Friday, February 28, 2014

शिळी कढी आणि रिकामचोट टाहो

      टाहो फोडणं हा आपला आवडीचा उद्योग आहे, किंबहुना जन्मजात जोपासलेली सवय. आणि एकाने फोडला की त्याला जोड देणारे टाहो किंवा त्याचा कसा फोल असा टाहो फोडणं हा पण. आणि असे टाहो फोडून जीव सुकला की त्याला अभिमान किंवा तत्सम थोर गोष्टींची कलमे लावणे. तर अशा आपल्या रुढीला अनुसरून आपण आज मराठी भाषेविषयी टाहो फोडूया आणि सरतेशेवटी अभिमान वगैरे व्यक्त करून आपापल्या वाटेला लागुया.
       तर काल रात्री मराठी भाषा माझ्या स्वप्नात आली. मी उशाशी किंडल ठेवून झोपतो. आणि त्यात एक इंग्लिश पुस्तक वाचत झोपलो होतो. तिने आधी मला थोबाडीत मारली आणि मग तिने टाहो फोडला. सकाळी उठून पाहतो तर ह्या दृष्टान्ताशी जुळणारे काही पेपरात, फेसबूकात.  
       मग तर मी अख्खा थरकापलो. म्हणजे एवढं आध्यात्मिक वगैरे पोटेन्शिअल असलेली भाषा आणि ती अशी दुःखी. अरं, रं, रं. आणि का तर म्हणे ती मृतप्राय होत आहे, इंग्लिश का इंग्रजी का आंग्ल भाषा तिच्यावर चहू बाजूने आक्रमण करून राहिली. लहान-लहान मुले इंग्रजी माध्यमात जाऊन राहिली. आणि ही लहान मुले पुढे मराठी कशी बोलतील ह्या विवंचनेने ही भाषा आज मरू लागली. टाहो, टाहो, थोर टाहो.
       छोट्या छोट्या शहरात इंग्लिश स्पिकिंग येऊन राहिलं. बीजगणित-भूमिती जाऊन अल्जिब्रा- जॉमेट्री आलं. आता कसं ह्या भाषेत संशोधन होणार? अमृताशी पैजा घेणारी ही भाषा, आता सोलकढी आणि मसाला ताकावर तरी पैजा घेईल का? टाहो, टाहो.
       एवढे सगळे टाहो अंगावर घेऊन मी बेभान इतस्ततः पळू लागलो. आणि रस्त्यावर आलो. तिथे रिक्षावाले हिंदी बोलून राहिले, भाजीवाले हिंदी बोलून राहिले, ऑफिसात इंग्रजी. मराठी कुठे, मराठी कुठे?
       मराठी दुबईत, मराठी कॅलिफोर्नियामध्ये, मराठी विले-पार्ले मध्ये, मराठी सदाशिव पेठेत. अशी कशी आकुंचन पावली ही बहुप्रसवा, प्रसरणशील भाषा. अशी कशी लोपू लागली ही संस्कृतोद्भव आणि प्राकृतोत्सव प्राचीन भाषा?
       आता तर माझी पुरती सटकली आणि मी नंगा होऊन सरकार समोर उभा राहिलो. अरे भिकारड्या, का तू अशी तुझ्या आईची दैना करतो असा आक्रस्ताळा आक्रोश करू लागलो. सरकार शरमिंदे होऊ लागले, त्याचा जीव कासावीस झाला, अरे इथे पाणी पुरेना, वीज टिकेना, शेती होईना, उद्योग चालेना, आणि हे तू कुठे नवे गाऱ्हाणे आणतो राजा.
       कुठे जायचं आता? मायबाप सरकारने असे बोलून लाथ मारली. आता कुठे, आता कुठे?
       तेवढयात कोणीतरी माझ्या अंगावर घोंगडी टाकली आणि मला बलदंड उचलून, माझा श्वास कोंडेस्तोवर उचलून एक कोपऱ्यात आणून टाकले. मी बेशुद्ध होतात्से शेवटचा चेहरा पाहिला तर तो मराठी चित्रपट निर्माता वाटू लागला. बेहोश.
---
       माझी बायको मला गदागदा हलवून उठवत होती. तिचा भयचकित चेहरा पाहिला आणि मग आजूबाजूला पाहिलं तर मी रातोरात टेबलावर येऊन हे सगळं वरचं खरडून ठेवलेलं. तिने पाणी आणलं. मला शब्द फुटेना, माझी मराठी भाषा माझ्या तोंडातून वदली जाईना. बायकोने लिहिलेलं सगळं वाचलं आणि फाडून फेकून दिलं. मग म्हणाली, दूध आण, कॉफी करू.
--
       कॉफी प्यायली, नाश्ता केला आणि भाषेच्या सखोल विवंचनेत बाहेर पडलो. मध्ये एक मित्र भेटला, फिजिक्स पी एच. डी. ,आत्ताच लघुरुद्र आटपून आलो घरी, चल चहा घेऊ.
       मी त्याला माझे स्वप्न सांगितले, तर म्हटला अरे मलाही काल असेच स्वप्न पडले. पण त्यात मराठी भाषा येऊन म्हटली की उद्या तुला तुझा रड्या मित्र भेटेल, लक्ष देऊ नको, त्यापेक्षा मॉलमध्ये जा, मराठी पिक्चर बघ.
       टू मच. थट्टा करू नकोस.
       चल मी निघतो. शो आहे ११.३० चा.
--
       मी दिग्मूढ तिथेच थांबलो. तो अजून एक मित्र आला. हा मराठी सिरीयलची कामं करतो. तो म्हणाला दोन नव्या असाइनमेन्ट आहेत, बीटा मराठी नावाचा चॅनेल येतोय, आणि ते दोन नव्या अतिमालिका आणतायेत. अतिमालिका, काय हे? हो अरे, दर अर्ध्या तासाने भाग. आणि मधल्या अर्ध्या तासात? म्हणून तर दोन आहेत ना अतिमालिका, च्युत्या आहे रे तू, म्हणून तो परत हसला.
----
         नाही, नाही, असं भरसट उपयोगाचं नाही. थोडं चिंतनपर झालं पाहिजे. उत्तरे नसलेले खोल प्रश्न खेळवले पाहिजेत.
       सरकार मराठी भाषेसाठी काय करतं किंवा करत नाही? त्या खालचा प्रश्न, सरकारने भाषेसाठी वगैरे काही करायचं असतं का?
       हे सगळं कोण म्हणत असतं? ह्या विवंचना कोणाच्या? ते जे कोण लिहिणारे असतात ते किंवा रिकामचोट पेन्शनर. कदाचित ते लिहून फार श्रीमंत होत नाहीत ह्याची खुजली ते भाषेसाठी रडं मांडून करत असावेत. खवचट झालं थोडं, नव्हे पूर्णच. पण ह्यातले बहुतेक लोक सरकारी नोकऱ्यांत किंवा सरकारी पैशाने चालणाऱ्या उपजीविकेत का असतात? जसा मी. गर्दुले, हॉटेल चालवणारे, पार्टटाईम नोकऱ्या करून लिहिणारे, गुंडाई करणारे मराठीत पुस्तकं छापत असतील ती कुठे मिळतात?
       भाषा आणि साहित्य ह्यांचा एकमेकांशी काय संबंध? भाषा आणि लिपी ह्यांचा? भाषा आणि एक्स्प्रेशन्स ह्यांचा? माणसांनी एकमेकांशी बोलणं, सांगणं, भौतिक आणि मानसिक समाधान मिळवणं ह्यापलीकडे भाषेचं पर्पज काय? आणि मग ह्या समाधानाची साधने कमी-जास्त प्रमाणात कालबाह्य होतात, जसे हातपंखे, मेणबत्या, बोरूची लेखणी, भूर्जपत्रे, दगडी हत्यारे, मण्यांची पाटी, चाळी, वाडे तर भाषा का नाही? भाषेला आयडेन्टिटी म्हणून बघणं आणि त्याचवेळी अशा आयडेंटिटीच्या, म्हणजे जात, धर्म, देश अशा प्रकारांकडे साहित्यातून नकारात्मक बघणं हा दुटप्पीपणा नाही का? एकीकडे लिहिण्याला कमोडिटीजचे नियम लावायला धडपड करायची, त्याचं मार्केट हवं असं म्हणायचं आणि त्याचवेळी सरकारने ह्या कमोडीटीच्या उत्पादकांना गोंजारत राहावं असं गाऱ्हाणं करायचं, पण असं मागू किंवा करू पाहणाऱ्या बाकी जगाकडे कुत्सित तात्विक हिनतेचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नजरिया ठेवायचा हा दुटप्पीपणा नाही का? का हे स्वातंत्र्य? मग भाषेला मारायचं किंवा हवं तसं तिचा वापर करायचं किंवा न करायचं हजारो-लाखो लोकांचं स्वातंत्र्य आहे ते?
       मला दिसतं की माझ्या लेखी शब्द, भाषेचे नियम हे केवळ माध्यम आणि साधन आहे, मला जे सांगायचं आहे त्या एंडसाठी. त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेवर आणि मला सांगून काय करायचं आहे त्याच्यावर माझं माध्यम आणि साधन ह्यांचा वापर अवलंबून राहील. माध्यम-साधन जपावं असा भावनिक च्युत्यापा हा सगळ्यांनी करावा ह्या टाहो फोडण्याला काय म्हणणार? का दुर्लक्ष करणार?
--
       मला स्वतःला इंग्लिश आणि मराठी ही इनकॉम्पॅटिबल निवड वाटते, म्हणजे मला एक्सप्रेस करण्याच्या दृष्टीने. मी जेव्हा सतत मराठीत लिहितो, तेव्हा स्वाभाविक माझ्या डोक्यातला त्याबद्दलचा विचार, त्यातल्या प्रतिमांमध्ये वापरली जाणारी भाषा ही मराठीच राहते. पण गणित, इकोनॉमिक्स ह्या विषयांच्या बाबतीत माझे विचारच मुळात इंग्लिशमध्ये होतात, ते मराठीतून मी करूच शकत नाही, जरी शाळेत मी हे विषय मुळात मराठीत शिकलो आहे. मुद्दा असा आहे की आपले मेंटल रीसोर्स मर्यादित आहेत, आणि मग ते कुठे द्यावेत ह्याची निवड आपण केली पाहिजे. आणि जर ते आपण कमी भौतिक रिटर्न्स देणाऱ्या ठिकाणी टाकू इच्छित असू, तर त्यासाठी लागणारी तयारी ही डिसिजन घेणाऱ्या माणसांत हवी. आणि ज्यांत ती नसेल, ते आपले रीसोर्स स्वाभाविकपणे अधिक भौतिक रिटर्न्स देणाऱ्या ठिकाणी टाकणार, ही एक रॅशनल निवड आहे. हे सगळं रीझनिंग अर्धवट झालं आहे, पण मला कोणी विचारलं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकू मुलाला का मराठी तर मी इंग्रजी सांगेन.
       मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असलेले विद्यार्थी मराठी उरत नाहीत हा हायपोथिसिसच एक जोक आहे. आई-वडील घरात काय करतात, बोलतात, वाचतात ह्यावरून मुलाच्या भाषिक आवडी-निवडी ठरतात असं मला वाटतं. शाळेची निवड ही भाषा, आत्म्याचा विकास, मूल्यशिक्षण, संस्कृती अशा जड ओझ्यांनी न करता उपजीविकेचे उत्तम प्रशिक्षण एवढ्या एकाच उद्देशाने करावी, उपजीविका उत्तम असली की बाकी साऱ्या दगडांना शेंदूर लावता येतो, नुसते दगड कोणालाच पावत नाहीत.
       मराठीचा टाहो फोडताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर शरसंधान करणारे लोक काही दिवसांनी ‘भाषिक लव्ह जिहाद’ बद्दलही बोलतील. मग, तेही आपण दुर्लक्षून घेऊ.
--
       मराठीत सारस्वत किंवा साहित्यिक वर्तुळात (खाजखुजली वर्तुळ म्हणावं असं मला वाटतंय, पण त्यात माझा केवळ द्वेषाचा भाग असेल) नामवंत होऊ घातलेल्या एका माणसाशी बोलताना त्याने अशी सांख्यिक तुलना केली की मराठी भाषिक अमुक एक करोड आहेत, त्यात वाचनालयांचे सभासद किती, त्यातून एका पुस्तकाच्या किती प्रति विकल्या जाऊ शकतात असा सगळा अंदाज बांधला होता. हा प्रश्न माझ्या डोक्यात राहिला, की करोडो लोक कशी-बशी किंवा चांगली जी भाषा बोलतात त्यात वाचणारे किती, कोण.
       एका राष्ट्रीय इन्स्टिट्यूटमध्ये शिकताना, सायन्स, एम,बी,ए. नाही, तर इकोनॉमिक्स, मी एकटाच होतो जो १०वी पर्यंत पूर्णपणे प्रादेशिक माध्यमात शिकला आहे (व्हर्नाक्युलर). मला माझ्या इंग्रजीवर पूर्ण कमांड नसल्याचा त्रास दोनदा झाला, एकदा आय.आय.एम. चे जी.डी. देताना (आता ते बंद झालेत L) आणि नंतर अॅनॅलिटिक्स मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे इंटरव्ह्यू देताना जेव्हा थोडे सेल्फ एक्स्प्रेशन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. माझ्याकडे शब्द असले तरी उच्चार आणि युसेज ह्या दोन गोष्टीत इंग्रजीमध्ये मी कच्चा आहे. आणि मला वाटतं ह्याचं कारण माझी निवड आहे. मी इंग्रजीवर फोकस करेन, तर मी मराठीवरची ग्रीप सोडेन आणि जर मला मराठीत लवचिकपणे, हवं तसं लिहायचं आहे तर आपोआप माझा फोकस इंग्रजी वरून हटेल. मला दुसरी भाषा कळणार नाही असं नाही, पण माझी एक्स्प्रेशनची भाषा एकावेळी एकच राहू शकते, जरी चालून जाण्याइतपत कोणी कितीही भाषा बोलू शकेल. कदाचित ही माझी लिमिटेशन आहे. पण मला कायम हा कमांडचा इश्यू जाणवला आहे. माझे काही बंगाली मित्र आहेत, ते बंगाली व्यवस्थित बोलतात, पण त्यांची बेस्ट एक्स्प्रेशन्स ते इंग्लिश मध्येच देऊ शकतात. कदाचित त्यांचा नजरिया डेव्हलप होण्यात मुख्य आधार इंग्लिश पुस्तके, सिनेमे, वृत्तपत्रे, शिक्षक हा असेल, म्हणून असं असेल. अमर्त्य सेन ह्यांचं संशोधन ते बंगाली किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये करू शकले असते असं मला वाटत नाही. कदाचित हे सगळं एकदम वैयक्तिक आणि चूकच असेल. पण मला भाषा हा प्रकार सिरीयसली महत्वाचा वाटतो, एस्पेशली त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी स्वतःची एक्स्प्रेशन्स, वैचारिक-भावनिक हा जगण्याचा आणि उपजीविकेचाही मुख्य आधार आहे.
       परत त्या वरच्या साहित्यिक प्रश्नाकडे. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये मला जाणवलं की सारेच उच्चडिग्रीत प्रोफेसर्स हे काही चांगले रीडर्स नाहीत. काहीजण काहीच वाचत नाहीत, काहीजण प्रसिद्ध आणि रंजक लिखाण वाचतात, काहीजण काहीही वाचतात, तर काहीजण सिरीयस, निवडीने वाचणारे आहेत. विद्यार्थ्यामध्येही असंच डिस्ट्रिब्यूशन आहे.
       पण भाषेच्या बाबतीत डिस्ट्रिब्यूशन वेगळं आहे. जे यशस्वी, क्वांटीटी आणि क्वालिटी दोन्हीपैकी कोणत्याही एका निकषावर, आहेत त्यांची भाषेवर कमांड आहे. ते त्यांना हवं ते एकदम नीट सांगू शकतात. कदाचित हा सोशल सायन्स रिसर्च आणि टिचिंगचा एक भाग असेल, पण भाषा इथे एक मुख्य घटक आहे, जरी प्रोग्रामिंग हा वेगाने मुख्य घटक बनत असला तरी.
       मुद्दा असा की वाचन, वाचनाचे प्रकार आणि भाषेची कमांड आणि तिचा वापर हे फार काही निगडीत घटक नाहीत. वाचल्याचे भौतिक फायदे किंवा भाषेवर ग्रीप यायला होणारे फायदेही फार सिद्ध करता येण्याजोगे नाहीत. भाषा ही मूलतः विचारांशी निगडीत आहे, आणि जो नीट विचार करू शकेल तो आपोआपच नीट बोलू शकेल, तो वाचक वगैरे असणं अजिबात जरुरीचं नाही. अगदी लंगोटाला हात घालून म्हणायचं झालं तर मृत्युंजय वाचणारा, कोसला वाचणारा आणि केवळ व्हॉटस् अॅप करणारा ह्यातल्या कोणाची मराठी भाषा (व्यक्त होणं ह्या निकषावर) चांगली असेल हे काही सांगता येणार नाही.
       वाचणारे मनोरंजनासाठी, आपला तळीराम शांत करायला वाचतात, लिहिणारे त्यासाठीच लिहितात. बाकी सारी नंतर लावलेली भरजरी ठिगळं.
       पण ह्या मनोरंजनात बौद्धिक रीसोर्स गुंतवावे लागतात, थोडा फोकस लागतो, आणि बौद्धिक स्वरुपाची किक यावी लागते. माझ्या मते हे सर्वांना नसतं, जसं प्रत्येकाला फुटबॉल एन्जॉय करता येणार नाही, कबड्डी, गोल्फ, क्रिकेटही नाही, तसं.
       प्रत्येक लोकसंख्येत एका ठराविक प्रमाणात हे बौद्धिक मनोरंजन करून घेऊन शकणारे लोक असणार. मराठी भाषिक लोकसंख्येतही असणार. मग जर मराठी भाषिक करोडो आहेत, तर हा गटही मोठा असेल ना. असेल, नक्कीच.
       पण त्याच्या रिडरशिप बनण्याच्या वयात तो अशा ठिकाणी असतो जिथे त्याच्या वेळेवर प्रचंड ताण आहे, म्हणजे इंजिनिरिंग किंवा मेडिकल किंवा सी.ए. किंवा आर्किटेक्ट किंवा भरपेट पगार देणारी लाईन. तो आर्ट्स करायचे चान्स कमी. मी इथे स्पष्टपणे हा असं म्हणतो आहे की शाळेतील टक्केवारी ही एक वर्गवारीची  योग्य सिस्टीम आहे. त्यातून बौद्धिक रीसोर्स कसे वाटले गेले आहेत हे काही ना काही प्रमाणात दिसतंच. त्याचे अपवाद सिद्ध होऊ शकतात, पण ह्या ट्रेण्डला तोडणारा ट्रेण्ड सिद्ध होणार नाही. त्यामुळे ह्या टक्केवारीवर पुढे त्यांचे होणारे वर्गीकरण हे वाचनाच्या प्रमाणवर प्रचंड प्रभाव पाडते.
       माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये मला प्रचंड मोकळा वेळ असे,पण तेच जर मी इंजिनीअर वा डॉक्टर होत असतो तर हा वेळ मला मिळाला नसता. माझं वाचन डेव्हलप करणं मला कठीण झालं असतं. त्याचवेळी माझ्या सोबतचे बहुतेकजण एवढं काही वाचत नसत. लायब्ररी तर होती, त्यांना वाचायचं नव्हतं.
       थोडक्यात वाचन हे सवय म्हणून डेव्हलप व्हायची क्षमता असलेले शिकायच्या वयात लोक अशा ठिकाणी जातात जिथे ही सवय डेव्हलप व्हायची मुभा कठीण असते. त्यामुळे एकदम गरम डेडीकेटेड गटच वाचतो, बाकी नाही.
       आणि त्यातही जे वाचू लागतात, त्यांना इंग्रजी नावाचा अफाट प्रकार खुला होतो.
       इथे एक फरक मला जाणवतो. गुजराथी पुस्तक मराठीत भाषांतरित झालेलं वाचणं आणि जर्मन पुस्तक मराठीत भाषांतरित झालेलं वाचणं ह्यात फरक आहे. गुजराती पुस्तक, जे गुजराती भूगोलाशी निगडीत आहे असं धरून चालू, त्या भूगोलाशी माझी स्वाभाविक जुळवणी होऊ शकते. पण तसं जर्मन पुस्तकाशी होणार नाही. पण तेच जर्मन पुस्तक इंग्रजीत वाचतांना हे अंतर बरंच घटतं. सगळ्या भाषा काही एकमेकांना जुळत नाहीत, सांबार इडलीबरोबर जुळतं आणि बिर्याणीबरोबर नाही तसं, ह्यात सवय किती आणि तथ्य किती!
       पण इंग्रजीमध्ये जी एन्टरटेनमेन्ट आहे ती मराठीत नाही, भाषांतराने आली तरी मग ती तोकडी उरणारच. आणि सिरीयस रीडिंग ग्रुप हा एन्टरटेनमेन्टशी जुळून येतो. इथे एन्टरटेनमेन्ट म्हणजे गॅंगस् ऑफ वासेपूर किंवा कहानी, बोलबच्चन नव्हे. म्हणजे आता मी हा जो एवढा बौद्धिक गांजा मारून राहिलो आहे त्यानुसार जेव्हा मराठी लिखाणाच्या एन्टरटेनमेन्टची कुवत आणि निर्मिती वाढेल तेव्हा त्याचा सिरीयस वाचक वर्गपण.    
---
       एवढी झोकली. आता गरगरू लागलं.
       ही एवढी इंग्रजीची सावली पडली, त्यांत उपजीविकेचा खंदा दणकट कुत्रा अंगावर सोडलेला, आणि मराठीचं मांजर असं म्यांव म्यांव करत सरकारी दूध शोधत हिंडतय, माझ्या पायाशी येतंय, मी उगाच कसनुसा होतोय आणि मग सगळे न बोलून शहाणे मजकडे  बघून किंवा न बघून म्हणतात, नया है वह.

