Thursday, August 29, 2013

बघ्या, चेन्नई एक्सप्रेस आणि दहीहंडी

बघ्या त्याच्यासाठी आलेल्या टाळ्यांचा आनंद घेतो. आणि जसा तो दिवसेन दिवस मुर्दाड होत चालला आहे त्याप्रमाणे त्याला त्या सगळ्या टाळ्या, वाह वाहची सुखद गंमत तर वाटत असते, पण त्याचवेळी एका मढ्यावरचे काही तुकडे आपण जे जोरसे इकडे-तिकडे भिरकवले त्या गिधाडी प्रकाराला एवढी मजा कशी आली असेल असं काहीही त्याला वाटत राहतं. मग त्याला त्याची जुनीच खाज परत येते, की काहीतरी प्रोलीफिक लिहावं, म्हणजे जाम म्हणजे जाम अल्टीमेट. की भेन्च्योत वाचणारा एकदम असा काही साक्षात्कारी मौनात गेला पाहिजे आणि लिहिणारा तर एकदम एक्स्टसी गाठून बेहोश आपलाच आपल्यात लोळत पडलेला असावा. पण असं प्रोलीफिक काय सापडत नाही. म्हणजे काही होत नसतं असं नाही, बघ्या काही पहात नसतो असंही नाही. किंबहुना इतकं पहात असतो की पाहणं आणि कळणं ह्या दोन गोष्टी अनेकदा वेगळया वेगळया होत पण नाहीत. आणि जिकडे तिकडे स्वतःला व्यक्त करण्याचा, भावना दुखावण्याचा आणि दुखावल्या जाण्याचा, प्रेरणेचा आणि विकासाचा, अवमूल्यनाचा आणि अधःपतनाचा महापूर आलेला असताना त्यात बघ्याचं काही प्रोलीफिक, अल्टीमेट फंडामेंटल काही शोधणं हरवून जातं. पण बघ्याला आता टाळ्या हव्या आहेत, गवगवा हवा आहे, हे स्वाभाविक आहे असं त्याने स्वतःचं कौन्सालिंग करून स्वतःला केव्हाचाच अॅक्सेप्टपण केलेला आहे, पण मग काय आहे, काय आहे की ढेर सारे पिक्चर बघून, विकिपीडिया, गुगल करून, जुनी पुस्तके परत चाळून चाळूनही बघ्याला काही प्रोलीफिक, अल्टीमेट फंडामेंटल काहीच का गवसत नाही. का काफ्का, दोस्तोवस्की आणि कोणाकोणाच्या हाताला लागून सगळं अल्टीमेट फंडामेंटल संपलंय आणि हा अनिश्चित शक्यतांचा गोंधळ तेवढा आता इथे चिवडायला बाकी ठेवलाय. पण बघ्या हॅज टू गो ऑन. तसा तो जातोच. खिशातून १००च्या दोन नोटा काढून येणारं संत मल्ल्या ह्यांचं ४२% तीव्रतेचं अध्यात्म विकत घेतो, सोबत थोडा इंद्रियांचे शमन आणि सरतेशेवटी संप्लवन करणारा चकणा आणि सगळ्यावर सगळे शेवटी माती आणि धूर/ळ असल्याचे सत्य फवारणारी सिगरेट असा आपल्याच वाद आपल्याशी सुरू करतो. मग त्याला तो कोण, त्याचा वाद कोण आणि आपल्याशी म्हणजे नेमके कोणाशी असं व्हायला लागतं तेव्हा तो पिंक फ्रोईडला हाक मारतो, तशी तो टपून बसल्यासारखा ‘कम्फर्टेबली नम्ब’ सुरू करतो आणि तिथे बघ्याला टीचभर का होईना प्रोलीफिक जागा दिसते आणि बघ्या त्यासरशी आपले सेन्सेस परत जागरूक करू पाहतो पण तेवढयात पिंक फ्लोईड असा कल्लोळ करतो की बस्स. बघ्या तिथे बघणं, ऐकणं असले सगळे झ्याटे उद्योग सोडून कम्फर्टेबली नम्ब होतो.
