुकेने खंगलेले, रांकेत उभे, किंवा दिसतही नसलेले
कितीही गेले चिरडले, दुर्लक्षले, डावलले तरी बेहत्तर
प्रेरणा, आशा, जोश, उत्साह आणि मते सर्वकाळ मिळवण्या  

उभे करीत राहू आम्ही सर्वोच्च सरकारी पत्थर     

Sunday, December 4, 2016

नंदा खरे ह्यांचे ‘उद्या’ आणि बाकीचे

नंदा खरे ह्यांचं ‘अंताजीची बखर’ मी अर्धवट सोडलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. ते फारच एकसुरी तिरकस होत गेलं असं मला वाटलेलं.
       ‘उद्या’ चा रिव्ह्यू मी ऐसी अक्षरेच्या दिवाळी अंकात वाचलेला. Dystopian  ह्या कप्यात परफेक्ट बसेल अशी ही कादंबरी आहे. तंत्रज्ञान, संशोधन- विशेषतः मानवी स्वभावाबद्दलचे संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञानाची मोठ-मोठ्या कोर्पोरेशन्सकडे एकवटणारी माहिती, त्यांच्या प्रचंड होत जाणाऱ्या क्षमता आणि त्यातून उद्भवू शकणा-या शक्यता असं कोरडं वर्णन करता येईल. इन्टरनेटवर active असणाऱ्या, इंग्लिश-मराठीमध्ये क्लासिकच्या पलीकडे वाचणाऱ्या, व्यक्तिवादी भूमिकांशी जवळीक असणाऱ्या वाचकाला ‘उद्या’ ग्रीपिंग वाटू शकेल, हादरवू शकेल किंवा बेचिराख भावनाही देऊ शकेल. प्लॉट म्हणूनही ‘उद्या’ सरस काम करते. एकमेकांशी कमी-जास्त जुळणारे, कमी-जास्त तीव्रतेचे तुकडे हा ‘उद्या’ चा फॉर्म सुरुवातीला अडखळल्यासारखा वाटतो, पण नंतर काम करतो. मध्ये-मध्ये लेखकाची ब्लॉग किंवा निबंध वाटावीत अशी स्फुटे/प्रकरणे येतात. त्यांत आजच्या शक्यता उद्याच्या नियमित अनुभवाच्या गोष्टी कशा बनल्या ह्याची एक थीम दिली जाते. हा प्रकार मला जाम आवडला, विशेषतः स्टीगलिटझ नावाचे एकक.
       कथेतल्या organizations च्या नावांची निवड हेतुतः आहे, पण काहीवेळा तो प्रकार over-stretched वाटतो.
       कथानक प्रवाही ठेवणं, काही बाबी ठसवण्यासाठी थोडं repetitive झालं तरी प्रेडिक्टेबल न होणं हे लेखकाला जमलं आहे. अर्थात कथानकाने आवाका फार मोठा निवडल्याने काही गोष्टी फारशी ट्रीटमेंट न मिळता संपून जातात आणि त्यांचा एकत्र येऊ पाहणारा सांधाही थोडा सगळं कुठेतरी संपवण्याची गरज असा आल्यासारखा वाटतो.
       कथेच्या बहुतेक प्रवाहांत लेखक एकूण सगळ्या रेट्याने बहुतांश सिनिकल झालेला सिझन्ड व्ह्यू घेतो आणि आणि भाबडा आशावादी वाटणारा व्ह्यू थोडा अध्ये-मध्ये वापरतो. इट वर्क्स. आणि त्यात लेखक सरतेशेवटी जगास संदेश, मानवतेस आधार आणि बहुतेकांस प्रेरणा अशा भाषिक जनुकीय परंपरेशी प्रतारणा करण्याचे धाडस दाखवतो हा भारी मामला.
--
कादंबरीच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र 
    