Tuesday, February 18, 2014

दगड कुठे लागला?

       हा प्रकार एंटरटेनमेन्टसाठी नाहीच. हा खूप सिरीयस अटेम्प्ट आहे एका भयंकर गोष्टीविषयी सांगायचा. अशा बाळबोध शब्दांत बोलाण्यावाचून आपली ‘जात’ या प्रकारातल्या कुठल्याही एक्स्प्रेशनबद्द्दल बोलायची औकात आहे माझी असं मला वाटत नाही.
       पण दिग्दर्शकाने शेवटला भिरकावलेला दगड नेमका कोणालाच न लागता एका कोरड्या बनू लागलेल्या होलमध्ये पडून राहील का काय असं वाटतं. असलं भरताड काही वाटण्याची संधी दिल्याबद्दल खरंतर माझ्या सहप्रेक्षकांचा मी आभारी आहे.
       माझ्या शेजारी तीन मित्र सिनेमा बघायला बसले होते. त्यातले माझ्या बाजूचे गुटखा खाऊन बसल्या सीटसमोर थुंकत होते. मी एकदा त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी मला टाळी मागायला हात पुढे केला. त्यांच्या बाजूला सिनेमाचा रिअल टाइम आणि लाउड समीक्षक बसला होता. आणि त्याच्या बाजूला ह्या तिघांमधला जास्तीत जास्त इम्बरेस झालेला मित्र.
       पिक्चर सुरू झाल्यापासून ५व्या मिनिटाला समीक्षक सुरू झाले. गुटखापंत त्यांची री ओढू लागले. ते दोघे अनावर झाले की तिसरा त्यांना थोडा हटकायचा. प्रत्येक समीक्षेच्या आधी आई किंवा बहिण किंवा शरीराचे अवयव ह्यांची याद स्मरून समीक्षा केली जायची. मी गुटखावाल्याला ह्याचं कारण विचारलं.
       शाळा, टाइमपास ह्यांचा पुढचा भाग वाटावा अशी लव स्टोरी पहायला आलो आम्ही. पण इथे नुसती सकाळ, दुपार,संध्याकाळ, हागणं आणि मुतणं. कसला पिक्चर आहे हा.
       बाकी थेटरातले बोलत नसले तरी इंटरव्हलला कुजबुज सुरू झाली. कसला पिक्चर आहे हा, कुठली लव स्टोरी, कोण गलपटत नाही, ‘नया है वह’ नाही, काय आहे हे, गाणं कुठंय, ११० रुपयाचं (तिकीटाची किंमत) गाणंच आहे, ह्यापेक्षा गुंडे पाहिला असता, असं.
       दुसराही गट होता, ज्याला दिग्दर्शक काय दाखवायला बघतोय हे उमजत होतं, पण ते दिग्दर्शकाच्या डिस्क्रिट धाटणीने थोडे त्रस्त झाले असावेत. स्टोरी इंटरव्हलपर्यंत कसलाही अदमास देत नाही, कसली ग्रीप पकडत नाही.
--
       कोणकोणत्या प्रकारचे लोक हा किंवा कुठलाही सिरीयस काही बोलू इच्छिणारा चित्रपट बघत असतील? मुळात सिरीयस काही सांगू पाहणाऱ्या सिनेमाला ह्या चित्रपटाला मिळालं तेवढं वाईड रिलीज मिळतं का हाही भाग आहे. जसं ‘देऊळ’ हा सिरीयसली काही सांगू पाहणारा प्रकार होता, पण लोकांना त्यात निवड होती. म्हणजे तो विनोद, सटायरच्या अंगाने जाणारा असल्याने एकतर तेवढंच घ्यायचं किंवा मग अजून सखोल, सटल काही बघण्याचा प्रयत्न करायचा. तसं काही इथे घडत नाही. असो. मूळ प्रश्नाला येऊ. कोण कोण बघत असतील? टिश्यू पेपर अप्रोचवाले, स्वतःची सिरीयस प्रेक्षक अशी इमेज ठेवू पाहणारे (म्हणजे जसा मी) आणि अजून काही, म्हणजे अजून नेमके कशात आहेत हे डीफाइन न करता येण्याजोगे. हा शेवटचा गट जरा इंटरेस्टिंग आहे.
       मी कॉलेजात असताना एन.सी.पी.ए. ला फुकटात सत्यजित रेंची ‘अपू त्रयी’ दाखवली जाणार होती. पहिल्या दिवशी श्याम बेनेगल बोलले, सत्यजित रे ह्यांच्या दिग्दर्शनाबाबतची एक फिल्म दाखवली गेली आणि मग मुख्य फिचर. त्या आधी वेगळा असा कोणता चित्रपट पाहिला होता तर तो म्हणजे ‘ब्लॅक’. बाकी रामगोपाल वर्मा, लगान आणि बाकी. म्हणजे तेव्हा मी वर ज्याला इंटरेस्टिंग म्हटलंय त्या गटात होतो. आणि आता मी थोडं स्वतःला एकीकडे सरकवलं आहे. पण असं सरकण्यात वेगवेगळया चित्रपटांचा, पुस्तकांचा वाटा आहे.
       त्यामुळे सिरीयस सांगू पाहणाऱ्या चित्रपटाचं एक चांगलं मोजमाप म्हणजे तो अशा किती लोकांना इकडून तिकडे सरकावू शकतो. हे सरकणं दोन गोष्टींवर अवलंबून आहे असं मला वाटतं, मुळात सरकायचा वाव किती आहे आणि कलाकृतीची क्षमता किती आहे. ह्या दोन्ही गोष्टी काही एकदम काटेकोर मोजता येण्याजोग्या नाहीत. पण आपण त्यांच्याबद्दल काही ना काही अंदाज ठेवू शकतो.
       एक उदाहरण पाहू. ‘रंग दे बसंती’ हा असं सरकवायची क्षमता असलेला चित्रपट आहे असं म्हणता येईल, म्हणजे मला वाटतं, मी अनुभवलं म्हणून. त्यातले देशभक्तीचे धडे किंवा जे काय ते नेमकं काय आहे, किती ठोकळेबाज आहे किंवा खरंच असं व्हावं का ह्याचा खल करण्यापेक्षा तो हे प्रश्न पाडतो तिथेच तो वेगळा आहे. आता ह्या चित्रपटाचा शो संपल्यावर, इमोशनली चार्ज अवस्थेत असताना असा डायलॉग ऐकू आला तर, ‘क्या एक एक जॅकेटस् पेहने थे अमीर खानने!’ तर? असं ज्याला म्हणायचं आहे तो कसा चूक-बरोबर किंवा जस्टीफाईड आहे असं काही आपलं म्हणणं नाही. पण ह्या उदाहरणातून दिसू शकतं की प्रोसेस दोन्ही बाजूंनी चालते.
       मला प्रोसेसच्या कलाकृतीकडे बघण्याच्या एंडला काय आहे ह्यात स्वारस्य आहे. माझ्या आवडत्या पेसिमिस्टीक कोनातून बघणारे गाढव होत चाल्लेत, त्यांना कशाची पडलेली नाही, इतक्या संवेदनशील विषयावर चित्रपट असेल तर त्यांची समजायची लायकी नाही असं हुंदके द्यायला खरं मला आवडेल. पण असं नाहीये, आणि मला असं वाटत असेल तर तो माझ्या बघण्याच्या रोखाचा इश्यू आहे.
       मी कल्याणमध्ये चित्रपट पाहिला, तो गोरेगावात पाहिला असता तर, किंवा कोल्हापुरात, किंवा पुण्यात किंवा अमेरिकेत, तर मला आजूबाजूचे आवाज कसे कसे ऐकू आले असते?
       मी अमुक एक जातीत जन्माला आलो, मी त्याशिवाय वेगळया जातीत, त्यातही गावांत, त्यातही जात-पात मानणाऱ्या आणि पाळणाऱ्या गावांत वाढलो असतो तर मला काय वाटतं, किंवा दिसतं?
       भले मी जात मानत नसेन, म्हणजे असं मानणं न मानणं ह्याला काही अर्थ आहे असं नाही, पण मी त्याचे प्रीव्हीलेजेस तर उपभोगतोच आहे. ह्याचं काय, त्याचं काय एवढी खाजवाखाजवी करायला मिळणारी स्पेस हाच मोठा प्रिव्हिलेज आहे. आणि त्यात कुठेतरी मी ज्या गोष्टीला न मानण्याचा प्रयत्न करतोय त्याचा वाटा आहेच. सो थोडे जड निकष लावले तर मी या सगळ्यावर बोलायला इलिजिबल नाहीच.
--
       पण मलाही कुठेतरी हा भिरकावलेला दगड लागलेला आहे. कुठे लागलाय नेमका? का मी बघितलं तेव्हा थेटराच्या अंधारात कोणाचंच तो दगड लागल्याचं विव्हळणं मला जाणवलं नाही हे मला लागलंय? का मला लागलं नाहीये, तर बरं वाटतंय की असं काही लिहून मी माझी जपवून वाढवलेली एक आयडेन्टिटी शाबित करू शकतो.
       काही महिन्यांपूर्वी मला जात प्रकाराबद्दल लिहायचं होतं. ८-९ पानांच्या पुढे मला काही लिहिता आलं नाही. न लिहिता येण्यामागे दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे या विषयावर जे काही फंडामेंटल लिखाण आहे ते मी फारसं वाचलेलं नाही, आणि दुसरं म्हणजे ह्या विषयाने येणारे कोणतेच चटके मी भोगलेले नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की मी जात ह्या विषयावर काही बोलायला, लिहायला पाहणं म्हणजे अनेकांच्या भोगलेल्या अनुभवांच्या टाळूचं लोणी फुकटात खायचा प्रकार. मी न बोलता अपराधी भाव मनात जपणं हेच जास्त बरोबर.
       काही अनुभव नाहीत हेही बरोबर नाही, आणि माझ्या परीने माझ्या आजूबाजूंच्या जातीय वर्तनाला मी तोडू पाहिलेलं नाही हेही खरं नाही. पण जे आहे ते अगदी निरुपयोगी तोकडं आहे.
n   --- 
    
