Sunday, September 8, 2013

शुद्ध देसी भडास

टीप: ह्या पोस्टचा आणि तत्सम चित्रपटाचा काही एक संबंध नाही. मिळेल त्या दगडाला शेंदूर लावून आपल्याला हवी ती गोष्ट सांगण्याच्या थोर परंपरेला अनुसरून सदर ब्लॉगपोस्ट लिहिण्यात आली आहे.

वैयक्तिक ईशारा: प्रस्तुत ब्लॉग संसारिक आनंद, धार्मिक, सामाजिक अभिमान, संस्कार अशा सगळ्या गोष्टींना घातक आहे. प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.
   
      रोमान्स म्हणजे प्यार, प्यार म्हणजे शादी असं मला लहानपणी हिंदी चित्रपटांनी शिकवलं. पुढे इंग्लिश चित्रपटांनी, साध्या आणि निळ्या, ह्या तीन पायऱ्यांच्या मध्ये बराच टापू असतो असं शिकवलं. ह्या थिअरीवर मग चुकले-माकले प्रयोग झाले, गंगेत घोडं न्हालं आणि मग हा ‘शुद्ध देसी रोमान्स’ आला.
       पिक्चरला जायच्या आधी मी दोन रिव्ह्यू, म्हणजे एकदम ऑन फिल्ड, ऐकलेले, ते म्हणजे हा ‘अशुद्ध विदेसी रोमान्स’ आहे आणि ‘जाम बोअर आहे’ असे. पण सकाळी १० वाजता स्वस्तात आपण बोअर व्हायलाही तयार असतो, थेटराच्या अंधारात मुळात कोणतीही गोष्ट आपल्याला नीट समजायला लागते आणि विदेसी गोष्टींची आपल्याला किंचित ज्यादा चाहत आहेच. मग काय ,आपण बसलो तिथे थेटरात, आणि मग समोर चाललेल्या पिक्चर सोबत आपल्या ताराही तंतरू लागल्या, ते कळेलच.
       आता एकदम समीक्षकी आव: वाणी कपूरची आत्मविश्वासपूर्ण अदाकारी, विशेषतः ती जेव्हा सुशांत कपूरची घे घे घेते, परिणीती चोप्राचे मिठे पंजाबी हिंदी आणि सुशांत सिंगचा चाचरलेला, जमेल तसे हात मारायला उत्सुक असणारा पण नको तेव्हा डाऊट येणारा रघुराम (सगळ्याच रघुरामांना असा दौत घ्यायची आदत आहे का, नाही म्हणजे ते जे दुसरे आहेत त्यांचं रेप्युटेशन पण त्यांनी असा दौत घेतल्यावर जाम वाढलं!) आणि फार कोम्प्रोमेजेस न करणारी, सामाजिक बदलाचा लिबरल झेंडा हातात न घेताही होईल तसे उपरोधाचे बाण सोडणारी डिरेक्शन. आपल्याला आवडला.
       आता ह्या दगडाला थोडा आपला शेंदूर लावू.

