Wednesday, February 22, 2012

उरे घोटभर गोड हिवाळा


 ५ वाजलेले सकाळचे. तो घड्याळाकडे बघत होता  . मागचे दोन दिवस तो झोपला नव्हता. जर अजून दहा मिनिटं आपण असेच या गादिवर लोळत राहिलो तर सहज झोप येईल आपल्याला. आणि मग? ६ वाजतील. ७ वाजतील. डोळे उघडे पर्यंत ९-१० कितीही वाजतील. आणि मग हे शहर गच्च भरून गेलं असेल माणसांनी. आणि मग त्या माणसांचे थवे घेवून इकडे-तिकडे करणा-या बस-रेल्वेमधून आपल्याला आपला रस्ता शोधायला लागेल. 
   गर्दीची एवढी भीती का वाटते आपल्याला? आपण सहज धक्के वगैरे मारून पुढे जाऊ शकतो. किंवा तास-दोन तास उभे राहून जाऊ शकतो. हं, चिडचिडे होतो आपण. पण आपण अजून स्वतःला सवय नाही लाऊ शकलोय. शहराचा एक नियम आहे, अलिखित, पण सगळीकडे ठसठशीतपणे दिसणारा.. you ought to be someone special तरच ह्या शहराच्या काळजात लपलेल्या रेशमी, निवांत जागा तुमच्यासाठी उघडणार आहेत. तुम्हाला हव्याहव्याश्या वाटणा-या साध्या गोष्टी, म्हणजे     वा-याची झुळूक चेहे-यावर घेत केलेला प्रवास, किंवा आपल्याच विचारात गुंतत चाललेला रस्ता किंवा एखाद्या उदास संध्याकाळी स्वताचे एकटेपण विसरायला एखाद्या शांत रस्त्यावर चालत जाणे... यातलं काहीही तुम्हाला मिळणार नाही if you are not part of that special...जर तुम्ही तसे नसाल तर तसे होण्या साठीच्या गर्दीत तुम्हालाही तुमचा पत्ता लढवून पहायला हवाय  ...लढा...सज्ज व्हा...हर हर महादेव...
   आत्ता गेलो रस्त्यावर तर काहीच नसेल ह्यातलं... पण वेळ अशी गोठून राहणार नाही. उद्याच्या दिवसाची वाट पाहणा-या लाखो माणसांच्या मनसुब्यांची धग आत्ता असणा-या शांततेला वितळवून, पार पार वाफ करून टाकेल. आणि मग खूप उशिराने ही लाखो माणसे काही तासांपुरती थांबली कि शांततेचे तुकडे अलगद जमू लागतील. रात्रीच्या काळ्या, मंद आवरणाखाली थोडावेळ काळ गोठेल.. निस्तब्धतेचे स्पंद जागतील... आणि त्यावेळी जर तुम्ही रस्त्यावर असाल तर तुम्हाला ह्या शहराचे निश्वास ऐकू येतील.. तुम्हाला दिसेल कि कशी एका एका माणसांच्या स्वप्नाचे बंध जोडत जोडत हे जगण्याचे जाळे इथे विणले आहे..निओन लाईटच्या उबदार पिवळ्या प्रकाशात पहुडलेले रस्ते कूस बदलताना दिसतील. आणि त्याचवेळी त्या रस्त्याच्या कडांना माणसांची घरे, इमारती, झोपड्या, खोपटी, बंगले सारे ओथंबून थांबले असेल... फार वेळ हे असणार नाही. हळूहळू कुठेतरी ठिपका लागेल प्रकाशाचा, आणि त्या ठीपक्यात हालचाल जन्म घेईल. 
   तरीही बराच वेळ आहे लख्ख उजाडायला...हे मधले हळवे सुखाचे काही तास...
