Saturday, November 26, 2016

द हाफ लायन आणि अन्य काही राजकीय चरित्रे

       विनय सीतापती ह्यांच्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव ह्यांच्याबद्दलच्या ‘द हाफ लायन’ ह्या पुस्तकाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. अगदी थोडक्यात म्हणायचं झालं तर पुस्तकाचा मुख्य उद्देश, जो कुठल्याही चरित्राचा असतो, तसं चरित्रनायकाला मुख्य झोतात आणणं हा आहे. इथे हा झोत अनसंग हिरो असण्याचा आहे. १९९१-१९९६ ह्या पंतप्रधान असण्याच्या काळात, अल्पमतात असलेले सरकार असूनही, नरसिंहरावांनी केलेल्या बदलांचा श्रेय त्यांना दिलं जात नाही, त्यांची लीगसी मानली जात नाही ह्या मुद्द्यांचा परामर्श हे चरित्र घेतं. १९९१-९२ च्या वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या नियमन चौकटीत घडवून आणलेल्या बदलांची, त्या पाठच्या व्यक्तींची विस्तृत चर्चा इथे येते.
       विनय सीतापती हे political science चे विद्यार्थी आणि पत्रकार आहेत. कदाचित त्यामुळे हे आत्मचरित्र उधळ बेलभांडार पद्धतीत नाही असं म्हणता येईल. ते राव ह्यांचे सहकारी असते तर कदाचित अशा चरित्राचा नूर वेगळा राहिला असता. काय मिळवले आणि काय गमवले ह्याची वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा, चरित्रनायकाला सहानुभूतीदार प्रयत्न अशा पद्धतीने ‘हाफ लायन’ कडे बघता येईल.
       नरसिंहराव ह्यांच्या व्यक्तिमत्वाला परस्परविरोधी असे दोन पदर होते आणि त्यामुळे समाजवाद मानणाऱ्या, left of centre अश्या पार्टीचे loyalist आणि तरीही मार्केट फ्रेंडली reformer अश्या विरोधाभासाला ते सांभाळू शकले ही ह्या चरित्राची सेन्ट्रल थीम म्हणाला येईल. ‘नरसिंह’ हेच ह्या परस्परविरोधी तरीही एकत्रित नांदणाऱ्या द्वैताचे रूपक अशा अर्थाने ‘हाफ लायन’ असे पुस्तकाचे नाव आहे.
       नरसिंहरावांकडे १९९१ च्या आधीचा स्टेटस-को चालू ठेवायचा किंवा काही radical बदल घडवायचे अशी निवड होती आणि त्यांनी दुसरी निवड केली असे सीतापती ह्यांचे अर्ग्युमेंट आहे. IMF च्या दबावाखाली, ते जे म्हणत गेले ते घडत गेलं अशी टीकेची भूमिका, डावे आणि उजवे, दोन्ही घेत आलेत, त्याला प्रतिवाद द्यायचा हा प्रयत्न आहे. (डाव्यांची भूमिका आणि विश्लेषण ‘Intelligent person’s guide to Liberalization ह्या पुस्तकात नीट मांडलेली आहे. उजवे, हे मुळात थेट दार्शनिक असल्याने, चिकित्सा आणि त्यात ती पुस्तकवगैरे रुपात अशा व्यर्थ पसाऱ्यापासून लांब आहेत.) रावांनी त्यांची टीम कशी उभारली, विरोधकांना धूर्तपणे कसे तोंड दिलं, तीनदा विश्वासदर्शक ठरावांना कसे सामोरे गेले, कॉंग्रेसवरील आपलं नियंत्रण कसे वाढवलं ह्याचे चांगले विवेचन, आणि शक्यतो साधार आलेले आहे. हे करताना पार्टी हायकमांडला डावलणे आणि बाबरी मशीद प्रश्नाची चुकीची हाताळणी ह्या दोन चुका त्यांनी केल्या आणि सरतेशेवटी त्यांच्या पार्टीनेच त्यांना कसे पूर्णपणे दुर्लक्षित केले हे लेखक मांडतो.
       रावांचे बालपण, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना आणि त्यांचे राजकीय निर्णय ह्यांना एका सूत्रात गोवण्याचा, मराठी वाचकांना अतिशय आवडता असा खास चरीत्री प्रकारही ह्यात आहे.
