Friday, November 15, 2013

माझाही श्रद्धांजलीपर लेख

सचिन तेंडूलकर निवृत्त होणार ह्या गोष्टीचा गवगवा फेसबुक, वृत्तपत्र असा सगळीकडे चालू आहे. आणि त्यात लिहिणारे देश, करोडो लोक हा शब्द इतक्या सहजी वापरतात की काहीवेळा मला वाटतं की खरंच गोष्टी इतक्या मोठया स्केलच्या असतात का? मला असा कुठलाही डावा किंवा उजवा आक्रोश करायचा नाही की काय हा गाढव देश, एवढ्या समस्या किंवा इतर अभिमानास्पद गोष्टी असताना ह्या एका कॉलोनियल खेळाचे, त्यात खेळून गब्रू झालेल्या एक खेळाडूचे गुणगान करत बसतात. माझा प्रश्न एक कुतूहल आहे, की आत्ता ह्या वेळेला (काही मिनिटांपूर्वी तो देवनारायणच्या बॉलिंगवर आउट झाला आहे) किती लोक त्याची बॅटिंग पहात बसले असतील? म्हणजे वानखेडेवर साधारण ५०००० असतील. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात जवळपास २५ करोड घरे आहेत. त्यात सुमारे ४८% लोकांकडे ती.व्ही आहेत. म्हणजे जवळपास १२ करोड टी.व्ही. झाले. त्यातले किती करोड आत्ता चालू असतील? मी माझ्या जवळच्या १२ किंवा १२० घरांना पाहिलं तर साधारण ५-६ टक्के प्रमाण असावं, म्हणजे ६० लाख लोक टी.व्ही वर बघत असतील आणि साधारणपणे ऑन अॅव्हरेज एक माणूस तो टी.व्ही. बघत असेल. परत ह्यात शेतकरी किती असतील, दैनदिन मजुरी करणारे किती असतील, महिला किती असतील, अपंग किती असतील, अनुसूचित जाती-जमाती मधले किती असतील, ईशान्य भारत आणि जम्मू-कश्मीर मध्ये किती असतील, मुंबईत किती प्रमाणात असतील आणि मुंबईच्या बाहेर किती प्रमाणात असतील असे बरेच बारकावे आहेतच. पण म्हणजे अगदी लिबरल गेस वापरला तरी ६०-७० लाख लोक  ते १ करोड लोक पाहतात, तेही प्रामुख्याने एक प्रकारचे म्हणजे नोकरदार, सुस्थितीतले असण्याची शक्यता जास्त तरीही एखादी घटना देशव्यापी बनते. म्हणजे स्वतःला एक्सप्रेस करणाऱ्या लोकांना असं वाटू लागतं. आणि हा सचिन चाहत्यांचा आकडा नक्कीच अण्णा हजारेंच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यात आलेल्या लोकांपेक्षा जास्त असेल, निर्भयाच्या वेळी मेणबत्त्या पेटवून आलेल्या लोकांपेक्षाही जास्त असेल. म्हणजे ह्यावरून काय समजायचं? काय समजायचं हा तसा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
       तसं एकूणच ह्या निवृत्तीच्या प्रकाराबाबत लिहावं का नाही हा प्रश्न मला पडला होता. म्हणजे इतक्या गंभीर किंवा महत्वाच्या गोष्टी आहेत लिहायला, निवडणुका आल्या आहेत किंवा आर्थिक बाबी आहेत, सामाजिक समस्या, स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, किंवा धर्म आणि त्याबाबतचे प्रश्न, किंवा विकास जो तर कसाही कुठूनही पाहता, बघता, लिहिता, वाचता येतो. पण इतके लोक हे सचिन, सचिन करतायेत, आणि मी व्यसनी माणसागत माझं फेसबुक, गुगल न्यूज, किंवा बाकीची तमाम सदरे बंद करून बसूही शकत नाहीये. मला गंमत येतीये, मध्येच तेच तेच वाचून डोकंही उठतंय आणि त्याचवेळी आपणपण आपल्या दोन-चार लावून द्याव्यात, कसं तेंडूलकर महान नव्हता हे समीक्षक, सिनिकल होऊन मांडावं अशी खुमखुमीही येतीये.