  रात्री झोपलच पाहिजे वेळेत. म्हणजे मग पुढचा दिवस एका लयीत सुरु होतो. तुम्हाला उन्हाचा काहिली न करणारा चकचकीत कवडसा पाहता येतो. झाडाच्या फांद्यांच्या मधून येणारी सोनेरी कोवळी तिरीप पाहता येते. आणि मुख्य म्हणजे हे सगळं पाहताना, त्याचे ठसे जाणीवेच्या ओलसर थरावर उमटताना कसलाही थकवा जाणवत नाही. असण्याची रुक्ष कोरडी जाणीव काही वेळापुरते मंतरून जाणारे हे क्षण पुढे दिवसभर मनाच्या एका कोप-यात गुंजत राहू शकतात. पण जेव्हा रात्रभर जागून तुम्ही अशी सकाळ पहाता, तेव्हा हे सारे सुखद प्रकाशित क्षण जगत येण्याच्या पलीकडच्या दुनियेचे वाटतात. आणि मग हे जे दिसते आहे आणि जे असणार आहे त्याच्यातले कोरडे पक्के अंतर तेवढे समजत रहाते. आणि त्या निराश घरंगळत्या जाणीवेत कुठेतरी पुढचा अपरिहार्य दिवस सरकत राहतो. 
  मी हे काय सांगतोय. साडेपाच वाजलेत आणि मी बसची वाट पहात उभा आहे. 
   थंडीचे दिवस येणार आहेत...त्याची वर्दी देणारा चुकार गारवा आहे हवेत. 
 हा कुठला महिना? म्हणजे अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष का माघ? मार्गशीर्ष असावा किंवा कार्तिक... म्हणजे अजून त्या कवितेचे दिवस आलेले नाहीत..
    न्हालेल्या जणू गर्भवतीच्या 
    सोज्वळ मोहकतेने बंदर 
    मुंबापुरीचे उजळत येई 
    माघामधली प्रभात सुंदर
        ही माघामधली प्रभात नाही. ही प्रभात पण नाही...हा तर रात्र आणि सकाळ यांच्या सीमेवरचा अलवार वेळ आहे. हळूहळू उलटून जाणारी रात्र आणि साजिरेपणाचा चेहेरा घेऊन येणारा मुत्सद्दी दिवस...   
  पण तरीही ह्या वेळेचे त्या कवितेच्या शब्दांशी नाते आहे...त्या कवितेतला घोटभर हिवाळा इथे आहे कुठेतरी.... घोटभर गोड हिवाळा... घोटभर हळवा हिवाळा...
  बस आली नाही अजून. आणि बसची वाट पाहणारी माणसे जमली आहेत. एक पिळदार मिशांचा माणूस आहे जो उभ्या उभ्या पेंगतो आहे. दोन कामावर जाणारे लोक आहेत जे पार आत्तापासूनच आपला धूर्त पवित्रा घेऊन उभे आहेत. एक मुलगी आहे जी गाणी ऐकते आहे मोबाईलवर...  आणि मागे ही फुटपाथवर झोपलेली माणसे..
त्यांच्या शरीराच्या पांघरुणाशी मिसळून गेलेल्या रेषा.. त्यांचे गारव्याने आपसूक शरीराशी जुळून आलेले आकार... आणि त्यांच्यातल्या कोणाला तरी येणारी जाग...
  बाई आहे ही... एक ब्लाउज आणि परकर घालून झोपलेली... थोडावेळ आळसावून ती उठते आणि मख्ख यांत्रीकेतेने गुंडाळते साडी... मग तिच्याकडे बघणा-या चार-दोन पुरुषी नजरा झेलत ती सहज शोधते आडोसा आणि आपल्या देह्धर्माला वाट मोकळी करून देते... 
  अजून बस आलेली नाही, एक झुळूक आली आहे आणि सगळे जण छातीभोवती हाताची घडी घालून बसची वाट पाहतायेत...
     पावणेसहा.  बस यायला हवी... अंधार फिकट होतो आहे, आणि घरांचे दिवे त्या फिकट अंधाराला  अजून छिद्रे देतायेत....हालचाल जागी होतीये...
