Saturday, December 27, 2014

वूल्फ टोटेम

      टोटेम शब्द मी ऐकला तो नोलानच्या ‘इंसेप्शन’ मध्ये. वूल्फ टोटेम बद्दल मी वाचलं ते मॅन एशिया पुरस्काराच्या यादीत. वूल्फ टोटेमला २००७ चा मॅन एशिया पुरस्कार मिळाला होता. अर्थात भारताच्या बाहेरच्या भूगोलावर असलेली कादंबरी वाचताना मी थोडा साशंक असतोच. कारण माझ्या आत डोळे मिचाकावाणाऱ्या प्रश्नार्थक क्रिटिकला लागणारी फारशी माहिती माझ्याकडे नसते. आणि चांगल्या स्टोरी-टेलरने आपल्याला गुंगवून टाकणं हे मला ‘सॉंग ऑफ आईस अँड फायर’ साठी आवडत असलं तरी वास्तवाने प्रेरित फिक्शनसाठी नाही. मी फिक्शन वाचतो कारण जगातील माणसे कशी वागतात हे मला बघायचं असतं आणि त्यामुळे फिक्शन मला जे सांगतीये त्याबद्दल थोडं फार काही ठाऊक असेल तर क्रिटिकचा तळीराम थोडा शांत राहतो.
      पण वूल्फ टोटेम काय आहे हे सांगणारा जाहिरातवजा मजकूर वाचताना त्यात मंगोलिया नावाचा भाग असणार आहे, वूल्फ असणार आहेत आणि प्रदीर्घ आणि खोलवर थंड हिवाळे असणार आहेत आणि कादंबरी जवळपास ८०० पानांची आहे ह्या सगळ्या घटकांनी मी ती विकत घेतली. वूल्फ, हिवाळे आणि लांबलचक कादंबरी ह्याची चटक मला ‘सॉंग ऑफ आईस अँड फायर’ वाचताना लागली. सो अशा नशिल्या आनंदाचा अनुभव परत मिळतोय का (संस्कृत शब्द पुनर्प्रत्यय वापरायचा मोह होतो आहे मला!) हे पाहायला सुद्धा मी वूल्फ टोटेम घेतली.
      ग्रीपिंग स्टोरी- नाही
      तपशिलांची खोली- होय
      पात्रांना डेप्थ- नाही
      कादंबरी एखादा बेसिक फिलोसॉफीकल प्रश्न एक्स्प्लोअर करते का- होय
      असं करताना ती शैक्षणिक होते का- डिपेंडस, थोडीफार
      कादंबरीचा वाचताना मला ‘पाडस’ ची आठवण येत राहिली. पण वूल्फ टोटेमची स्केल, निखळ लांबी ह्या अर्थाने आणि त्यात काय सांगायला बघितलं आहे ह्या अर्थानेही फार जास्त आहे. एका प्रकारे एका अटळ विनाशाची, हजारो वर्षे टिकण्याच्या आणि एकदम विस्मृतीच्या आणि सोय-सवय ह्यांच्या ताकदवान प्रवाहाच्याखाली गडप होण्याची ही गोष्ट आहे. कोण गडप होतंय? तर त्याची अनेक उत्तरे कादंबरीत आहेत. थोडं संस्कृती रक्षकांना गोड गुदगुल्या होतील अशा शब्दात म्हणायचं झालं तर जगण्याची एक वेगळी पद्धत, वेगळी तऱ्हा, वेगळं तर्कशास्त्र असू शकतं हे सांगण्याचा एक दमदार प्रयत्न वूल्फ टोटेम आहे. अर्थात हा तात्विक निर्मितीचा प्रयत्न नसून फिक्शनचा रस्ता असल्याने आपलं सांगणं एका सुसंगत वाटू शकणाऱ्या शेवटला नेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरती त्यात आहेत. काही वेळेला अशा कसरती आणि त्या पाठी काही मुद्दामून जास्त ठळक किंवा गायब करायचा प्रयत्न खटकतो सुद्धा. पण कादंबरीची वाचनीयता फार ढासळत नाही आणि ठराविक वेळाने ती वेग पकडत राहते. कादंबरीत फार पात्रे नाहीत आणि आहेत त्यांच्याही साऱ्या मिती एक्स्प्लोअर झालेल्या नाहीत. पण असं म्हणता येईल कि कादंबरीमध्ये खरं मुख्य पात्र आहे ते म्हणजे वूल्फ ज्याच्या शीर्षस्थानी आहे तो जैविक पिरामिड किंवा ती सिस्टीम. आणि त्याला एक्स्प्लोअर करण्यात लेखक कमी पडत नाही.