   हा मी अगोदर केव्हातरी लिहून ठेवलेला भाग.

       मला मी अमुक एक जातीचा आहे असं साधारण ७-८व्या वर्षी कळू लागलं. म्हणजे मला घरातून कोणी मुद्दामून जात वगैरे काय असतं हे सांगितलं असा भाग नसावा. माझी शाळा, मी राहतो तो शहराचा भाग यांतून मला कळलं असावं की माझी अमुक एक जात आहे. किंवा कदाचित कोणाच्यातरी लग्नाची वगैरे हकीकत ऐकताना मला कळलं असावं. मला आठवतं की शाळेत एकदा वर्गातल्या सगळ्या मुला-मुलींच्या जाती-पोटजाती काय हे विचारायचाही  मुला-मुलींचाच (अर्थात अनौपचारिक) कार्यक्रम झाला होता. त्यातल्या काही जणांना ठाऊक होत्या-काही जणांना नाही. शाळेत कॅटलॉगवर प्रत्येकाच्या नावासमोर हिंदू आणि जात असं लिहिलेलं असायचं.
       ह्या तशा फार मागच्या किंवा अफार काही सिरीयस नसलेल्या गोष्टी झाल्या. मी माझ्या जाती बाबतचं , आणि माझं मी अमुक एक जातीचा आहे याबाबतचं, जातीव्यवस्थे बाबतचं असं माझं एक मत आणि त्याला अनुरूप वागणं बनवलं पाहिजे असं मला फार नंतर वाटायला लागलं. पहिले मी थोड्या अशा-तशा इकड-तिकडच्या गोष्टीच सांगणार आहे. मग मला हळूहळू मला नेमकं काय म्हणायचंय किंवा मला नेमकं काय म्हणता येत नाहीये हे नेमकं सांगता येईल.
       मी थोड्या दिवसांपूर्वी ‘शिवाजी अंडर ग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ बघायला गेलो होतो. मी आधी ते नाटक मुंबईत, कफ परेडला, एन.सी.पी.ए. च्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात पाहिलं. किंवा कदाचित तिथल्या प्रेषक वर्गात नाटकात सातत्याने डोकावणाऱ्या जातीयतेवरच्या टीकेचा फारसा प्रतिसाद उमटत नव्हता. मग मी तेच नाटक कल्याणमध्ये पाहिलं. तिथे नाटकाला एक गट आला  होता. तो नाटकात एका ठराविक जातीवरच्या टीकेचा भाग आला की जोरदार आवाज करायचा.
       जातीयतेच्या विरुद्ध असणारा, मार्क्सवादी विचारसरणीच्या चळवळींत हिरीरीने सहभागी असलेला माझा एक मित्र आणि मी एकदा आंतरजातीय विवाहाबद्दल बोलत होतो. मुद्दा हा निघाला की प्रेमविवाह असेल तर तो जातीय निकषावर ठरला आहे का नाही हा मुद्दा बाद ठरतो. दोन व्यक्ती प्रेमात पडल्या आहेत. त्या जात वगैरे बघून कशा काय प्रेमात पडल्या असतील बरं अशी माझी प्रश्नचिन्हांकित बाजू होती. (अर्थात माझी बाजू सुरुवातीपासून लंगडी आहे. मला माझ्यावर ज्या एका जातीचा शिक्का आहे त्याच जातीतले अनेक सजातीय प्रेमविवाह ठाऊक आहेत. आणि तिथे प्रेमात ‘पडायच्या’ आधी कोणत्या जातीच्या व्यक्तीच्या प्रेमात ‘पडावे’ हे आधीच ठरले असावे असा दाट संशय मला आहे. किंवा सजातीय व्यक्तीच्या शिवाय बाकी कोणाकडे ‘झुकणे’ झाले तरी ‘पडणे’ टाळले गेले असावे. )त्यावर माझ्या मित्राचा मुद्दा असा होता की आपल्या सबकॉन्शस मध्येच जातीय बायस असतात. आणि हे सबकॉन्शस आपल्या प्रेमात पडण्याच्या क्रियेत कार्यरत असते. त्यामुळे प्रेमविवाह हेही जातीयतेच्या निकषावर पहिले पाहिजेत. आपल्या जातीत प्रेमविवाह ही जातीय वागणूकच एकप्रकारे. मी माझ्या मुद्द्याचा बचाव करताना म्हटलं की म्हणजे मी माझ्या सबकॉन्शसला न वापरता ‘जाणीवपूर्वक’ प्रेमात ‘पडलो’ तर कदाचित एकूणच वर्तणुकीत खोटेपणा येईल किंवा आपण जाणीवपूर्वक थोर सामाजिक काही करत आहोत असं. हे माझ्या जोडीदाराला त्रासदायक होऊन लग्न न टिकण्याचा, त्याचा दोघांना त्रास व्हायचा चान्स जास्त आहे.
मी माझ्या मुद्द्याचा बचाव केला तरी मित्राचा मुद्दा मला टोचत राहिला आहे. विधवा पुनर्विवाहाचा विचार केला तर पूर्वी काहीजणांनी मुद्दामून असं केल म्हणून आज विधवा झालेल्या योग्य वयातील बाईसाठीचे जोखड थोडे हलके झाले असेही असेल. मग मुद्दामून केलेले आंतरजातीय विवाहही कालांतराने असेच फळ देतील. मग?
      आंतरजातीय विवाहांची संख्या वाढत असावी. पण एकूण होणाऱ्या लग्नांच्या प्रमाणात त्यांचे प्रमाण घटतच असावे. नव्या, नव्या वेबसाईट, अन्तरशहरिय विवाह मंडळे, फेसबुक वगैरे आल्यापासून सजातीय ‘जुळवणे’ किंवा ‘पडणे’ जास्त सोपे झाले आहे. आणि समाजातला वागण्याचा ट्रेण्ड बदलायला संख्येपेक्षा प्रमाण जास्त महत्वाचे आहे. प्रमाण वाढले की संख्या (बहुतेकवेळा) वाढलेलीच असते, पण संख्या वाढून प्रमाण घटते आहे असं होत असेल बदल काहीच होत नाही. 
       माझ्या एका मैत्रिणीने प्रेमविवाह केला. लग्नानंतर एकदा बोलताना ती म्हणाली की आता एक बरं आहे. माझ्या मुलांना माझ्या सारखा त्रास नाही होणार. कारण तिच्या नवऱ्याची जात आरक्षणाचा फायदा मिळण्यासारखी आहे. नन्तर मी महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय वाचला. ज्यानुसार आंतरजातीय विवाहात अपत्याला आईची जात मिळणार आहे. असं खरंच जर होणार असेल तर मग आता माझी मैत्रीण काय म्हणेल? त्याधीची गोष्ट म्हणजे १२ वीच्या परीक्षेनंतर ह्या मैत्रिणीने आरक्षण आणि त्यातून होणारे ‘अन्याय’ ह्यावर एक नाटक वगैरे लिहिलं होतं.
                आम्ही काही मित्र मिळून पुस्तक प्रदर्शन लावतो. म्हणजे आमच्या कुवतीनुसार पुस्तके विकतो. तसं हे प्रदर्शन चालू असताना एक मुलगा तिथे आला. त्याने शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं एखादा पुस्तक आहे का याची चौकशी केली. आमच्याकडे नव्हतं. मग त्याने बाकीची पुस्तकं चालली. त्यात अजून काही नेते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांची, ह्यांच्या, त्यांच्याबद्दलची पुस्तके होती. मग तो मुलगा म्हणाला, ही बाकीची पुस्तके आहेत. अण्णाभाऊ साठ्यांचाही पुस्तक ठेवलं पाहिजे ना. त्याने का ठेवलं नाहीत असा प्रश्नही विचारला नाही. किंवा आम्ही जातीय वागत असल्याचा आरोपही केला नाही. पण विचार केल्यावर कळतं की जे झालं होतं ते जातीयच होतं. आम्ही जिथे राहतो त्या तिथल्या स्थानिक पुस्तक विक्रेत्याची मदत घेऊन आम्ही प्रदर्शन लावतो. हा पुस्तक विक्रेता प्रथितयश प्रकाशनांची पुस्तके विकतो. ही प्रकाशने काय छापतात, काय नाहीत हे ते वाचकांचा अंदाज घेऊन ठरवत असणार. आणि अण्णाभाऊ साठ्यांची पुस्तके या प्रथितयश प्रकाशानांकडे नाहीत. म्हणजे? वाचणाऱ्या लोकांनी, छापणाऱ्या लोकांनी काही निवडी, ज्याला डिस्क्रिमिनेशन म्हणता येईल अशा करूनच ठेवल्या आहेत का?
       सांगली तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका गावात मी आणि माझा मित्र गेलो होतो. आम्हाला माहिती सांगणाऱ्याने गावाबद्दलची एक जुनी गोष्ट सांगितली. त्यात गावातला एक शूर सरदार आणि पेशवे यांचा भाग सांगताना पेशव्यांची जात आणि त्याबद्दल सरदाराला वाटणारी साशंकता हा भाग त्यांनी सांगितला. मग गावाची, दुष्काळाची माहिती दिली. मग आमची नावं  विचारली. मग जात. शहरात असं फारसं घडत नाही. कुठचे विचारतात. जात पटकन विचारत नाहीत. मला स्वतःला जात काय हे विचारणे प्रचंड अवघड वाटतं. सर्व्हे करताना सुरुवातीच्या प्रश्नातच जात विचारावी लागते. सांगणारा अनेकदा सहज सांगतो. मला थेट विचारता येत नाही.  