       डोकी अलगद घरे उचलती 
       काळोखाच्या उशीवरूनी 
काळोखाची उशी...काळोखाची कुशी...
     चहावाला आला आहे तिथे...   कवितेत पण आहे चहावाला... गरम चहाचा पत्ती गंध... पण इथे बोटी नाहीत, इथे धुराचा जळका परिमल नाही...इथे कविता नाही...इथे फक्त ही कवितेशी अंशतः जुळणारी एक वेळ आहे, रात्र आणि दिवसाच्या अधांतराशी तोललेली.... 
   पण हा मुलगा कोण आहे इथे? 
   ए, नाव काय तुझं? कोण तू? 
    काय? तुझं नाव गोड हिवाळा आहे?         
    मजा घेतो का माझी, मी झोपलो नाही रात्रभर म्हणून का न झोपण्याच्या आधी मी काही पेग मारले म्हणून... सांग तुझं खरंखुरं नाव सांग... अशा पहाटेच्या वेळी खोटं बोलून दिवस सुरु करू नये...
        हेच नाव आहे तुझं? गोड हिवाळा? तुझं गाव काय? मुंबापुरी बंदर? 
     हा.हा... तू मला कविता म्हणताना ऐकलस ना? आणि म्हणून असं काहीतरी सांगतोयेस? 
नाही? खरोखर तुझं नाव 'गोड हिवाळा' आहे? आणि मग तुझं आडनाव मर्ढेकर आहे? 
काय आहे मुलं, इथे एक आडनाव असणा भलताच आवश्यक आहे. आडनाव म्हणजे काय? ज्याच्या आड तुम्ही कोण होणार ह्याच्या बहुतेक शक्यता लपलेल्या असतात त्याला आडनाव म्हणतात असं मला आज काल वाटतंय...किंवा नुसत्या नावाने काही करण्याच्या जे आड येते ते आडनाव...ते सोड ना...तुला आडनाव नाही असं कसं? तुझे आई-बाप असतील ना? का तू असाच एकदम इथे माझ्या शेजारी, ह्या सकाळी सॉरी पहाटे उगवून आलं आहेस? 
   काय? तू काल्पनिक आहेस? हे बघ भाऊ, किंवा मुला, तुला काहीतरी झालंय किंवा मला...पण हे जे काही तू सांगतो आहेस ना त्यावर मला विश्वास ठेवावासा वाटला तरी ही जी इथे माझ्या भोवती त्या पहाटे येणा-या बसची वाट बघत उभी माणसे आहेत ना ती तसा मला ठेऊ देणार नाहीत... विश्वास ठेवायला तिथे काहीतरी असण्याची जागा असावी लागते, तू म्हणतोयेस कि मग कल्पनेतून जन्मलोये...ह्यात मला विश्वास ठेवायची जाणवणारी जागा कुठेय? आणि इतक्या लहान वयात तू पहाटे पहाटे छान मस्त उबदार पांघरूणात झोपायचा सोडून काहीही सांगतोयेस? तू इथेच राहतो का फूटपाथवर? नाही? मग?

   गोड हिवाळा 

काय माणूस आहे हा? हा जेव्हा इथे चालत येत होतं तेव्हा एकदम त्याला हवेतले हलके थंड कंपन जाणवले...आणि त्याच्या जागलेल्या, त्रासलेल्या रात्रींवर फुंकर मारून गेल्यासारखे वाटले त्याला. आणि अशावेळी अठ्ठ्याणव टक्के लोक 'मस्त झोपलो असतो यार'आणि मग वयपरत्वे झोपण्याच्या वेगवेगळ्या अवस्था समोर आणतात  तेव्हा ह्याने एकदम उसासा टाकला आणि ही हलक्या शिराशिरीची वेळ थोडावेळ गोठून जावी आणि त्यातले हे नवेपण, हे निरलस हलकेपण तरंगत तरंगत त्यात बुडून जावे असे त्याला वाटले...म्हणून मी आलोय इथे...त्याच्या उसास्याने बोलावलं म्हणून... इतक्या पहाटे अशा कल्पनाच्या प्रतिमा बनवणारा माणूस मी काल्पनिक आहे हे मान्यच करत नाही?