       लोकसत्ता आणि अन्य मराठी वृत्तपत्र ह्यांनी अत्यंत भावूक विनोदी लेख छापायला सुरुवात केली आहे. म्हणजे अखेरचा हा तुला दंडवत, किंवा ठाणेकर फडक्यांनी जपल्या डोंबिवलीकर सचिनच्या स्मृती, किंवा वानखेडे बेभान-वेडे (आभार: लोकसत्ता, त्याचे संपादक, त्याचे मालक आणि जे कोणी) म्हणजे सचिन मेला आहे, का रिटायर होतो आहे हे कळू नये. मुळातच एखाद्या बद्दल बेल-भंडारा उधळून त्याला ईश्वरी अवतार करण्याची कला ही मराठी लिहिणाऱ्याला उपजतच येत असावी, थोडे शहाणे अधून-मधूनच निपजतात. संझगिरीनी म्हटलंय की वानखेडेवर गवताची पाती रडत असतील, ते दंव नसेल त्यांचे अश्रू असतील (कोणीतरी शेअर केलेला फेबु मेसेज). अरे वा!! आता वानखेडेवर परत या, परत या, सचिन तेंडुलकर परत या असं सुरू झालं की मिळवलंच. तसेही कसोटी मध्ये ३००, ४००, ५००, ६०० रन असे रेकॉर्ड्स बाकी आहेत. अनुक्रमे नेपाळ, पापुआ न्यू गिनी, झैरे आणि झांबिया ह्यांना कसोटी दर्जा देऊन तेही मिळवता येतील. आणि असे केल्याचा दुसरा फायदा म्हणजे रविचंद्रन अश्विन हा झपाट्याने ५००-६०० विकेट घेऊन आणि कसोटीत त्रिशतक करून मोकळा होईल. त्यामुळे ह्या सूचनेचा श्रीनिवासन, पवार आणि बाकी क्रिकेटच्या सदोदित हितचिंतकांनी विचार करावा अशी नम्र विनंती.
       ह्या श्रद्धांजलीपर लेखांचा अजून एक प्रकार आहे. एक म्हणजे सचिनची थोरवी स्पष्ट करणारे लेख. म्हणजे साहित्य सहवासच्या प्रांगणात, तिथल्या वातावरणात सचिनने जी मूल्ये आत्मसात केली ती कशी त्याला उपयुक्त ठरली असं. किंवा सचिन हा कसा मुंबईच्या स्पिरीट चे प्रतिनिधित्व करतो असं. किंवा रामचंद्र गुहांचा हा युटीलिटी दर्शवणारा लेख, की कसं सचिन तेंडुलकरने जाती भेद थांबवण्यात मदत केली आहे, ज्या देशात रोल मॉडेल्सची कमी आहे (म्हणजे होती, आत्ता फेसबुक वर क्लिक कराल तिथे प्रेरणा आणि रोल मॉडेल्स आहेत, नाहीतर ते, अहो ते, ते युगपुरुष, तेच तेच, हा तेच, नेतृत्व, ते आहेतच) त्या काळात सचिन एक रोल मॉडेल बनला आहे. त्याने कशी भारतीय समजला पटणारी मूल्ये आत्मसात केली आहेत, जसं तो उगाच वाद-विवाद करत नाही, तो आपल्या बायको आणि मुलांशी प्रामाणिक आहे, त्याने कधी विरोधी खेळाडूंना तोंडाने शिवीगाळ केली नाही, त्याने कसं नवोदित खेळाडूंना घडवलं आहे असं. मला माहीतच नव्हतं ही भारतीय समाजाला खूप आवडणारी मूल्यं आहेत. मला तर वाटतं की फेरारीचा कर भरताना काही सवलत मिळते का हे बघणे, संघातील एक जबरी खेळाडू असताना कर्णधार (अझरुद्दीन) आणि उपकर्णधार (जडेजा) हे सामना-निश्चित प्रकरणात सापडतात तेव्हा काहीही न बोलणे, आपला मुलगा शालेय स्तरावरच्या क्रिकेट मध्ये कसा पुढे येईल ते बघणे (धीरूभाई अंबानी शाळेच्या पालकांनी सचिनवर थेट नाही, पण असा आरोप केलेला आहे!) आणि मुख्य म्हणजे आपल्या अन्तेष्टीसाठी आफ्रिकेची टूर बदलून वेस्टइंडीजला बोलवायचा घाट घातला जातोय आणि क्रिकेटला डब्ल्यू.डब्ल्यू.इ केलं जातंय असं दिसताना पण काही न म्हणणे ही खरी मूल्ये तो आपल्याला शिकवतो. गप्प बसून आपले आणि आपल्या जवळपासच्या लोकांचे कपडे सांभाळणं हेच खरे भारतीय मूल्यशिक्षण असा मज खुसपटी माणसाचा खवचट समज आहेच म्हणा! पुढे मागे क्रिकेट माझा श्वास अशा आशयाच्या आपल्या आत्मचरित्रात सचिन ह्या सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश पडून माझा कपाळमोक्ष करेल हे तर आहेच.
