Wednesday, December 29, 2010

संमेलन लक्षण समास

  इये मराठीचिये नागरी
  साहित्य असे नानापरी
  परी चर्चा घरोघरी
   असे संमेलनाची

   विचारती सामान्य जन
  काय प्रकार संमेलन
   काय त्याचे प्रयोजन
  सारेच दिग्मूढ

    चालीला हा मेळा  दरसाल
   आधी निवडणूक इरसाल
  मग अवतरे सोहळा विशाल
   अखिल भारतीय

 आधी ग्रंथदिंडी सोहळा
  गत अध्यक्षांचा आवळा
  नव-अध्यक्षांचा कोहळा
  अवघे दाटले कौतुक

  चिंतनाचा पडे सडा
  विचार लोळती गडबडा
 भाषेचा विराट गाडा
  करे आवाज जागेवरी

   जाणती मार्केट डिमांड
   प्रकाशन घोड्यावरी मांड
 शब्दांवर कुशल कमांड
  असे साहित्यपुंगव

   करती चर्चा घनघोर
   सर्व जीवांस लागला घोर
  भाषेचे वैभव थोर
  पण भविष्य काळवंडले

   कशी टिकवावी भाषा
  कशी वाढवावी भाषा
  संमेलनाचा अनुदानित तमाशा
  कसा पुढे चालणार   
  
  भेटती समदुखी मित्र
   चालती अनेक सत्र
  पावले वळती इतरत्र
  हेच संमेलन जीवांचे

   करती भेदक गर्जना
   गगनभेदी घोषणा
   भाषेच्या शील रक्षणा
   धावती कागदी सिंह

    ऐशी अगाध असे लीला
   खेळ संमेलन चांगला
   भाषेचा जीव खंगला
   घेई उभारी नवी

     साहित्यिक प्राणी आगळा
    पुस्तकी घेई नाना कळा
    नेत्यांचा लागला लळा
    लागली वर्णी उपर

    साहित्य जीवनाचे प्रतिबिंब
    राजकारण जीवनाचे अंग
    लाभला थोडा सत्ता संग 
   काय बिघडले एवढे
 
   असती काही बाणेदार
    साहित्याचे स्वतंत्र सुभेदार
   घालिती स्वयंस्फूर्त बहिष्कार
   आणि मार टीकांचा

   संमेलन असे ऐरावत
   वाटे निष्ठावंता खिरापत
   विरोधकांची नसे मुर्वत
   चाले प्रवास वर्षानुवर्ष

  संमेलन बहुप्रसवा नारी
  होती संमेलने राज्यभरी
  पण सर्वांहुनी भारी
   हेच खरे अखिल भारतीय

  विदेशी पोचली उडी
  ओळखली एन.आर.आय. नाडी
  संस्कृतीची शानदार गुढी
  उभारली सातासमुद्रापार

   लाभती भक्कम प्रायोजक
   आणि कल्पक संयोजक
  चालती कल्पना रोचक
  पत्रकार नोंदीती सहर्ष

   संमेलन महिमा अपार
   फुक्या झाला पार गार
   एवढा सोहळा रुबाबदार
   डोळा न पाहिला

   मराठीचे गाऊ शौर्य गान
  आले शब्दांत त्राण
   हातात घेतली वहाण
  फोडू मुस्काट अन्य भाषांचे

   करू अनुवाद, लिहू फिक्शन
   सीमा भागात घेऊ एक्शन
   जीवनाचे सर्वांग भक्षण
   आणि निर्मुया कविता

  हेच संमेलनाचे सार
   लोपला भाषीय अंधार
   साहित्यिकांनी दिला आधार 
  वेलू गेला वर भलताच 
  

Saturday, December 25, 2010

तमाच्या तळाशी दिवे लागलेले

 
सोकावलेल्या सुन्न दिव्यांच्या
क्षणात होती लखलख ज्योती
वार्यामधली अबलख गाणी
श्वासावरती निथळून जाती

दूर तमाच्या शहरामध्ये
प्रकाशटिंबे चमचमणारी
अंधाराचा खोल वारसा
पटलावरती उमटवणारी

धुंद जरासा मदिर गारवा
त्वचेस आले अस्थिर कंपन
गात्रांमध्ये सरकून जाई
कैक तृषांचे अपूर्ण मंथन

इथेच होता सापडलेला
नितळ स्पर्श अलवार मृण्मयी
इथेच संपून गेली होती
श्वासांमधली धून प्रत्ययी

