Saturday, January 22, 2011

शेवटचा प्रखर लख्ख प्रकाश

 'तो धावत होता, अंगावर एकही कपडा नसताना, आणि त्याच्या पाठी अजून कोणीतरी...जो कोणी पाठीमागून येत होता तो त्याला घट्ट मिठी मारू पहात होता. शिसारी आणणारी, गुदामरवणारी आणि तरीही अंग पेटवणारी मिठी... मग एकदम त्या मागच्या चेहेर्याचा चेहेरा बदलत होता, कधी ओळखीचा, स्त्रीचा, पुरुषाचा...आणि त्याचा  हात लालसेने ह्याच्या शरीरभर फिरत होता. मग एकदम एक जीवघेणा क्षण, असह्य ताण असलेला, कोसळणारा...' तो खाडकन जागा झाला. त्याने मोबाईलवर वेळ पहिली. रात्रीचे ८ वाजत आलेले. जवळपास दीड तास तो झोपलेला. आणि आता जाग आल्यावर अजून गळून गेल्यासारखं वाटत होतं. तो तसाच पडून राहीला. समोरच्या खिडकीतून समोरच्या बिल्डींगचे दिवे दिसत होते. खालच्या मजल्यावर कोणीतरी लावलेल्या गाण्याच्या ओळी, मागच्या बाजूच्या झाडांवरून येणारा कावळ्यांचा तीक्ष्ण आवाज, वरचा एका अशक्त मलूल लयीत फिरणारा पंखा, तटस्थ उभ्या टेबलावर अस्तव्यस्त पुस्तकं, अंगाभोवती अर्धवट लपेटली गेलेली चादर... तो कुशीवर वळला. त्याच्या नाकाची, ओठाची, गालाची एक बाजू उशीला टेकली. घामाचा, लाळेचा जुनाट वास जाणवायला लागला. किती दिवस ही उशी अशीच बिना अभ्र्याची वापरतोय...त्याने नजर तिरकी करून खुर्चीकडे, तिच्यावर निवांत पडून राहिलेल्या धुतलेल्या आणि न धुतलेल्या कपड्यांच्या ढिगाकडे पाहिलं. परत डोळे मिटले. खांद्यावर पंख्याच्या वार्याचा अस्पष्ट स्पर्श, नाकपुडीला जाणवणारा श्वास...काही क्षण तो शांत पडून राहिला, कुठलाच विचार न करता... मोबाईलवर कुठलाच मेसेज नव्हता, तिचाही नाही. कदाचित आज अजून कामात असेल..पुढच्या आठवड्यात ती भेटेल. इथेच बोलावू कदाचित तिला...त्याचे पाय ताणले गेलेले, तळवे घामेजलेले... झटक्यात तो उठून बसला...डोळ्यांच्या कडांशी बोटं लावून काही घाण जमलीये का हे पाहू लागला. हाताच्या तळव्याला त्याची खरखरीत दाढी जाणवत होती. त्याने परत मोबाईल पहिला. ८.१५ वाजत आलेले. 'जेवायला जायची वेळ झाली. आधी अंघोळ करून घ्यावी का का चहा प्यावा बनवून' विचार करत तो बेसिनपाशी पोचला. २-४ वेळा त्याने तोंडावर पाणी मारलं. पाणी ओघळत शर्टावर पोचलं. टॉवेल शोधत त्याने सावकाश चेहेरा पुसला. सवयीने तो आरशासमोर उभा होता. चेहेरा पुसून टॉवेल खाली नेताना त्याची नजर अपोआप आरशात गेली. केसांचा टोपलं झालेलं, डोळ्याखाली निम-गडद वर्तुळे, गाल सूज आल्यासारखे वर आलेले, पोट सुटलेलं... स्वतःशीच शरमून जावून त्याने पोट आत ओढून व्यवस्थित वाटायचा  प्रयत्न केला..केस नीट केले...तो परत आरशात बघू लागला. आता बाकी कुठे न बघता तो अनोळखी माणसाकडे पहाव तसं आपल्याच डोळ्यात नीट निरखून पाहू लागला. आपल्याला आपल्या बुबुळांचा रंगही माहित नाही. कदाचित असा माहित करून घेण्यासारखा विशेष रंग नाही म्हणून. पण या डोळ्यात काहीच नाही, असेल तर एक पळपुटा भाव, समोरच्याच्या नजरेपासून नजर चोरायची घाई... त्याने आपल्या प्रतीबिम्बापासून नजर काढून घेतली.