१.                        १. का ‘शुद्ध देसी रोमान्स’ कोणाला तरी ‘अशुद्ध विदेसी रोमान्स’ का वाटतो? सोप्पं आहे, कुटुंब व्यवस्था भारतीय संस्कृतीचा कणा आहे आणि विवाहसंस्था ह्या कण्याला बांधलेला, चांगला करकचून आवळलेला पट्टा, ज्यामुळे सगळं उभं आहे’. आणि अशा ह्या अतिप्राचीन, ललामभूत वगैरे वगैरे गोष्टींवर कोणी जर गंमत करू पाहील तर गेलीच आपली तळपायाची आग मस्तकात. अशुद्ध, अब्रह्मणम्, पश्चिमी प्रभावाने बाटलेले पाखंडी साले.
२     .    २.   आपल्याकडे कोणतीही अल्टरनेटिव्ह थिअरी नाही बॉस. विवाहसंस्था सोडून एकदम मोकळा मीनाबाजार किंवा घटकंचुकी सुरू करावी असंही आपलं म्हणणं नाही. आपलं म्हणणं एवढंच आहे की सगळ्या आधीपासून चालत आलेल्या गोष्टी ह्या चांगल्याच, आपल्याला कळत नसेल पण त्यात काहीना काही ग्रेटर, बेटर पर्पज आहेच ह्या सिद्धांताशी आपलं कधीच जमू शकत नाही. आणि त्याचाच दुसरा भाग म्हणजे जगात दुसरीकडे कुठे काही चाललं असेल तर एकतर ते फेकून देण्याजोगे असणार किंवा आमच्याकडे त्याच्या आधीची काहीतरी व्हर्जन असणारच, म्हणजे विंडोज, आय-फोन, क्लाउड कम्प्युटिंग, सापेक्षतावाद हे इथे जे आधी भास्कर, पिंगल, ब्रह्मभट (पहिला, दुसरा, सातवा, पायावा) आणि त्यांचे अनेक कलीग्ज ह्यांनी शोधून  आर्ष संस्कृत मध्ये कोड करून हार्ड डिस्क मध्ये सेव्ह करून कुठेतरी कैलाशात मेन सर्व्हर वर ठेवले आहेत आणि आज त्यांचे प्रगाढ अनुयायी ते एक एक करून फेसबुक वर अपलोड करत आहेत, (आमिश त्रिपाठी की जय हो!) असं आपण अजिबात मानत नाही. आपण आपलं डोकं वापरायचा प्रयत्न करणार, चुकणार आणि त्यामुळे बाकीचेही असेच चूक-बरोबरने बनले आहेत, त्यांचे इतिहासही असेच चूक-बरोबर आहेत असं आपलं म्हणणं आहे. एकच एक ग्रँड उत्तर असेल सगळ्याला आणि तेही आपलंच असं काही मला वाटत नाही.
३.                     ३. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था, गावातील बलुतेदारी आणि इतर संस्था ह्यांचे फायदे समजला झाले असतील. पण त्यांनी तोटे झालेच नाहीत असं आहे का? मुळात स्वातंत्र्याची वैयक्तिक उर्मी मारून गतानुगतिक जगा, त्यात थोड्या सोयी करा पण ढाचा पडू देऊ नका अशी बेदम स्थितीशीलता नाही का भरली गेली आपल्यात? स्वातंत्र्य ह्या गोष्टीला पण आपण स्वप्नाळू झालरी लाऊन बेगडी केलं. स्वातंत्र्य म्हटलं की एकदम सगळं छान, मंजुळ, सुखद, स्वच्छ, बंधुभावपूर्ण. एकदम जो जे वांछील असं पसायदान किंवा सर्वे भवन्तु सुखिनः असं. स्वातंत्र्य हे कोरडं, कसलीही छटा नसलेलं असतं आणि आपण निर्बंधानी त्यावर काही एक आकार घालू पाहतो असं कधी नसतंच स्वातंत्र्य आपल्यासाठी. आपण देशाचं आणि देशातल्या माणसाचं स्वातंत्र्य हे मुळात बरोबरच्या चिन्हाने जोडूनच टाकलंय. वैयक्तिक असं काही नाहीच इथे, सगळं करोडो लोकांच्या हजारो वर्षाच्या निष्प्राण होत चाललेल्या इतिहासाने चिरडलेलं आहे. कुठलाही वैयक्तिक पराक्रम हा आपण ताबडतोब भारतीयत्व, महाराष्ट्रीयन, जात, शहर अशा स्टेजवर उभे करायला जातो. त्याने त्याच्या वैयक्तिक उर्मीने ते केलं असेल असं का वाटत नाही आपल्याला? आणि हाच न्याय आपण व्यक्तिगत दुर्गुणांना का नाही लावत? म्हणजे हा महाराष्ट्रीयन चोर, हा भारतीय बलात्कारी, हा माझ्या जातीचा लाचखोर असं? सगळ्याची एक, एक बाजूच बघायची, कसलीही किंमत मोजायला नको अशी इन्शुअर्ड चौकट घायची आणि मग बाकी सगळेही कसे त्याच चौकटीत आहेत हे पटवायचे फोपशे प्रयत्न करायचे. वा!