स्मरणामध्ये उब नभाच्या
उन्ह कालचे मालवलेले
गारठलेली स्वप्ने निजली
तमाच्या तळाशी दिवे लागलेले

(प्रतिमा सौजन्य: http://www.sheltoweehikes.com/IMG_0776.jpg )

Friday, December 24, 2010

आत्म्याचा हिवाळा

स्तब्धतेच्या मुळाशी नसे निर्मितीचे समाधान
आयुष्याची मुळे कोरडी आणि न भागलेली तहान

रिता असे घडा समजेचा, कोलाहल माहितीचा
अर्थाचा दाणा नसे रुजलेला, पोकळ साचा

थरावर थर, ओल खोलवर, तृष्णेचे रोप
शब्दांचे कंपोस्ट सडलेले, तण वाढे अपोआप

मौनाचा गारवा, सुखी झुळूक आत्मसंवादी
थडथडे नाडी, वाहे निवांत रक्त-नदी

आसमंत झाला अस्पष्ट, निवाले सगे, सोयरे, मित्र
हा आत्म्याचा हिवाळा, आता दीर्घनिद्रा सत्र

वीरो, मावळो, निवो दिवस अस्वस्थ बेलगाम
जुळो, सापडो, समजो एक सत्य ठाम

प्रतिज्ञा, प्रार्थना, विनंत्या, धमकी धडधडीत
फुक्या म्हणे आहे थंडी बरे झोपणे गोधडीत

