Skip to main content

Posts

Showing posts from September, 2016

आळोखा

कोणी उकिडवा बसून वाट पाहू लागतो साठलेला साका बाहेर यायची कोणी घोळतो पेस्ट आणि ब्रश दातांत निरखत झोपाळू आरसा कॉफी वाफाळते मगात   कुठे दुधवाला गिनतो उरलेल्या थैल्या रिक्षावाला सोडतो वाट पाहणारी जांभई वॉचमन तारवटून पाहतो ए टी एम च्या दाराकडे शटर करकरत जाते वर शिलगते सिगारेट चहाच्या मिठ्या उबेत फुटपाथवर गुरफटतो कोणी चादरीत पुन्हा इडलीवाला देतो सांबार, चटणी व्हॉटस अॅपवर दिल्या जातात गुड मॉर्निंगच्या सुवचनी पुड्या मित्र म्हणतो हे तर पक्कं येणार टेस्टला आज स्टिरिओ धनकतो एफ.एम. रात्रीने मऊसूत झालेले रस्ते आणि निवलेले लोक कुत्र्यासारखा ताणून आळोखा देतो दिवस आणि मग एक पाय वर करून खांबावर मुतून जातो    

काही काल्पनिक मुलाखतीतील संपादित अंश

बघ्या: सर, हे वेगळं केलेलं निर्माल्य तुम्ही कुठे कंपोस्ट करता? सर : (विद्यार्थ्याने काढलेल्या फोटोत सस्मित होत) कसं आहे, समाजात पर्यावरणाची जाणीव रुजणं महत्वाचं आहे. आम्ही मागची अनेक वर्षे हे काम करीत आहोत. आज ह्या कृत्रिम तलावावर १०००० शाडूच्या मातीचे गणपती विसर्जनाला येतात. ६ वर्षामागे, जेव्हा मी प्रोफेसर म्हणून जॉईन झालो, तेव्हा ४००० गणपती येत, सारे पी.ओ.पी. चे. हा डोळस बदल आहे. ही श्रद्धेला दिलेली दिशा आहे. शेवटी गणपती विद्येची देवता आहे. बोला, विज्ञानमूर्ती मोरया बघ्या: असं, असं.. ---- बघ्या: सर, तुम्ही गणेशोत्सव ही लोकांची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे असं म्हणता आहात. म्हणजे जरा स्पष्ट कराल का? तुम्ही गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल बोलताय का? सर: हे पहा, आपण लोकशाहीचे नागरिक आहोत. मी आहे. मी मोहरम मिरवणुकांना काही म्हणत नाही. मी ३१ डिसेंबरच्या जल्लोषाला काही म्हणत नाही. कारण शेवटी प्रत्येक माणसाचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग वेगळा आहे. आणि माणसांच्या ह्या वैविध्यानेच देश, समाज, मानवता संपन्न होत असते. बघ्या: सर, आपण सध्या कुठे असता? सर: अरे, 'जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि उत्…