४.                        ४.  लहानपणी ऐकलेल्या आणि वाचलेल्या प्रकारांत एक उल्लेख असायचं, बघा अमेरिकन संस्कृतीत घटस्फोटांच प्रमाण किती वाढतं आहे, कशी त्यांची कुटुंब संस्था ढासळते आहे. त्याच्यापाठी न लिहिलेलं गृहीतक असं असायचं की अमेरिकन आई-बाप हे सेक्ससाठी हपापलेले आहेत, त्यात त्यांना वारंवार रुचीपालट हवा असतो आणि त्यासाठी ते आई-बाप, सासू-सासरे किंवा मुले ह्यांचीही पर्वा करत नाहीत. पण बघा, आम्ही पर्वा करतो, ह्याची करतो, त्याची करतो, समाजाची पर्वा करतो, आई-बापांची करतो, देश, धर्म, इतिहास आणि आमचा आज, उद्या सगळा येणाऱ्या फिक्शनल पसायदानिक परवावर सोडतो. कबूल, ह्यामुळे लोक एकमेकांशी घट्ट बांधलेले राहतात, सोशल सिक्युरिटी बनते,समाज, कळप तुटणार नाही, त्याची स्थिती खालावणार नाही ह्याची गारंटी बनते. पण आपण व्यक्ती म्हणून बेगडी बनतो. आपण खऱ्या अर्थाने आपण सुखी आहोत का दुःखी हे ठरवतच नाही, असा प्रश्न आपल्याला एक तर येत नाही आणि आला तरी आपण ह्याची ना त्याचीं पर्वा करण्याच्या असहाय्यतेची ढाल घेऊन आपण तो अडवून धरतो. आणि अजून बेगडी होत जातो. घटस्फोट घेणं हा अगदी क्लीशेड शब्दात म्हटला तरी त्या बाईच्या स्वातंत्र्याचाच एक नमुना आहे. ठीके, कदाचित ती असे दहा घटस्फोट करेल, असमाधानीच मरेल, पण कसलीही निवड न करता येणाऱ्या ढेकरेपेक्षा आपल्या निवडीची अर्धपोटी भूक काय वाईट? किमान त्यात रोमान्स तर आहे!
५.                      ५. आणि ही स्थितीशीलता आपला समाज म्हणून घात करतेच आहे की! सोयीचे हलके बदल तेवढे आपण घेतो, म्हणजे लोकल ट्रेन मध्ये सिगरेट पिणं थांबलं, मुंबईत बेस्ट बस साठी सुरुवातीच्या स्टोप ना लोक रांगेत थांबतात आणि असे बदल कोणी दंड न करता घडले, कारण त्यात बहुतेकांचा फायदा झाला, काम सोपं झालं किंवा सुखावह झालं. पण किती नवरे घरी बायकोबरोबर जेवण बनवायची, घरकाम करायची जबाबदारी शेअर करायला लागले? बायका नोकरी करतील हे समाजाने म्हणजे सासर नावाच्या प्रकाराने स्वीकारलं ते त्यातल्या भौतिक फायद्याने, हां, थोडीफार सूट दिली त्यांनी, पण ढाचा नाही बदलला. मासिक पाळीच्या काळात नोकरी करून त्या पैशाने घरात देवपूजा झाली तर चालेल पण त्या बाईने त्या दिवसांत त्या पूजेत येऊ नये असं तर बहुतेक ठिकाणी आहेच ना. चतकोर घरात कोंबून राहिले तर सुखी कुटुंब आणि योग्य वैद्यकीय शुश्रूषा असू शकणाऱ्या वृद्द्धाश्रमात आई-बापांना ठेवणारे कृतघ्न, असं अजूनही बहुतेकांना वाटतं ना? का असं?
       मला हेही समजतंय की अशी जाचक बंधनं आहेत म्हणून कदाचित गंमत आहे, म्हणजे ती तोडण्याचा आणि काहीतरी मिळालं असं वाटण्याचा खेळ तरी खेळता येतो. इट प्रोव्हाइडस् अ पर्पज टू अदरवाईज मिनिंगलेस गेम. माझ्या अशा एका रविवारला ‘शुद्ध देसी रोमान्स’ ने ते मिळालं, तसं खेळणं तुम्हालाही मिळो, तुम्हाला प्रश्न पडोत, तुम्हाला अस्वस्थता येवो, ती अस्वस्थता सर्वत्र भरो आणि पडझडीला सुरुवात होवो, मग खरा रोमान्स सुरू होईल, शुद्ध देसी रोमान्स. हा हा हा!!                

‘न्यूटन’, निष्काम कर्मयोग आणि बाकी लिहिण्याचा इगो

‘न्यूटन’ बद्दल मी वाचलेल्या प्रतिक्रियांना दोन टोके होती. एक होत्या भारावलेल्या आणि दुसऱ्या होत्या ‘न्यूटन’ राष्ट्रद्रोही गटातला आहे असा श...