Saturday, December 18, 2010

वेगवेगळ्या 'मी' ची गोष्ट

तो घरातून बाहेर पडला. नेहेमीच्या सवयीने काहीकाळ आपल्याच पायात नजर घुटमळवून त्याने बाजूला पाहिलं आणि तो चमकलाच, किंवा उडालाच... हे सगळे शब्द तोकडे पडावेत.... रस्त्याच्या बाजूंच्या मैदानात तो खेळत होता... आणि तो म्हणजे तोच जो पहिल्या वाक्यात घरातून बाहेर पडला होता.... काही वर्षापूर्वी तो इथे खेळायला यायचा... आत्ता तसंच तो तिथे खेळत होता मैदानात... अनवाणी, घामाघूम, ओरडणारा, धावणारा... आणि तो स्वतःलाच बघत होता खेळताना.... त्याने डोळे चोळले, आणि काही पावलं पुढे जाऊन तो निरखून पाहायला लागलं.... तेच कपडे, तो आवडता निळा टी-शर्ट, चपला मैदानाच्या कोपर्यात भिरकावलेल्या, हात कमरेवर ठेवून खेळाच्या पुढच्या टप्प्याची वाट बघणारा... तपशीलात काहीच फरक नाही... पण मग हा बघतोय तो कोण... आणि त्यांची वये एकसारखी नाहीत, मग हे काय.... संभ्रम, स्किझोफ्रेनिया, काल घेतली तर नव्हती, आणि असती तरी एव्हाना.... त्याने मैदानावरची नजर काढून बाजूला पाहिलं, तर मैदानाच्या भिंतीला हनुवटी टेकवून आणि हाताचे तळवे त्या हनुवटीभोवती टेकवून तोच उभा..त्याने मैदानात नजर टाकली तर कबड्डीच्या आखलेल्या पटांगणात उजव्या कोपर्यात तो उभा... वाकून...चढाई करणाऱ्याच्या पायाकडे बघत.... त्याने मैदानच्या बाजूच्या गर्दीत पाहिलं,,,, तो उभा टाळ्या पिटत ,ओरडत.....
    घामाघूम होत तो मटकन खाली बसला.... त्याच्या खांद्यावर त्याला हात जाणवला, त्याने वर बघून बघितलं, आणि तेच.... तोच.... आणि एक साधा प्रश्न.... मित्रा, काय झालं.... पाणी वगैरे हवंय का? त्याच्या, म्हणजे स्वतःच्या चेहेर्यावर आपल्या प्रतीबिम्बासाठीपण ओळखीची एक रेषापण नाही.... पण कोण कुठला हाअशी  रखरखपण नाही....
   भिरभिरल्यासारखी  त्याने चारीकडे नजर टाकली.... तोच.... आईचं बोट धरून चाललेला लहान मुलगा.... शाळा सुटल्यानंतर वर्गातल्या मुलींच्या मागे जाणार्या घोळक्यात..... चहाच्या टपरीपाशी मित्रांशी बोलत.... त्याच्या ओठांना कोरड पडली.... तो चालायला लागला आणि त्याला तोच भेटत राहीला.... काहीवेळा त्याला टक्क आठवत होता तिथे असणं.... पण काही क्षणी तिथे असण्याची पुसत आठवणही सापडत नव्हती.... उदाहरणार्थ ८व्या मजल्याच्या घराच्या खिडकीतून दूरवर पहात उभा असलेला, किंवा वेगात चारचाकी हाकतजाणारा , ओठावर एक वरचढ हसणं ठेवून....
   हे कोण आहेत सगळे... आणि ह्यातल्या एकालाही मी दिसत नाहीये का... त्यांच्या चेहेर्यावर मला पाहून काहीच कसं लकाकत नाही...  आपण थांबलो तर कदाचित संभ्रमाच्या जाळ्यात अजून खोलवर फसू असं काही वाटल्याने तो चालायला लागलं.... वाहनांची गर्दी, आणि धक्के, माणसांचे आणि त्याचे स्वताचेच, खात तो दूरवर आला. आता गर्दी विरळ झाली होती. वार्याची निवांत झुळूक जीवाला थंडावा देत होती. त्याने समोर पाहिलं. समोरून कोणीतरी चालत येत होता. आणि यावेळेला स्वताचाच चेहेरा समोर पाहून तो फारसा भांबावला नाही. आश्चर्य ही थोडावेळ टिकणारी गोष्ट असते, सवय झाली कि ती उरत नाही.
   पण यावेळेला समोरचा चेहेरा त्याच्याकडे पाहून हसला. त्याच्या हसण्याची स्वाभाविक प्रतिक्रिया म्हण, किंवा इतक्या वेळाने ओळ्ख सापडल्याचा परिणाम म्हणून म्हणा हसण्याच्या चार चुकार रेषा त्याच्याही चेहऱ्यावर आल्या. 'अर्थ लागत नाहीये का ह्याचा?' समोरच्याने विचारलं. 'हे इतके 'मी' दिसतायेत मला आणि तेही काळाच्या गतीशी सुसंगती नसलेले. कोणी ५ वर्षापूर्वीचा, तर काही ठिकाणी मी असण्याची सुतराम शक्यता नसतानासुद्धा. आणि आता तुला प्रश्न पडलाय कि हे सगळं मला कसं कळलंय'. त्याने (म्हणजे जो पहिल्या वाक्यात घराबाहेर पडला आहे त्याने) फक्त होकारार्थी मान डोलावली.
