Monday, April 20, 2015

कोर्ट: विरोधाभासाचे अन्वयार्थ


       ‘कोर्ट’ सिनेमा आणि त्याच्या चित्रपट म्हणून असणाऱ्या बाबींचे विश्लेषण अनेकजण करत आहेत. मुळात फेसबुकवर ह्या सिनेमाची एवढी तगडी प्रसिद्धी झाली होती की मला मुळात कोणी पद्धतशीर हे तंत्र वापरत आहे की काय ह्याची शंका यायला लागली होती. अर्थात माझ्या बिनकामी हस्तीदंती मनोऱ्यामधली ही शंका आहे, आणि मुळात कुठल्याही गोष्टीकडे स्केप्टीकल होऊन बघण्याच्या सवयीचा हा नतीजा असावा. पण रिलीज व्हायच्या पहिल्याच दिवशी ‘कोर्ट’ बघावा असं मी ठरवलं होतं.
       मला व्यक्तिशः ‘कोर्ट’ चित्रपट म्हणून आवडला असला तरी चित्रपटगृहात तो बघणं हा अत्यंत तापदायक अनुभव होता. आणि अनेकदा आजूबाजूच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी आपण पाहतोय आणि ते पहातायेत त्या दोन वेगळ्याच तर गोष्टी नाहीत ना असं मला वाटत होतं, म्हणजे चित्रपट पाहताना आपली काही तंद्री वगैरे लागत नाही. आजूबाजूचे लोक हीच आपली फंडामेंटल कुतूहलाची बाब आहे. आणि चित्रपट तरी ह्या आजूबाजूच्या लोकांबाबत बोलतात म्हणूनच आपण बघतो.
       ‘कोर्ट’ अत्यंत सटल अशी कलाकृती आहे. त्यात विरोधाभास आणि विसंगंती ह्यांचा वापर अत्यंत कौशल्याने केलेला आहे. तो टोकदार कटाक्ष टाकतो किंवा रुख जगण्यावर भाष्य करतो अशा पगड्या चढवून त्याची बोळवण करता येणार नाही. माझ्या स्वतःच्या अनुभवात चित्रपट बघून आल्यानंतर हळूहळू मला त्याची किक येत गेली. त्यात ‘दुष्मनाला जाण रे’ ह्या गाण्याचाही भाग होता. ‘कोर्ट’ चित्रपटातील बाकी कुठल्याही भागाला न बघता केवळ सुरुवातीला येणारं हे लोक शाहिरी कवन किंवा गाणं बाजूला काढलं तरी ते मास्टर पीस ठरेल. शब्द, चाल आणि दृश्य सादरीकरण ह्या सगळ्यांच बाबींवर हे कवन बाप जमून आलेलं आहे. लोक शाहिरीचा हा सुरुवातीला आणि नारायण कांबळेला जामीन मिळाल्यावर येणारा सिनिकल शाहिरीचा भाग- जमेची पक्की बाजू क्रमांक एक. जमेची दुसरी बाजू म्हणजे समाजात महत्वाच्या डिसिजन घेणाऱ्या, किंवा ओपिनियन मेकिंग प्रभाव टाकू शकणाऱ्या किंवा उपद्रव मूल्य असलेल्या लोकांच्या वर्तनाबाबत, त्यांच्या दृष्टिकोनाबाबत आणि त्यांची जगण्याची पद्धत व्यक्त होते अशा दैनदिन जगण्याच्या प्रसंगातून दिग्दर्शक शक्यतांचे असंख्य दायरे आपल्यासमोर उलगडतो. चित्रपटात थेट मांडली न जाणारी पण कायम टोचत राहणारी गोष्ट आहे ती म्हणजे अजेंडा घेऊन असलेली अजस्त्र, ताकदवान सिस्टीम आणि त्या सिस्टीमखाली चिरडल्या, दबल्या जाणाऱ्या पण चिरडण्याची, दाबण्याची दखलही ज्यांना मिळत नाही अशा माणसांच्या वेदना मांडणारा एक माणूस. अजेंडा काय, कसला, कोण राबवतंय ह्याचं विद्वत विवेचन कुठे नाही, पण तो अदृश्य अजेंडा खाकी कपड्यात सर्वत्र आहे. आक्रोश, वेदनांची हादरवणारी दृश्येही