   आणि माझा जन्म काही एकच एक कल्पनेतला नाही. आणि माझं वय असं कोवळं वाटलं तरी मी तुमच्याहून खूप जास्त हिवाळे पाहिलेत...हिवाळेच...कारण मी फक्त हिवाळेच पाहतो...मी आहेच गोड हिवाळा....
  ठीके मी सांगतो तुम्हाला...
  माझा जन्म काल्पनिक आहे...आणि हे वाक्य बिलकूल खरं आहे. अर्थात कोणा एकाच्या कल्पनेतून नाही. आणि माझा जन्म व्हायच्या आधी माझं एक चेहेरा नसलेलं, आवाज नसलेलं धूसर अस्तित्व होतंच. तुमचे कुठे, कसे हे प्रश्न मला लागूच नाहीयेत. मी शक्यतांच्या जगाबाबत बोलतोय. मी तिथेच अस्तित्वात होतो.
एकदा एक माणूस असाच या शहरातून फिरत होतं. आणि माणसांच्या गर्दीत तो शब्द शोधत होता. त्याला ते शब्द जाणवत होते, त्याच्या जवळ थरथरणारे...त्या शब्दांच्या गाभ्याशी असणारे अर्थाचे स्पंद त्याला भुलवत होते आणि त्याचवेळी त्याला त्या शब्दांवर कृत्रिमतेचे कपडे घालायचे नव्हते. त्याच्या लेखी अर्थाइतकीच  लय ही पण शब्दांची मुलभूत ओळख होती. आणि म्हणून माणसांच्या अजस्त्र कोलाहलाच्या आपसूक लयीत तो त्याचे शब्द शोधत होता. ह्या भव्य आणि स्वतःभोवती गिरकी घेत वाढणा-या कोलाहलाच्या अंतरंगातही शांततेचे तोललेले क्षण असतात. त्याला त्या तोललेल्या क्षणाला अलगद स्पर्शूनच ते शंब्द मिळणार होते. आणि तो शोधत हिंडत होता. 
      जसं ब-याचदा होतं कि एखादा तरल काळजाचा माणूस काही शोधायला निघतो आणि त्या वाटेत त्याच्या काळजावर नवे नवे ठसे उमटत जातात आणि शेवटी तो त्या ठशांच्या मागच शोधू लागतो. जे ठरवलंय तेच शोधत राहण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांच्या परिपूर्णतेचे आंधळेपण असावे लागते , ते सगळ्यांना असतेच असे कुठेय ... आणि तरल काळजाच्या माणसाना तर ते नसतेच नसते. किंबहुना स्वतःची स्वप्ने  कैद करण्यासाठी लागणारे कुंपणही त्यांच्याकडे नसते...असो..
  तर तो लय आणि अर्थ बिलगून असलेले शब्द शोधणारा माणूस असाच तरल काळजाचा होता. माणसांच्या कृतींच्या एकमेकांना ताणणा-या, खेचणा-या प्रतलावर तोललेले क्षण तो शोधायला निघायला आणि त्याचवेळी शहराच्या सर्वव्यापी होऊ घातलेल्या चक्रात आपल्या, आपल्या जवलाच्याच्या आयुष्याला सर्वमान्य समाधानाची किनार देऊ पाहणा-या अनेक माणसांचे ठसे त्याच्यावर उमटत गेले. ही माणसे, त्याचे कोरे पण एखाद क्षणी एखाद्या छोट्याश्या समाधानाच्या झुळकीने फुलणारे चेहरे, त्याचे थकणारे हात-पाय, त्याच्या घामेजलेल्या त्वचा, त्यांच्या वितभर स्वप्नांना झाकून मोड आणणा-या चतकोर रहायच्या जागा, त्यांचे कधी भल्या पहाटे तर कधी भर दुपारीही सुरु होणारे दिवस आणि त्यांच्या भोवतालच्या लयीशी फारकत घेत जाणारी त्यांच्या आयुष्याची एकटाकी लय...