    'तू नेहेमीच असतोस तुझ्या गोष्टींमध्ये.  गोष्टीच्या केंद्राशी फिरणाऱ्या नाम-सर्वनामाला तुझं चेहेरे असतो, कधी निनावी, कधी बेमालूम लपवलेला. कधी-कधी तुझे अस्वस्थ उद्रेकच तो कल्पनेच्या चौकटीत सोडतोस. गोष्ट जो सांगतो त्याचीच असते, त्याने स्वतःला कितीही वजा केलं तरी. आणि सगळ्या गोष्टी काही सांगितल्या जात नाहीत. काही जन्म घेतात, त्यांचे तलम स्पर्श काहीकाळ सुखावतात तुझे तुलाच, आणि मग तुझ्या स्मरणाच्या पिंजर्यात न अडकता ती पाखरे सहज संपून जातात. '
   'पण मग हे इतके मी कसे सभोवती. ' (जो पहिल्या वाक्यात.....)
   'कारण तूच बनवले आहेस ते. काही वेळा आठवणी म्हणून, काही वेळा कल्पनांचे उनाड खेळ म्हणून, काहीवेळा फक्त कोणाला तरी सांगायची खोड म्हणून. ते तू आहेस हे फक्त चेहऱ्यावर आहे त्यांच्या. पण त्यांचं असणं हे तुला त्यांच्याबद्दल काय वाटतं ह्याच्या खोलीवर अवलंबून आहे. जा मागे जाऊन पाहिलास तर त्यांच्यातले अनेक जण एव्हाना संपले असतील. त्यांच्या चेहेर्यावर जाऊ नकोस. ह्या सगळ्या तू स्वतःला किंवा इतरांना सांगितलेल्या गोष्टी आहेत, आणि आत्ता त्या दिसतायेत तुला एवढंच. ' 
   'पण ते मला ओळखत का नाहीयेत? ' (जो पहिल्या.... )
  'कारण गोष्टीत तू नाहीयेस, तू दुसरा काही चेहरा पांघरला आहेस. आणि म्हणून त्यांना तुझा चेहेरा जो दिसतोय तो ओळखीचा नाहीये, अगदी तो त्यांचाच असला तरी'
  'मग तू का मला ओळखलंस? '
  'कारण मी तुझ्या गोष्टीतला पात्र नाहीच आहे,,, इथे तू दुसर्या कोणाच्या तरी गोष्टीतला एक आहेस आणि मी त्यात भेटतोय तुला.... '
   'म्हणजे ...'
'म्हणजे तुझ्या गोष्टी, किंवा तू जे जगतोयेस त्या काही समांतर रेषा नव्हेत. दुसरा कोणीतरी त्यांना सहज छेदून जावू शकतो'
' पण एकदा गोष्ट जन्माला आली कि....'
'आलीच.... ती मागे फिरणार नाही. तिचा शेवट बदलणार नाही. अगदी तू टाळला असशील करायचा शेवट तिचा तरी ती एका टोकाला पोचून लटकत राहिलंच.... जसं तिथे आहे' त्याने बाजूला बोट दाखवले....
   तो आणि ती तिथे थांबलेले.... त्याचे डोळे तिच्या चेहेर्यावर खिळलेले... आणि ती सरळ त्याच्या डोळ्यात बघत.... तोच प्रश्न.... आणि त्याने टाळलेले उत्तर... तिच्या डोळ्यांशी कडांशी येऊनथांबलेलं पाणी..आणि त्याच्या चेहेर्यावर खूप प्रयासाने काही-बाही कारण देताना यावेत तसे आलेले कृत्रिम भाव....
   ' तू संपवलीच नाहीस ही गोष्ट. '
   त्याने (म्हणजे जो...) समोर पाहिलं... कोणीच नव्हतं, आणि तरीही मगाशी ऐकलेला आवाज स्पष्ट होता... आता त्याला भास किंवा खरं अशा शंका उरल्याच नव्हत्या.... त्याने परत बाजूला पाहिलं.... तेदोघं ... स्थिर तिथेच.... तो त्याच्या बाजूला जाऊन उभा राहीला.... काहीवेळ थांबून त्याने काही बोलू पाहिलं... त्याच्या बाजूच्या त्याचेच ओठ हलले क्षणभर.... पण तेवढंच....
       तो तिथून निघाला.... आता तो कुठे बघत नव्हता... त्याला जाणवत होतं कि तो जिथे बघेल त्याचा अर्थ लावू पाहील.... आणि तो अर्थ लावताना तो एक गोष्ट रचेल मनाशी ... कदाचित ती गोष्ट त्याला लहानपणापासून जी कळली आहे तशी आहे.... किंवा त्याने वाचलेल्या एखाद्या गोष्टीशी जुळणारी....  जर त्याला एक निस्तब्ध, शांत क्षण अनुभवायचा असेल तर त्याला त्याच्या मनाच्या तळाशी तिथे पोचला पाहिजे जिथे आयुष्याचा अन्वय लावण्याचा, किंवा एखादा छोटासा निर्णय घेण्याचा प्रयत्न नाहीच आहे. बस, जो आहे तो नितळ, निरागस जगतो आहे... 
   अशी कुठली जागा सापडतच नाहीये.... आहे तो असा गुंत्यांचा खेळ आणि त्यात हे आपले एवढे चेहरे... पण तरीही ह्याच्या पार जायची गोष्टही आपणच लिहायला हवी... गोष्ट संपण्याची गोष्ट...
    स्वतःशी हसून त्याने बाजूला पाहिलं....
    एक लहान मूल मातीत रेघोट्या मारत बसलेलं....आपल्यात हरवलेलं.. त्या रेषांचा पुढे काय होईल याच्याशी त्याला काहीच नव्हतं...थोड्या वेळाने ह्या खेळाचा कंटाळा येऊन ते निघून गेलं...
त्या रेघांत जन्माला येणाऱ्या गोष्टी पहात तो तिथेच उभा राहीला....

