Wednesday, February 5, 2014

आयडेन्टिटी फेटीश आणि निखळ च्युत्यापा

       तुम्हाला निखळ च्युत्यापा अनुभवायचा असेल, वेगवेगळया स्टिरीओटाइप्सची ठिगळे कशीही एकमेकांना जोडून सुमारे अडीच तास चालणारा अडाणचोट प्रकार बघायचा असेल तर पुणे व्हाया बिहार बघा.
       आता म्हणाला की असं आहे बाबा अति शहाण्या माणसा, तर तू काय तिथे XXवत बसला होतास! आता असं आहे की आपल्याला वेगवेगळे च्युत्यापे समजून घ्यायची स्वाभाविक आवड आहे. आणि जसे एक थोर लेखक म्हणाले त्या धर्तीवर, सारी शहाणी माणसे एकसारखी वागतात, च्युत्ये आपापल्या परीने निरनिराळे च्युत्यापे करीत असतात ह्या बंधुप्रद भावनेने मी तिथे होतो.
       बाकी तुम्हाला आयडेन्टिटी फेटीशबद्दल कुतूहल असेल, म्हणजे तुम्हाला सटल असं काही वाचून भरसट होण्याइतका वेळ असेल तर तुम्ही अमर्त्य सेन ह्यांचं ‘आयडेन्टिटी अॅन्ड व्हायलन्स’ वाचू शकता. आणि इतका वेळ किंवा भरसटलेपण तुम्हाला नसेल किवा वरील पुस्तक वाचून तुम्हाला वेळ वाया गेला असंच वाटत असेल तर तुम्ही वेडे आहात किंवा तुम्हालाच आयडेन्टिटी फेटीश आहे. फेटीश अशा अर्थाने की स्वतःला कुठल्या ना कुठल्या आयडेंटिटी मध्ये पहिल्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. आणि त्यामुळे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे, भौतिक जगाचे विश्लेषणही तुम्ही ह्या फेटीशमधूनच करत राहता. आणि वरील पुस्तक अत्यंत ग्रेट आहे, प्रत्येकाला बदलून टाकेल असं आहे असंही मला म्हणायचं नाही. पण तार्किक अंगाने हे आपल्या भोवती काय चाललं आहे हे बघणाऱ्याला ह्या पुस्तकातले आयडेंटिटीबद्दलचे व्ह्यू रेसोनेट झाल्यावाचून राहणार नाहीत असं मला वाटतं. आणि तसं जर होत नसेल, तर परत एकदा माझ्या मते, वाचणारा तार्किक अंगाने न बघता फेटीशने बघणारा असेल असं मी म्हणेन. सेन ह्यांच्या लिखाण आणि तत्वज्ञानाबद्दल मला स्वतःला आत्तापर्यंत एकच ऑब्जेक्शन वाटली आहे, ती म्हणजे त्यांच्या लिखाणात असे एक अप्रत्यक्ष गृहीतक आहे की प्रत्येक माणूस चांगले-वाईट ठरवायला योग्य असा सारासार विवेक घेऊन आहे आणि हिंसा, किंवा भेदभाव हे सगळे अजिबात फंडामेंटल नाहीत. पण हे कदाचित माझे अर्धवटपण असेल. असो.
       आयडेन्टिटी आणि स्टिरीओटाइप करणे ह्या गोष्टी हातात हात घालून जातात. वर उल्लेखलेल्या चित्रपटात त्या ठासून भरल्या आहेत. जसे:
१.       बिहार म्हणजे गुंड आणि नेते ह्यांची युती. प्रत्येक नेत्याचा मुलगा हा गुंडाईमध्ये मश्गुल. गुंडाई म्हणजे सतत बलाढ्य पुरुषांच्या टोळ्या वाहने घेऊन इकडे तिकडे भटकत, वाटेत येईल त्याला मारत-तुडवत असणार. गुंडाई म्हणजे हवी तशी बाई उपभोगणं आलंच. बाई म्हणजे आयटम डान्स. आयटम डान्स म्हणजे बाईच्या बहुतेक छातीच्या आणि उरल्या वेळात बाकी अवयवांच्या घसघशीत हालचाली. ह्यातले काही स्टिरीओटाइप्स खरेही असतील, पण ते ‘बिहार’ ह्या आयडेंटिटीला चिकटून एकामागोमाग एक येतात.