  पण ह्या ठशांचा माग कुठेच लागत नव्हता. ते कुठे पोचत नव्हते, आणि तरी थांबत नव्हते. आणि त्या ठशांच्या गडद, अंतर्वक्री आकृत्यांमध्ये कुठेतरी ते शांत मृदू सुखाचे ठिपके होते. पण त्या ठिपक्यांच्या रेषा दिसत नाही तोच संपत होत्या.
      का? का? का एवढी माणसे जगत राहतात? त्यांचे जाणवणारे दुख खरे आहे कि भास? आणि जरी त्यांचे शारीरिक कष्ट संपवले तरी समाधानाचे मायाळू आभाळ त्यांना कवेत घेईल का? 
   तो शोधत निघाला होता ते शांततेचे तोल-क्षण मागे पडले आणि मग हजारो आयुष्यांच्या पिचल्या, दबल्या दिवसांचे प्रयोजन तो शोधत बसला. 
   शोधून सापडतं हा आपला आवडता गैरसमज आहे. खरं तर असं आहे कि शोधण्याच्या नशेत आपण काय शोधतो हे विसरलो कि काय शोधत होतो ते सापडते. बहुतेकवेळा आयुष्याचा असा एका नियम असतो कि समाधानाची तहान आणि समाधान हे एकत्र कधीच येत नाहीत. समाधान सा-या जाणिवांच्या पलीकडे जाऊन निशब्द, निस्तब्ध होऊन भोगायची जागा आहे. जाणवते ते समाधान नाही तर येणा-या अथवा जाणा-या समाधानच्या सावलीचे ओले सुखद भास....
   तो भटकत राहीला ह्या शहरात... पोक आलेल्या, काळपटलेल्या भांड्यात रटरटून शिजणारे संसार पहात, श्रमाच्या अनिवार्य ग्लानिमध्ये लोभस उद्याचे स्वप्न हाताळू पहाणारे डोळे पहात, आणि ज्यांच्यासाठी आयुष्य एक हलका मस्तीचा कैफ होऊन आले आहे अशांच्या जिंकण्या-हरण्याच्या खेळासाठी प्यादी बनलेली आयुष्ये पहात... 
   ह्याला अर्थ आहे? ह्या प्रशांत गडबडीच्या तळाशी भरीव असे काही आहे? कुठे आहे? कसे आहे? 
   दिसत आहे तो रात्रीसोबत येणारा समाधानाचा चकाकता तवंग... आणि मग त्या तवागांच्या रंगांच्या उबेखाली काही काळ विसावणारी आयुष्ये... आणि त्या तवागांच्या मृगजळाचे बिंब फोडणारा उद्याचा कठोर प्रकाश...
  आणि हा मधला गोड हिवाळा... ह्या समाधानाच्या फसव्या अस्तित्वाचे मूळ...
   समजा आत्ता एखादी घामट, दमट रात्र असती तर कूस बदलत, आयुष्याला शिव्या देत ही माणसे रात्रभर तळमळली असती. आत्ता पाउस पाडत असता तर गळके आयुष्य वाचवायला डोळ्यांवरची झोप आवरत जागे असते सारे... सारे म्हणजे तेच सारे जे अजून शारीर सुखी अवस्थेच्या एकमात्र स्थिर बिंदूपासून लांब आहेत...
  सुख ही निखळ शारीर जाणीव आहे...उद्या कसा असेल हा डोक्यावरचा ताण संपला कि अंगभर उरणारी तलम जाणीव म्हणजे सुख... आणि समाधान म्हणजे ह्या सुखाचा कंटाळा आलेली माणसे स्वतःसाठीच एक खेळ शोधतात त्या खेळात त्यांना हवे ते मिळालेले दान...