       काही काही वेळा मला ह्या इतक्या बारीक बारीक गोष्टी माहित असल्याचे काही वाटत नाही. म्हणजे मी अमुक एका शहरांत, राज्यात, किंवा अमुक एका आर्थिक परिस्थितीच्या आई-बापाच्या पोटी जन्माला आल्याचे मला जितके काही वाटते तितके जातीचे वाटत नाही. अगदी देशाचा वगैरे विचार केला तरी हळूहळू जातीयतेची तीव्रता जाईलच असंही वाटतं मला कधी. किंवा काहीवेळा मला जातीयता चेहऱ्यावर असलेल्या एकाद्या पुळी सारखी वाटते. म्हणजे तिच्या असण्या-नसण्याने शरीराच्या प्रमुख हालचालींना, विचार करण्याला काहीच आडकाठी नाही. पण एखाद्याकडे बघताना बऱ्याच जणांना ती पुळी लक्षात राहू शकते. काहीही उपयोग नसताना ती त्या माणसाची ओळख बनू शकते.
---
       मला दोन प्रकारच्या किंवा तीन प्रकारच्या जातीयता दिसतात. म्हणजे तीन प्रकारची माणसे. एक जी उघड जातीय आहेत. त्याच्या वागण्याच्या, दररोजच्या जगण्याचा, महत्वपूर्ण निर्णयांच्या मागे त्यांचा स्वतःच्या जातीचा अभिनिवेश, अभिमान आणि काही प्रमाणत बाकी जातींचा द्वेष आहे. दुसरा प्रकार म्हणजे जिथे द्वेष, अभिनिवेश फारसा नाही. पण जात मानली जाते. लग्न जुळवायचा, दुसऱ्या माणसाबाबतचा तो एक महत्वाचा निष्कर्ष आहे. आणि तिसरे म्हणजे ज्यांच्यासाठी जात ही त्यांच्यालेखी काही एक महत्व नसलेली संकल्पना आहे आणि त्यांना कधीही ‘जात’ वापरून कोणतेही निर्णय घ्यावे लागणार नाही आहेत.
       आपण आता हे तीन प्रकार उदाहरणांसह पाहू.
                खैरलांजी प्रकरणाची निदर्शने चालू असताना एकदा कल्याण रेल्वे स्थानकाच्या आधी रेल्वे गाड्या थांबवल्या गेल्या. अजूनही काही ठिकाणी दगडफेक झाल्याच्या वगैरे बातम्या टीव्हीवर येत होत्या. मी घरी त्या बातम्या बघत असताना त्याच्या स्वतःच्या कामासाठी आलेला एक मनुष्य माझ्यासोबत टीव्ही पहात होता. समोर चालू असलेल्या बातम्या पाहताना तो एकदम तुच्छतापूर्वक काहीतरी म्हणाला. आणि परत हसत टीव्ही बघायला लागला. हे म्हणजे पहिल्या प्रकारचे उदाहरण.
       माझी एक नातेवाईक बहिण एकदा आमच्या घरी आली होती. ती आठवीत आणि मी पाचवीत होतो. माझी आजी तिला शाळा कशी चालू आहे असं काहीकाही विचारत होती. त्यावर ती बोलायला लागली की काही विषय नीट शिकवले जात नाहीत. आणि तिच्यालेखी त्याचं कारण म्हणजे ते विषय शिकवणारे शिक्षक हे गुणवत्तेनुसार भरले गेले नव्हते. तिच्या बोलण्यातलं लक्षात राहिलेलं उदाहरण म्हणजे ते शिक्षक ‘आणि आणि पाणी’ हे दोन शब्द कसे बोलतात याचा तिने करून दाखवलेला उच्चार. हे सुद्धा पहिल्या प्रकारचंच उदाहरण. कदाचित ती स्वतः तशी नसेलही. शाळेतल्या शिक्षकांमध्ये चालणाऱ्या गटबाजी खेळात मुलांमध्ये असं मुद्दामून पसरवत असतील. माझ्या शाळेतही असे प्रकार व्ह्यायचे. अशा गटबाजीला कंटाळून एका शिक्षिकेने राजीनामाही दिला होता.
       द्वेष किंवा स्वतःच्या जातीशिवाय बाकी जातींच्या बाबतीत उणे काढण्याची भावना ह्यानेच पहिला प्रकार बनतो असं नाही. माझ्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मध्ये असलेले काही लोक त्यांच्या जातीसंबंधीची मंडळे, कम्युनिट्या चालवतात. ते काहीकाही अपडेट करत असतात. त्यात त्यांच्या जातीची थोरवी, गर्व आहे मी अमुक असल्याचा, तमुक असल्याचा असे मजकूर असतात. किंवा त्याच्या जातीच्या ऐतिहासिक थोर पुरुषाचे फोटोशॉपिक तेजस्वी, ओजस्वी वगैरे (प्रसंगी सिक्स पॅक) फोटो टाकत असतात. ही पहिला प्रकारच.
       दुसरा प्रकार म्हणजे जातीबाबतची उघड एक्स्प्रेशन न देता असणारे लोक. त्यांच्या दैनंदिन जीवनात जात फार डोकावतही नसते. पण ते जातीबाहेर लग्न करत नाहीत. जातीच्या रुढी-परंपरा पाळतात. ते दुसऱ्या जातीला कमी-जास्त लेखायला जात नाहीत. पण योग्य ते अन्तर राखतात. आणि जर त्यांच्या जातीतले पहिल्या प्रकारचे लोक त्यांना कधी एखाद्या मेळावा, कार्यक्रमाला बोलवायला आले तर त्यांना त्यात काही वावगे वाटत नाही. ते अशा जाती संघटनांना देणग्या देतात. त्याच्या यशाचे पावडे जर ह्या जाती संघटनांनी गायले, त्यांचे उदाहरण जातीची महानता म्हणून वापरले तर ते त्यांना चालते.
       असं म्हणता येईल की पहिला प्रकार चुकीचा आहे. दुसरा प्रकार असेल तर त्यात काय चूक आहे. माझ्या स्वतःच्या मते दुसरा प्रकारही चुकीचाच आहे.

--

         बाकी तर मी टापोटाप बघ सिनेमा आणि टाक रिव्ह्यू असं करतो. इथे मला एवढा वेळ का लागला? ‘जात’ एवढी सेंट्रल होती सिनेमात की बाकी चित्रण, डीटेल्स, अभिनय ह्या बाबत काहीच लिहिता नसतं आलं.  मला. माझ्यालेखी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती नायकाच्या मनातली त्रास देणारी, सतत तडफडवणारी जाणीव. इकीकडे त्याला हिरोईक काही करायचं आहे, छाप मारायची आहे, त्याच्या मनात रुजलेला चेहरा, त्याच्या अदा दररोज पहायच्या आहेत. पण तितकंच त्याला ठाऊक आहे की तो आहे त्या व्यवस्थेत ह्या कशासाठीही एनटायटलड नाही. आणि ह्या विरोधाला पुसण्यासाठी तो काहीतरी तोडगा शोधू पाहतो, त्याच्यावर भाबडा विश्वास ठेवतो आणि केव्हातरी त्याचा सगळा भाबडा इमला कोसळतो. जिच्यासमोर त्याला हिरो बनायचे आहे तिच्यासमोर त्याची पूर्ण सार्वजनिक अवहेलना होते आणि मग त्या अवहेलनेला प्रत्युत्तर देणारा दगड तो फेकतो, पुढच्या परिणामांची पर्वाही न करता.
       असं काहीसं लिहिता आलं असतं. दॅट वुड हॅव सर्व्हड.
       बहुतेकजण असं चुकचुक करून सोडतात. काहीजण असं असेल तर बघूयाच नको म्हणतात. काहीजण हे असं सगळं नाहीच, हा डाव आहे, षडयंत्र आहे असा कल्लोळ करून त्याखाली सगळंच झाकून टाकायला बघतात.
n   
       असं हळहळणं, आपल्याला थोडी जास्त रुंद जाणीव आहे, कन्सर्न आहे असं काही करायला बघणं हे मला एकदम बेगडी वाटतं काहीवेळेला. ह्या व्यवस्थेतून एक्झिट घेऊन जिथे माणसाला आपल्या एकटेपणात निवांत रमता येऊ शकतं, हवं तेव्हा आपल्या कोशातून बाहेर पडायची आणि मग परत घुसायची मुभा आहे अशा कुठल्यातरी अत्यंत कमी लोकसंख्येची घनता असलेल्या देशांत जावं. काय करायला लागतं अशा ठिकाणी जायला, डिग्र्या, इंग्लिश आणि गणित. तेवढं जमलंही असतं. मग कधीतरी नॉस्टॅल्जियाचा, किंवा भव्य मानवी प्रश्नांच्या कळवळ्याचा प्रकारही जमला असता, व्हेन नथिंग इज अॅट स्टेक्स किंवा हे सगळं, जात, देश, धर्म, भाषा विसरून जाऊन अजून कुठल्यातरी अॅबस्ट्रॅक्ट डोहात झिंगून बुडी मारता आली असती.
       पण असं झालेलं नाही अद्याप. आणि त्यामुळे बघ्याचा आव आणून इथल्या गर्दीच्या तरंगांकडे पहा, त्यावर निष्कर्षांचे, अंदाजांचे दगड फेका हाच आपल्या आवडीचा खेळ आहे.