२.       मराठी म्हणजे शिवाजी महाराज. पुढे काही बोलायला नको, कारण पुढे काही नाहीच.
३.       मराठी माणूस (पुरुष) म्हणजे मर्द.
४.       मराठी आई म्हणजे ‘स’ ची आई. अधिक स्पष्टीकरणासाठी.
५.       मराठी मध्यम वर्ग म्हणजे पापभिरू, नीतीमत्तापूर्ण (आणि अर्थात कपडे सांभाळू दूरदर्शी, आता हे मध्यम वर्गाचे वैशिष्ट्य का मराठी मध्यमवर्गाचे, हा हा!!) पण एकदा का तो जागला की त्याचे ‘यदा यदाही..’ असे कर्तव्य (म्हणजे आई-बाप आणि नातू ह्यांची बेगमी करणे ह्याच्या पुढचे जगाच्या नितीमत्तेच्या ओझ्याचे, दिल्या-घेतल्या शपथा पूर्ण करण्याचे) बजावल्यावाचून त्याला मुक्ती नाही.
          हे सारं कसं आलं ह्या चित्रपटात आणि कसं हे सगळं खालावत चाललं हो असा उर आपल्याला अजिबात पिटायचा नाही. हा काही अशा आयडेंटिटीच्या हाळी देणाऱ्या पहिला चित्रपट किंवा कलानिर्मिती नाही. आद्यमान तर ‘पानिपत’ ला द्यावा लागेल. हा चित्रपट असा आहे हे निरीक्षण एवढंच सांगतं की अशा प्रॉडक्टला डिमांड आहे. आणि डिमांड ही आयडेन्टिटीवर भाष्य करणाऱ्या निर्मितीला नाहीये, ती आयडेंटिटीचा नगारा बडवून, खतरे मे.. चा टाहो करून मग ही परमपवित्र आयडेन्टिटी जपणाऱ्या, वाचवणाऱ्या हिरोला आहे. अर्थात हिरोची डिमांड तर शाश्वत आहे, अव्याहत आहे. फक्त कधी हिरो आयडेंटिटीचे कातडे पांघरून येतो, कधी आयडेंटिटी हिरोचा मुखवटा घालून येते. 
          अर्थात आयडेन्टिटी कार्डची टिपिकल आयडेंटिटी वगळूनही आपल्या जगण्याची स्पेस निरनिराळ्या आयडेंटिटीजने कायम भरलेली असते. आणि बहुतेक आयडेंटिटीचे वैशिष्ट्य हे की तुम्ही ती मानता का नाही ह्याचे तिला काही सोयरसुतक नसते. दुसरा कोणीही तुमच्यावर ती टॅग करू शकतो, म्हणजे तुम्ही असे आहात किंवा नाही आहात असं. आणि मी आहे किंवा नाही ह्या दोन्हीत नसून मुळात मला ही निवडच मान्य नाही ह्या बचावाला काही अर्थ नसतो. म्हणजे तुम्ही देशभक्त आहात किंवा नाही आहात, म्हणजे देशद्रोही आहात  किंवा फायदे लाटणारे उपटसुंभ. मला माणसांशी घेणे-देणे आहे, देश वगैरे फक्त कन्स्ट्रक्ट आहात अशी तात्विकता एकदा का तुम्ही टॅग झालात की काही कामाची नाही. अर्थात वैयक्तिक स्तरावर आपण असे कुठलेही टॅगिंग मानावे का नाही हे झालेच. पण जिथे माणसाच्या एकांड्या स्पेसची प्रचंड चणचण आहे, आणि जिथे एकमेकांना घासून जगण्याला पर्याय नाही अशा वातावरणात टॅगिंग मोठा रोल घेतं.
असो. हे तर तात्विक भाष्य होऊ लागलं. आपण तर इथे घ्यायला आलो.
वरील ‘नीट’ प्रकारानंतर थोडा मनोरंजक चकणा म्हणून आपण गूफ अप्स पाहू.
१.       औरंगाबादमधून बिहारला जाणारी गाडी आणि MH 01 अशी नंबर प्लेट.
२.       कपड्यांचे अख्खे स्टोअर सोबत घेऊन एका पर्सनिशी पळून निघालेली नायिका.