       पण आपण परत रामचंद्र गुहांच्या लेखाकडे येऊ. म्हणजे त्यांनी तिथे म्हटलंय की सचिन हा ग्रेटेस्ट आहे असं काही म्हणता येणार नाही. म्हणजे ग्रेटेस्ट खेळाडू ही एक पातळी आहे आणि तिथे सचिन सोबत बाकीचेही आहेत. त्यांच्या लेखी सचिन वर एवढे भारतीय एवढं प्रेम करतात हे महत्वाचं आहे.
       ठाऊक नाही. सचिन मुळे टी.व्ही बघायला सगळ्या जातीचे लोक एकत्र आले आणि त्या आरडा-ओरड्या मधून जातीभेद कमी झाला असेल. पण आज जे खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळतायेत त्यांच्यात जातींचे काय प्रमाण आहे? असं नाही का झालं की क्रिकेटचा झपाट्याने बाजार होताना तो बाजार शालेय, अंडर-१७, अंडर १५  स्तरापर्यंत झिरपण्यात सचिनने हातभार लावला. सचिनने जातीभेद कमी केला म्हणताना मला हिंदूंच्या संघाला (१९४० मध्ये, वाचलेल्या गोष्टी, आणि ह्यात हिंदू संघटनांचा काही हात नसे!!) जिंकवून देऊनही ज्याला शेवटच्या सभारंभात वेगळं बसायला लागलं त्या बाळू पालवणकरची आठवण आली. मुंबईला क्रिकेटचं वेड लावण्यात ह्या बाळू पालवणकर (आणि त्याचा भाऊ विठ्ठल)चा मोलाचा सहभाग आहे, तोही अशाच चाळीशी पर्यंत क्रिकेट खेळला आहे आणि प्रेरणा वगैरेचे डोस घ्यायचे असतील तर तेही त्याच्या स्टोरीत ठासून आहेत. पण आज त्याच्या नावाने मुंबईच्या क्रिकेट मध्ये काही नाही. ज्यांना इतिहासाचे झेंडे घ्यायचे आहेत त्यांसाठी खास सूचना, हॅरिस शिल्डचे नाव बदलून पालवणकर शिल्ड करायला हवेच, हवेचचच!!