       पण मध्येच कोणी असा दगड फेकतो, आणि काही दिवस तो कुठे लागला आणि किती हे चाचपडण्यात जातात, परत नेहमीची सुस्त निब्बरता किंवा पाळीव संवेदनशीलता येईस्तोवर.      

Tuesday, February 11, 2014

झलकतो चंद्र

झलकतो चंद्र हायवेवरच्या विदीर्ण आकाशात
आणि रस्तावरचे कुत्रे भुंकतात सरावाच्या असूयेने
मालकाच्या लोभसवाण्या पुष्ट कुत्र्यांकडे पहात

आपला आत्मा तसू तसू वाटला आहे असा या भटक्या किंवा बांधलेल्या कुत्र्यांत,
निमिषार्धात गायब होणाऱ्या स्वार्थी हरहुन्नरी मांजरांत
आणि उशिरा रस्त्यावर असणाऱ्या भरधाव निवांत गाड्यांत
आणि तरीही राहत फतेह आली खान म्हणतो
‘साजिश मे सामील सारा जहॉं है’

एका क्वार्टरला एवढी अनुभूती
खंबा मारतो तर ह्या कुत्र्यांसोबत मीही भिडवली असती माझी हाक  
निऑन दिव्यांच्या या भासमान अवकाशात

कॅपिटलिस्ट दिवसाने चिणलेली टीचभर रात्र देते घाबरट ढेकर
त्या वेळेला ह्या रस्त्यांच्या कडेने कुसा बदलतात
कामोत्सुक जीव, कोरी करकरीत बालके आणि रिकामे वृद्ध
आणि तरीही जाते वेळ सरकत
सगळ्यांवर आपली चिंधी फिरवत
गतानुगतिक फिलोसॉफर तेव्हा उसासा देतो  
इन द लोंग रन वी ऑल आर डेड  

    