  टेबलापाशी जाऊन त्याने सिगारेटच पाकीट आणि माचीस घेतली. तो परत आरश्यासमोर आला. आरशाकडे बघत त्याने सिगरेट पेटवली. सिगारेटच्या पुढच्या टोकाचा निखारा त्याच्या श्वासाबरोबर भडकत होता आणि तयार होणार्या राखेखाली दबत होता...त्याने दोन लांब कश मारून धूर समोरच्या आरशावर सोडला. सिगारेटच वास आणि धूर आणि त्याच्यातून दिसणारा  त्याचा चेहेरा...
   कितीतरी कथात, सिनेमात आरशातला प्रतिबिंब मुळच्या बिम्बाशी बोलतं किंवा वेगळं वागतं. आत्ता समजा समोरच्या आरशात आपल्या प्रतिमेशिवाय अजून कोणी दिसत असेल तर...
   असा होतंच नाही. हे आयुष्य त्याच्या पिचक्या पायांवर फरफटत, त्याच्या सपक चवीनेच जगायचं आहे. संवेदनांना झटका देणारा, अगदी आतवर हाक मारणारा क्षण फक्त कुठेतरी वाचायचा किंवा पाहायचा. आपल्या आयुष्यात येणार ते आतून-बाहेरून सारं माहित असलेले खुले पोकळ दिवस. तीच अधू स्वप्ने पहात आणि साजर्या मनाने जगण्याच्या रेषा चालत जाणारी माणसे आपल्या भोवती नांदणार. त्यांच्या कोमट वादविवादात, वठलेल्या सामाजिक वगैरे जाणीवात, कुठलेही विष नसलेल्या फुत्कारात आपण एक... कदाचित आपण असे आहोत हे जाणवतंय एवढंच काय ते आपला असणं...चार कविता माहिती आहेत, शब्दांचे बुडबुडे उडवून त्यात रंग पहात येतात एवढंच..पण आयुष्याच्या सार्या कडा आपण फक्त कल्पनांवर तोलून पाहतो, त्यांच्या धारेवर जगत नाही, त्यांच्या स्पर्शाने सुखावत नाही किंवा रक्तबंबाळही होत नाही.
   खूप दूर जायला हवंय इथून, अगदी अंग झडझडून काम करत हा लेचापेचा प्रकार बदलून टाकायला हवं. डेरेदार, मजबूत झाडासारखा अविचल बनलं पाहिजे, सारं सोसून एकाही निशाणी न दाखवता अपार उभा रहाता आलं पाहिजे....
     कपडे घालून तो रस्त्याला आला... त्याच्या नेहेमीच्या जेवायच्या जागेपाशी तो काही काळ घुटमळला. इथे जेवलो तर पैसे वाचतील..अजून १७ दिवस बाकी आहेत महिन्याचे... पण तो पुढे चालत राहीला. सराईत पावलांनी बार मध्ये येऊन पोचला.
   त्याच्या ओळखीचे वेटर पुढे झाले. हा आजचा सलग तिसरा दिवस. त्यातल्या एकाने दाखवलेल्या टेबलावर तो बसला. थोड्याच वेळात वेटरने ग्लास, स्टरर आणि बर्फ आणून टेबलावर ठेवलं. त्याने ऑर्डर दिली, सोबत सिगारेटचे एक पाकीट आणायला पैसे दिले. वेटर गेल्यावर तो समोरचा टीव्ही आणि आजूबाजूच्या टेबलांकडे पहात बसला. बार जवळपास भरला होता. बहुतेक टेबलांवर २ जण, काहींवर ४ तर काही त्याच्यासारखे एकटे बसले होते. समोर टीव्ही चालू होता, जुनी गाणी..अल्कोहोल आणि निकोटीनबरोबर विरघळणारे परफेक्ट कॉम्बिनेशन. 'आखों मै क्या जी....किसीका आचल'.....  