   मराठीत कथा-कादंबऱ्यांचे वाचक म्हणून जो वर्ग शिल्लक उरलेला आहे त्यात कोण ‘उद्या’ वाचेल? आपल्या आजूबाजूला जे दिसतं त्यातून पुढच्या शक्यता घ्यायच्या म्हटल्या तर मला असं दिसलं – मी लोकल ट्रेनमध्ये ‘उद्या’ वाचत असताना मला माझ्या परिघात एक कॉलेज तरुण मराठी पुस्तक वाचताना दिसला, ‘खोगीरभरती’. ‘उद्या’ एक कल्ट नॉव्हेल बनून राहील असा होरा मी लावून ठेवतो.
       Aldous Huxley च्या ‘Brave New World’ च्या ओळीत ‘उद्या’ बसते. त्या ओळीत ती कितवी असेल हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे.
       माणसाच्या इतर माणसांशी होणाऱ्या संबंधातून आर्थिक-सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण होतात. ‘उद्या’ ह्या तिन्ही प्रतलांत न फिरता ह्यातली काही प्रतले बाकी कुणातरी एका प्रतलाच्या विस्तारात subsume होतील ह्या गृहितकावर कथा उभारते. Animal Farm मध्येही असाच प्रयत्न होता, पण Animal Farm रूपकांच्या आडून तात्विक अर्क काढू पाहते. तिथे ‘उद्या’ वेगळी आहे.
--
‘उद्या’ च्याच genre मध्ये काही उल्लेख कराव्याश्या गोष्टी म्हणजे Black Mirror. ही सिरीज Netflix वर उपलब्ध आहे. Dystopian प्रकारात किंवा अन्य स्टोरी टेलिंगमध्ये  व्हिज्युअल्स ही लिखाणापेक्षा तगडी ठरू शकतात. मनुष्य विचार करतो, आठवतो ते दृश्यांमुळे. अगदी लिखाणाच्या अनुभूतीतही प्रतिमांचाच भाग असतो. सिनेमे किंवा सिरीज त्यामुळे अधिक थेट वाटू शकतात. Black Mirror ही स्टोरी टेलिंगची क्षमता भरपूर वापरते. त्यातील भाग हे पुस्तक म्हणून कसे वाटले असते हा कुतूहलाचा भाग आहे.
       Dystopian प्रकारात आपल्या जगण्याच्या पद्धतीत तंत्रज्ञान काही मूलभूत बदल घडवेल किंवा अनपेक्षित वातावरणीय बदल किंवा एलियन्स हे घटक येतील तेव्हा काय होईल ह्याचा बिन-आशावादी पट लावलेला असतो. Black Mirror ह्यातला पहिला भाग, म्हणजे जगण्याच्या काही गृहीतकांत, शारीरिक क्षमतांमध्ये, सामाजिक व्यवहारांमधल्या माहितीच्या ओघात काही radical बदल झालेले आहेत अशा प्रकारची dystopian सिरीज आहे. गोष्टीच्या मुळाशी असलेले तांत्रिक इफेक्ट पडद्यावर बेमालूम येत असले तरी Black Mirror लक्षात राहते ते माणूस काय होईल अशा अवस्थेत ह्याच्या शक्यता मांडण्या-या चिरेबंद स्टोरी-टेलिंगने. जगण्याचे तत्वज्ञान किंवा एथिक्स ह्यांच्यावर भडभडा किंवा तलम संवाद बोलणारी माणसे टाळून अत्यंत थंड आणि निर्दयी स्टोरी टेलिंग हे Black Mirror चं वैशिष्ट्य.
       Westworld चा उल्लेखही करायला हवा आणि Humans आणि Mr. Robot चाही.
--
भविष्याचा वेध घेण्यास फिक्शन किती उपयोगी पडेल? माणसांच्या प्रश्नांचा जो पेच असतो तो अमूर्त पण पोटेन्ट फॉर्म मध्ये पकडायला शब्दच उपयोगी येतील. पण त्यानंतर व्हिज्युअल माध्यमे प्रभावी ठरतील. वर्तमानाचे  विस्तृत रंजक टिपण किंवा अपरिहार्य नॉस्टॅलजिया ह्यासाठी फिक्शन मर्यादित होईल असं होईल का?
Gadgets आणि माहितीचा प्रवाह ह्यांच्या अवस्थांत होणारे बदल, पर्यावरणात होणारे बदल ह्यांनी काय होईल हे सांगण्यापेक्षा दाखवणं अधिक प्रभावी असतं. आणि भविष्याचा वेध घेताना तंत्रज्ञान, माहितीचा प्रवाह, पर्यावरण ह्यांचेच फासे फेकायचे आहेत.
कादंबऱ्या, लिखित कथा ह्या भविष्यवेधाच्या बाबतीत वेगाने नाकाम होऊन पटकथा आणि त्यावर आधारित व्हिज्युअल स्टोरी-टेलिंग ह्यानेच भविष्याची चाचपणी करता येईल. असं होईल का?    
--