नाहीत, पण त्यांच्या अस्तित्वाची हूल आहे. ‘कोर्ट’ गोष्ट सांगण्याचा वेगळा प्रयत्न अशासाठी ठरतो की त्याच्या प्रेक्षकाला स्वतःच्या जाणिवेचा प्रचंड वापर चित्रपट पाहताना करावा लागतो. त्याच्यावर येऊन आदळणारे मनोरंजन किंवा उद्वेग किंवा मेसेज किंवा सोल्युशन चित्रपटात नाही. व्याख्या करायचीच झाली तर सिस्टीम ज्या लोकांनी बनलेली आहे त्यांच्या जगण्याच्या बारकावेदार सादरीकरणातून सांगितलेली सिस्टीमच्या एका भागाची गोष्ट. ही व्याख्या तोकडी आहे. प्रेक्षकाला तापवण्याचा, त्याला दृश्य माध्यमातून विदीर्ण करण्याचा कुठलाही प्रयत्न न करता त्याला विचार करायला लावणारी गोष्ट सांगणं सोपं काम नाही. तात्पर्यांची नशा असलेल्या प्रेक्षक वर्गाला, अगदी त्यातल्या निवडक अशा संवेदनशील वगैरे अधिक ठरकी गटाला सुद्धा थबकवू शकेल असा प्रयत्न. हे माझं रिकामचोट कनक्ल्युजन.
       वर म्हटलेल्या अदृश्य प्रायमरी गोष्टीच्या खाली एक गोष्ट मला जाणवत राहिली ती म्हणजे आपल्या जगण्याच्या मुळाशी असलेल्या विसंगतीची. वकील व्होरा किंवा न्यायाधीश किंवा सरकारी वकील ह्या सगळ्यांच्या एक भूमिका आहे आणि भूमिका शिवाय असलेले त्यांचे एक जगणे आहे. कोण सुसंगत आहे, त्यांच्या सार्वजनिक भूमिकांशी आणि त्यांच्या वैयक्तिक जगण्याशी? नारायण कांबळे? त्याचे साथीदार? मे बी मी म्हणतोय तो विसंगतीचा प्रश्न दिग्दर्शकाला मांडायचाच नाहीये. ही त्याची गोष्ट आहे, कुठला पंचनामा नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याला पर्स्पेक्टिवचे एक टोक आहे. आणि हे टोक आपण पाहू शकत नाही असे आहे. पाहू शकत नाही, कारण एक तर ते आपल्याला दाखवायचे टाळले जाते किंवा आपण ते दिसूनही नाही असे म्हणतो किंवा पटूनही पटले म्हणायचे टाळतो.
       विसंगतीचा हा प्रश्न मनात यायला दोन प्रसंग कारणीभूत ठरले: एक म्हणजे वकील व्होरा ह्यांच्या शॉपिंगचा प्रसंग (आणि त्यांच्या घरातल्यांचे आणि अन्य प्रसंगही काही प्रमाणात) आणि दुसरा शेवटचा फॅमिली ट्रीपचा. शेवटचा प्रसंग नो डाउट चाहत्यांच्या टाळ्या घेईल. पण मला वकिलाचे प्रसंग ‘लिबरल’ भूमिकेच्या मुळाशी असलेला विसंगतीचा पेच दाखवणारे वाटले. ‘लिबरल’ भूमिका आणि ‘भांडवल आधारित अर्थव्यवस्था’ हा तुझं नी माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असा प्रकार आहे. मी जेव्हा माणसाचं स्वातंत्र्य ही कुठल्याही सिस्टीमची मूलभूत गोष्ट मानतो त्यावेळी उपभोगांचं स्वातंत्र्य आणि निर्णयांची अनिर्बंधता मला मान्य करावी लागते. पण मग ही उपभोगाची अनिर्बंधता आणि माणसांची विषमता न्याय-अन्यायाचे अनेक प्रश्न उभे करते. अनेकदा अन्याय-न्याय ही विभागणी सुद्धा सोपी नसते. आणि अन्याय मिटवणारी आणि तरीही स्वातंत्र्य जपू शकणारी सामूहिक चौकट अस्तित्वात आहे का हा प्रश्न आहेच.