त्याने टीव्हीची नजर काढून समोर बनवलेल्या पेगकडे ठेवली. वेटरने सवयीने चकणाही आणून ठेवला होता. त्याने वेटरकडे  बघितलं, वेटरने अदबीने त्याची पसंतीची नजर उचलली. त्याने सिगरेट पेटवली, एक मोठा घोट घेतला, आणि डिशमधून काहीतरी तोंडात टाकले. हीच क्रिया त्याने सलग ४-५ वेळा केली. अर्ध्याहून अधिक ग्लास संपलेला. त्याला त्वचेखाली काही उबदार सरकवलय असं वाटू लागलं. त्याने एक जोरदार कश मारला आणि उरलेला पेग रिकामा केला. वेटरने लगेच दुसरा पेग बनवला. टीव्हीवरचा गाणं बदलून 'दो दिवाने शहर मे' लागलेलं.... गाण्याचे शब्द सावकाश त्याच्या कानाशी येऊन थांबतायेत, पण त्यातला अर्थ आणि आवाज विलग होऊन दोघे नेमके जागच्याजागी पोचातायेत असं त्याला वाटू लागलं...  हे नेमक्या ठिकाणी पोचणं खरं, अगदी नेमक्या...
   आता इथे समोर कोणीतरी बोलायला यावं, अगदी किमान तो काय सांगेल ते ऐकायला तरी.... किंवा कोणीतरी त्या गाण्याबरोबर त्या नेमक्या जागी जाऊन त्याला काय सांगायचय  ते शोषून घ्यावं, त्याला रितं, कोरडं आणि कोरं करून टाकावं ....
पण कोणीच नसणार इथे... असे ज्यांना नसतात कोणी तेच तर असे तीन किंवा अनेक दिवस सलग दारू पीत बसतात.... गाणी ऐकतात, आयुष्याला कुठलेही काटे नसलेल्या तलम दुलईत ठेवतात काहीवेळ...
 फार धूर्त होत चाल्लय शहर.... चुका करायची मुभाच नाही. सगळ्यांनी एक राजमार्गावरून चालायचं, तरच आणि तरच ते कोणीतरी आहेत.नाहीतर मग त्यांनी फक्त घरंगळत जायचं, कुठल्यतरी गल्लीच्या कधीही उपसल्या न जाणार्या गटारात किंवा एखाद्या टीचभर कोपर्यात पोतेरं बनून रहायचं,,,
  तोच समाज प्रगती करू शकतो जिथे माणसांच्या चुकांना किंमत असते'  वाक्य जिथे-तिथे रंगवून ठेवलं पाहिजे....
   नुसतंच धूर्त नाही होत आहे हे शहर, ते खुबीने माणसांच्या भुतकाळालाच भविष्य म्हणून विकत चाल्लय... तुमच्या बाप-आजाने जमवलेल्या पुंजीवरच तुमची ओळ्ख ठरणार, नाहीतर मग प्रगतीचा रथ ओढायचे सोनेरी जू खांद्यावर घ्यायचे आणि पौष्टिक कडबा खात सुस्त सुखात लोळायचे. एकसारख्या एक घरात राहायचे, एकसारखे एक कपडे घालायचे, एकसारखी एक बेगडी सुख-दुखे जमवायची आणि मग ती निसटली म्हणून एकसारखे एक सुस्कारे टाकायचे....
     तीन पेग संपलेले. त्याने वेटरला खूण करून अजून एक पेग मागितला, अजून एक सिगरेट पेटवली. पेटवून काडी विझलीच नाही, जळत जळत त्याच्या बोटाला चटका बसला तशी त्याने ती झटकन खाली फेकली. त्याच्या बाजूच्या टेबलावर एकटा बसलेला माणूस त्याच्याकडे बघून हसला, साधं, त्याचा चटका जाणवलेला हसणं...
     असंच असणार जग, असंच होतं... प्रश्न आपण कशासाठी इथे आहोत ह्याचा आहे... आपले दिवस अशी वखवख घेऊन का येतात... आपल्या हात-बोटांनी बनवलेलं आणि काळजाला जाणवणारं समाधान का नाही. फक्त मेंदू हा एकच अवयव वापरात घ्यावा असे का जगतोय आपण... एकाला एक जोडून बनणाऱ्या विचारांच्या साखळ्या बनवणं आणि त्यात माणसांच्या कृतींचा अर्थ कैद करणं.... पण जिथे माणूस काय हेच ठाऊक नाही तिथे नेहेमीच विचारांचे रिकामे पिंजरे आणि त्याच्या बाहेरचं आयुष्य असं प्रकार उरणार... पण मग तरीही इतकं विचारी, धूर्त, सजग असण्याचा अट्टाहास का लादतोय आपण...