३.       वैदर्भी किंवा उत्तर महाराष्ट्रात असलेली बोली बोलणारा नायकाचा मित्र, त्याचा गावाचा माणूस गोंदियामध्ये किंवा जवळच लॉज सांभाळतो, पण ह्या मुलाचा मामा कोळीवाड्यात टिपिकल कोळी वेशात आहे.
४.       एका दिवसांत पटण्यामधून महाराष्ट्रात येणारी चारचाकी प्रवासात गोंदिया जिल्ह्यात कशी पोहचते, म्हणजे नेमका कोणता रस्ता? (हे खुसपटपण असेल!)
५.       खूप झालं हे उंगली करणं.
आता थोडा चटपटा म्हणजे संवेदनशील आणि तपशील स्वरूपाचा खुसपट्या स्टार्टर मागवू. तो क्रमाक्रमाने घेऊ.
१.       चित्रपटात वापरलेली आडनावे: भोसले(नायक आणि वडिलांची वडा-भाजी ह्यांची गाडी), यादव (नायिका, वडील अगोदरच केंद्रीय मंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री व्हायची मनीषा असलेले, बाकी अर्थात गुंड), निंबाळकर (एन्काऊंटर किंग, भले त्याने राजकारण्यांच्या इशाऱ्यावर केले असतील गेम पण दिलाचा पवित्र) राणे, जाधव (दोन्ही धिप्पाड असे सहाय्यक बहुउपयोगी पोलीस ऑफिसर), सहस्रबुद्धे (अत्यंत हुशार आणि लाडका विद्यार्थी), कुंटे (झोलझाल वकील) (!) तरी महाराष्ट्र पुण्यवंत म्हणायचा, बिहारसाठी तर एकच आडनाव आठवतं सगळ्यांना.
२.       बिहारच्या इतक्या बाहुबली आणि परंपरानिष्ठ नेत्याची मुलगी औरंगाबादेत शिकायला येते (मला वाटायचं की पटण्याचे एलिट दिल्लीत जातात आणि एम.बी,ए वगैरे असेल तर नंतर मुंबईत येतात) आणि ह्या मुलीचा बॉयफ्रेंड आणि बेस्टफ्रेंड आहे, आणि बॉयफ्रेंडपेक्षा तिचा बेस्टफ्रेंडबरोबर जास्त असा पी.डी.ए. आहे. ही हायरार्कीला मारलेली टांग आणि न जुळणारी आधुनिकता मला तरी खटकली.
३.       बिहारचे कुठलेही क्रेडिबल शूटिंग नाही. बहुतेक दृश्ये महाराष्ट्रातच घेतलेली वाटतात, एखादा लोंग शॉट सोडला तर. मी विचार केला की मराठी चित्रपटाला असं पटण्यात शूटिंग करता येईल का हो! मला एक किस्सा आठवतो. एकदा आम्ही काही मित्र गप्पा मारत होतो, त्यात असाच राज ठाकरे आणि त्या वेळी त्याला मारायला आलेला आणि कुर्ल्यात बसमध्ये पिस्तूल घेऊन चढलेला एक तरुण ह्याची चर्चा निघाली. आणि टू माय सरप्राईज, एका बिहारच्या श्रीमंत, सुशिक्षित घरातल्या आय.आय.टी. मध्ये इंजिनिरिंग केलेल्या आणि फिनान्स मध्ये काम करणाऱ्या मित्राने म्हटलं, की मी कधीही एखाद्या मराठी माणसावर विश्वास ठेवू शकणार नाही. त्याची तेव्हाची गर्लफ्रेंड ही एक उच्चभ्रू महाराष्ट्रीयन होती. ती त्याला म्हणाली, की तू असं कसं म्हणू शकतोस. तर तो म्हणाला, की मुंबईतला बिहारी त्याच्यामुळे इतका असुरक्षित आहे. माझ्यासाठी हे म्हणजे कोड्यात कोडं होतं. म्हणजे एकतर करीअरची अशी दिशा असलेल्या माणसाला एकदम असा व्ह्यू असावा हे मुख्य. आणि त्यात त्याने एकाची द्वेषाची भूमिका दुसऱ्याच्या तशाच भूमिकेवर जस्टीफाय करावी हे. आणि एका ठिकाणी अनेकांना जो फार न्याय्य मुद्दा वाटतो त्याची दुसऱ्या ठिकाणी एकदम दुसरीच प्रतिमा असू शकते हेही.