--
               
               ‘कोर्ट’ सिनेमाच्या अनुषंगाने मागचे दोन दिवस फेसबुक बघताना एक प्रश्न डाचत राहिला की बघा, बघा हा चित्रपट थेटरात जाऊन बघा असं एवढे लोक का सांगत सुटले आहेत. एकानं तर म्हटलं होतं की this is movie for everyone. बुलशीट!! This movie is too subtle to be for everyone.  आणि असं म्हणण्यात मी फार मोठा तिस्मार लागून गेलो असं वाटत असेल तर नाईलाज आहे.
       मी सिनेमा बघताना ३० लोक होते १५०-२०० लोकांच्या थेटरात. शुक्रवार रात्रीच्या शोची ही गोष्ट. सोशल मिडियामुळे आपल्या सामाजिक संवेदनेचे सादरीकरण ही एकदम सोपी गोष्ट झाली आहे. मग त्यात परत परस्पर खाजखुजी प्रकार असतात, म्हणजे मराठी भाषावाले देशाभिमान्यांची खाजवतात. किल्ले-इतिहासवाले मराठी भाषावाल्यांची खाजवतात असं. आणि असं कुठलीही सतत प्रेरणा देत राहणारं मिशन नसलेले अनेक संवेदनशील वाटणारे मासे असतातच. ते कोणा-ना कोणाच्या गळाला लागलेले असतात. मग ते प्रचाराची झुंबड उडवून देतात. अशा झुंबडी मधून चित्रपट पहावा असं ठरवून आलेले काही मित्र माझ्या सोबत होते. त्यात दोन-तीन ज्वलंत कार्यकर्ते होते, बाकीचे त्यांचे तहहयात सहानुभूतीदार आणि उरलेले निव्वळ मित्र. ह्या निव्वळ मित्र सबसेटला सुरुवातीलाच कळलं की ह्या चित्रपटात थेट आपल्याला एंगेज करणारं काही नाही. चाललंय आपलं, बघा, विचार करा, बघा. मग त्यांनी एकदम चित्रपटाला विनोदी चित्रपटात रुपांतरीत केलं आणि ते जागोजाग हसू लागले. अशा जागा घातल्यावर मग त्यांनी खुल्ला त्यांच्या मित्रांची संभावना सुरू केली. आणि चित्रपटाच्या शेवटला त्यांनी निष्कर्षांचे धुमारे आणि विकेंड आकांक्षांचे बार उडवत चित्रपट संपवून दिला. मला आणि बाकी कोण बघू पाहणाऱ्याला चित्रपट पाहता येऊ नये इतकं त्यांनी डिस्टर्ब काही केलं नाही, ती सीमारेषा त्यांनी चोख सांभाळली. पण त्यांची फसगत झाल्याची भावना त्यांनी त्यांच्या उरल्या गटाला नीट कन्व्हे केली.
       मी ह्या गटाकडे दुर्लक्ष करू शकतो. कदाचित हा मला आलेला अपवादात्मक अनुभव असावा. पण हा अपवाद नाही हे मला जाणवतं आहे. आणि एकीकडे त्यांनी आपल्या कमेंट्स आणि हश्याने आपली प्रतिक्रिया दिली हेही मला योग्यच वाटतं. ते (मित्रांनी भरीस पाडलेले किंवा मित्रांसोबत जायच्या रीवाजाने आलेले)  ग्राहक म्हणून आले होते आणि प्रॉडक्ट त्यांच्या अपेक्षेला उतरलं नाही. ‘कोर्ट’ मधली गोष्ट काय सांगते ही बाब मागेच पडते जेव्हा तुम्ही ह्या फिल्मला कमर्शिअल रिलीज देता. मग आता ही एक विक्रीला असलेली वस्तू आहे. आणि मार्केटच्या डिमांड-सप्लायनुसार ती चालणार. मला वाटतं की ‘कोर्ट’ ला धंदेवाईक प्रोड्युसर मिळणं सुद्धा कठीण गेलं असेल. ‘कोर्ट’ प्रेक्षकांकडून बरंच काही एक्स्पेक्ट करतो आणि एवढं देऊ शकणारे लोक कमी असतील हे सांख्यिकी सत्य आहे असं मला वाटतं.