   बस...हे शहर, वेडं-विद्रूप वाढणारा शहर ओरबाडून काढावं, सगळ्या जन्मलेल्या मुलांना त्यांच्या आई-बापापासून वेगळं काढून जंगलात सोडावं,,, त्यांना त्यांचे हात-पाय-दात-नखं वापरू द्यावेत. त्यांना एकमेकांना धरून रहायची किंमत कळू द्यावी. त्यांना आपला घास हिसकावून आणि वाटून खाता यायला हवं. त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या झाड -पक्षी- प्राण्याच्या सुरात आपली भीती आणि आपलं गाणं शोधू द्यावं. ही मुलं इथे राहिली  तर त्यांच्यात गडद रेषा मारल्या जातील, त्यांना झापडं लावली जातील, त्यांना घाबरायला शिकवला जाईल आणि राजमार्गावरचा लोंढा अजून वाढवला जाईल....  ते एकमेकांचे मेंदू खाजवत प्रश्न बनवतील आणि मग संगणकाच्या पडद्यावर त्यांची उत्तरे शोधतील.... ते लोकांच्या भुकेल्या पोटांना मानवता शिकवू पाहतील आणि ऐदी साजूक आयुष्यांना अजून कोरत राहतील. ते कधीच आयुष्यभर जाळणारी स्वप्ने पाहणार नाहीत, ते कधीच एखाद्या चुकार रस्त्याला जाणार नाहीत, ते त्यांच्या आधी चाललेल्या आणि मागून येणाऱ्या मेंढरांचा इतिहास गात राहतील....
   त्याने उद्वेगाने हात झटकला.वेटर लगबगीने जवळ आला, त्याने अजून एक पेग आणि बिल आणायला सांगितले. 'अजीब दास्ताँ हैं ये'  समोरचा टीव्ही गात होता... त्याला जाणवलं कि आजही दारूत आपले प्रश्न सहज संपले, आणि कोड्याचे सगळे तुकडे जुळून आले... आता फक्त कोणीतरी कौतुकाने पहायला पाहिजे आपल्याकडे, आपल्याला जवळ घेऊन थोपटलं पाहिजे आणि मग हेच असंच वाटत राहिलं पाहिजे....
   पण उद्या ही धुंद जाणीव उतरणार... मग परत तिच्यात जाण्यासाठी तडफड.... एकमेकांना घासत एकमेकांच्या विरुद्ध जाणार्या दोन जाणीवा एवढाच शेवट आहे का सगळ्याचा.... आणि तसं असेल किंवा नसेल, तरी एकदा हे उलगडल्यावर दररोज हा खेळ का खेळायचा.....
   त्याने बिल भरलं, २-३ नोटा टीप म्हणून ठेवल्या...
  तो रस्त्यावर आला तेव्हा रहदारी निवळत आलेली. एक थंड झुळूक त्याला छेदून, त्याचा बोलण्याच्या तहानेला जागवून गेली. पण जे बोलायचं त्यासाठी एकटाच असलं पाहिजे आणि त्याचवेळी कोणाच्या तरी अस्तिवाने आपल्या जाणीवांवर खूण ठेवावी असंही वाटत राहणार ....तोच घासत जाणारा अटळ विरोधाभास....
   तो आपल्याशीच हसला... त्याने अजून एक सिगरेट पेटवली. त्याच्या उजवीकडून एक ट्रक वेगात येत होता, त्याचे प्रखर हेडलाईट....
   त्याने एक जोरदार कश मारला आणि एक पक्या जाणीवेने त्याची पावले त्या वेगाने येणाऱ्या प्रकाशाकडे चालू लागली.....   