Friday, December 17, 2010

फिके लावण्य चारपदरी रस्त्यांचे

फिके लावण्य चारपदरी रस्त्यांचे
हायवेच्या शुष्क कडांना लगडलेली
असंख्य माणसे,
त्यांच्या विरक्या स्वस्त कपड्यांसकट,
रबरी झीजक्या चपलांसकट
आणि शहराच्या दमदार वाढत्या
त्रिज्येत चिणून गेलेल्या सपाट जगण्यासकट
अदृश्य होत चाललेली.....

दोन भाग होत आले आहेत इथे....
एक धुंद अस्मानी नशेचा
आणि एक किडक्या बैचैन मृगजळाचा..
एक भागात वाटली आहे समाधानी खिरापत
दुसरीकडे नपुसंक स्वप्नांनी शेज सजवलेली

भरपेट जेवणाची उच्च मध्यमवर्गीय ढेकर देऊन
संवेदनशिलतेचा टिश्यू पेपर घेतलेला तोंड पुसायला
वांझ निर्मितीचे आयते झगे आणि मग
सामाजिक वीकेंड...

दोष कोणाचाच नाही...
तत्वांचे हिमनग विरघळल्यावर
उरलेल्या चिखलात बरबटलेले सारेच....
काही उपडे पडलेले, काही पालथे

Wednesday, December 8, 2010

स्यूडोवैराग्यवर्णन

आला वासनांचा कंटाळा
लावला लालसेला टाळा
आतील गडबड घोटाळा
संख्येअभावी तहकूब

शोधिले पण नाही मिळाले
वाचिले पण नाही कळाले
शेवटी अंगाभोवती गुंडाळले
सक्तीचे एकटेपण

महागाई मारी गांड
नको संसाराचे लचांड
उगा दररोज भांडाभांड
वैराग्य हस्तमैथुनी

तुका-नामा, मार्क्स, कामू
सार्या ग्रंथांचा केला चमू
नका पुन्हा या घरी जमू
तुम्ही बरे लायब्ररीमध्ये

उगा तत्वांची नको झोळी
कशाला जीवाची करा होळी
गेली हातून पुरणपोळी
आता सात्विक राइसप्लेट

असे झाले शांत-क्लांत चित्त
वाढे- ओसरे अवखळ पित्त
कुणा मेनेकेचे निमित्त
आणि अवघे स:ख्खलन

स्वप्नांची फेकिली जळमटे
जळो आठवांची चिरगुटे
आता रात्रीवर उमटे
झोप रिकामी

असा चालीला प्रवास
ठाम माझा कयास
नको अजून सायास
लाभिली मज मुक्ती सक्तीची

दमल्या जाणीवा बोथठल्या
संवेदना गार गोठल्या
आत उरत साठल्या
वांझ होऊनी

इंद्रिये घेती व्हीआरेस
मेंदूस आला जबर फेस
निवाले शोक चिंता सोस
आता शब्द रिकामे

समाज प्रगती संकट
नको काही अंगलट
आपुले आपल्याशी झांगट
चालू द्यावे

येईल तसा घ्यावा दिस
काढू नये जगण्याचा कीस
न करावी घासाघीस
समाधानी व्हावया

फासळ्या आणि आतडी
शरीराची एक गोधडी
बांधावी अस्तित्व झोपडी
रहावे निगुतीने

जाणावे हे स्युडो वैराग्य
हाती न आले काही भोग्य
तेव्हा हाच मार्ग योग्य
कोल्ह्यास द्राक्षे आंबट