  आणि ह्या शहरात अशी कित्येक माणसे आहेत ज्यांना अजून सुखाच्या धाग्याचे टोकही हाती लागले नाही... 
  अशीही माणसे आहेत जे सुख खूप झाले म्हणून दुस-यांच्या दुख दत्तक घेऊ पाहतायेत....
   अनेकदा प्रश्न सवयीचा असतो... असे आहे असे सवयीने समजावत राहिलो के असेच आहे असे वाटूही लागते....
  आपण सुखी किंवा दुखी आहोत हा असण्यापेक्षा वाटण्याचा प्रश्न असतो...चार दिवस आपण आपल्याला जे सांगत राहू ते पाचव्या दिवसापासून वाटूही लागेल...  
  आपल्याला निःशंकपणे जाणवते ते फक्त आपले शरीर... हेही तसे खरे नाही.... आपल्याला निःशंकपणे जाणवते ते फक्त शारीर दुख... 
  सुख जितके विरळ तितके अधिक तृप्तावणारे  .... ते जितके सवयीचे होईल तितके लवकर ओसरून जाते....   
     हे मी सांगत नाहीये... हे त्या माणसाला शहरभर फिरताना मिळालेले आहे...   
     तो शहरभर फिरला.. दिवस, महिने, मौसम.... आणि मग हळूहळू त्या शोधण्यातच तो रमला. तो बैचैनही उरला नाही. पण मध्येच हजारो आयुष्यांच्या एकत्रित अस्तित्वाचा का? का? असा प्रश्न त्याला भांबावून सोडायचा. आणि मग त्याच एकत्रित, बहुजिनसी, जिवंत अस्तिवाच्या छटांत तो त्या निनादत्या, घुमत्या प्रश्नाची मुळे शोधू पाहायचा, त्या प्रश्नाचे नाद विरून जाईपर्यंत...
   एका रात्री तो असाच अजून कशानेतरी बैचैन होता. आणि मग हळूहळू त्या बैचैनीचे मूळ त्याच निनादत्या प्रश्नाशी आले. मग केव्हातरी प्रश्न जाऊन नुसत्याच नाच-या प्रतिमा त्याला दिसू लागल्या. संवेदनांचे वेदनाविलक्षण संचित लाभलेल्या माणसाना अटळपणे दिसत आलेले जगण्याच्या सगळ्या धडपडीचे मर्यादीत शहाणपण आणि त्यापलीकडचे म्हटले तर कित्येक अर्थांचे, म्हटले तर काहीच नसलेले असे माणसांच्या आयुष्याचे केवळ दिवस एकमेकांवर साठवत जाणे त्यालाही दिसले. आणि मध्येच कुठेतरी जगण्याच्या पोकळीशी घुमून येणारा का? का? आणि मग तो प्रश्न दडवत जाणारे हजारो पोपटी -कोवळे स्वप्नांचे अंकुर, त्यापायी उजाड, उनाड, हिरवीगार, बहरून येणारी माणसे आणि त्या सगळ्या धडपडीत कुठेतरी शांततेच्या निवांत कोप-याला लगटून येणारे आश्वस्त चार क्षण. समाधान किंवा आनंद किंवा नाम-रूपाच्या चौकटी पलीकडची अनासक्त, अनाहत जाणीव..
   शेवटी      तो आपल्याच जाणिवांच्या नशेत शहरभर भटकू लागला. तो कोणाशी बोलेना. कारण बोलायला, सांगायला जाऊन अनेकदा आपण जे सांगायचे ते सोडून नावेच गुंते बनवत जातो असे त्याला वाटले. त्याने ओळ्ख बदलली, त्याने परिचित रस्त्यांवरून चालणे सोडून दिले. तो रात्र-रात्र जागा राहू लागला. तो आपल्याच कल्पनेच्या सारीपटावर शक्यतांचे फासे फेकून पाहायचा आणि हवे तसे बिलोरी दान आले कि हरखून जायचं. मग ती थरारती अवखळ जाणीव तो शब्दांत लिहू पाहायचा. शब्द विरून जायचे, फासे घरंगळून जायचे आणि असंख्य चौकड्यांचा सारीपाट तेवढा मागे उरायचा. 
