Friday, January 15, 2016

इस्लाम, आय.एस. आणि पाकिस्तान ह्याबद्दलची ३ पुस्तके


       मी अमेरिकन लायब्ररीचा मेंबर होतो, जवळपास ११ वर्षांमागे तेव्हा तिथे दहशतवादावरच्या पुस्तकांचं एक आख्खं सेक्शन होतं. मी त्या सेक्शनला फार हात लावत नव्हतो. मुळात तेव्हा मला वाटायचं की काही लोक आहेत जे दहशतवादी आहेत आणि येन केन प्रकारेण त्यांना मारून टाकणं हे अगदी बरोबर आहे. लादेन हा त्यांचं म्होरक्या आहे आणि एका ठराविक धर्माच्या लोकच दहशतवादी असतात. गेले ते दिवस.
       ११ वर्षानंतर लादेन मारला गेलेला आहे, पण इस्लामिक स्टेट नावाचा प्रकार त्याहून भयंकर तबाही माजवतो आहे. हे दोघे वेगळे आहेत. देश, धर्म आणि आर्थिक उद्दिष्टे ह्या सगळ्याचा झांगडगुत्ता झालेला आहे. हे एवढं मला समजलेलं आहे.
       श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारी कृत्याची प्रेरणा हे मला कुतुहलाचे विषय वाटतात. अनेकदा बुद्धीजीवी माणसे श्रद्धाळू माणसांच्या गटाचे स्पष्टीकरण देताना श्रद्धाळू गटाचे नेते कसे भोंदू आहेत, कसे विसंगत आहेत आणि कसे त्यांच्या स्वार्थासाठी अन्य लोकांच्या श्रद्धेचा वापर करून घेत आहेत असे मॉडेल वापरतात. माझ्या मते हे तसे तोकडे स्पष्टीकरण आहे. बुद्धीणे विचार करणारा  हे श्रद्धा पटकन समजू शकत नाहीत आणि त्यातून येणारी कृतीची प्रेरणासुद्धा.
       असो. मला इथे ३ पुस्तकांचा उल्लेख करायचा आहे.
१.       The Shade of SwordsM.J.Akbar  
२.       The ISIS Apocalypse  - William McCants
३.       Pakistan: A Hard County – Anatol Lieven

The Shade of Swords ह्या पुस्तकात अकबर ह्यांनी इस्लामची स्थापना आणि पुढे त्याचा झालेला भौगोलिक आणि राजकीय विस्तार मांडलेला आहे. त्यांची भूमिका तटस्थ संशोधक अशी नसून बिलीव्हर अशीच आहे हे त्यांनी लपवलेलं नाही. पुस्तकाचे उपशीर्षक मुस्लीम आणि ख्रिश्चन ह्यांच्यातल्या संघर्षाचा, म्हणजे जिहादचा इतिहास असे आहे. २००३ मध्ये लिहिलेले हे पुस्तक तसे जुने आहे.
ISIS Apocalypse बद्दल मला एका ब्लॉगवर माहिती मिळाली. ह्या पुस्तकातळी जवळपास निम्मी पाने संदर्भ आणि स्पष्टीकरणे आहेत! इस्लाम मधील प्रोफेसीस( भाकिते) आणि इस्लामिक न्याय (hadud) ह्या दोन घटकांचे चांगले स्पष्टीकरण ह्या पुस्तकात आहे. अल-कैदा आणि इस्लामिक स्टेटमधला फरक, सिरियाची दुटप्पी भूमिका आणि क्रूर, हिंसक आणि कडवे असणे ही सुद्धा कशी व्हायेबल राजकीय/धार्मिक. जिहादी चाल असू शकते हे मुद्दे ह्या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
Pakistan: A Hard Country हे एक खास पुस्तक आहे. खरंतर भारतात अशा पुस्तकाबाबत बोलणं म्हणजे वहाबी हिंदूंचा राग ओढवून घेणं. पण पाकिस्तान काय आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्वाचे पुस्तक म्हणजे Pakistan: A Hard Country. पाकिस्तान सरकार (प्रामुख्याने पंजाबी राजकारणी), पाकिस्तान तालिबान आणि अफगाण तालिबान, पाकिस्तानी सैन्य, आय.एस.आय, बलुचिस्तान, सिंध इथले असंतुष्ट गट आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन आणि फेडरली अॅडमिनिस्ट्रेड ट्रायबल रिजन ह्यांचे प्रश्न आणि ह्या सगळ्याच्या वर गंभीर होत चाललेला लोकसंख्या आणि रिसोर्सेसचा प्रश्न अशा अनेक अंगांनी पाकिस्तान बद्दल हे पुस्तक स्पष्टीकरण देते.      