       त्यामुळे हा सर्वांसाठी चित्रपट आहे असं विधान करणाऱ्या माणसांचं मला नवल वाटतं. मान्य आहे की अधिकाधिक लोक हा चित्रपट पाहतील तेवढी संभाव्यातेच्या नियमाने तो आपापल्या परीने अॅप्रिशिअेट करू शकणारे लोकही अधिक असतील. आणि त्यातले काही गोष्ट सांगण्याच्या नव्या तरीक्यांना पुढेही जाऊन प्रोत्साहित करतील. पण त्याचवेळी समीक्षकांच्या, ऑफिशियल आणि बाकीच्या, मते संवेदनशील आणि वेगळ्या, अशा गोष्टीला नाकारणारे, नाही पटलं, जमलं नाही बुवा म्हणणारेही लोक वाढणार. आणि कदाचित ते बहुसंख्य सुद्धा असणार. अनेकदा चित्रपट समजलेले, आवडलेले लोक अशा म्हणण्याचा प्रतिवाद करतात किंवा थोडी चढेली भूमिका घेतात, म्हणजे कळलाच नाही तुम्हाला आणि कळला आम्हाला अशी. थोडाफार ते खरंही आहे. पण प्रेक्षकांच्या डिमांडचं डिस्ट्रिब्युशन हे तसं उघड झालेलं असतं. अशावेळी चित्रपट कसा असणार आहे ह्याची जाणीव असूनही मुद्दाम किंवा जाणीव नसताना किंवा चांगुलपणाच्या बालिश जोमाने जेव्हा लोक जाहिरात करतात तेव्हा नवल वाटतंच. आणि एक प्रकारे इथे सुरुवातीचे दोन दिवस गल्ला जमावा म्हणून प्रेक्षकांना च्युत्या बनवायचा रस्ता वापरला जातो असंही घडतं. (म्हणजे च्युत्या बनवणं चूक आहे असं माझं म्हणणं नाही. शहाणे करून सोडावे सकल जन असं जरी बोधवाक्य असलं तरी लोकांच्या स्वतःला आणि बाकीच्यांना च्युत्या बनवायच्या चाळ्यांमुळेच सारी गम्मत आलेली आहे.) ‘फँड्री’ च्या वेळेला आलेल्या एका गटाची प्रतिक्रिया होती कि ट्रेलर तर लव्हस्टोरी होता, पण हा सिनेमा काये!
       मी ह्या कमेंटला आणि व्यक्तीला ‘इनसेन्सेटिव्ह’ असं लेबल लावू शकतो. पण असं करताना मला ‘सेन्सेटिव्ह’ असण्याला सुद्धा प्रश्न विचारावेसे वाटतात. समजा, मी ‘सेन्सेटिव्ह’ आहे आणि मी जाऊन पिक्चर, नाटक पाहतो, अस्वस्थ होतो, चर्चा, वाद करतो, लिहितो. त्यातून मी काय साधतो? माझा स्वार्थ. आणि ‘इनसेन्सेटिव्ह’ माणूस काय साधतो? सो वेगळं काय आहे? बहुतांश संवेदनशीलता ही पाशवी आणि मानवी स्पर्धेच्या जगात निब्बर गर्दीक सुखात मजा न येणाऱ्या माणसांचे विव्हळणे असते असं म्हणता येईल का?    
चित्रपटाचा व्यावसायिक रिलीज केल्यानंतर त्याला लोकांच्या आपसूक मिळणाऱ्या प्रतिसादाला आपण बरोबर-चूक जेव्हा म्हणतो तेव्हा आपण चुकीची मापं काढत असतो. लोक जेव्हा एखादी वस्तू विकत घेतात तेव्हा त्यांना त्यांच्या विलिंगनेस टू पे चा योग्य परतावा मिळेल असं ते बघतात. हे स्वाभाविक आर्थिक शहाणपण आहे. तो जर त्यांना मिळाला नाही तर ते नाही मिळाला असं म्हणतात. मुळात तुम्ही चुकीच्या गटाला चुकीचा माल विकायला जाल तर एक तर मालाला उठाव राहणार नाही किंवा वाईट प्रतिक्रिया मिळणार. अर्थात अनेकदा आपण पैसे भरून येडे बनलो हे फार कोण सांगायला जात नाही हि जमेची बाब ठरते.