       पण संत मल्ल्यांचे ४२% संपतात आणि बघ्या जागा होतो. पण ही उसनी आलेली जाग आहे, बघ्या आपला आपला जागला त्याला तर कित्येक दिवस झाले. ही जाग बेल वाजून आली आहे. बघ्या तशाच झोपाळ चेहऱ्याने दार उघडतो तो तिथे चार पोरे आहेत, अंकल दहीहंडी का कॉंट्री असं म्हणत. बघ्या पाकीट घेऊन किती ते विचारतो आणि मग दहाच्या दोन नोटा देऊन त्यांच्या थांक्यूसरशी दार लावतो तो एकदम चहा बनवत, मध्येच कॉम्पॅक्टली दात घासत आणि शेवटी चहा उतू जाऊ न देता उरलेल्यातली सिगरेट पेटवून परत कॉम्प्युटरसमोर बसून माहितीच्या अविरत धबधब्यात सचैल नाहू लागतो. पण परत तेच प्रोलोफिक वगैरे सुरू होते, बघ्याला लाईम लाईट हूळहूळवू लागतो, तसं बघ्याला प्रेशर जाणवू लागतं मग बघ्या एक एक करून कल्पनांच्या, तात्विक स्पष्टीकरण आणि संकल्पनांच्या लेंड्या टाकत जाऊ लागतो तो पार त्याचे पोट रिकामे होईपर्यंत, पण काही नाही. हे तर सगळं जे इकडे तिकडे आधी उकिरडे फुंकले त्याचेच आपण प्रोसेस केलेले अवशेष. काहीही प्रोलीफिक नाही.
       बघ्या डिप्रेस्ड. म्हणजे वेळ निसटतोय हातातून. काहीच दिवसांत बघ्या वोंट बी दॅट यंग, दॅट न्यू, दॅट क्रेझी मग तो आपलीच पूर्वीची बेधडक सावली पकडायचा प्रौढ खेळ खेळू लागेल. नाही, नाही, काहीतरी हवंच मिळायला किंवा मग आपण तरी हरवून जायला पाहिजे. बाकी काही पर्याय नाहीच, नव्हतेच..
       मग स्वतःला हरवायला बघ्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ बघायला जातो. दहीहंडीच्या सुट्टीला धरून भरत आलेलं थेटर. आणि त्याच्यापुढे ‘चेन्नई एक्सप्रेस’ धावू लागते. लोक हसू लागतात. बघ्याशेजारी एक आई तिच्या मुलीला पिक्चर दाखवायला घेऊन आली आहे. आईने पप्पां(मुलीच्या!)सोबत अगोदर हाच मूव्ही पाहिला आहे. तेव्हा आता फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर अशा भूमिकेत ती आता मुलीला एन्टरटेंमेंटचा बेताज बादशहा आणि त्याची तमिळ बेगम ह्यांची स्टोरी समजावून सांगते. मध्ये मध्ये मुलगी काही क्षुल्लक प्रश्न विचारते जसे सगळे तमिलीयन लुंगी बांधतात का, सगळे तमिलीयन कोयता घेऊन फिरतात का किंवा तमिळ मिन्स नारियल आणि डोसा का ममी असे. पण आई हसून तिला परत समोर चाललेल्या अजरामर प्रेम कथेत नेते. बघ्याला ते इतकं परफेक्ट वाटतं की थेटराच्या अंधाराचा फायदा घेऊन तो आपले डोळे टिपतो. तेव्हा लोक आजूबाजूला हसत असतात, जसे सगळ्याच प्रोलीफिक ग्रेट गोष्टींना लोक आधी हसले आहेत. बघ्या इंटर्व्हलपर्यंत गदगदून जातो की तो पुढे पिक्चर बघू शकत नाही. त्याला जाणीव होते की त्याचे ग्रेट गोष्टींना ग्रास्प करण्याचे अँटेना काम करत नाहीत. त्याच्या अवती-भवतीच्या बहुतांश निष्काम, निर्बुद्ध, निष्फळ पण तरीही प्रचंड एन्जॉयेबल असा कर्मयोग साधणाऱ्या आध्यात्मिक जनतेपासून तो भरकटला आहे. आणि आता त्याने परत तिकडे जायला हवं. बघ्याला असे रीयलायझेशनचे कढ येत असताना तिथे ‘सत्याग्रह’चा ट्रेलर लागतो. तेव्हा परत ती चिमुरडी चाणाक्ष मुलगी ममीला विचारते की हा ‘राजनीती’ आणि ‘गंगाजल’ चा सिक्वेल आहे का, तर ममी अभिमानीत हसून म्हणते की प्रकाश झा असे सोशल क्वेश्चन्सवर मूव्ही काढतो, सो दे ऑल लूक लिटल बीट सेम. पण हा मूव्ही अण्णा हजारे मुव्हमेंट आहे. यू रिमेंबर, लास्ट इअर, पप्पा देल्ही मध्ये होते आणि ते सगळं चालू होतं, यू रिमेंबर किती स्केअर्ड झालेलो आपण. मग ती मुलगी सगळे प्रश्न सोडून आता सुखद झालेल्या त्या थरारक भूतकाळाचा तुकडा दोन्ही हातानी ओढून गालाभोवती लावते, तेवढयात दिवे मंदावू लागतात, तसा बघ्या सरबरीत होतो आणि एक्स्क्यूज मी करत करत एकदम थेटराबाहेर जातो.