       मला स्वतःला वाटतं की आपण सिनेमा, पुस्तक ह्यांच्याकडे बघताना जी चूक करतो तीच क्रिकेट कडे बघताना करतो. खरं आहे ते शेवटी डर्टी पिक्चरचं बोधवाक्य, एन्टरटेनमेन्ट! एन्टरटेनमेन्ट!! एन्टरटेनमेन्ट!!! एन्टरटेनमेन्ट एवढा महत्वाचा घटक नाही. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर (आणि सेहवाग, गांगुली, कोहली, युवराज), बाबासाहेब पुरंदरे लोकप्रिय असण्यामागे एकच घटक आहे तो म्हणजे तो म्हणजे घटकाभर आपणच साऱ्यावर राज्य करणारे हिरो आहोत एवढी किक ते देऊ शकतात. आज भी मै फेके हुये पैसे नाही उठाता, किंवा शतकांच्या अंधारामागून येणारी एक केशरी ज्वाला किंवा सहा फिल्डर लावूनही जाणारा ऑफ ड्राईव्ह, किंवा फ्लिक करून ब्रेट लीला थेट छतावर फेकणारी सिक्सर किंवा डीप स्क्वेअर लेग असतानाही तिथेच फटका मारायचा अट्टाहास ह्यात एकच मजा आहे ते म्हणजे सिच्युएशन तर फूल वाईट आहे पण हिरो हवं ते करतोच. आणि आपल्या आयुष्यात आधी जन्माला येऊन करोडो मधला एक होत शाळा, संस्कार असं जमेल तसं होत होत एकगठ्ठा वाढणं, आपले आई-बाप सांभाळणं, मग बायको-मुलं बघणं, त्यात होईल तशी आपली विडी-काडी आणि रंग-ढंग करणं, मग मरणं अशा एककलमी कार्यक्रमात असणाऱ्या जनतेची मनोरंजन ही गरज असणारच. आपल्या दोन एकराचे चार व्हावेत, दहाचे वीस, वीस हजाराची नोकरी चाळीसची व्हावी, एका फ्लॅटचे तीन व्हावेत आणि वर सेकंड होम, हनिमून केरळाला झाला आता युरोप व्हावा अशी स्वप्नं म्हणजे आपल्या जगण्याची एक्सटेंशन्स. म्हणजे त्यात काय गंमत नाही. मग राहिली एन्टरटेनमेन्ट. आणि एकदम विजयी विश्व करणाऱ्या स्फुरक स्फोटक प्रकारची गंमत कुठेच नाही. आणि सचिन तेंडुलकरने ती दिली जेव्हा त्याच्या आजूबाजूचे कोणीच ती देत नव्हते. सिद्धू, अझर, संजय मांजरेकर, कांबळी ह्या प्रकारात (गेला बाजार जडेजा वेगळा होता म्हणा) अशा प्रकारात मॅकग्राला लॉंग ऑन वर फेकून देणारा सचिन (वानखेडे १९९६) ही वेगळीच गोष्ट होती. मला सचिन लक्षात राहिला आहे तो त्याची बॅटिंग बघताना काहीवेळा मिळालेल्या अशा मजेमुळेच. त्याची शारजाची १४३ ची इनिंग, त्यातल्या त्याच्या स्ट्रेट सिक्सेस आणि मागे टोनी ग्रेगची तोंड फाटून कॉमेंट्री, आणि मुख्य म्हणजे बरीच जनता भारत १०० च्या आसपास ४-५ विकेट टाकून लुडबूडतोय असं पाहून झोपी गेली, मग धुळीचं वादळ आणि मग सचिन. भारत तो सामना जिंकला नाही, पण त्याची काही फिकीर नव्हती. तशी त्याने कॅडिकला मारलेली पूल सिक्स, ब्रेट ली दिलेला स्ट्रेटड्राईव्ह आणि अगदी मागच्या टेस्ट मध्ये शिलिंगफोर्ड ला मारलेल्या दोन ऑनच्या फोर, मुश्ताक अहमदला पुढे येऊन फेकलेल्या सिक्सेस, जयसुर्याला दिल्ली १९९६ च्या सामन्यात दिलेली लेट कट, १९९९ च्या सामन्यात केनियाविरुद्ध एक रिवर्स स्वीप, पाकिस्तान विरुद्ध रावळपिंडी २००४ ची इनिंग आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३५० चेस करताना केलेले १७५.
       ही शेवटची इनिंग मला जास्त आवडते. खरं म्हणजे मी जेव्हा मॅच बघायला बसलो तेव्हा मला काही समजत नव्हतं. काहीतरी व्यक्तिगत च्युतेपणा करून मी उगाच सुन्न अवस्थेत होतो. आणि ना धड काही वाचता येतंय किंवा कोणाशी काही बोलता येतंय अशा अवस्थेत मी मॅच बघत होतो. आणि जेव्हा स्कूप करण्याच्या नादात सचिन आउट झाला आणि पुढे प्रवीण कुमार आणि कंपनीने गोंधळ घालत हातची मॅच घालवली तेव्हा मला काहीही वाईट वाटलं नाही. ती इनिंग बघून मी जसा पूर्ण हलका होऊन गेलो होतो. मजा तशीही ह्यातच असते की पूर्ण क्षमतेने लढूनही शेवटी आपण हरतो आणि त्याची जखम याद राहते. आनंद तर विसरले जाणारे असतात.