      स्वतःचे टिकायचे आणि सिस्टीम मधल्या साऱ्यांना टिकायाची पुरेशी संधी मिळायचे स्वतःचे असे लॉजिक असलेली जीवनपद्धती हा लेखकाला द्यायचा धडा आहे. काहीवेळा फार बटबटीत पद्धतीने तो ह्या धड्यातील तात्पर्ये वाचकाच्या गळी उतरवू पाहतो. पण त्याची हे वेगळं लॉजिक उलगडून सांगण्याची अॅम्बिशन जबरी आहे. आणि ती केवळ सायन्स किंवा तर्काच्या रटाळ रस्त्याने येत नाही. ती मध्येच मिस्टिक होते. त्याची एक वेगळी चव कादंबरीला आहे.
--
      सेन्स ऑफ लॉस आणि लॉंगिंग फॉर द पास्ट ह्या दोन गोष्टीत लिखाणात खूप येतात. हा आपण राहतो त्या काळाचा अपरिहार्य साईड इफेक्ट आहे का? आपल्यावर प्रचंड बदलाने आदळणाऱ्या इनोव्हेशन्सना आपली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे कि आपण सेन्स ऑफ लॉस आणि लॉंगिंग फॉर द पास्ट अधिकाधिक तीव्रतेने फील करायला बघतो आहोत? माहित नाही. पण काळ आणि काळाची घडण बदलत असली तरी माणूस म्हणून आपलं काही कायम, स्थिर आहे का? आपल्या जाणिवांच्यामध्ये, त्यात आपण जी सुख-दुःखे उपभोगतो त्यात तळाला माणसाचं म्हणून बेसिक काही आहे का? दुःख, भावनांच्या स्तरावरचं दुःख हेच आपलं व्यवच्छेदक लक्षण आहे का असं दुःख ज्याने निर्माण होतं ती सभोवतालाला, त्यातल्या जिवंत-अजिवंत वस्तूंना जोडले जाण्याची आणि मग काळाच्या एखाद्या टोकदार प्रवाहाने त्यापासून तुटण्याची प्रक्रिया? आणि आपल्यात सरतेशेवटी हे दुःखच उरू शकतं म्हणून आपण एकतर ते नाकारायचा किंवा ते आपल्या भवतालात ट्रान्समिट करून आपलं वैयक्तिक रडं एका सामूहिक कोलाहालाचा भाग करण्याचा प्रयत्न करतो का? का म्हणून मला असं वाटतं कि साऱ्या गोष्टी शेवटी जीवघेणं होऊ पाहणारं दुःख आणि तरीही त्यातून पुढे पुढे सरकण्याच्या अनिवार दाबाने जगत राहणारी माणसे ह्यांच्याचबद्दल बोलतात?
      वूल्फ टोटेम असले प्रश्न डील करत नाही. वरच्या प्रश्नांच्या वेटाळाकडे ती बघतपण नाही. कदाचित म्हणून तिला पंकज मिश्रा साहेबांनी शैक्षणिक कादंबरी म्हटलं आहे.
--
      चीनबद्दल मी अजून एक पुस्तक वाचलं ते म्हणजे ‘रेस्टलेस एम्पायर: चायना अँड द वर्ल्ड सिन्स १७५०’. ऐतिहासिक असलं तरी खूप चांगला फ्लो असलेलं हे पुस्तक आहे आणि पुस्तकाच्या शेवटी मोजके आणि नीट क्लासिफाय केलेले फर्दर रीडिंगचे रेफरन्स आहेत.
      एक मजेची गोष्ट अशी आहे कि ‘वूल्फ टोटेम’ आणि ‘रेस्टलेस एम्पायर’ दोन्ही मध्ये आपण कोण आहोत (मी नाही, आपण, आपण) ह्या प्रश्नांना फार जागा आहे. रेस्टलेस एम्पायर’ मध्ये तर म्हटलं आहे कि चायनीज म्हणजे नेमकं काय असू शकतं ह्याचा शोध आणि असं काही वेगळं असण्याची प्रेरणा आणि त्याच्या सोबत येणारा पश्चिमेची म्हणजे प्रामुख्याने अमेरिकेन गोष्टींबद्दल साशंकता आणि त्याचवेळी त्या अनुभवण्याची असोशी ह्या फोर्सेस चीन मध्ये जे घडलं आणि घडतं आहे त्यात फंडामेंटल आहेत.
      आपण भारतीय आहोत म्हणजे कोण आहोत हा प्रश्न भारतातल्या कशा-कशातून पडतो? कुठल्या चित्रपटातून किंवा कुठल्या कादंबरीमधून? असं झालंय का कि इथल्या लेखक-कलाकार वर्गाने वसाहतवादातून थेट व्यक्तीकेंद्रित अनुभवांच्या सादरी/प्रकटीकरणावर उडी घेतली आहे आणि त्याच्या मधली आपणची एक कडी मिसिंग आहे? का मिसिंग आहे, कारण माझ्या व्यक्ती म्हणून जगण्यात देश ह्या आपणचा घटक म्हणून काहीही न द्यावं लागताही (म्हणजे संधी, वेळ, क्षमता) मी व्यक्ती म्हणून काही बेअर मिनिमम नियम सांभाळून राहू शकतो? किंवा माझ्या पूर्वजांना कधी देश म्हणून स्वतःला डीफाइन करण्याची किंवा त्याचा घटक असण्याची काही किंमत मोजण्याची वेळ आलीच नाही?