कदाचित वरचा दाखला अनेकांना त्यांच्या कमी-जास्त तीव्रतेच्या मराठी फेटीशसाठी समर्थन देणारा मुद्दा वाटेल. पण मला त्यातून एवढंच परत जाणवतं की रिजनल आयडेन्टिटीचा फेटीश फार जबरी पसरला आहे.
काही जण अशा आयडेंटिटीचे क्लासिफिकेशन करतात. म्हणजे बिहारी किंवा महाराष्ट्रीयन (असं आपण म्हणत नाही, आपण मराठी म्हणतो) ह्यापेक्षा भारतीय मोठी आयडेन्टिटी. जातीपेक्षा धर्म ही मोठी आयडेन्टिटी. पण ह्यात अनेक विरोधाभास येतात. म्हणजे धर्म आणि देश ह्यांत काय तुलना. पण मग एक जबरी तोडगा म्हणजे व्याख्याच अशा करायाच्या की प्रश्न येउच शकत नाही. आणि अर्थात तार्किक कोडी ही पाश्चिमात्य संस्कृती झाली, श्रद्धा हवी, श्रद्धा, मग हे एकत्व जाणवतं. मज पामरास कोठली आली ही अनुभूती...
अजून एक म्हणजे इतिहासातल्या धार्मिक संघर्षाच्या आणि त्यातून झालेल्या धार्मिक स्वातंत्र्यावरील अन्यायांच्या निर्णयांचा हवाला देऊन त्याचे रिव्हर्सल हवे असणाऱ्या लोकांचा जो मोठा गट  आहे, त्यातले बहुतेकजण इतिहासातल्या जात उतरंडीतून जे अन्याय आणि स्वातंत्र्याचे प्रश्न झाले त्याचे रिव्हर्सल करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला विरोध असणारे आहेत. आणि हा त्यांच्या भूमिकेतला विरोधाभास त्यांना सांगितला तर तो ते ट्विस्ट करून परत तोच जस्टीफाय करतील. म्हणजे तोंडावर पडल्यागत.
हुश्श, फार झालं.
प्रश्न चित्रपटाच्या दुबळ्या ढाच्याचा किंवा विरीधाभासाचा नाही. प्रश्नही नाही कदाचित. आजूबाजूची गर्दी असे प्रश्न आणि विरोधाभास दररोज तुडवून आणि पचवून, एकमेकांना स्टिरीओटाइप करून तरी एकमेकांवर अवलंबून जगून पसरतेच आहे. मध्ये केव्हातरी तोंडी लावायला घेतल्यागत ती ह्या ना त्या आयडेन्टिटीचे झेंडे घेते, काही (म्हणजे दोन-चार, काही शे, ते लक्षावधी) माणसे, थोडी मालमत्ता ह्या तोंडी लावण्यात जाते आणि परत गर्दीचा आणि त्या मागचा जमवाजमवीचा प्रकार अव्याहत सुरू होतो. पण ह्या सगळ्याकडे बघून फिलोसॉफीकल स्टान्स घेणाऱ्या बघ्याला जाणवतं की बहुतेकांची कलेची गरजही किती साधी आहे, एकतर ती टिश्यू पेपर सारखी असावी. आठवड्याभराच्या उष्ट्या-खरकट्या प्रकाराला साफ करून, मेंदू मोकळा करून टाकणारी. उगा सिरीयस होऊ नका, मजा घ्या नाहीतर सोडा. किंवा मग तिने थोडे उत्तेजक डोस सोडावेत, आशावादाचे खत वाढत्या स्वप्नांच्या पिकाला द्यावेत. मग तपशील, भूमिका, विरोधाभास गेले कुठेही. एंटरटेनमेन्ट आणि आशावाद, सोबत निखळ च्युत्यापा.
       थिअरीचा एवढा मोठा पेग आणि सोबत एवढा चकणा, एका सिनेमाच्या दगडाला शेंदूर फासून बसवलेल्या आपल्या नित्य दैवताला एवढा निविद्य पुरे. 

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...