‘उद्या’ मध्ये कुठलाही radical तांत्रिक बदल तिच्या मूळाशी नाही. सरकारी निर्णयप्रक्रिया आणि सप्लाय ऑफ पब्लिक गुड्स ह्यावर मोठ्या-मोठ्या कोर्पोरेशन ताबा मिळवतील, मानवी मानसिकता जाणण्याच्या संशोधनात अचूकता येईल, ही अचूकता, बलाढ्य भांडवल आणि माणसाच्या जगण्याचा कोना-कोना टिपत राहणारे cameras ह्यामुळे जगण्याचा एका साच्यात, म्हटलं तर लोकांच्या स्वतःच्या निवडीने आणि म्हटलं तर बाकीचे सारे दरवाजे अप्रत्यक्षरित्या रोखून लोकांना कोंडलं जाईल, त्याचवेळी भारतीय समाजाचे काही खास असे गुणधर्म, जसे जात, विषम लिंग गुणोत्तर असे structural गुणधर्म बाकी राहतीलच आणि असं जर ‘उद्या’ होईल तर काय होईल हे ‘उद्या’ सांगते.
--
शोधनंतर मी वाचलेली मराठी कादंबरीउद्या’. पण ह्या दोन वाचनात जवळपास वर्षाचे अंतर आहे. ‘उद्यात्याच्या वाचकांकडून मुळात माहितीची, जाणिवेची एक पातळी गृहीत धरतो. प्रश्न पाडू शकणाऱ्या मनोरंजनासाठीची डिमांड किती? मराठीत किती? हा तसा उगा गमतीचा प्रश्न आहे.
--  
तसा थेट ह्या कादंबरीशी लागून नाही, पण त्यामुळे डोक्यात आलेलं.
मला असं वाटतं आहे कि ‘उद्या’ हे लेखकाने ही एक माझी करिअरची कृती अशी लिहिलेली नाही. क्षीण का होईना, माझ्या लिखाणाने भविष्यात घडू शकणारे काही अवांछानीय टाळायची कृती आज जन्माला येऊ शकेल असं काही लेखकाला वाटतं आहे असं मला वाटतं. असं काही होऊ शकेल असं मला अजिबात वाटत नाही. फिक्शनने लोकांत बदल होईल, समाजाच्या एकूण हितात वगैरे भर पडेल ही लेखकांनी आपला गंड जोपासण्यासाठी (आणि IPR चे फायदे टिकवण्यासाठी जोपासलेली?) कल्पना आहे. अगदी एखाद्याला पार पार बैचैन वाटलं अमुक एक पुस्तक(इथे टेक्स्टबुक किंवा वैचारिक प्रबंध हे पकडलेले नाहीत.) वाचून तरीसुद्धा तो केवळ एक मनोरंजनाचाच भाग असतो. पुस्तक हे लोकांत प्रत्यक्ष असलेली भावना भडकवायला वापरले जाऊ शकते. पुस्तक हे माहितीचा स्त्रोत म्हणून वापरले जाऊ शकते. पुस्तक हे कृतीचे मूळ असण्याची शक्यता माझ्या मते शून्य आहे. एखाद्या चळवळीत कार्यरत व्यक्तीचे पुस्तक हे तिला augment करू शकते. एखाद्या प्रश्नाने पछाडलेली व्यक्ती स्वतःच्या मांडणीसाठी पुस्तक लिखाण वापरू शकते. पण दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकाचा उपयोग कुठल्याही बदलाच्या मांडणीला प्रपोगंडा म्हणूनच होऊ शकतो.      
मी जर समाजातल्या एखाद्या प्रश्नाने, समाजाच्या वाटचालीने, भविष्याच्या शक्यतेने अस्वस्थ असेन तर मी पुस्तक लिहेन का? जर मी केवळ पुस्तक लिहीन तर मुळात माझी अस्वस्थता हे माझे मनोरंजन, जे मला परवडत होते, आणि पुस्तक हे त्या मनोरंजनाची परिणीती असेच म्हणायला लागेल. हे शक्य आहे कि मी कदाचित अशा प्रश्नांचे तात्विक विवेचन करेन, जेणेकरू त्या प्रश्नांबाबत काय करणे चूक आणि काय बरोबर हे स्पष्ट होईल. पण जोवर मी बदलाच्या कृतीचा भाग होत नाही तोवर माझे लिखाण हे एकतर माझी रोजीरोटी असेल किंवा मनोरंजन. ह्यात गैर काही नाही, पण अशा लिखाणाने सामाजिक बदलाची अपेक्षा पूर्ण व्यर्थ असेल.
फिक्शनने मुळात असं काही ओझं घेऊ नये. फिक्शन हे माणसाच्या एकूण साऱ्या झांगडगुत्त्याला काही शेंडा-बुडखा नाही हेच नव्या-नव्या गोष्टी सांगत गिरवत राहते. पण असं आहे असा आध्यात्मिक निष्कर्ष काढून हात झटकून चालू लागण्यापरीस ती गोष्ट सांगायच्या-ऐकायच्या आदिम नशेसाठी नव्या-नव्या गोष्टी लिहिल्या जातात. एकूणातच काही नसण्याच्या दस्तऐवजात भरही पडत राहते.    

--

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...