       बघ्याला वाटतं आपल्याला हे आपल्या सभोवतालचे लोक समजले नाहीत आणि आपण प्रोलीफिक शोधतोय. बघ्याला असं आठवू लागतं की ‘साधीसुधी ही माणसे, माझी कवित्वाची धनी’ आणि तेवढयात त्याला दूरवरून चीनतता चिताचिता असं लोकसंगीत ऐकू येतं. सोबत बाईकवर दोन, तीन, प्रसंगी चार अशा आवेशी गोविंदांचे लोंढे त्याला दिसू लागतात तसा तो त्याच्या नव्या साक्षात्काराकडे ओढला जातो. ती खेच का ओढ संपते तेव्हा बघ्या आपले खिसा, पाकीट सांभाळत समोरची क्रेनने तारलेली आणि तरंगवलेली ११, का १२ का १५ थरांची हंडी बघत उभा असतो. त्या खाली कोणी भाऊ, दादा का साहेब ह्यांचे टी—शर्ट घातलेले गोविंदा पथक. जवळ पाण्याचा टँकर, लोकगीतांची अविरत गंगा प्रसवून सगळ्यांचे कान भारून टाकणारी साउंडसिस्टीम, त्याजवळ आयोजक स्टेज जे साहेब, त्यांचे साहेब, त्यांच्या आई, बाई, मुले, पुतणे, जावई, सून, स्थानिक साहेब, बाई अशा अनेकविध पोझेसने भलतेच मार्गदर्शक झाले, तिथे हाताची घडी आपल्या पसरत्या पोटावर घालून बसलेले नेतृत्व जे मध्ये हात दाखवते आहे आणि घेते आहे, त्यांचे उजवे-डावे असे अनेक हात आणि कुठेतरी सुप्त असणारा पण शिस्तीचे, सुरक्षेचे नियम पाळण्याचे, वेळ न गमावता पुढील गोविंदा पथकांना संधी देण्याचे आवाहन करणारा आयोजकी आवाज.
       तेवढयात गोविंदा पथकाची शिट्टी आणि आपली सरावाने कमावलेली लय आठवायचा प्रयत्न करत उभे राहणारे थर, दोन, तीन, चार, मग एकेरी तीन थर, वर केसात मोरपीस आणि पाठीशी क्रेनची दोरी बांधलेला २-३ वर्षाचा हसरा पोर पथकमनोरा उभा, हंडी त्यावर बरीच वर, समोर टाळ्या, मोबाईल सरसावलेले आणि मग पथक पद्धतशीर खाली उतरून परत गर्दीत एकजीव होऊन. मग परत लोकगीत, हुक्का बार. बघ्या आता पर झान्जाळून गेला आहे आणि नेहमीप्रमाणे त्याच्या खवचट प्रश्नांचे फवारे त्याच्या समोर उडू लागले आहेत.
१.       म्हणजे ह्या दहीहंडीने काय होतंय? फार फंडामेंटल झालं, पण पैशाच्या अभिसरणाशिवाय काय? निवडणुकांचे गणित? का राष्ट्र निर्मिती, समाजबांधणी, आपल्या धर्माचे परंपराचे हुक्का बार (पाप, पाप, एक  थोबाडीत एका गालावर) संस्कार? का शारीरिक क्षमता वाढवावी ह्याचे तरुणांत आकर्षण वाढणार? का ते सलमान खान (पाप, पाप, दोन थोबाडीत क्रॉस दोन्ही गालांवर, मराठी भद्र ब्लॉग साहित्यात असं काही!) मुळे वाढलं? का संस्था निर्मिती होणार समाजात? हे गरम रक्ताचे, लायसन्स, पेपर्स न ठेवता वेगात गिरकावून बाईक्स चालवणारे भाऊ, दादा, साहेब प्रायोजित तरुण आणि त्यांच्या प्रायोजित संस्था, त्यांचे समाजाभिमुख कार्यक्रम, समाजाची बलदंड तरुण शक्ती, वेळ आली तर कोणालाही डाफरवू शकणारी. भले शाब्बास!
२.       असं नुसतंच खुसपटं काढणार बघ्या तू. अरे असेल थोडं असं-तसं, पण ह्यातही बघ किती चांगल्या गोष्टी घडतायेत. बघ, ते गोविंदा पथक, ४५ वर्षे झाली त्याला, त्यांची व्यायामशाळा आहे, रुग्णवाहिका आहे, अभ्यासिका आहे. हा आता त्यांच्या टी-शर्ट वर नसेल कोणाचा फोटो, पण म्हणजे काय सरसकट सणवार बंद करायचे का, धर्मभेदी बघ्या, भेन्च्योत तुझ्यासारख्या गांडू लोकांनीच ‘ते’ माजलेत. जेव्हा रस्त्यावर येऊन ठरेल ना सगळं तेव्हा ही दंडशक्तीच कामी येते. जा जा तू बघ्या च्युत्या..