      तसे हे ढोबळ आणि म्हटले तर फार ऱ्हेटोरिकल प्रश्न आहेत. आणि व्यक्तिवादी चष्म्यातून पाहिलं तर देश किंवा समाज नावाच्या आयडेंटीटीजकडे कृत्रिम, सोयीच्या उभारण्या म्हणून पाहता येतं. आणि त्या कृत्रिम आहेत ह्या कारणाने त्यांच्याबद्दल माणसांना वाटणारे प्रश्न फार फोकस होत नाहीत, तर ह्या कृत्रिम सिस्टिम्स माणसांना व्यक्ती म्हणून जगायला कशा अडकाव करतात हे सतत येत राहतं.
      मी असं म्हणत नाहीये व्यक्ती हे कला, सामाजिक संशोधन, पॉलिसी डिबेट ह्याच्यातून मानवी जीवनाबद्दल घडणाऱ्या अभ्यासाचं बेसिक युनिट नाहीये. मला फक्त माझं (अपुरं आणि बदलू शकणारं) निरीक्षण नोंदवायचं आहे कि मी ज्या भाषांमध्ये पला-बडा झालो आहे त्यात कलेक्टीव्ह आयडेंटिटी आणि सिस्टीम फार एक्स्प्लोअर झाल्या नाहीयेत. (‘रौंदाळा’ अजून पूर्ण वाचलेलं नाही.) सेन्स ऑफ लॉस आणि लॉंगिंग फॉर द पास्ट आहे, पण त्यात व्यक्ती जास्त आहे. असं का?
      पंकज मिश्रा त्यांच्या वूल्फ टोटेमच्या क्रिटीकल बुक रिव्ह्यू मध्ये म्हणतात कि १९५० पासून, म्हणजे चीन आधुनिक राजकीय अस्तित्व बनण्याच्या सुरुवातीच्या काळापासून तिथल्या लेखकांनी चायनीज म्हणजे काय हा प्रश्न धसास लावून शोधला. ते भूत त्यांच्या मानगुटीवर आजतागायत आहे. ‘रेस्टलेस एम्पायर’ मध्ये लेखक म्हणतो कि आधीच्या हान साम्राज्याच्या अभिनिवेशी आठवणी आणि परकीय सत्तांच्या आर्थिक आणि राजकीय वर्चस्वाच्या प्रयोगांच्या नकोश्या आठवणी ह्या गोष्टी चीनच्या नेतृत्वाने वारंवार इनव्होक केल्या आहेत.
      प्रश्नांची हि जंत्री मी समरीवजा काही प्रश्न देऊन थांबवतो:
१.      राजकीय नेतृत्वावर असणाऱ्या प्रभावांचा त्या राजकीय युनिट मध्ये असणाऱ्या व्यक्तीवर केवढा परिणाम होतो? त्या राजकीय एककात बनणाऱ्या कलेवर किती परिणाम होतो?
२.      सामूहिक आयडेंटिटी आणि व्यक्ती ह्यांच्यातल्या भावनिक बंधाकडे मराठी, भारतीय इंग्लिश साहित्य फार कमी बघतं का? असं असेल तर का? (काही पूर्ण/थोडे अपवाद अजून आठवतात: सुनील खिलनानी ह्यांचं ‘आयडिया ऑफ इंडिया’, साता उत्तरांची कहाणी)
--
एनी वे, वूल्फ टोटेमने आलेले हे प्रश्न. वूल्फ टोटेममध्ये ‘लिटल वूल्फ’ आहे. आणि त्याची गोष्ट निखळ, एका अजून पुरत्या भाजल्या न गेलेल्या माणसाची आहे. बाकी सगळ्या धबडग्यापेक्षा ती जास्त रुतल्यासारखी आहे.
   निष्पापपणाचा, निरागसपणाचा, त्यातून येणाऱ्या प्युअर मॅडनेसचा माणूस हेवा आणि पाठलाग का करतो- एकतर त्याच्या हातून केव्हातरी हा इनोसन्स मारला गेलेला असतो त्या गिल्टने म्हणून किंवा त्याच्या आत असा इनोसन्स अगोदरच खुडून टाकलेला असल्याने बनलेल्या रिकामेपणाची स्वाभाविक परिणीती म्हणून?

   ‘फ्रीडम ऑर डेथ’ च्या प्रश्नाला आणि ‘लिटल वूल्फ’ ला..             

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...