       माझं क्रिकेट बघणं ह्यात दोन टप्पे आहेत. एक देशाभिमानी टप्पा आणि एक अस्तित्ववादी टप्पा. देशाभिमान टप्प्यात मी प्रत्येक गोष्ट जसं क्रिकेट, रस्त्यावरची वाहतूक, स्वतःचे आणि बाकीच्यांचे छोटे-मोठे डिसिजन हे सगळं देशाभिमान परस्पेक्टीव्हनेच बघायचो. अर्थात क्रिकेट बघावं का नाही हा प्रश्न मी वगळला होता. पण जेव्हा केव्हा बघायचो तेव्हा भारताची टीम म्हणून बघायचो. सामना जिंकणं-हरणं हे देशाचा मान-अपमान अशा भावनेने बघायचो. तेव्हा सचिन ही गोष्ट फार वाटायची नाही. किंबहुना तो खेळला की टीम हरतेच असं काहीसं समीकरण मनात होतं. आणि उदाहरणादाखल खूप गोष्टी होत्या, जसं कोलकाता २००१, नॅटवेस्ट ची फायनल २००२, अॅडलेड कसोटी ह्या सगळ्यात सचिनच्या बॅटिंगचा खूप वाटा नव्हता. अर्थात मी हेडिंग्ले कसोटी विसरतोय. त्याच्या भारतातल्या इनिंग्स आठवत नाही कारण तेव्हा त्याच्यापेक्षा कुंबळे जास्त मोठा मॅचविनर वाटायचा किंबहुना भारतात टेस्ट म्हणजे कोल्हा-करकोचाची गोष्ट असंच वाटायचं. घ्या आता मजा. पुढचं पुढं बघू असं.
       नंतर पुढे देशाभिमान ह्या गोष्टीलाच प्रश्न पडले. नेमकं काय मॅटर करतं असं वाटायला लागलं. पण त्यावेळेला क्रिकेट एक प्रकारे रीडिस्कव्हर झालं, म्हणजे प्युअर एन्टरटेनमेन्ट म्हणून. मी काही क्रिकेट कोचिंग घेतलेलं नाही. मला आधी फीट मूव्हमेन्ट किंवा लाईन-लेंग्थ हे स्वतः बॅटिंग-बॉलिंग करताना काही कळायचं नाही. पण करताना मजा यायची, ती त्यातल्या इंस्टिंक्ट्समुळे. आपल्याही नकळत आपला मेंदू, शरीर अंदाज घेतो, आपले पाय, मनगट हलतं आणि काहीतरी घडतं. इट्स फन, इमेन्स फन. आणि ही डिस्कव्हरी सही होती. अशीच मजा मला नंतर बॅडमिंटन खेळताना यायची. गेम समजायचा, कुठे प्लेस करायला हवं, पाय कसे हलायला हवेत हे जाणवायचं पण सराव नसलेलं आळशी शरीर कळण्यापेक्षा इंस्टिंक्ट्स वापरायचं प्रेफर करतं हे कळायचं. सराव, कोचिंग, त्यातून येणारं स्किल्स ह्यात एक गिरवलेला बोअरडम आहे. त्यात मजा काय, अनिश्चितता काय. हा म्हणजे अक्रम आणि मॅकग्रा ह्यांची बॉलिंग बघण्यातला फरक आहे. किंबहुना द्रविड आणि लक्ष्मण ह्यांच्यातला.