Saturday, December 4, 2010

आत्महत्येच्या एका ऐकीव बातमीबाबत

सिगारेटच्या धुरात उदास संध्याकाळचा कंटाळा हलका होताना मित्राचा फोन वाजला.... फोनवर तो थोडावेळ बोलला आणि एकदम मला म्हणाला, माझ्या एका मित्राने आत्महत्या केली. माझ्या कंटाळ्यात एक मोठे भगदाड पडले, आणि मी कुतूहलाने पुढे ऐकू लागलो...
हा श्रीमंत होतं काय.... आणि इंजिनियर ...म्हणजे आमच्या ३ महिन्याच्या स्टायपेंड एवढा ह्याचा महिन्याचा पोकेटमनी... वडील प्रसिद्ध डॉक्टर , मोठा भाऊ पण डॉक्टर.... (थोडक्यात गरिबी हे मरण्याचे कारण बाद) ह्याचे एका परधर्मीय मुलीवर प्रेम होते आणि ह्याच्या आईचा लग्नाला विरोध होतं... (ऐकल्यासारखी वाटते ना गोष्ट) मागची तीन वर्षे ह्याचे आईबरोबर झगडे होत होते आणि तो नोकरीनिम्मित दुसर्या शहरात रहात होतं. मरण्यागोदर त्याचं आई आणि प्रेयसी दोघांबरोबर भांडण झालेलं. आणि मग....
त्याने गळफास लावला...खाली खुर्ची नव्हती.... आणि त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत होते.... हा जेव्हा मेलेला सापडला तेव्हा त्याचे गुडघे दुमडलेले होते.... आणि शरीर निळे पडलेले ....
माझ्या मित्राच्या मते हे मरण्याचे झ्याटू कारण आहे.... त्या मुलीशी लग्न करून भांडत भांडत आईला समजावता आला असतं....
माझ्या मते आत्महत्या करणारे कायमच बरोबर असतात.... फक्त तर्काच्या दोर्या वापरून त्यांच्या बरोबर असण्याच्या मुळाशी पोचता येत नाही.... its on altogether different plain... आणि त्यांना भित्रे वगैरे म्हणणे म्हणजे जगत रहाणार्यांनी आपल्या भोंदू गांडूपणाला जोडलेली शौर्याची बेगडी शेपटी आहे.... त्यांना मरावासा वाटलं ते मेले.... जे हवं होतं ते मिळत नव्हतं हे मरण्याचं सबळ कारण आहे.... ते कधी ना कधी मिळेल किंवा त्यापेक्षा बरं मिळेल किंवा ते दुखच संपून जाईल अशा तथाकथित 'आशावादाला' चिकटून जगत राहणं कि खरंच चांगली निवड आहे का.... आता मी अजून जिवंत आहे आणि तरी असे म्हणतो आहे... मग मी मरत का नाहीये.... बरोबर आहे तुमचा प्रश्न.... त्याबद्दल नंतर कधीतरी.... आता विषय वेगळं आहे.... (सोयीस्कर!)
आता हा इसम मेल्यावर त्याच्या आईचा आणि प्रेयसीचा काय.... त्याच्या प्रेयसीने पण आत्महत्येचा प्रयत्न केला अशी ऐकीव बातमी.... पण आईचं काय....
एखादा माणूस,,, अगदी निराशावादी माणूसही आपल्यामुळे मेला आहे हे जाणवत राहून जगत राहणं हा काय प्रकार आहे....
आता कदाचित ह्या इसमाचे लग्न झाल्यावर त्याने एक वर्षात घटस्फोट घेतला असतं... किंवा त्याच्या बायकोने आत्महत्या केली असती.... किंवा ह्या माणसाला मुळाशीच काही पोकळपणा असणार... म्हणून त्याने आई-बाई अशा शुल्लक प्रकाराने आत्महत्या केली.... किंवा प्रेमात पडल्याने आणि उभं न रहाता आल्याने....
आम्ही दोघं त्या मृत इसमाचे सहानुभूतीदार आहोत का तटस्थ निरीक्षक.... जे एकूणच ह्या मृत्युच्या तात्विक पार्श्वभूमीचे विश्लेषण करत आहेत....
त्याला मरण्याच्या शेवटाच्या काही क्षणात काय वाटलं असेल.... कारण खुर्ची वापरून गळफास हा तुलनेने मरण्याचा कमी त्रासदायक प्रकार आहे... मणका तुटतो... आणि खल्लास... (मित्राकडून आलेली माहिती) ...आता इथे हा लटकत होता... प्रयत्नपूर्वक गुडघे दुमडत असणार.... पण मग तो आधी बेशुद्ध झाला आणि हळूहळू ... का मरेपर्यंत त्याने गुडघे टेकलेच नाहीत...मरणासमोर.... का काळा-निळा पडण्याच्या शेवटच्या क्षणात जगण्याच्या इच्छेचा डोंब उसळून आला आणि तिथे कोणी नव्हतंच.... त्या मुलीला कधी कळलं नाही कि हा असा टोकाला जाऊ शकतो.... का असे टोकाला जाऊ शकतो वाटणारे कुठे जाणारे नसतातच....जे जातात ते असे झटकन....
त्याला हे का कळलं नाही कि प्रेम ही भावना हळूहळू विरत जाईल आणि सोयीस्कर तडजोडीने तो समाधानाचा घरगुती अंगरखा पांघरू शकेल....
शक्यतांच्या जाळ्यात न येणारी घटना एवढंच म्हणून हा 'इवेन्ट' सोडून द्यावा लागेल का.... मेळघाटात माणसे जगतात, हजारो किलोमीटर अंतर तोडत जगण्याची नवी मुळे पकडतात, बकाल दारिद्र्यात जगतात, एकवेळचे जेवण खाऊन जगतात.... म्हणजे ऑन एवेरेज माणसाच्या जगण्याचा आशेचा तंतू प्रबळ असताना हा असा का..... किंवा बाकीचे असे का..... अख्या भारतात मागच्या वर्षी असे ३७००० आहेत.... कोट्यावधींच्या जगण्यात, जे दरवर्षी ९%ने समृद्ध (!) होते आहे त्यात हे उदास जीव का....
जे हवं आणि जे आहे यांच्या मधलं अंतर कधी कधी इतकं न संपणारं का असतं....
त्याच्या आणि त्यांच्या आत्महत्येनंतर माझे हे वांझोटे प्रश्न....