Saturday, January 15, 2011

इन्फ्लेशन

रस्त्याच्या कडेला वाढणारा एक मुलगा
त्याचा एक अखंड बेवडा बाप
कधीतरी आलेल्या मायेच्या अल्कोहोलिक उमाळ्याने
द्यायचा पोराला ५ रुपयाचं नाणं
आणि परत पडून राहायचा नशेत धुत्त...किंवा बिडी पेटवून
कुठेही बघत रिकाम्या गर्द नजरेने झुरके मारत बसायचा....
पोरगा पळत जायचा...
रस्त्याच्या धुतल्या-न्ह्याल्या माणसांच्या पायातून वाट काढत
सरकणारी चड्डी सावरत, झिपर्या आवरत
तो स्तब्धपणे उभा राहायचा वडापावच्या खमंग वासाने....
मग खेकासणाऱ्या दुकानदाराच्या हातात लुप्त व्हायचं
पाचाचा नाणं, आणि हातात यायचा वडापाव आणि मिरची
मग पुढचे काही क्षण गाठ पडायची हाताची-तोंडाची
बोटही चाटत संपायचा वडापाव
निवायचा पोटातला डंख
मग परत गाठायची रस्त्याची कड, गोल गोल फिरवायचा टायर
किंवा हात पसरायचा ओशट केविलवाणा स्पर्श करत
चेहेर्यावर पसरत पोरके केविलवाणे भाव

आजही बापाने दिले ५ रुपये,
मुठीत घट्ट पकडून तो वडापावच्या दुकानासमोर उभा राहीला
बापाची माया आणि नशा होती तेवढीच....
५ रुपयाच्या नाण्याचा जड बंदा स्पर्शही तसंच....
भूक तेवढीच पोटात, किंचित वाढलेली वाढत्या वयात, वाढत्या थंडीत
आज वडापाव तेवढा आला नाही हातात....
फक्त खमंग वास तेवढा घुसला नाकपुडीत,
तो कालही फुकट होता आणि आजही......