       रावांचा व्यासंग, नोकरशाहीचे आकलन, राजकीय विजनवासात असताना त्यांनी स्वतः मधल्या लेखकाला, विद्यार्थ्याला दिलेला वाव ह्या बाबी लेखक ठासून मांडतो.
       मुख्य म्हणजे लेखन प्रवाही आणि योग्य ब्रेक घेणारे आहे.
--
       राजकीय-आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींची चरित्रे मी फार वाचलेली नाहीत. पण राजकीय-आर्थिक घटनांसोबत असणारा व्यक्तींच्या महत्वाकांक्षा, जुने परिचय आणि अन्य काही संदर्भ ह्यांचा अंडर-प्ले समजणं आवश्यक आहे असं जाणवायला लागल्याने मी अशी चरित्रे वाचायला लागलो आहे.
       त्यात शरद पवार ह्यांचे आत्मचरित्र आहे. अर्थात ते पुस्तक आपल्या हातात बघूनही लोक आपल्याकडे ‘काय राव, माहित नाही का साहेब कसे आहेत तुम्हाला’ असे पाहतात हे मी वडगाव-बुद्रुकमध्ये पुस्तक वाचताना अनुभवले आहे! सगळ्यात जास्त मला पुस्तकातले फोटो आवडले आहेत. पुस्तक म्हणाल तर आपल्याबद्दल एकूण जो समजांचा बरबट पसरला आहे तो एकदम लक्झरी टिश्यू पेपरने पुसून काढायचा प्रयत्न आहे. पवारांच्या डोक्यातील कल्पना आणि त्यांनी त्या कश्या वापरल्या, त्यांचे नोकरशाहीवरील नियंत्रण आणि त्याची समज ह्या बाबी काही प्रमाणात अधोरेखित होतात.
       माननीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांचे ‘The Turbulent Yearsह्यात कॉंग्रेस, इंदिरा गांधी हत्येनंतरची निर्णयप्रणाली, आणि मुखर्जी ह्यांना साईड-लाईन केलं जाणं (१९९० चे दशक) हे आलेलं आहे. पण हे पुस्तक हातचं राखून आहे हे सतत जाणवत राहतं. अर्थात पुस्तक आत्मचरित्रात्मक आहे हे त्याचं कारण असावं.
       माजी CAG विनोद राय ह्याचं Not just an Accountant: The Diary of Nation’s Conscience Keeperहे इंटरेस्टिंग पुस्तक आहे. 2G, कोळसा खाण आणि अन्य काही सरकारी निर्णयांमधल्या त्रुटी दाखवण्यात CAG चा रोल महत्वाचा होता. ह्या त्रुटी कशा होत्या आणि त्यावरील टीका काय होती ह्याचा चांगला आढावा ह्या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचताना मी कायम विचार करत राहिलो कि CAG ची भूमिका २०१४ च्या सत्ता-बदलात एकदम pivotal आहे. अर्थात राय आपण कसे केवळ आपली ड्युटी निभावत होतो आणि मिडियाने कसा गदारोळ घातला हे पुस्तकात स्पष्ट करतात.
       अजून एक उल्लेखनीय नोंद म्हणजे तमल बंदोपाध्याय ह्यांचे ‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक.
       आर.बी.आय. चे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव ह्यांचे ‘हू मूव्हड माय इंटरेस्ट रेट?’ वाचायच्या यादीत आहे. तसेच कौशिक बसू (माजी CEA) ह्यांचेही त्यांच्या भारतातल्या कार्यकाळाचा आढावा घेणारे पुस्तक वाचायचे आहे.   
--           

अमेझॉनच्या किंडल अनलिमिटेडमध्ये भारतीय राजकारण आणि पत्रकारिता ह्यातील व्यक्तींची आणि त्यांच्याशी संबंधित अनेक पुस्तके आहेत. जर झपाट्याने पुस्तके वाचता येत असतील तर १९९ रुपयांच्या मासिक शुल्कात किमान ५-६ पुस्तके वाचता येऊ शकतात.      

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...