डिसेंबर

अजून एक अर्धवट विझला दिवस मनात साठवत तो चालायला लागला. असा एकदम मानगूट पकडणारा कंटाळा त्याला आता सवयीचा झाला होता. कंटाळा म्हणजे एकच रंगाचा चष्मा लावण्यासारखं आहे, त्यातून सगळ्या गोष्टी अर्थहिनतेच्या गर्तेत जाताना दिसतात आणि आपण ते पहात राहण्यापलीकडे काही करू शकत नाही. संध्याकाळ होत आलेली, थंडीचे दिवस असल्याने उन्हाने लवकरच काढता पाय घेतला होता. पश्चिमेला लालसर सूर्यबिंब क्षण-दोन क्षण प्रत्येक बिंदूशी थांबत, प्रत्येक स्तब्ध क्षणात ढग आणि आकाश यांच्यातल्या मोकळ्या पडद्यावर रंगांचा व्याकूळ, निशब्द पट मांडत मावळत होते. ह्या वेळेला , इतक्या वेळा पाहूनही तेच तुटल्यासारखं का वाटतं? कोणीतरी अपार मायाळू ओळखीचा भेटावं, आणि अशा एखाद्या कुशीत हा भयकाल संपेपर्यंत, उरातले अस्थिरतेचे कंप मिटेपर्यंत चेहेरा लपवून पडून रहावं.... जाणारा प्रत्येक दिवस या कोलाहलाला माझ्यासाठी परका करून जातो आहे, दिवसेंदिवस एक अतृप्त कोरडेपण येते आहे सगळ्यावर.... कशाचा डंख लागत नाही, कशाने मन पालवून निघत नाही, आणि पाय घासत निघालेल्या निर्वासित कळपासारखा निरुद्देश रस्ता पसरला आहे समोर..... आता का? कुठे? कशासाठी ? अशा प्रश्नांचेही वादळ येत नाही..... बस,,,ही एक संध्याकाळ येते.... समोरच्या धूसर पडद्याडच्या इमारती, त्यात हजारो माणसे, त्यांचे एकमेकांशी संबंध..... ह्यात कशात कुठे आपण नाही.... आपली नोंद नाही त्यातल्या एका प्रकाशित चौकोनावर.... आत्ता वाट पाहणारही कोणी नाही म्हणून कुठे जायची घाईही नाही..... हा पत्करलेला का ओढवलेला एकटेपणा... आणि तरीही जीव जळत जाणारी तगमग कुठेच शमलेली नाही....
समोर एक फुगेवाला होता.... तसे आता फुगेवाले कमी दिसतात.... बासरीवालेही कमी दिसतात.... कल्हईवाल्यांची हाक ऐकू येत नाही.... ठीके.... आता फक्त फुगेवाला आहे समोर.....
तिला फुगा विकत घेतलेला आपण एकदा.... आधी तिला विचारलं तेव्हा तिला वाटलं मी गम्मत करतोय....म्हणून हो म्हणाली.... मग हातात एक भला मोठा गोल फुगा दिला तेव्हा गोंधळली....मग तसाच तो फुगा मिरवत चालायला लागली.... त्याच्या मागे ती लपून जायची.... मग कुणालातरी धक्का लागायचा.... मग ती फुग्यामागून डोकवायची...तिच्या चेहेर्यावर तिचं ते 'पोर' हसणं... समोरच्याला 'सॉरी ' म्हणायची.... आपणच कानकोंडे झालेलो तिच्या सोबत चालताना....मग एका हाताने आपला हात पकडून आणि दुसर्या हातात फुगा पकडून रस्ता पार केला.... मग कुठेतरी त्या फुग्याकडे बघणाऱ्या रस्त्यावरच्या मुलाला देऊन टाकला तो फुगा आम्ही.... आम्ही... का मी....का मी आणि ती....
ती नाहीये ह्याचीही सवय झालीये आता.... ती नाहीये म्हणजे....ती आहे.... एका अर्थाने तिने असायला हवंय तिथे आहे.... आणि ती नेहेमी सांगायची तशी डिसेंबर मध्ये आहे ती तिच्या आवडत्या शहरात....
डिसेंबर.....