थोडक्यात, मला ‘कोर्ट’ सिनेमा अशा पद्धतीने वाईड रिलीज करणं ही गोष्ट फार गमतीची वाटते. म्हणजे लोकांच्या वागण्याचं डिस्ट्रिब्युशन कसं आहे हि काय इतकी लपलेली गोष्ट नाही. असं म्हणता येईल कि लोकांची हि ‘अभिरुची’ बदलावी, ते टीचभर अजून समजणारे व्हावेत म्हणून ‘कोर्ट’ आणि असे प्रेक्षकाकडून अपेक्षा करणारे सिनेमे रिलीज होत राहिले पाहिजेत.  
आणि कुतूहल वाटतं की ‘कोर्ट’ सारख्या सिनेमाला लागणारं बिझनेस मॉडेल काय? सटल असं काही सांगू पाहणाऱ्या माणसाने लागणारे रीसोर्स कुठून उभे करायचे?         
--
      
          ‘कोर्ट’ सांगतो एका माणसाची गोष्ट, तो त्याच्या शब्दांच्या, सुरांच्या, त्यातल्या अर्थांच्या सहाय्याने आपल्या अवती-भवती उपभोगांच्या मॅक्झिमायझेशनवर आधारलेली व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचे सुकाणू ज्यांच्या हातात आहे अशांच्या अन्याय वागण्याची मूक पण धारदार गोष्ट सांगतोय.. किंवा सिस्टीमची गोष्ट जी ‘मनी’ नावाच्या अदृश्य इंधनावर फोफावते आहे आणि ह्या फोफावण्यात प्रचंड विषम असे वैयक्तिक आउटकम्स बनवतीये. पण तिच्या वाढीची हि बाब कोणी उघडी केलेली तिला नको आहे. मग ती आपली पगारी शक्ती वापरून आपला मुर्दाड दरारा बनवते. ती खच्ची केलेलं स्वातंत्र्य जारी ठेवते आणि त्रास देणारं स्वातंत्र्य गजाआड करते.
पण ही गोष्ट लोकापर्यंत पोहचते कशी, मॉलमधून, मल्टीप्लेक्स मधून.
नारायण कांबळे म्हणतो, ‘हा झोलझाल रे, भव्य मॉल रे, फ्री फॉर ऑल रे, हा ग्रेट फॉल रे’. माणसाची वखवख जागवून त्यातून सगळ्यांची भूक मिटवू पाहणाऱ्या अदृश्य हाताच्या सिस्टीमचं दृश्य रूप नारायण कांबळेचे शब्द पकडतात.
       माझ्या मेल बॉक्स मध्ये बुक माय शो मला सांगतो कि १०.१५ वाजता ‘कोर्ट’ चा शो आहे. माझ्या क्रेडीट कार्डाने मी तिकीट घेतो. खालचं मेल सांगतं कि आज फटाफट फ्रायडे आहे, ५०% डिस्काऊंट आहे, चड्डी आणि बनियन, भांडी आणि शूज, मोबाईल आणि टी,व्ही. वर. मी दहा गोष्टी माझ्या विश लिस्ट मध्ये टाकतो, २ विकत घेतो, त्यात एक असतं गौतम बुद्धाचं पोस्टर.
       मग मी तावातावाने भोगवादाच्या विरुद्ध बोलू लागतो. माझा मित्र त्याच्या कॅमेराने माझे फोटो काढतो. दुसरा मित्र म्हणतो, खरय आपण काहीतरी केलं पाहिजे. लेट्स राइट अबाउट इट. मग आम्ही मिळून पुस्तक काढतो. मग त्यात आमचा खूप वेळ जातो. मग आम्ही ते विकायला ठेवतो. त्याचा मेल येतो परत मेलबॉक्स मध्ये.