   मी तेव्हा त्याच शहरात होतो, जरा जास्तच रेंगाळलो होतो. खरतर मी वर्षानुवर्षे ब-यापैकी नियमाने फिरतो. पण त्या वर्षी मी जरा जास्तच वेळ त्या शहरात रेंगाळलो. एकतर मला हा रात्री-अपरात्री कुठेही दिसायचा, मग मी सहज त्याच्या सारीपाटावरचे एक दान व्हायचो. मग शब्द चौखूर उधळलेला तो, कोणी मनाजोगते ऐकणारे मिळते का म्हणून शोधायला भटकायचा. मग मी त्याला कुठेतरी एखाद्या कोप-यावर भेटायचो. त्याच्या स्मरणातला कुठलाही चेहेरा होऊन. आणि तो बोलेल ते ऐकत राहायचो. त्याला कधी कळलेच नाही कि जसं तो त्याच्या आजूबाजूची माणसे जगतात त्या चौकटीपासून वेगळं होऊन त्याच्या कल्पनेत जगतो आहे तसंच मीही आहे. त्याला वाटायचे कि कुठेतरी त्याचे काल्पनिक, सोनेरी कोवळ्या प्रकाशाचे जग ह्या खराखु-या जगाला छेदते आहे, त्याच्या रुक्ष अर्थहिनतेला जिवंत, हवेहवेसे कवडसे देते आहे. मी कधीच त्याचा हा समज तोडला नाही. पण हळूहळू तो बोलायचा थांबला. त्याला कळले, ठाऊक नाही. कदाचित सहज आलेले समाधान त्याला कंटाळवाणे झाले किंवा मी नसताना त्याला तो कोपरा, तो चेहरा, तो ऐकणारा मिळालाच नाही. 
    मग    मलाही जावे लागणार होते. आणि मला पहिल्यांदा जाणवले कि आपले काहीतरी हरवले आहे. आणि तिथे माझ्या निरागसपणाला पोक्त तडे जाऊ लागले. जे हरवले होते ते शोधण्यासाठी मी तडफडू लागलो. आणि इतके दिवस माझ्या निरागस असण्याला सोकावलेले शहर मी जाऊन कधी एकदा त्वचा तापवणारा उन्हाळा येतो त्याची वाट पाहू लागले. 
  म्हणजे  तोही नाही आणि आता या शहरालाही मी नकोसा झालेलो. मी एकदम निघून गेलो. 
  पण मला त्याची आठवण येत राहिली. एका रात्री तर मला त्याच्यासारखाच एक नव्या शहरातही दिसला. मग मी न राहवून परत त्याला शोधायला ह्या शहरात आलो. 
   आणि तो पण कदाचित मला, म्हणजे एखाद्या सहानुभूतीदार ओळखीच्या चेहे-याला शोधत होता. मी त्या दिवशी कोणताच चेहरा घेतला नाही. असाच बसलो त्याच्या सोबत. 
       मग तो म्हणाला, एवढे दिवस घेतलेस ख-या चेहऱ्यात यायला. मी काहीच न बोलता त्याचा त्वचेवर एक बोलका शहारा सोडला. 
       मग तोच बोलत राहीला. 