३.       पण म्हणजे त्यांच्या ४५ वर्षाच्या कामाची दुगणी, तीगुणी, अनेकपट रूपं असे नुसते टी-शर्ट घालून, डी.जे. चे घणघण अँड्रेनलीन पम्पिंग बोल अंगात भरून, असे भव्य सामाजिक देखावे लावून होणार? त्यांच्या कामात कोणीतरी माहित नसलेले पण नेमक्या जागी घुसून काम एखाद्या बळकट खिळ्यासारखे करणारे लोक असतील ते असे लाख, करोड फेकल्याने येतील? का आता असे लोक नकोच आहेत, आता फक्त निवडणुकीच्या वेळेला कार्यालय आणि रात्री धाबे भरणारे, कुठे पोलिसांनी पकडला का नियमाने अडवला तर भाऊंचा, दादांचा, साहेबांचा किंवा त्यांच्या खालच्या, बाजूच्या अशाच कोणाचा नंबर मोबाईलवर सेव्ह असलेले लोक हवे आहेत? ही खरी सहभागी लोकशाही, आधी तर ती निष्फळ संपलेल्या माणसांची निशब्द आध्यात्मिक हुकूमशाही होती, आता तर कुठे प्रत्येक जण ओरबाडायला शिकतो आहे. जय असो, ह्या झुंडीच्या आता लपलेल्या लोकशाहीचा जय असो..
४.       आणि हे सगळं बघणारे, टाळ्या पिटणारे लोक कोण? हे कसे कुठेही असतातच, अपघात झाल्यावर, आवाज आल्यावर, सकाळी प्रत्येक चौकात आपली एक धाबळी घेऊन काय शोधत असतात? त्यांना कोण प्रायोजित करतं? का हळूहळू ते पण बघायच्या टोकाकडून करायाच्या टोकाकडे येतील, टी-शर्ट घालतील, जय हो करतील, आधार कार्ड काढतील, आपला असा एक स्क्वेअर फूटाचा कोपरा विकत घेतील? आणि मग ते पण ह्या कशाचाही अभिमान असणाऱ्या, कशानेही दुखवू शकणाऱ्या जिवंत ताकदवान हिंसक अस्तित्वचा भाग होतील?
५.       आणि मग चेन्नई एक्सप्रेसने? त्याने का नाही कोणाच्या भावना दुखावत आणि दुसऱ्या त्या एकाने का? म्हणजे तुम्हाला सरसकट एका प्रकारचा दाखवला, तुम्हाला विनोदी म्हणून वापरला तर तुम्ही पण टाळ्या पिटणार आणि तुम्हाला फिक्शनालैझ करून आधीच्या खऱ्या कशाकडे बोट दाखवलं तर खुपणार? असं कसं? भावना दुखावतात म्हणजे नेमकं काय दुखतं? कोणाचं? आपण च्युत्ये असू शकते, पण वाईट नाही असं आहे का? ह्यातलं काय पत्करावं?
६.       का झुंड हीच फंडामेंटल, प्रोलीफिक गोष्ट आहे. आणि ही झुंडीची सळसळ काहीवेळ तरी आपल्या तालावर नाचवणं हेच अल्टीमेट फन. ज्याची झुंड तो राजा, ज्याचे हाती झुंड तो पारधी. मग कोणाचीही का होईना पारध.
फार होतं बघ्याला. असे शब्द शब्द होऊन आपण फुटून जाऊ का असं. भोसड्यात गेलं सगळं. मग तो सरळ आपले दोन्ही हात वर करतो, आणि तेरी अखीयोंका का वार दिलपे झेलत समोरच्या धुंद गर्दीत नाचू लागतो. त्यांच्या धक्क्यांच्या, घामट वासाच्या, दणदणीत आवाजाच्या उग्र नशेत कम्फर्टेबली नम्ब होतानाही बघ्याला आधी ज्यांचं आठवलं त्यांचं परत काही आठवतं

‘ऐकणारे ऐकती सोयीप्रमाणे, बोलणारे बोलती काढून छाती’

Wednesday, August 21, 2013

बघ्या, दाभोलकर आणि मंगळागौर

बघ्या सकाळी मित्रासोबत चहा पीत असताना त्याला दाभोलकरांची गोळ्या घालून हत्या केली असं कळलं. त्याला धक्का बसला. का?
  १. तो केव्हातरी दाभोलकरांच्या नात्यातल्या जवळच्या कोणालातरी भेटला होता.
  २.  त्याहून महत्वाचं म्हणजे त्याच्या अशा छोट्या-मोठया ओळखीत खून झालेलं त्याने पहिल्यांदा ऐकलंय.
