Sunday, October 16, 2016

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.
       माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणतो, त्यांच्या जातीचे एवढे लोक आहेत विधानसभेत-परिषदेत, त्यांनी मोर्चा काढू नये. म्हणजे जात मानावी, मोर्चा काढू नये.
       काही म्हणातात, आमची जात बघा, आमचा गट बघा. आम्ही संवैधानिकरित्या भांडू. पण आरक्षण हवंच.
       काही जण म्हणतात, जात नकोच, जात चुकीची. पण आमचा तेवढा एक गट वेगळा ठेवा, आमच्या अन्यायाचं परिमार्जन अजून झालं नाही.
       एकजण त्याच्या जातीतल्या मुलींना सांगतो, जातीत लग्न करा. एक मुलगी त्याला जाहीर अन्फ्रेंड करते. त्याचे मित्र पुढे ह्याच्या-तिच्या बाजू घेऊन वाद जारी ठेवतात.
       काहीजण तर थेट आहेत, घेतल्याशिवाय राहणार नाही.
       काही अजूनही थेट असतील, कदाचित माझं आडनाव,जात, वंश त्यांचा काळ्या यादीत असेल. अजूनतरी मला अशी व्यक्ती भेटलेली नाही. पण अशा व्यक्ती असतील असं मला वर्तमानपत्र वाचून वाटतं.
       मी खिडकीतून बाहेर बघतो तेव्हा ५०% पोस्टर्स वर असलेला एकुलता एक ऐतिहासिक महापुरुष बाकी पोस्टर्स वर असलेल्या तत्कालीन महापुरुष आणि स्त्री-पुरुष ह्यांना निर्विकार बघत असतो, किंवा त्याची करारी नजर आकाशाकडे कोन करून असते.
       फेसबुकच्या, ब्लॉगच्या काही ओळींतून प्रश्नाची ना चिकित्सा होईल ना तोडगा.
       पण ते नकोच आहे मला.
       माझ्या अवती-भवती हे सारे होर्डिंग्ज, रिक्षातून फिरणाऱ्या जाहिराती, जातीच्या नावाचे सळसळते झेंडे हे सगळं मी पाहतो तसं १४-१५ वर्षाची मुलं-मुली पहात असतील. त्यांच्यावर कोण जातीचा शिक्का आहेत, कोण आपले-कोण त्यांचे हे तसं त्यांना समजावला जात असेलच बहुदा. पण राहताना, शाळेत, सोबत त्यांचे मित्र-मैत्रिणी असतील, ते सगळेच काही त्यांचे-आपले होत नसतील. पण आता ह्या झेंड्यांनी, मेसेजनी, त्यांचे २०-२५ वयाचे नातेवाईक, काका, बाबा, आई, मावशी साऱ्यांना पाहून, एकीची, अभिमानाची, आवेशाची हवीहवीशी जाणीव घेऊन ही मुलं-मुली त्यांच्या जगाचीही वाटणी सुरू करतील, आपल्या वाट्यासाठी सरसावतील, त्यांना का- मला का नाही, माझ्या जातीचे थोर लोक, त्यांचं असंच. मग ते ह्याच चष्म्यातून त्यांचे जोडीदार निवडतील.
       ह्या शहराने, अर्थव्यवस्थेच्या नव्या फेऱ्याने, उपभोगाच्या, स्वतःच्या जगण्याला अधिकाधिक पुष्ट करण्याच्या स्पर्धेने एक झरोका बनवला होता. ही मुलं त्या झरोक्यात जगत होती, कदाचित त्यांनी हा झरोका मोठाही केला असता. पण आता ते ठामपणे ह्या झरोक्याकडे पाठ वळवतील. त्यांनी जिकडे तोंड केलंय तिथे त्यांना त्यांच्या पूर्वजांची रांगच दिसत असेल.
       ह्या मुलांना, त्यांच्या मित्रांना त्यांच्या जगाचे जातीनिहाय कप्पे पाडायला भाग पाडलं जातंय त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे.
       पण मी त्याचं उत्तरही शोधात नाहीये.
       माझ्यासारखा विचार करणारे, हे जे चाललंय त्याने तडफडणारे लोक बाकीही असतील. त्यांना हेही जाणवत असेल कि त्यांच्या कुठल्याही भूमिकेचा, निषेधाचा, स्पष्टीकरणाचा झ्याट फरक पडणार नाही. त्यांच्या अड्ड्यावरचे लोक माना हलवतील, विरोधी अड्ड्याचे एक एक शब्द, वाक्य, त्यांचे वैयक्तिक अनुभव घेऊन त्वेषाने भांडतील, हिडीस विनोद करतील, मग नवं काही घडेल, आणि हीच दारू नव्या भांड्यात ओतून आपण तर्र होऊ. किंवा अशा तर्र लोकांच्या लीला पाहत राहू, पाहत राहण्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून.