Wednesday, February 5, 2014

आयडेन्टिटी फेटीश आणि निखळ च्युत्यापा

       तुम्हाला निखळ च्युत्यापा अनुभवायचा असेल, वेगवेगळया स्टिरीओटाइप्सची ठिगळे कशीही एकमेकांना जोडून सुमारे अडीच तास चालणारा अडाणचोट प्रकार बघायचा असेल तर पुणे व्हाया बिहार बघा.
       आता म्हणाला की असं आहे बाबा अति शहाण्या माणसा, तर तू काय तिथे XXवत बसला होतास! आता असं आहे की आपल्याला वेगवेगळे च्युत्यापे समजून घ्यायची स्वाभाविक आवड आहे. आणि जसे एक थोर लेखक म्हणाले त्या धर्तीवर, सारी शहाणी माणसे एकसारखी वागतात, च्युत्ये आपापल्या परीने निरनिराळे च्युत्यापे करीत असतात ह्या बंधुप्रद भावनेने मी तिथे होतो.
       बाकी तुम्हाला आयडेन्टिटी फेटीशबद्दल कुतूहल असेल, म्हणजे तुम्हाला सटल असं काही वाचून भरसट होण्याइतका वेळ असेल तर तुम्ही अमर्त्य सेन ह्यांचं ‘आयडेन्टिटी अॅन्ड व्हायलन्स’ वाचू शकता. आणि इतका वेळ किंवा भरसटलेपण तुम्हाला नसेल किवा वरील पुस्तक वाचून तुम्हाला वेळ वाया गेला असंच वाटत असेल तर तुम्ही वेडे आहात किंवा तुम्हालाच आयडेन्टिटी फेटीश आहे. फेटीश अशा अर्थाने की स्वतःला कुठल्या ना कुठल्या आयडेंटिटी मध्ये पहिल्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. आणि त्यामुळे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे, भौतिक जगाचे विश्लेषणही तुम्ही ह्या फेटीशमधूनच करत राहता. आणि वरील पुस्तक अत्यंत ग्रेट आहे, प्रत्येकाला बदलून टाकेल असं आहे असंही मला म्हणायचं नाही. पण तार्किक अंगाने हे आपल्या भोवती काय चाललं आहे हे बघणाऱ्याला ह्या पुस्तकातले आयडेंटिटीबद्दलचे व्ह्यू रेसोनेट झाल्यावाचून राहणार नाहीत असं मला वाटतं. आणि तसं जर होत नसेल, तर परत एकदा माझ्या मते, वाचणारा तार्किक अंगाने न बघता फेटीशने बघणारा असेल असं मी म्हणेन. सेन ह्यांच्या लिखाण आणि तत्वज्ञानाबद्दल मला स्वतःला आत्तापर्यंत एकच ऑब्जेक्शन वाटली आहे, ती म्हणजे त्यांच्या लिखाणात असे एक अप्रत्यक्ष गृहीतक आहे की प्रत्येक माणूस चांगले-वाईट ठरवायला योग्य असा सारासार विवेक घेऊन आहे आणि हिंसा, किंवा भेदभाव हे सगळे अजिबात फंडामेंटल नाहीत. पण हे कदाचित माझे अर्धवटपण असेल. असो.
       आयडेन्टिटी आणि स्टिरीओटाइप करणे ह्या गोष्टी हातात हात घालून जातात. वर उल्लेखलेल्या चित्रपटात त्या ठासून भरल्या आहेत. जसे:
१.       बिहार म्हणजे गुंड आणि नेते ह्यांची युती. प्रत्येक नेत्याचा मुलगा हा गुंडाईमध्ये मश्गुल. गुंडाई म्हणजे सतत बलाढ्य पुरुषांच्या टोळ्या वाहने घेऊन इकडे तिकडे भटकत, वाटेत येईल त्याला मारत-तुडवत असणार. गुंडाई म्हणजे हवी तशी बाई उपभोगणं आलंच. बाई म्हणजे आयटम डान्स. आयटम डान्स म्हणजे बाईच्या बहुतेक छातीच्या आणि उरल्या वेळात बाकी अवयवांच्या घसघशीत हालचाली. ह्यातले काही स्टिरीओटाइप्स खरेही असतील, पण ते ‘बिहार’ ह्या आयडेंटिटीला चिकटून एकामागोमाग एक येतात.
२.       मराठी म्हणजे शिवाजी महाराज. पुढे काही बोलायला नको, कारण पुढे काही नाहीच.
३.       मराठी माणूस (पुरुष) म्हणजे मर्द.
४.       मराठी आई म्हणजे ‘स’ ची आई. अधिक स्पष्टीकरणासाठी.
५.       मराठी मध्यम वर्ग म्हणजे पापभिरू, नीतीमत्तापूर्ण (आणि अर्थात कपडे सांभाळू दूरदर्शी, आता हे मध्यम वर्गाचे वैशिष्ट्य का मराठी मध्यमवर्गाचे, हा हा!!) पण एकदा का तो जागला की त्याचे ‘यदा यदाही..’ असे कर्तव्य (म्हणजे आई-बाप आणि नातू ह्यांची बेगमी करणे ह्याच्या पुढचे जगाच्या नितीमत्तेच्या ओझ्याचे, दिल्या-घेतल्या शपथा पूर्ण करण्याचे) बजावल्यावाचून त्याला मुक्ती नाही.
          हे सारं कसं आलं ह्या चित्रपटात आणि कसं हे सगळं खालावत चाललं हो असा उर आपल्याला अजिबात पिटायचा नाही. हा काही अशा आयडेंटिटीच्या हाळी देणाऱ्या पहिला चित्रपट किंवा कलानिर्मिती नाही. आद्यमान तर ‘पानिपत’ ला द्यावा लागेल. हा चित्रपट असा आहे हे निरीक्षण एवढंच सांगतं की अशा प्रॉडक्टला डिमांड आहे. आणि डिमांड ही आयडेन्टिटीवर भाष्य करणाऱ्या निर्मितीला नाहीये, ती आयडेंटिटीचा नगारा बडवून, खतरे मे.. चा टाहो करून मग ही परमपवित्र आयडेन्टिटी जपणाऱ्या, वाचवणाऱ्या हिरोला आहे. अर्थात हिरोची डिमांड तर शाश्वत आहे, अव्याहत आहे. फक्त कधी हिरो आयडेंटिटीचे कातडे पांघरून येतो, कधी आयडेंटिटी हिरोचा मुखवटा घालून येते. 
          अर्थात आयडेन्टिटी कार्डची टिपिकल आयडेंटिटी वगळूनही आपल्या जगण्याची स्पेस निरनिराळ्या आयडेंटिटीजने कायम भरलेली असते. आणि बहुतेक आयडेंटिटीचे वैशिष्ट्य हे की तुम्ही ती मानता का नाही ह्याचे तिला काही सोयरसुतक नसते. दुसरा कोणीही तुमच्यावर ती टॅग करू शकतो, म्हणजे तुम्ही असे आहात किंवा नाही आहात असं. आणि मी आहे किंवा नाही ह्या दोन्हीत नसून मुळात मला ही निवडच मान्य नाही ह्या बचावाला काही अर्थ नसतो. म्हणजे तुम्ही देशभक्त आहात किंवा नाही आहात, म्हणजे देशद्रोही आहात  किंवा फायदे लाटणारे उपटसुंभ. मला माणसांशी घेणे-देणे आहे, देश वगैरे फक्त कन्स्ट्रक्ट आहात अशी तात्विकता एकदा का तुम्ही टॅग झालात की काही कामाची नाही. अर्थात वैयक्तिक स्तरावर आपण असे कुठलेही टॅगिंग मानावे का नाही हे झालेच. पण जिथे माणसाच्या एकांड्या स्पेसची प्रचंड चणचण आहे, आणि जिथे एकमेकांना घासून जगण्याला पर्याय नाही अशा वातावरणात टॅगिंग मोठा रोल घेतं.
असो. हे तर तात्विक भाष्य होऊ लागलं. आपण तर इथे घ्यायला आलो.
वरील ‘नीट’ प्रकारानंतर थोडा मनोरंजक चकणा म्हणून आपण गूफ अप्स पाहू.
१.       औरंगाबादमधून बिहारला जाणारी गाडी आणि MH 01 अशी नंबर प्लेट.
२.       कपड्यांचे अख्खे स्टोअर सोबत घेऊन एका पर्सनिशी पळून निघालेली नायिका.
३.       वैदर्भी किंवा उत्तर महाराष्ट्रात असलेली बोली बोलणारा नायकाचा मित्र, त्याचा गावाचा माणूस गोंदियामध्ये किंवा जवळच लॉज सांभाळतो, पण ह्या मुलाचा मामा कोळीवाड्यात टिपिकल कोळी वेशात आहे.
४.       एका दिवसांत पटण्यामधून महाराष्ट्रात येणारी चारचाकी प्रवासात गोंदिया जिल्ह्यात कशी पोहचते, म्हणजे नेमका कोणता रस्ता? (हे खुसपटपण असेल!)
५.       खूप झालं हे उंगली करणं.
आता थोडा चटपटा म्हणजे संवेदनशील आणि तपशील स्वरूपाचा खुसपट्या स्टार्टर मागवू. तो क्रमाक्रमाने घेऊ.
१.       चित्रपटात वापरलेली आडनावे: भोसले(नायक आणि वडिलांची वडा-भाजी ह्यांची गाडी), यादव (नायिका, वडील अगोदरच केंद्रीय मंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री व्हायची मनीषा असलेले, बाकी अर्थात गुंड), निंबाळकर (एन्काऊंटर किंग, भले त्याने राजकारण्यांच्या इशाऱ्यावर केले असतील गेम पण दिलाचा पवित्र) राणे, जाधव (दोन्ही धिप्पाड असे सहाय्यक बहुउपयोगी पोलीस ऑफिसर), सहस्रबुद्धे (अत्यंत हुशार आणि लाडका विद्यार्थी), कुंटे (झोलझाल वकील) (!) तरी महाराष्ट्र पुण्यवंत म्हणायचा, बिहारसाठी तर एकच आडनाव आठवतं सगळ्यांना.
२.       बिहारच्या इतक्या बाहुबली आणि परंपरानिष्ठ नेत्याची मुलगी औरंगाबादेत शिकायला येते (मला वाटायचं की पटण्याचे एलिट दिल्लीत जातात आणि एम.बी,ए वगैरे असेल तर नंतर मुंबईत येतात) आणि ह्या मुलीचा बॉयफ्रेंड आणि बेस्टफ्रेंड आहे, आणि बॉयफ्रेंडपेक्षा तिचा बेस्टफ्रेंडबरोबर जास्त असा पी.डी.ए. आहे. ही हायरार्कीला मारलेली टांग आणि न जुळणारी आधुनिकता मला तरी खटकली.
३.       बिहारचे कुठलेही क्रेडिबल शूटिंग नाही. बहुतेक दृश्ये महाराष्ट्रातच घेतलेली वाटतात, एखादा लोंग शॉट सोडला तर. मी विचार केला की मराठी चित्रपटाला असं पटण्यात शूटिंग करता येईल का हो! मला एक किस्सा आठवतो. एकदा आम्ही काही मित्र गप्पा मारत होतो, त्यात असाच राज ठाकरे आणि त्या वेळी त्याला मारायला आलेला आणि कुर्ल्यात बसमध्ये पिस्तूल घेऊन चढलेला एक तरुण ह्याची चर्चा निघाली. आणि टू माय सरप्राईज, एका बिहारच्या श्रीमंत, सुशिक्षित घरातल्या आय.आय.टी. मध्ये इंजिनिरिंग केलेल्या आणि फिनान्स मध्ये काम करणाऱ्या मित्राने म्हटलं, की मी कधीही एखाद्या मराठी माणसावर विश्वास ठेवू शकणार नाही. त्याची तेव्हाची गर्लफ्रेंड ही एक उच्चभ्रू महाराष्ट्रीयन होती. ती त्याला म्हणाली, की तू असं कसं म्हणू शकतोस. तर तो म्हणाला, की मुंबईतला बिहारी त्याच्यामुळे इतका असुरक्षित आहे. माझ्यासाठी हे म्हणजे कोड्यात कोडं होतं. म्हणजे एकतर करीअरची अशी दिशा असलेल्या माणसाला एकदम असा व्ह्यू असावा हे मुख्य. आणि त्यात त्याने एकाची द्वेषाची भूमिका दुसऱ्याच्या तशाच भूमिकेवर जस्टीफाय करावी हे. आणि एका ठिकाणी अनेकांना जो फार न्याय्य मुद्दा वाटतो त्याची दुसऱ्या ठिकाणी एकदम दुसरीच प्रतिमा असू शकते हेही.
कदाचित वरचा दाखला अनेकांना त्यांच्या कमी-जास्त तीव्रतेच्या मराठी फेटीशसाठी समर्थन देणारा मुद्दा वाटेल. पण मला त्यातून एवढंच परत जाणवतं की रिजनल आयडेन्टिटीचा फेटीश फार जबरी पसरला आहे.
काही जण अशा आयडेंटिटीचे क्लासिफिकेशन करतात. म्हणजे बिहारी किंवा महाराष्ट्रीयन (असं आपण म्हणत नाही, आपण मराठी म्हणतो) ह्यापेक्षा भारतीय मोठी आयडेन्टिटी. जातीपेक्षा धर्म ही मोठी आयडेन्टिटी. पण ह्यात अनेक विरोधाभास येतात. म्हणजे धर्म आणि देश ह्यांत काय तुलना. पण मग एक जबरी तोडगा म्हणजे व्याख्याच अशा करायाच्या की प्रश्न येउच शकत नाही. आणि अर्थात तार्किक कोडी ही पाश्चिमात्य संस्कृती झाली, श्रद्धा हवी, श्रद्धा, मग हे एकत्व जाणवतं. मज पामरास कोठली आली ही अनुभूती...
अजून एक म्हणजे इतिहासातल्या धार्मिक संघर्षाच्या आणि त्यातून झालेल्या धार्मिक स्वातंत्र्यावरील अन्यायांच्या निर्णयांचा हवाला देऊन त्याचे रिव्हर्सल हवे असणाऱ्या लोकांचा जो मोठा गट  आहे, त्यातले बहुतेकजण इतिहासातल्या जात उतरंडीतून जे अन्याय आणि स्वातंत्र्याचे प्रश्न झाले त्याचे रिव्हर्सल करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला विरोध असणारे आहेत. आणि हा त्यांच्या भूमिकेतला विरोधाभास त्यांना सांगितला तर तो ते ट्विस्ट करून परत तोच जस्टीफाय करतील. म्हणजे तोंडावर पडल्यागत.
हुश्श, फार झालं.
प्रश्न चित्रपटाच्या दुबळ्या ढाच्याचा किंवा विरीधाभासाचा नाही. प्रश्नही नाही कदाचित. आजूबाजूची गर्दी असे प्रश्न आणि विरोधाभास दररोज तुडवून आणि पचवून, एकमेकांना स्टिरीओटाइप करून तरी एकमेकांवर अवलंबून जगून पसरतेच आहे. मध्ये केव्हातरी तोंडी लावायला घेतल्यागत ती ह्या ना त्या आयडेन्टिटीचे झेंडे घेते, काही (म्हणजे दोन-चार, काही शे, ते लक्षावधी) माणसे, थोडी मालमत्ता ह्या तोंडी लावण्यात जाते आणि परत गर्दीचा आणि त्या मागचा जमवाजमवीचा प्रकार अव्याहत सुरू होतो. पण ह्या सगळ्याकडे बघून फिलोसॉफीकल स्टान्स घेणाऱ्या बघ्याला जाणवतं की बहुतेकांची कलेची गरजही किती साधी आहे, एकतर ती टिश्यू पेपर सारखी असावी. आठवड्याभराच्या उष्ट्या-खरकट्या प्रकाराला साफ करून, मेंदू मोकळा करून टाकणारी. उगा सिरीयस होऊ नका, मजा घ्या नाहीतर सोडा. किंवा मग तिने थोडे उत्तेजक डोस सोडावेत, आशावादाचे खत वाढत्या स्वप्नांच्या पिकाला द्यावेत. मग तपशील, भूमिका, विरोधाभास गेले कुठेही. एंटरटेनमेन्ट आणि आशावाद, सोबत निखळ च्युत्यापा.
       थिअरीचा एवढा मोठा पेग आणि सोबत एवढा चकणा, एका सिनेमाच्या दगडाला शेंदूर फासून बसवलेल्या आपल्या नित्य दैवताला एवढा निविद्य पुरे. 