  ३.  त्याला हेही एकदम जाणवलं की महाराष्ट्राच्या, किंवा भारताच्या सामाजिक, राजकीय घडामोडींत असे खून क्वचित होतात. अपवाद/उदाहरणार्थ: बिल्डर्स, नगरसेवक आणि शहरपातळीवरचे राजकारणी, गँगस्टर्स, एक पत्रकार सुमारे दीड एक वर्षांमागे. कदाचित हे त्याला माहित असलेले, आठवत असलेले.
मग बघ्या दिवसभर ह्याच घटनेवर तरंगत राहिला. फेसबुकवर शोकाचे, श्रद्धांजलीचे, महाराष्ट्रातील, देशातील लोकशाहीच्या अधःपतनाचे, स्वातंत्र्यावर घाला येण्याचे स्टेटस अपडेट वाचत राहिला. होईल तसा आपलेही पसा-दोन पसा योगदान देत राहिला. त्याला ठाऊक होतं की त्याचं बरचसं वाईट वाटणं बेगडी आहे, दिखाऊ, सवयीचा भाग आहे. तो त्याचं म्हणून एक जे व्यक्तिमत्व जोपासू पाहतो आहे त्यात अशी हळहळ हा एक पैलू आहे.
पण त्याला एक प्रश्न पडत राहिला, तो म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यांचा. बघ्या आधी जाम श्रद्धाळू होता. म्हणजे इयत्ता तिसरीत त्याचा आठवा क्रमांक हुकला याचं कारण होराभूषण शास्त्री यांच्या दर रविवारी छापून येणाऱ्या भविष्यानुसार त्याला असलेली साडेसाती हे होतं. मग तो त्यासाठी शनिस्तोत्र वाचू लागला. मग तो परीक्षेच्या अगोदर हातावर दही घेऊन बाहेर पडू लागला. पण ही काही श्रद्धा नव्हती हे आज बघ्या सांगू शकतो. ही असली तर भीती होती, किंवा खंडणी.
मग बघ्या हळूहळू अश्रद्ध बनत गेला. म्हणजे तो उघड नास्तिक झाला नाही. पण त्याने अस्तिक असण्याचे जे आचार-विचार बाळगावेत ते सोडले, ते केले नाहीत तर काय ह्याची भीती सोडली. पण बघ्या निर्भय झाला नाही. बघ्याची गांड फाटायची. पण तो कोणाला न दाखवता एकटा मनात टाके घालायचा. पण काही-कधी काही जाम झेपायचं नाही. मग बघ्या भगवद्गीता वाचायचा, किंवा मनाचे श्लोक म्हणायचा. म्हणजे तो थेट देवाला वेठीस धरायचा नाही, पण त्याच्या जाणीवेबाहेरचा, आकलनापलीकडचा एक बिंदू आधाराला धरून तो हलके हलके स्थिर व्हायचा. मग गांड फाटायची थांबली की परत तो अधांतरीचा बिंदू सोडून आपल्या नेहमीच्या धंद्यांना लागायचा.
किंवा कधी-कधी बघ्याला स्वतःचा तिटकारा यायचा. म्हणजे आपण वासना, आळस, इर्षा, मांद्य ह्यांनी बनलेला मांसल लिबलिबित गोळा आहोत असा. आणि त्याला कळायचं नाही कि स्वतःची त्वचा तरातरा ओढून मोकळं व्हायची जी तहान लागते, जी वेडीपिशी तगमग होते तिचं काय करायचं? मागे फिरायचे रस्ते बंद, आणि पुढे असली येडझवी अवस्था, त्याच्या मध्ये बघ्या परत स्वतःला शांत करायचे आध्यात्मिक उपाय करायचा. मग बघ्या शांत व्हायचाही. पण बघ्याला ही स्वतःच्या स्केप्टिकल, रॅशनल होऊ पहाण्याशी केलेली प्रतारणा वाटायची.
   आता बघ्या मुर्दाड आहे. तो स्वतः स्वतःची अवहेलना करत नाही की पाठ थोपटत नाही. तो सामाजिक जबाबदारीने पोक घेत नाही की उच्छृंखल मुक्तपणाने उनाडूनही जात नाही. तो फक्त बघतो, जसं आज त्याने दाभोलकरांचं मरणं बघितलंय.
--
   बघ्या विचार करू पाहतो की का झाली असावी ही हत्या, का वध, का खून? बघ्या शब्दच्छल सोडतो आणि फोकस्ड होतो. पण बघ्या पोलिटिकल अॅनालिस्ट नाही, बघ्या विकेंड पुरवणीत सिरीयस दिसणारे, सामाजिक, राष्ट्रीय धोक्याचा भोंगा वगैरे देणारे लेख लिहीत नाही. बघ्याला उत्सुकता आहे एवढंच.