       किंवा अगतिक झपाट्याने ते रोमँटिक छोटे छोटे बदल करू. वंचित मुलांना शिकवू, महिलांना बचत करायला लावू, एखाद्या समजदार मुलीला शिकवायला मदत करू. मग ती तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला येईल, आमच्या जातीतला आहे, शहरात घर आहे स्वतःचं. तिला अशी सात्विक सात्विक पुस्तकं वगैरे भेट देऊन आपण बरं वाटून घेऊ.
       किंवा तिने पळून जाऊन लग्न केल्यावर तिच्या आई-बाप-भावांच्या जळत्या नजरा पाहू, त्यांच्या गुड बुक्स मधून, त्यांच्या वस्तीतून निष्कासित होऊ. मनात उसासा टाकू, मुलगी सुखरूप असल्याचा.
       आपल्या कलीग्ज, नातेवाईकांना सांगू कशी जात चुकीची आहे ती. ते त्यांच्या जातीत नसलेल्या लोकांनी केलेल्या गुन्ह्याचे पझल्स आपल्याला घालतील. आपल्या पोटतिडकीला आवश्यक सहानुभूती देतील. मग let’s agree to disagree अशा लिबरल तोडग्यावर आपण त्यांच्यासोबत आपला वेळ काटू.  
       आपण आशावाद ठेवू कि होतोय बदल, होतोय, आणि त्यावेळी आपलं बेट ऐतिहासिक सातत्याची वाढती पातळी गिळंकृत करत जाईल.
       माझे ओळखीचे परदेशस्थ लोक दोन गटात आहेत, एक अभिमान ग्रुप आणि दुसरा म्हणजे वर्षातून २-३ फेसबुक अपडेट देणारा ग्रुप.
       पहिल्या गटातले लोक मी नेहमी पाहतो. मी त्यांच्याशी निरुपद्रवी गोष्टी वगळता काही बोलू शकत नाही किंवा त्यांच्या नॉन-अभिमान, नॉन-आवेश मोड मध्ये काही गाणी,पुस्तके असं. कधीकधी मला वाटतं कि ह्या साऱ्यांना वसई रोड स्टेशनला विरार-अंधेरी लोकल ट्रेन मध्ये सोडावं. त्यांना ह्या गर्दीचाही अभिमान वाटेल काय? स्क्वेअर फुटामागे चिणून बसलेल्या गर्दीच्या आवाजावर, स्पर्शावर, तिच्या कोपऱ्या-कोपऱ्यात ओघळत येणाऱ्या विद्रूप तहानेवर ह्यांच्या कडे काही दार्शनिक तोडगा आहे काय? का हे प्रश्न इतिहासाच्या, सनातन संस्कृतीच्या जाज्वल्य पानांत तळटीप म्हणूनही नाहीत?
       बंदच करतो मी काही पाहणं. डिमांड-सप्लायच्या मूलभूत कोड्यात डोकं घालतो. मग मला प्रश्न पडतात, मॉडेल्सचे, गृहीतकांचे. माझे रफ कागद संपतात. माझ्या कामात अव्याहत चालू असलेली गाणी ऐकताना मध्ये पाकिस्तान कोक स्टुडीओची गाणी ऐकतो तेव्हा मला हा देशद्रोह आहे का नाही असा पेच पडत नाही. माझे शब्द, वाक्यं एडीट करतो. मी माझ्या डेटासाठी कोणतं टेक्निक वापरावं ह्याचा विचार करतो. माझं रिझनिंग, माझं अधिकाधिक अचूक लिहिणं, त्या लिहिण्याने एखाद्या आजवर न सुटलेल्या कोड्याची काहीतरी उकल होणं हा आनंद मला जाणवत जातो. मला प्रश्नही पडतो कि मी हा आनंद सोडून बाकी कशालाही डोक्यात जागाच का देतो. आपण सगळ्याकडे फक्त डेटा असंच बघायला हवं. मला विचार करणाऱ्या माणसाचा अपरिहार्य कोडगेपणा आल्यागत वाटतं. बाहेरचा सगळा राडा म्यूट झालेला माझा कोपरा.  
        माझा मेंदू थकतो. मी जॉगींगला बाहेर पडतो तेव्हा रस्त्याला जिकडे-तिकडे वाहनं फुटलेली असतात. पार्कात मित्राचे बाबा मला म्हणतात, आहे का कोणी ओळखीत आमच्या मुलाला, काही अट नाही, फक्त आपल्या जातीची हवी. मी ओशाळा होऊन पळतो, माझ्यावर त्यांनी लावलेला टॅग ओरबाडून काढायला बघत.
        तेव्हा मला परदेशस्थ लोकांचा दुसरा गट आठवतो. मला जाणवतं कि एक वाट आहे जिने गेलं कि ही उसनी, बिनकामाची तडफड थांबेल.
       मी माझं वय, माझा बँक बॅलन्स ह्याची त्रैराशिके मांडतो.

       माझ्या सभोवती वाहनांचे हॉर्न वाजत राहतात. मध्येच एक बलिष्ठ चारचाकीवाला भर रस्त्यात थांबतो, मागच्याला बुकलतो, बाकीचे हॉर्न वाजवत राहतात. पोस्टर्स फडफडतात. त्यावरचा ऐतिहासिक महापुरुष धीरोदात्त नजर लावून आकाशाकडे बघतो. मोर्च्यात जाण्यासाठीचा मोबाईल नंबर खाली दिलेला असतो.    

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...