       मला वाटतं सचिन खेळायला लागला तेव्हा तो इंस्टिंक्ट्स अधिक वापरायचा. म्हणजे त्याच्याकडे कौशल्य नव्हतं असं नाही. ते होतंच, सराव करून पक्कं स्कील. पण त्याचा गेम भावला कारण तो इंस्टिंक्ट्स वापरून आक्रमक खेळत जायचा. आणि कदाचित त्यामुळे तो कधीही आउट होऊ शकेल असा व्हल्नरेबल होता. दोन गोष्टी असाव्यात ज्यामुळे त्याने कदाचित आपली बॅटिंग रि-डिफाइन केली, एक म्हणजे व्हिडीओ अॅनालिसिसचं वाढतं प्रमाण आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवून वागू शकणारे बॉलर्स आणि दुसरं म्हणजे त्याची पाठीची इंज्युरी. त्यानंतर त्याचा गेम बदलला, म्हणजे इंस्टिंक्ट्स सेकंडरी झाले आणि स्कील अप्लाय करणं वाढलं. मला वाटतं इथेच त्याचा सपोझेडली नंबर फेटीश सुरू झाला असावा. कारण नंबर्स टारगेट देतात. आणि मग तुम्ही त्या टारगेटचे स्वतःला गुलाम बनवू शकता. ही टारगेटची बाब २०११ वर्ल्ड कप नंतर अधिक स्पष्ट झाली. सचिनने २०११ वर्ल्ड कप नंतर फक्त १ शतक केलं, १००वं, बांगलादेश विरुद्ध, तेही ९० नंतर सावकाश खेळत आणि त्या ५-१० रन शेवटी शेवटी डिफेंड करायला कमी पडल्या. त्याच्या एकूण टीम मेंबर करियरचं इतकं मोठं टारगेट वर्ल्ड कप नंतर संपलं होतं की त्याच्या बॅटिंग मधली पोकळी दिसत होती. तरीही तो २०० कसोटीसाठी का खेळत राहिला हे मला कळू शकत नाही. कदाचित तो स्वतःला चॅलेंज करू पहात असेल. हर्षा भोगलेने क्रिकइन्फोच्या लेखात म्हटलं तसं त्याच्यासाठी किवा कोणत्याच ग्रेटसाठी केव्हा थांबावं हे ठरवणं सोपं नसणार. मर्यादा स्वीकारणं ही कोणालाही कठीण गोष्ट, मग ज्याच्यात क्षमता आहे त्याला तर अजून कठीण. मला स्वतःला तो ९९ शतके आणि वर्ल्ड कप फायनल ह्या सोबत रिटायर झालेला अधिक आवडला असतं. मागची दोन वर्षे त्याला बहुतेक वेळा खुरडताना आणि मध्येच केव्हातरी त्याच्या जेन्युइन स्किल्सची झलक दाखवताना पाहणं कठीण होतं. सगळ्यात वाईट तर होतं जेव्हा वानखेडेवर पनेसरने त्याला च्युत्या बनवत बोल्ड केलं. (वानखेडे म्हटलं की २००६ साली ह्याच मैदानात त्याला बू करण्यात आलं होतं, जेव्हा शेवटच्या दिवशी शॉन उडाल नावाच्या एका ऑफ स्पिनरच्या बॉलिंग वर सचिन आउट झाला, भारत १०० ऑल आउट, सचिन ३४ सर्वाधिक स्कोर, भारत टेस्ट हरला. आज त्याच्या नावाने मुरली विजय आउट झाल्यावर ओरडणाऱ्या स्टेडियम मध्ये कोणाला हे आठवतं का!!)
       माझ्या क्रिकेट बघण्याला सचिन च्या किंवा कोणाच्याही रिटायर होण्याने फरक पडणार नाही. मला रस्त्यावरच्या अंडरआर्म मॅच मध्ये मजा आहे, आयपीएल मध्ये आहे, अॅशेस मध्ये आहे आणि वर्ल्ड कपमध्ये आहे. पण क्रिकेटची डब्ल्यूडब्ल्यूइ बनू नये असं मला वाटतं.
       सचिन रोल मॉडेल आहे का नाही, त्याने जातीभेद, आर्थिक विषमता कमी जास्त केली का नाही, तो सच्छील आणि चांगल्या चरित्राचा आहे का नाही ह्याचं मला काही घेणं देणं नाही.