१.       त्यांनीच मारलं. तेच जे त्यांच्या विरोधी होते. संपवला त्यांनी. खत्तम. वध आहे हा त्यांच्या दृष्टीने, जसा कृष्णाने जरासंधाचा, अर्जुनाने कर्णाचा, शिवाजी शहाजी भोसल्यांनी अफजलखानाचा, आणि __श्यांनी ... . तसा वध आहे हो. हा निद्रिस्त समाज/धर्म जागा झाला की की तो असे बळी गिळतोच असं म्हणतील ते. त्या वधकर्त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष समर्थन देतील, मदत देतील. आणि ज्यांनी ही सुपारी दिली ते सावकाश त्यांच्या साथीदारांसमोर हे आम्ही केलं ह्याचं क्रेडीट घेतील. गर्जना करतील, शंखनाद करतील. पण वरकरणी ते हळहळतील. अगदी अश्रूही ढाळतील.
२.       पण त्यांना मारून काय झालं? मारणारा हुतात्मा होईल का, का रोल मॉडेल? अगदी त्यांच्या कट्टर अनुयायात? म्हणजे मोहम्मद अट्टा, किंवा लादेन जसा काहींच्या लेखी असेल तसा तो होईल का? का मारणाऱ्याला धर्म पालनाचं समाधान मिळेल, सगळ्या भौतिक समाधानाच्या पलीकडचे समाधान, सूडाचे, क्रूर कर्तव्यपूर्तीचे समाधान? पण त्याचं हे समाधान बाकीच्यांना कसं समजेल? आणि समजलं तरी स्वीकारलं जाईल?
३.       दाभोलकरांच्या आणि त्यांच्या विरोधाच्या चळवळीचे काय फायदे तोटे? एक बडा मोहरा मारल्याने ती बाजू नामशेष होईल का उफाळेल? विरोधाची चळवळ सरकारी परिप्रेक्ष्यात येईल आणि कमकुवत होईल? का विरोधी चळवळीला वाढता जनाधार मिळेल? आणि ज्यासाठी होत आहे अट्टाहास, त्या जादूटोणा विरोधी बिलाचं, बाबा-फकीर-दुवावाल्यांचं काय होईल?
४.       का त्यांना येऊ घातलेल्या निवडणुकीच्या गणितातला एक मोहरा म्हणून मारला? म्हणजे मग एका बाजूला xxध, xxध असं म्हणता येईल. आणि मग विकासाचे नारे का सेक्युलर सरकार हे जुनेच कोडे घालून गंडवता येईल? आणि दुसऱ्या बाजूला पण इनडिरेक्ट कळतंच आहे की हे विकास, गव्हर्नन्स वगैरे नारे फार अल्ट्रा-मॉडर्न झाले. शेवटी परत धर्म, संस्कृती, इतिहास, प्रथा, परंपरा आणि ग्लोरीयस पुनर्निर्माण हवंच. एवढी कडक अफू तर कुठेच नाही, आणि चिलीम पेटवायला थोडे निखारे तर हवेच. मग जसा इथे हा मोहरा, आपसूक. बाकी यात्रा, मंदिर, दंगे आणि पोग्राम तर चालूच आहे वर्षानुवर्षे?
५.       एकूणच कुठल्याही राजकीय, सामाजिक हत्येचा उद्देश काय असतो? दहशत, विरोधाची बाजू चिरडणं? मग तो इथे साध्य होतोय? का असं थंड डोक्याचं गणित नाहीच आहे मागे? आहे ती भावनांची उकळ आणि लख्ख मानसिक क्लॅरिटी, की ह्याला मारायलाच हवा? दाभोलकरांच्या किंवा ते ज्या बाजूने होते त्या बाजूत इतकी प्रसिध्द, इतकी प्रभावशाली रिप्लेसमेंट आहे? का आता दुय्यम निर्नायकी? तसं असेल तर हा वर्मी घाव म्हणायचा. पक्का हिशोब.
बघ्या रिसर्चर नाही, बघ्याकडे कुठली फेलोशिप नाही, बघ्याकडे आतल्या गोटातले परिचय नाहीत. बघ्या एवढेच तार्किक तारे तोडू शकतो आणि मग सट्टा लावल्यागत कुठला लागतो ह्यातला म्हणून उत्सुक राहू शकतो.
--
बघ्या त्याच्या आईला सांगतो की दाभोलकरांना गोळी घातली. आई म्हणते कशाचे डॉक्टर होते ते? बघ्या शांतपणे पोळी खातो, भाजी खातो, हात धुतो आणि चलतो, काय हवंय का घरात विचारतो. आई म्हणते, बस प्रसाद खा. मग तो दारात उभा राहतो, उजव्या हातात प्रसाद घेतो तेव्हा आई म्हणतो अजून कोणीतरी गेले ना, तर तो म्हणतो ते कालनिर्णयवाले. आई म्हणते पण कोणीतरी भास्कर होते ना गेले ते. तो निघतो.