      ही तीन पुस्तके संपूर्ण स्पष्टता देतील असे नाही. पण अनेकदा सोप्या भडकाऊ थिअरीमध्ये आपण महत्वाचे पॅटर्न विसरून जातो. फाळणीबद्दल व्हिलन ठरवायची अहमहमिका असताना ‘थॉटस ऑन पाकिस्तान’ ची स्पष्ट मांडणी लक्षात राहते.
       पाकिस्तान आणि इस्लामिक दहशतवादाचे प्रश्न हे दीर्घकाळ चालणार आहेत. आणि त्यामुळे अशी काहीतरी कृती असेल ज्यामुळे एका दमात हा प्रश्न सुटेल ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे कुठल्याही देशाला दीर्घकालीन उपाययोजना आखावी लागणार आहे. ही उपाययोजना करताना आपल्या समोरच्या प्रश्नांचे कंटिन्युअस अॅनालिसिस करत रहावे लागणार आहे. आणि कॅरट आणि स्टिक ह्या दोन्ही गोष्टी वापराव्या लागणार आहेत. त्यामुळे थंड डोक्याने होणारा रिसर्चला पर्याय नाही.

       एका कॉलमात सर्व प्रश्नांची उत्तरे द्या अशा आजच्या स्पर्धेत शेकडो संदर्भ, बरीच वर्षे आणि अपूर्ण उत्तरे अशा लिखाणाची आवड आपल्याला उरो.   

फसके आणि फसवे प्रयत्न

१.       ‘वझीर’ बघणं ही एक disappointment ठरली. अगदी सुरुवातीपासूनच चित्रपट प्रेडिक्टेबल बनला. अर्थात इथे मी अनेक देशी-विदेशी चित्रपट बघतो ही बाब आहेच. हा बेनिफिट ऑफ डाउट ‘वझीर’ ला द्यायला हवा की अनेक प्रामुख्याने हिंदी चित्रपट बघणाऱ्या, किंवा नव्या चित्रपट प्रेक्षकांना ‘वझीर’ अधिक आवडू शकतो. मला स्वतःला नंबियारचे आधीचे ‘डेव्हिड’ आणि ‘शैतान’ आवडले होते. त्यामुळे मला ‘वझीर’ चा भुसभुशीतपणा अधिक जाणवला.
फरहान अख्तरचं काम मला आवडलं. अमिताभचा एकूणच प्रकार थोडा ओव्हर-रेटेड वाटतो. ऑन डिमांड खलपुरुष, जे थोडसं ‘डेव्हिड’ मध्येही होतं, ते इथे अति होतंय.   
ह्याच प्रकारात मग ‘तलाश’ बरा होता. Uncertain character तिथे अधिक चांगल्या प्रकाराने हाताळलं गेलं होतं.
‘वझीर’ बघताना मला ‘The Illusionist’आठवत होता, विशेषतः शेवटच्या प्रसंगात.
शतरंज, प्यादा वगैरे उगाचच. इन ऑल, पैसे वाया जाणार नाहीत, रिटर्न ऑन मनी, नाही!
2  २.  १४ जानेवारी हा पानिपतच्या लढाईचा स्मरणदिन असतो असं मला फेसबुकवर लोकांचे अपडेट्स पहात कळलं. मग कळलं की पानिपत हे मराठ्यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आहे!

‘कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पानिपती॥

आज 255 वर्षा पुर्वी सबंध महाराष्ट्र हिंदुस्थानच्या रक्षणासाठी पानिपतावर कंबर कसुन उभा होता.हिंदुस्थानच्या रक्षनासाठी असंख्य यातनांना सोसत,सहन करत मरण पत्करणार्या त्या दत्तोजींना,जनकोजींना, तिर्थरुप भाऊसाहेबांना,विश्वासरावांना,समशेरबहाद्दरांना,इब्राहीम खानांना आणि तमाम रांगड्या मराठी विरांना आठवतांना नकळत डोळ्यांच्या कडा पाणावतात..हिंदुस्थानच्या स्वातंञ्याच्या यज्ञात मराठ्यांची समीधा झाली नसती तर आम्ही कोणते दिवस पाहीले असते .....???
पाऩिपतावर धारातीर्थी पडलेल्या तमाम रांगड्या मराठी विरांना पाणावलेल्या डोळ्यांनी प्रणाम करतो ....’
(फेसबुक वरील रत्ने)