सगळ्या वर्षाच्या आठवणी ह्या एका महिन्यात येऊन कोलमडणार.... मग हळूहळू त्यांच्यात हरवायचं.... राहुल शर्माचा 'डिसेंबर' ऐकलेला अशा एक थंड होत गेलेल्या रात्री.... कॉफी...अंगावर मध्येच येणारं शहारा... कोणी काही बोलायचं नाही.... संतूरचे सूर त्यांच्या नाद-निनादांचे कोश विणत जायचे.... मग मध्येच ती सांगायची.... रजईत गुरफटून जायच्या आठवणी.... मग असंच कशा-कशावर बोलत जायचं.... आणि मग केव्हातरी ती निघून जायची.... आत्ताही ती निघून गेली आहे..... ही संध्याकाळ बाकी आहे, हा डिसेंबर बाकी आहे... तिची आठवण जागवणारे संदर्भ सोयीस्कररित्या विसरायला शिकलो आहे आता.... कॉफीचा मग वापरायचा नाही... काही गाणी ऐकायची नाहीत....काही जागी जायचा नाही.... आणि तरीही काहीवेळा एकदम तिचं कडवट होत निघून जाण असं एकदम ..... ते तेवढे क्षण जाळून गेल्यासारखे.... पार राख राख.... एखाद्याच्या निष्पाप असण्याला चरा पडणं यापलीकडे भेसूर काहीच नसतं.... गर्दीत एखाद्या मुलाचा हात आईच्या हातातून निसटला कि कसं कावरं-बावरं होतं ते पोर.... पुढे जाऊन कदाचित ते आईचा दुस्वास करेल....पण म्हणून आपण एकटे आहोत, एकटे होणार आहोत याची भयप्रद जाणीव करून देणारे ते क्षण माफ होत नाहीत.... तिच्या आतलं कुठलंही सोंग न घेता जगाकडे अनिमिष डोळ्यांनी पाहणार मुल कुठे गेला.... ते फुगा घेऊन रस्ताभर भटकणारे ... टाळ्या पिटून कुठेही हसणारं....कुठेही घरच्या आठवणीने चुरगाळून जाणारं....
कदाचित तिने इथे यायलाच नको होतं.... जर-तरचे हजारो फासे जरी टाकले तरी आज तिच्या कोडग्या मौनामागे दफन झालेलं तिच्यातला लहान मुल.... आणि त्याच्या अकाली संपण्यात तू सामील आहेस .... तूच सूत्रधार आहेस त्याचा.... तुझ्या शब्दांनी गळा घोटालय त्याचा.....
सभोवतालचे सारे जण पाहतायेत आपल्याकडे आणि जर मनात उमटणारे हे शब्द त्यांना दिसले तर....
सवयीने गुदमरवणारे हे क्षण थोपवून धरू आपण.... पण असे व्रण साठून साठून आता कुठलाही आनंद आपण कधीही पूर्णांशाने भोगू शकणार नाही.... अशा प्रत्येक क्षणी तिची आठवण येणार आहे.... संदिग्ध शब्दांचा आणि निर्माल्य होऊन गेलेल्या पण कधीतरी तीव्र असलेल्या भावनाचा एवढा पालापाचोळा आहे कि मी आता तिच्याकडे बघून साधा ओळखीचं हसूही शकणार नाहीये.... तिच्या आयुष्याला आता आपण स्पर्श करू शकत नाही हे बरं मानायचा आणि त्याचवेळी इतक्या आतवर रुतलेल्या माणसाला अनोळखी मानायचा अशक्य आटापिटा करत रहायचं...
ओरबाडत जाणार्या ह्या द्वन्द्वाकडे पहात तो आपल्याशीच हसला..... हे असं कोलमडतो आहोत एवढं तरी....
सारे विचार फेकून देत तो बाजूच्या बाकावर बसला..... समोर फुगेवाल्याकडे एक मुलगी फुगा विकत घेत होती.... सूर्य कधीच मावळला होता.... आणि आता त्याच्या भोवती एक मंद वार्याची झुळूक होती.... डिसेंबरमधली....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...