Monday, February 3, 2014

अ रेनी (किंवा कुठलाही चालेल) असा डे

पुढे स्पॉईलर्स आहेत, नाविन्य जाऊन ओबडधोबड तात्विक वाटण्याचे नको असेल तर काळजी घ्यावी.

       एका शहरात आपली ठरलेली कामे संपवताना मधला रिकामा वेळ उगाच भरसटून न जाता काढण्याचा उपाव म्हणून मी थेटरात पोचलो. ७० रुपयात चित्रपट, तोही चांगल्या प्रतीच्या स्क्रीनवर ही मुंबईत माझ्यासाठी  गतवैभवाची किंवा कधीच नसलेल्या अद्भूताची (सकाळचे राखीव शो सोडून) बात आहे. तर अशा सर्व प्रस्तावानेनिशी स्क्रीनवर पाऊस पडू लागला आणि मला असे वाटले की मी गोवा-५३ नावाचा चित्रपट पाहतो आहे की काय! मराठी बोलणाऱ्याच्या विचारातून पुणे उणे होत नाही ते असेच बहुदा.
       तर एक जे हवे ते कसेही करून मिळवणारा, साधनशुचिता वगैरे नसलेला आणि ‘यश’ हेच काय ते एकमेव ध्येय मानणारा पुरुष आणि त्याची पत्नी ह्यांची गोष्ट. ती पावसाळ्यात, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातही घडू शकते अशी. गोष्टीची एकदम दमदार बाजू म्हणजे तिच्यात केलेला परा-मानस किंवा सुपर-कॉन्शस म्हणता येईल अशा स्टोरी-टेलिंगचा वापर. मायबाप जागतिक सिनेमाच्या आपल्या सूक्ष्म अनुभवात ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ मध्ये ह्याच्याशी साधर्म्य असलेल्या तंत्राचा वापर केलेला आहे. आणि आपल्या परसदारी असलेल्या पण बहुतेक फुले आपल्याच अंगणात पडणाऱ्या हिंदी मध्ये ‘तलाश’ आणि ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ आठवतात. अर्थात हे तीन चित्रपट आपल्या लिस्टेत आहेत म्हणून हा समजलाच असं काही नाही.
       आता चित्रपटाची घ्यायची म्हटली तर दोन बाजू: एक म्हणजे अतीव कलात्मकता. म्हणजे काही वेळा ती गोष्टीवर चढून आपली मजा घेऊ लागते. म्हणजे संवाद होत असताना एकदम त्रयस्थ कोनातून कॅमेरा आपल्याला दृश्य दाखवू लागतो. काही वेळा संवाद, सीन्स संपले की गाडीचा पार्श्वभाग किंवा घनगच्च आकाश किंवा झाडे किंवा भीतीच्या छटा असलेली पेंटींग्स असं काही काही लांबटपणे तरळत राहतं. काही प्रसंगांमध्ये त्यांची तीव्रता नाही तेवढ्या तीव्रतेचे विज्युअल्स किंवा साउंड इफेक्टस्. अर्थात ह्यात वैयक्तिक खोचकपणा पुरेपूर आहे हे झालंच. केवळ तांत्रिक मूल्यांनी पाहिलं तर ह्या साऱ्या गोष्टी जबरी जमल्या आहेत. पण गोष्ट सांगताना त्या काही अधिकचे देतात का तर तिथे प्रश्नचिन्ह आहे.
       दुसरा मुद्दा तसं पाहिला गेलं तर मराठी निर्मितीच्या जनुकीय रचनेचाच असावा. तो म्हणजे सामाजिक कमेंट करण्याचा. अर्थात मायबाप पुणे-५२ एवढा हा टॅंजंट मारत नाही. फिस्कल डेफिसिट, इन्व्हेस्टमेंट आणि कॉर्पोरेट ह्या सगळ्या गोष्टी इथे बऱ्यापैकी जोडलेल्या आहेत. पण जोडताना भांडारकर साहेबांची इन्व्हर्स आठवण यावी एवढा क्लीशेड प्रकार झाला आहे. म्हणजे उद्योजक म्हटले की सरकारची परवानगी न घेता किंवा त्यांना फसवून हवे ते करू पाहणारे, नेते आणि मंत्री म्हणजे उद्योगांचे धार्जिणे आणि एका फोनवर कोणाचाही गेम करू शकणारे, अॅक्टिव्हिस्ट म्हणजे सचोटीचे, पर्यावरण आणि स्थानिकांच्या वतीने लढणारे एक खांबी किल्ले जे लढाईत शेवटी हरतात, प्रोफेशनल करिअर करणारी बाई म्हणजे ती करिअरसाठी किंवा कंपनीसाठी कोणाबरोबर तरी झोपतेच आणि हे सगळं वापरून सगळ्यांना विकत घेऊ पाहणारे एक मुख्य पात्र. कदाचित ह्यातल्या काही गोष्टी ह्या अशाच असतील. पण जर प्रत्येक गोष्ट अशी गृहीतकांना खो देत देतच चालली तर ती बोरिंग होते. मला तर झाली आणि थेटरातले रीफ्लेक्सिव्ह उमाळे आणि सुस्कारे असेच होते. आणि काहीवेळा शक्यतांचे दोर जाम ताणून ताणून जमवलेल्या गोष्टी, जसे अस्वलाचा मुखवटा आणि डेअरीच्या मुखवट्याआड हातभट्टी!
       वानगीदाखल:
- -    प्रत्येक माणसाला एक प्राइस टॅग असतो आणि मी तोच शोधत असतो. (ले बेटा, आपण तर रिनोव्हेशन सेल मध्ये जन्माला आलो इथे!)
-   -  विकास, विकास म्हणजे कोणाचा विकास? (अॅंग्री ओल्ड अॅक्टिव्हीस्ट)
-    - बाकी साऱ्या नशा परवडल्या, पण ही मूल्यांची नशा उतरता उतरत नाही (किंवा तत्सम)
-    - संस्कार आणि प्रतिष्ठा हीच मध्यमवर्गीय माणसांची संपत्ती (साश्रु नयन आणि अनावर हुंदके)
-    - चोरलेल्या पैठणीपेक्षा साधं नेसूचं लुगडं अंगावर खुलून दिसतं. (..........)
-    - मला माझ्या मुलाला प्रामाणिक आणि खरा श्रीमंत करायचं आहे. (अशीच अमुची आई असती...)
तर असे अनेक मोती ह्या पावसाळ्यात दडलेले आहेत. अलोकनाथ स्माईल देणारे बाप, प्रत्येक कृतीत संस्कार आणि सुविचार आणि संस्कृती आणि स्स्स... असं सगळं ‘स’ कारात्मक देत जाणारी स ची आई असा ऐवज असताना ह्या देशात एवढे दुर्गुण आले कुठून ह्याचा शोध आता भागवताच्या ‘इंडिया-भारत फरक योग’ अध्यायात घ्यावा लागेल. असो.
तशी अजून एक गंमत आहे, ती म्हणजे मोठेपणाच्या सगळ्या कृती ह्या लहानपणीच्या वागणुकीने कशा बनतात हे सिद्ध करणे. जी.ए.नी ह्या प्रकारची मजा घेतली आहे. ते कुठेतरी असं काही की म्हणतात, की आत्मचरित्रात आत्ता थोर असलेली माणसे कशी लहानपणी सोवळ्या चड्डीत दिसत ह्याचे फोटो टाकले जातात. किंवा पुढे मागे अपत्याने जी लंबी छलांग घेतली त्याची गुत्थी लहानपणी बांधलेल्या लंगोट आणि कडदोऱ्यात असे (हे आपले वाक्य!) त्याचेही प्रत्ययकारक प्रसंग सदर चित्रपटात आहेत.
आजचे नित्यप्रसवा साहित्यिक असे जे एक संपादक महोदय आहेत त्यांच्यासाठी तर हा चित्रपट खास अँटीडोट आहे. म्हणजे ते मनाचे श्लोक असावेत तसे धनाचे श्लोक लिहितील एवढ्या उंचीला आहेतच. आणि त्यात गुगल, विकी आणि बाकी अन्तरराष्ट्रीय प्रवासातील मौलिक वेचे ह्यांचे नित्य संस्कार सूक्त असा समांतर कार्यक्रम आहे. ह्या कल्पनेने मला कुठे कुठे गुदगुल्या होऊन राहिल्या आहेत की महोदय हा चित्रपट पाहता आहेत आणि नंतर त्यांची मध्यमवर्गीय दांभिक मूल्यछेदक लेखणी घेऊन ते सपासप वार करत आहेत.
सटायर अपार्ट J! प्रश्न तर तोच येतो की बनवणाऱ्याला हे सगळं जाणवत नाही का का तो त्याच्या कल्पनेपासून खूप जवळ असल्याने त्याला केवळ त्या कल्पनेची धुंदी जाणवते. आणि कथेला निखळ वैयक्तिक प्रतलावर का ठेवत नाहीत, विशेषतः तेव्हा जेव्हा कथेतील कोअर टेन्शन जे आहे ते दोन व्यक्तींच्या नात्याचे, त्यातल्या गृहीतकांचे आणि त्याला जाणाऱ्या छेदांचे आहे. इथे तसं पाहिला गेलं तर ‘अ रेनी डे’ ला झुकतं माप दिलं पाहिजे. कारण तो ‘ही पहा माणसे आणि पहा कशी ती सामाजिक परिस्थितीने झुलत आहेत’ असा सरळसोट डोंबारी प्रयोग करत नाही. त्यात सामाजिक कमेंट पार्श्वभूमीला आहे आणि ती तशीच ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे. मज नाठाळाचे निरीक्षण एवढेच की ही पार्श्वभूमी ठोकळेबाज होते आणि प्रेडिक्टेबल झाल्याने दोन माणसांच्या गोष्टीला पुरेशी तीव्रता देत नाही.
तरीही गोष्ट सांगण्याच्या एका वेगळया प्रयोगासाठी....
आगामी आकर्षणे: (ट्रेलर्स वर आधारित)
१.       संभाव्य जोगवा- २ उर्फ प्रियतमा

२.       सई देवधर         

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...