बाकी २ हिरे, मोती, माणिके आणि नाणी हे परत आलंच. परत काही जणांना जातीचे उमाळे वगैरेसुद्धा आलेले होते.
मला स्वतःला ह्या घटनेशी माझ्या आत्ताच्या अवस्थेचा काहीही कनेक्ट जाणवत नाही. राष्ट्र आणि लोकशाही/मध्यवर्ती शासन ह्या दोन गोष्टी नसताना घडलेल्या ह्या घटनांचे परिणाम नंतरच्या इंग्रजी कालखंडाने पुसून टाकलेले आहेत.
इतिहासाचे उमाळे हा अगदी शहाण्या-सुरत्या भासणाऱ्या लोकांच्या अगदी नाजूक जागचा असल्यासारखा विषय असतो. आपल्या सोशल डिस्कशनमधून ऐतिहासिक (कट्टा)वाद कमीत कमी करणं आणि त्याजागी डेटाआधरित लॉजिकल ऐहिक डिबेट वाढवणं हे करण्याची गरज आहे. पुराव्याच्या आधारे हायपोथेसिस मांडणं आणि त्याची सिद्धता देणं अशा अर्थाचे ऐतिहासिक संशोधन सोडून आपण इतिहासाला नुसता हर हर महादेव प्रकार किंवा प्रेरणा-कोकेन किंवा सूडकथा ह्या प्रकारांत घेतो. आणि फेसबुक अनेकांना इतिहासाची व्हायग्रा वाटतच असते.
हा फसवा, प्लेसिबो प्रकार आहे. पानिपत किंवा भीमा-कोरेगाव किंवा अजून कुठली, अभिमान म्हणून नैसर्गिकपणे उचललेल्या ह्या रेषा पुढे द्वेषाची सीमा ठरवणार.
    ३.  ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘ ’मराठी भाषा आणि तंत्रज्ञान’ – मराठी भाषेतून विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयी साहित्य निर्मिती’ अशी
परिचर्चा होणार आहे. अध्यक्ष आहेत –डॉ. विजय भटकर! आणि सहभाग आहे, - प्रा. मोहनराव आपटे, श्री.अच्युत गोडबोले आणि बाकीचे लोक ज्यांची नावे मी ऐकलेली नाहीत.
मोहन आपटे (माहित नाही त्यांना राव का म्हटलं आहे पोस्टरमध्ये. बहुतेक आयोजक त्या ‘मोहनरावांचे’ भक्त असावेत!!) ह्यांची पुस्तके मी शाळेत असताना वाचली होती. आणि मराठी माध्यमाट असल्याने एका अर्थाने मला इंग्रजीत असलेले पर्याय (सुपिरियर) वापरता येत नव्हते. आपटेंच्या पुस्तकांनी मला विस्मयचकित व्हायला मदत केलेली. नारळीकर, बाळ फोंडके आणि निरंजन घाटे ही अन्य नावे.
चांगली बौद्धिक क्षमता असलेले पालक, चांगली आर्थिक अवस्था आणि बौद्धिक क्षमता असलेले विद्यार्थी हे प्रामुख्याने इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. मराठी शाळातील enrolment घटते आहे आणि ज्या शाळांची नसेल त्यांची होऊ लागेल. ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की मराठी भाषा मरणार वगैरे आहे. पण मराठी भाषेच्या काही अंगांवर तिचा परिणाम जरूर होणार आहे. पुस्तकांचे वाचक आणि लेखक ही ती दोन अंगे असतील असं मला वाटतं. त्यात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक मराठी लेखनाला’ काय अवकाश राहील हे माझे कुतूहल आहे.
माहिती देणारे आणि सायन्स फिक्शन असे दोन्ही प्रकारचे लिखाण इंग्रजीत अधिक क्वालिटीचे उपलब्ध आहे. इथे मराठीला थिटे पाडण्याचा मुद्दा नाही. हा सरळ सांख्यिक प्रकार आहे. लिहायची क्षमता आणि विषयाचे आकलन असे दोन्ही असलेले लोक निवडताना इंग्रजीत ते काही हजारांतून असतील तर मराठीत काही शेमधून(?). दुसरं म्हणजे आर्थिक मुआवजा.
व्हिज्युअल मिडियाच्या घोडदौडीने मुळातच वाचक कमी झाले असावेत (सर्व भाषांत) असा माझा कयास आहे. ब्रॉडबँड युगात व्हिजुअल मिडिया सर्वत्र पोचतो आहे. मराठीवरही हे परिणाम होत असणार.
ठीके. तरीही मी ह्या परीचर्चेला थोडं सिरीयसली घेतलं असतं. पण त्यातल्या नावांनी मला एकूणच हा प्रकार बोलाची कढी वाटतो आहे.
ऑन दॅट नोट, मला डॉ. अतुल गावंडे ह्यांचं ‘बीइंग मोर्टल’ आठवतं आहे. मी लेखकाच्या नावाने बनवलेल्या गेसपेक्षा तो वेगळाच निघाला. सायन्स आणि सामाजिक ह्यांना जोडणारं लिखाण ह्याचा उत्कृष्ट नमुना आहे त्यांचं लिखाण.                   

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...