       मग माझ्या पुस्तकावर प्रश्न निर्माण होतात. ते सगळे प्रश्न मला तावातावाने ढकलू पाहतात. माझं टू बी.एच.के. घर, माझी गोंडस इंग्लिश बोलू लागलेली मुलगी, माझी व्हीलचेअर वरची आई. माझी असिस्टंट मॅनेजरची नोकरी सारं सारं माझ्या हातातून सुटून जाऊ लागतं. तेव्हा मी परत पुस्तक लिहितो, तावातावाने उदारीकरणाने जवळ आलेल्या जगावर. मी ते परत विकायला लावतो, त्याचा मेल येतो, वर सगळीकडे लाईक, संयमित दृष्टीकोनाला.
       नारायण कांबळे म्हणतो, ‘जादुई महाजत्रा, पैक्याची भारी मात्रा, माणसाचा होई कुत्रा, कुत्र्याची रूपे सतरा’.
--
       
           कोण नेमकं कोणाविरुद्ध आहे? दुष्मान कोण आहे? आणि आपण दुष्मानाला मारायला फेकलेली सारी हत्यारं तो परत आपल्यावर उलटवून लावत असला तर?
       नारायण कांबळेच्या गोष्टीपेक्षा, ‘न्याय’ देण्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या विसंगत वागण्याच्या तुकड्यापेक्षा मला दिसतो तो आपल्या जगण्याचा पेच. ‘कोर्ट’ सिनेमा बघून मला जे वाटतं आणि माझ्यासोबत हा चित्रपट पाहणाऱ्या बाकीच्यांना जे वाटतं त्याची विसंगती मुळात आपल्या जगण्याशी असलेल्या विसंगतीमध्ये आहे असं. मला वाटत नाही कि दिग्दर्शकाला अशी मूलभूत विसंगती दाखवायची होती. त्याला दाखवायची विसंगती, प्रामुख्याने आहे ती दोन सिस्टीमची, भव्य मॉलवाली आणि रक्तात रंगलेल्या भुकेची. पण ही प्रमुख विसंगती मांडताना, ही विसंगती जाणवलेली, ती दूर करायला बघणारी माणसं परत त्यांच्या जगण्याच्या अपरिहार्यतेत नव्या अॅबसर्ड गोष्टी उभ्या करतात. सगळेच नाही, एक वेड पकडून जगणारी माणसं विसंगतीच्या पलीकडे जातात. पण मग ते असं कुठलंही वेड नसलेल्या माणसांच्या सिस्टीमचे प्रश्न केवळ मिशन, गम्मत म्हणून घेतात. पोलीस हात धुवून मागे लागलेल्या आरोपींसाठी लढणारा वकील हे त्याचं उदाहरण असावं.
       नारायण कांबळेचं काही कळत नाही. त्याची शाहिरी सिस्टीमचे पेच पकडते. पण मग? भव्य मॉल नाही, फ्री फॉर ऑल नाही तर काय? परत तोच रगाडा ज्याला झिडकारून आपण नवं काही असेल म्हणून इथे येऊन पोचलो.
       का हू विल गार्ड द गार्ड्सचा कालातीत प्रश्न? हाऊ टू जज अ जज बनून?
       उभा तर मीच आहे आरोपीच्या पिंजऱ्यात, मीच माझा पुरावा आहे आणि मीच माझ्या विरोधी सुद्धा, आणि निर्णय सुद्धा मलाच द्यायचा, निष्पक्ष. कसा?
       मे बी मी आहे त्यापेक्षा जास्त पाहतो आहे ह्या सिनेमामध्ये. पण सौंदर्याच्या आकलनाचा काथ्याकूट, सामाजिक रिलेव्हन्स आणि निष्कर्षांचा, सिनेमा कसा आहे आणि कसा नाही हे सांगायचा कोणाचही समाधान न करणारा हस्तमैथुनी बुळबुळीतपणा ह्यातून पुढे जाऊन मला हा प्रश्नच डाचतो.

       सुखाचा शोध, न्यायाचा शोध आणि ग्रेट फॉलला...                

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...