       आई उपवास करते बघ्या नीट लाईनीत यावा म्हणून. त्याने आजूबाजूच्या शे-सव्वाशे पोरांसारखी इस्त्रीची शर्ट-पँट घालावी, बूट घालावे, नियमाने दाढी करावी, लोकल पकडावी, महिन्याला ३०-४०-५०-६०-७० हजार पगार आणावा, आपल्या जातीत बायको करावी, बायकोने सारे सणवार करावे, बघ्याची सिगारेट सुटावी, बघ्या सुखी रहावा आणि बाकी जनरल...
       आई विद्युतपुरवठा खंडीत झाला की स्वामींना साकडं घालते, बाबांना यायला उशीर झाला की व्यंकटेश स्तोत्र म्हणते, आणि बाबांना कधी ऑर्डर्स नाही मिळाल्या मनासारख्या की महाराजांची पोथी वाचते. पण ती काम करायची थांबवत नाही. आणि होईल तेव्हा बाबांना, बघ्याला त्यांच्या क्रमशः अश्रद्ध किंवा आळशी कामचलाऊ श्रद्धेबाबत टोमणे मारणंही. ती वर्षातून एकदा सत्यनारायण करते. तिने बघ्यासाठी, तिच्या काहीही फुफाटा न करता अग्नी दिलेल्या सासूसाठी नारायण नागबळीही केलाय.
       बघ्या आईला आधी समजावू पहायचा, मग त्याला कळलं की आई ऐकतच नाहीये. ती फक्त बघ्याला बोलू देतीये. तिच्या भोवती तिच्या काल्पनिक कठीण परिस्थितीचे, तिला न मिळणाऱ्या भौतिक सुखांचे, तिच्या परिश्रमपूर्वक जगण्याचे, तिच्या स्वामी, बाबा आणि देवांचे जे कवच आहे त्यात प्रश्न घुसूच शकत नाही आणि त्या कवचात आई सुखरूप आहे.
       आता बघ्या आईला जे ती वांछील ते करू देतो, जोवर ते त्याच्या आड फारसे येत नाही. फार कधी प्रसंग आलाच तर मांडवली केल्यासारखा तो मिनिमम काही करतो आणि मोकळा होतो. जसे, एकदा बाबा गावी गेले आणि आईला जमणार नाही म्हणून तो शंकराला बेल वाहून आला. पण त्याने तिथे बसून बोर्डावर लिहिलेले स्तोत्र काही वाचले नाही.
       पण त्यावेळीही बघ्या एका सूक्ष्म नैतिक द्वंद्वात सापडलाच. १२-१२.३० च्या त्या दुपारी देऊळ निवांत होते. त्याच्या पाठी एक जुनाट तळे होते जे पाहून बघ्या थोडा काव्यमय हळवा झाला आणि देवळाच्या खिडकीपाशी उभे राहून त्या जीर्ण, मरू घातलेल्या तळ्याकडे पाहतानाही त्याला शांत, हलके वाटले. हे काय? म्हणजे आपल्या आत खोल असली प्रतिकहीन आस्तिकता असतेच का? का सगळे त्या कोण एका/एकीवर सोडून मुक्तपणे कृतीला न्याय द्यायची ट्रिक भावते आपल्याला? मग बघ्या बाहेर आला, त्याला आधी काही तरुणी आणि मग एक व्हील चेअर वरचे आजोबा दिसले तेव्हा आधीचे द्वंद्व जाऊन अधिक शारीर द्वंद्वात बघ्या सापडला. असो!
       पण बघ्याला सकाळचा प्रश्न, श्रद्धेचा, आठवलाच परत. आणि त्याला एक कोरोलरीही. की भले आपण आपल्यापुरता निवडा केला ह्या श्रद्धेचा, त्याचा प्रचार-प्रसार का करावा? बघ्याला जाणवलं की हा प्रश्न इतका क्षुल्लक नाही. तो मुळात एका अवाढव्य प्रश्नाचा भाग आहे. तो प्रश्न म्हणजे-
       माणसाने कसं जगावं, का जगावं ह्याची काही अंतिम उत्तरं आहेत का आपल्याकडे? आणि ही अंतिम उत्तरं, त्यांच्या वाटा ह्या वैयक्तिक आहेत का सामूहिक?
       बघ्याला वाटतं की त्याला मंदिरात जे शांत वाटलं, त्याला अधांतरीच्या बिंदूचं जे आकर्षण वाटतं, त्याला अद्वेष्ट सर्वभूताना म्हणताना जे वाटतं, त्याला निर्वाणषटक ऐकावसं वाटतं, त्याला काही दिवस सगळ्यांशी सगळं बोलणं सोडून आपल्यात गुंतावासा वाटतं ते ह्याच प्रश्नाशी जोडलेला आहे. पण ही खरी जाणीव का निष्क्रियतेची गुंगी हे बघ्या जाणत नाही. बघ्या तिथे हताश आहे.