       भारताची आफ्रिकेत १९९६ साली टेस्ट सिरीजमध्ये धुलाई होत असताना दुसऱ्या टेस्टमध्ये सचिन आणि अझर ५व्या विकेट साठी एकत्र होते. डोनाल्ड, पोलॉक आणि बाकीच्यांच्या बॉलिंग समोर भारत ८० ला ५ अशा अवस्थेत होता. तेव्हा नवीन असलेले गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण तिघेही बाद झाले होते. पण नंतरचे दोन तास अझर आणि सचिन ने २०० रन्सची पार्टनरशिप केली. कोणताही बॉलर त्यांना आउट करू शकत नव्हता. शेवटी अझर रनआउट झाला आणि ती पार्टनरशिप संपली. पण ते जेव्हा खेळत होते, तेव्हा ते त्या २२ यार्डस् चे बादशहा होते आणि त्यांची बॅटिंग बघणं, ती सुद्धा तेवढ्याच टेस्टिंग बॉलिंगसमोर ह्यासारखी मजा नाही.
आय थँक यू मिस्टर सचिन तेंडुलकर, ब्रँड अॅम्बेसेडर ऑफ कमोडिटी कॉल्ड गेम ऑफ क्रिकेट इन इंडिया, फॉर गिव्हिंग मी सच प्लेझरेबल एक्सपिरियन्सेस.
बाकी त्याची श्रद्धांजली पूर्ण करताना मला लोकसत्ता, फेसबुक ह्यांच्यामुळे जे बोध झाले त्यांना तोड नाही. एकूणच मिडिया आपल्याला काय चालले आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत असताना माणसे कशी आहेत हे आपोआप दाखवून देण्याचे प्रयोग होत असतात त्यालाही तोड नाही.
       बाकी अजून नरेंद मोदी किंवा राहुल गांधी ह्यांनी सचिनच्या निवृत्तीबाबत काहीच कसे म्हटले नाही ह्याचे मला नवल वाटते आहे. त्यांचे पाठीराखे आणि विरोधक नक्कीच ह्या देशापुढच्या ज्वलंत प्रश्नाची दखल घेतील अशी मी आशा करतो.
       मला आनंद सिनेमा मधले एक वाक्यही आठवते आहे, ते म्हणजे जिंदगी लंबाईसे नही गहराईसे नापनी चाहिये, हे वाक्य क्रिकेटला लागू होते का?
       रामचंद्र गुहांच्या ‘कॉर्नर ऑफ अ फॉरेन फिल्ड’ मध्ये त्यांनी मुंबई मधले १९४०च्या दशकातले पंचरंगी (धार्मिक संघातले) सामने आणि त्याबाबतचा दर्शकांचा उत्साह, निराशा आणि एकूण ‘बेभान वेडेपण’ ह्यांचे वर्णन केले आहे. त्यावेळी हा सामन्याची तिकिटे त्या वेळच्या मानाने स्वस्त असत आणि बरेचसे लोक सामना फुकट बघत. नंतर आपण, म्हणजे भारत देश असं काहीतरी स्वतंत्र वगैरे झालो, मग थोडी स्थिरता, थोडी अधोगती आणि मागच्या २० वर्षांत तर प्रगती झाली. क्रिकेटचे तर आपण बाहुबली झालो, एकवेळ लंगडा त्यागी होतो. पण बेभान वेडेपण आहेच. फक्त तेव्हा त्या फाटक्या लोकांचं होतं, आज कॉर्पोरेट आहे. तेव्हा विठ्ठल पालवणकर होता ज्याचं आज नाव स्टेडियमच्या एका खुर्चीलाही नाही, आणि आज सचिन तेंडुलकर आहे ज्याच्या नावाचा स्टँड आहे. पारश्यांनी ब्रिटिशांच्या पोलो टीमशी भांडून मुंबईत आणलेला हा खेळ आज आपण कोणत्याही टीमला आणून किंवा हाकलून खेळू शकतो. काळाची करणी अगाध(च) आहे(च) हे(च) खरंच (लांबच लांब सुस्कारा!!)

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...