Tuesday, January 11, 2011

प्रिय मी,

प्रिय मी, 
तू काय करतोयेस असं प्रश्न पडल्याने आता असे पत्र पाठवण्याची वेळ आली आहे....
                     तू वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून अस्वस्थ वगैरे होतोस, आणि मग पुस्तकांच्यात वगैरे डोकं
खुपसून वर्तमानपत्रातल्या प्रश्नंची उत्तरे शोधू पाहतोस....
त्या वर्तमानपत्रात असणारा वर्तमान केव्हाच पळवला गेला आहे, आणि तिथे मायावी भविष्यकाळ पुरवला जात आहे
वर्तमान म्हणून.... लख्ख उजळ किंवा गडद अंधारा....
ज्यांच्या बापाने स्वतःच्या पायाने चालणं सोडून कित्येक वर्षे झाली आहेत आणि जे छान सोनेरी पाळण्यात जन्मले होते,
ज्यांच्या वाटा आणि त्यावरची संकटे गोष्टीतल्या राजकुमार-राजकुमारी सारखी होती तेच आता
रस्त्यांवर चालणाऱ्या आणि पाऊलभर सावली जपून ठेवणाऱ्या लोकांच्या आयुष्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढतायेत....
त्यांच्या भरपेट ढेकरांमध्ये कसे तुला अदृश्य आयुष्याचे आवाज ऐकू येतील?
पानोंपान अक्षरात दिवेसेन दिवस पिचत जाणार्या माणसांची स्वप्ने, तोकडे आनंद आणि अनंत अतृप्त इच्छा उमटत नाहीत....
त्या जगून पाहाव्या लागतात आणि त्यांचे वळच आयुष्याच्या वाटांना आकार देतात....
हे लिहिणारे, स्तंभ, सदरे आणि अग्रलेख ह्यांच्या चरबितला एक हिस्साही वितळणार नाही  डाळीची किंवा कांद्याची किंमत वाढल्याने...
जाहिरातींच्या बांबूवर तोललेले हे लोकशाहीचे स्तंभ आता इतके उंच झाले आहेत कि त्यांना दिसितीये समृद्धीची मठ्ठ सूज तेवढी....
बाबारे, व्यवस्था बदलायला व्यवस्थेच्या सुस्त बैलाला द्यावा लागतो एक निष्पक्ष, निस्पृह रट्टा..
हे हस्तिदंती मनोरे त्या बैलांवरची गोचीड, ते प्रेमळ चावेच घेणार... आणि बैल सहज विसरून जाणार....
   जाऊ दे, विषयांतर झालं.... तुला पडलेल्या 'आपण का जगतो आहोत' अशा घनघोर प्रश्नांबाबत कळलं....
   पूर्वीही असे प्रश्न पडत....आणि अशा प्रश्न पडणाऱ्या येडझव्यांकडे माणसे पहात कौतुकाने....
   आता असे प्रश्न पाडू नयेत याची तजवीज करतात पार आधीपासूनच....आणि पडला तर डबल डीजीट बर्फी खाऊ
घालून पार सुस्त करतात....पोट भरलं कि प्रश्न गार पडतातच.....
तर लक्षात घे.... धोपट मार्ग सोडू नको....मार्ग धोपट, पैसा चौपट....
अगदीच थांबली नाही प्रश्नांची मळमळ तर जात, धर्म, इतिहासाच्या उत्थानाचे झेंडे घे खांद्यावर....
शहामृग बन भूतकाळाच्या वाळूत डोकं खूपस....पण भाऊ, जे चाल्लय ते काय असं विचारू नकोस.....
तुझा प्रश्नही ते सहज विकत घेतील, तुला शाल-श्रीफळ देऊन करतील आपल्यातला एक आणि मग
हळूहळू तुझ्या प्रश्नांकडे न मरणाऱ्या म्हातारीची बडबड जसं कोणीच ऐकत नाही तसं कोणीच ऐकणार नाही....
जग....हळूहळू मजा येतेच....
अरे राजा....स्वार्थच खरा अर्थ आहे... आणि स्वार्थाच्या टोकाला परमार्थ म्हटले जाते....केव्हा कळणार तुला, आता २५ वर्षाचा होशील...
छान रहावं, गाड्या वगैरे घ्याव्यात, चर्चा कराव्यात चकण्याच्या डिश उडवत आणि देणगी द्यावी एक स्मरणार्थ....
तेवढाच असतो वाटा आपला....उगाच मोठ्या बदलांच्या दिवस्वप्नांवर आपले आणि इतरांचे जीव वाया घालवू नयेत....
देव तुला सदबुद्धी देवो आणि तुझ्या वडलांना गुंतवणुकीवर १८% रिटर्न्स....
तुझाच....


ता.क. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी धमाकेदार आवाजच करावा लागतो असं भगतसिंग वगैरे कोणी म्हणून गेला होता

Thursday, January 6, 2011

बेरात्रीच्या कविता

खुणावलं नाही डोळ्यांच्या तळ्यांनी
काळजाच्या कळ्यांना हुरूप उरला नाही
ओसरून गेला बहर आणि झोपून गेलं शहर
विरहाच्या वेदनांना तितके जहर उरले नाही

निर्मनुष्य रस्त्यांना हाक घालते रात्र
पिवळा प्रकाश अंधाराचा स्पर्श रोखून आहे
तसे सामावले विश्व आता गादीत आणि गोधडीत
गात्रांची उष्णता शरीराचे कुंपण जोखून आहे

गटार झोपले आहे, नाल्याने बदलली आहे कूस
कडेला एक भिकारी केव्हाचा पडून आहे
लुचत आहे पिल्लू कुत्रीच्या स्तनाला
अख्खा उद्या स्वप्नांच्या बांधाला अडून आहे

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...