       पण म्हणजे आपण किती विचार करून आपल्या कृती ठरवणार? आणि त्यात किती जणांना किती दुखवायचं? आणि असं करून जे काही हाती लागेल ते फक्त आपलं आपल्याशी राहणार असेल, त्याला सर्वांना पटणारा अर्थ नसेलच, तर मग एकूणातच हे उद्योग, हे प्रश्न का? आपण कोण कोणाचे नेमके कोण लागतो? आणि त्यांच्या श्रद्धा डोळस का आंधळ्या हे ठरवायला जाणं हे कितपत बरोबर?  
       म्हणून बघ्याने हत्येचा निषेध केलेला नाही. त्याला हिंसेचे कुतूहल आहे, कदाचित आजवर तो अशा कशात सापडला नाही म्हणून. पण त्याने अशी हत्या, आजवर तो जसा जगला तेवढ्याने तरी केली नसती असं तो सांगू शकतो. बघ्याला दाभोलकरांच्या समाजाच्या बैलाला चुचकारून अंगावर घ्यायच्या धाडसाचं कौतुक वाटतं, हेवा, इर्षाही. पण त्याचवेळी कायदा बनवायला जाणं हा त्याला स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या लेखी जो चुत्याप आहे तो करायच्या बेसिक फ्रीडमवर आघात वाटतो, जसं थेटरात येणारी धूम्रपान विरोधी फुफ्फुसात एवढा टार सांगणारी जाहिरात.
--
       बघ्या दिवसभर एवढा सगळं बौद्धिक तलम गांजा मारून रात्री एका नव-विवाहित मित्राकडे होऊ घातलेल्या मंगळागौरीस जातो. तिथे तो जेवतो. मग तो खेळ बघू लागतो. त्याचा दोस्त बॅटमॅनने करावी तशी एक फुगडीही घालतो. बघ्या तिथे जमलेल्या नव, जून आणि पोक्त विवाहीतांचे खेळ बघू लागतो. त्यातल्या गाण्यांचे बोल ऐकू लागतो. मोड्युलर किचन मध्ये जगणाऱ्या, लोकल ट्रेनने जाणाऱ्या, मराठी सिरियल्स पाहणाऱ्या संसारिक सुखी स्थूल स्त्रियांचे खेळ. मग भरल्या पोटी ढेकर द्यावे तसे प्रश्न: ही श्रद्धा का अंधश्रद्धा? का पूर्वी हा खेळ म्हणजे संसाराचे कष्टाळू गाडे ओढणाऱ्या बायकांची स्पेस होती? म्हणजे युटिलिटी? आपला धर्म, किंवा प्रथा-परंपरा म्हणजे निव्वळ सामूहिक स्तराच्या गंमतीचा संरक्षित पाशवी आनंद का माणसांना एकत्र जमून पेन्ट अप करण्याची सोय? आपल्या ह्या रुढी-परंपरा किती खोल घुसल्या आहेत, काळात आणि स्थळातही? आणि ह्यातल्या किती बायकांना ठाऊक आहे दाभोलकर गेले? कितींना त्या माहितीने बरं-वाईट असं वाटलंय? का ह्या भव्य,भयानक रगाड्यात अशी एक हत्या काही नाही. १२५ करोड माणसांना, किंवा १२ करोड माणसांना, किंवा ५ करोड शहरी महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांना किती सोयर-सुतक असतं असल्या सार्वजनिक परिघात घडलेल्या गोष्टींचं? मला किती आहे? खरंच किती आहे?
       बघ्याला समोरचे खेळ तद्दन खोटे वाटू लागतात. ह्या बायका उद्या कशा कण्हत असतील, सांधे दुखत असतील असं त्याला वाटतं. त्या बायकांचे मोबाईलवर शूट करत असलेले नवरे त्याला मजेशीर वाटतात. त्याला कळप म्हणून जगण्याचे सुख दिसते. आणि मग त्याला मनापासून वाईट वाटतं की दाभोलकरांना गोळी घातली गेली. त्याला मनापासून स्वतःचा गांडूपणा जाणवतो. त्याला त्याची दाभोलकरांचे वाक्य कोट केलेली स्टेटस अपडेट आठवते, पण नेमकी अपडेट आठवत नाही.
       बघ्या मंगळागौरीतून निघतो. बघ्या रस्त्यावर येतो आणि फुफ्फुसांत टार भरू लागतो. तेव्हा बघ्याला वाटतं की या आजूबाजूच्या सगळ्याला फाट्यावर मारूनही त्याबद्दल झिडकारा, घृणा न ठेवणं ही केवढी मोठी गोष्ट आहे, मग तुम्ही कशासाठीही फाट्यावर मारलेलं असू दे आणि शेवटी तुम्हाला गोळी लागलेली असू दे.                  

      

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...