       तू होतास तर ही एवढी गर्दीही एकमेकांना सांभाळून राहिली. एकमेकांच्या असण्याचे ओझे झाले नाही. त्यांची स्वप्ने गोठली नाहीत किंवा जाळली नाहीत. ती त्याच्या कुशीच्या उबेत, त्यांच्या कवेत त्यांना अप्राप्याचे स्वर ऐकवत राहिली. आणि त्या धुनेवर सारे जगणे जुळून गेले. पण तू गेलास, तसे तुझे स्वप्नांना हाका देण्याचे अवखळ वेडही गेले. दिवस बोचू लागले आणि रात्रीनाही दमट वास्तवाचे मोड आले. होईल तसे इवल्या इवल्या कोप-यात डांबलेले जगणे ढुशा देऊ लागले. एकमेकांवर रचलेली माणसांची ही उतरंड आडवी-तिडवी प्रसारण पावून स्वतःलाच चेपू लागली. आणि मी माझ्यापुरता जमलेला कोपराही माझ्याहातून निसटला. 
        आणि      आज तू आलायेस, न बोलावता येणा-या हव्याहव्याश्या माणसासारखा...
        चल,  फिरुया...
     मग आम्ही चालत राहिलो, आणि जिथून जिथून आम्ही चालत गेलो तिथे मी नोस्ताल्जियाची उबदार लहर पसरवत गेलो. 
      मग समुद्र.. 
  मग तो म्हणाला, तू एवढं नोस्ताल्जिया पसरवत आलास, पण उद्या ह्या मंद, रेशमी जगाच्या धूसर खुणा राहणार. काळाचा अटळ हात फिरताना मागचे वाचलेले काही संदिग्ध संदर्भांचा भासमान भूतकाळ जन्माला घालणार. तू हे का करतोस? 
      मी हसलो. माझ्या परत गवसलेल्या निरागस पणाला कार्यकारण भावाचा वायदा असतोच कुठे? 
      मग तो कितीतरी वेळ पहात राहीला, त्याच्या मौनाशी शब्दांचे तांडे धडकत होते, पण तो निग्रहाने त्यांना आवरत होता. त्याला जाणिवेची निखळ जागा शब्दांच्या लोटात हरवायची नव्हती. 
    त्याचे शब्द बाहेर यावेत म्हणून मी थंडगार झुळूक झालो, पण त्याने आपल्या हातांच्या घडीत सारे लोट अडवले. 
     मग मीच त्या लोटात शिरलो अन ते सारे शब्द हलके हलके गोठवत गेलो. 
     सचेतनाचा हुरूप शीतल 
      अचेतनाचा वास कोवळा  
  तोवर सकाळ होत आली, प्रकाशाचे स्पर्श आले. आता मला जावे लागणार होते. मी परत त्याच्या शब्दांचे लोट इकडे-तिकडे केले. मला त्याला बोलते करायचे होते. 
    दिवस आधी लहानगा होता तोवर मी त्याला गोंजारले, खेळवले. पण मग एकाएकी दिवस सैरभैर होऊन धावू लागला आणि गर्दीच्या नव्या उत्साही लोटांत चिरडत जाणार तेवढ्यात मी निघालो. मला परत ह्याच शहरात माझे निरागसपण तडे जाताना पाहायचे नव्हते. 
     लाटांवर खेळात मी दूर जाताना मला त्याचा आवाज ऐकू आला..
       ह्या सृष्टीच्या निवांत पोटी
        परंतू लपली सैरावैरा 
        अजस्त्र धांदल क्षणात देईल 
        जिवंततेचे अर्घ्य भास्करा
        थांब जरासा वेळ तोवरी 
        अचेतनाचा हुरूप शीतल 
        सचेतनाचा वास कोवळा 
       उरे घोटभर गोड हिवाळा 


(कवितेच्या ओळी: बा.सी. मर्ढेकर- पितात सारे गोड हिवाळा)
   (मुंबईतल्या दुर्मिळ आणि बरेच दिवस राहिलेल्या थंडीस, ज्यात दिवस बरे गेले)

वाचलेले-पाहिलेले काही

वाचलेले  १. एम. जे. अकबर ह्यांचे 'Kashmir: Behind the Vale'.  इस्लामच्या माझ्या आकलनाची सुरुवात हे अकबर ह्यांच्या 'Shade of S...