Thursday, April 29, 2010

ए वेडे ऐक,
नाही म्हटला तरी वेड्या माणसांची बरीच गाणी आता झाली आहेत.
सापडत राहतात माहितीच्या बेटांत ती अधून-मधून...
तुला पत्र लिहू
का पोचू तुझ्यापर्यंत निमिषार्ध व्यापणारी माध्यमे घेऊन...
मी तुझे संदर्भ अलग करतो आणि अर्थात माझेही
आणि लिहित राहतो जे खरं तुलाच सांगायचं होतं...

Wednesday, April 28, 2010

देहभर तुझ्या दंशांच्या खुणा
आणि मनात फुटलेलं तुझ्या अस्तिवाचा वारूळ
तुझं अर्थ कळतच नाही मला,
फक्त गुरफटला जातो तुझ्या माझ्या सोबत असण्यात.
तुला-मलाही हि अशी शब्दांची चढलेली भूल,
तुझ्या देहाच्या अलवार वळणांचा मदिर कैफ
आणि जगाच्या प्रघाताना विसरलेली बेईमान रात्र..

हि देहभूल उतरेल आणि मग मी पाहीन आत्ताच्या
बेभान आवेगांकडे ते माझे नसल्यागत...
मग हे सारे प्रहर सहज मागे सोडत
मी माझ्या मुक्त मोकळेपणात....
कळेल तुला याचा अर्थ...
एकमेकात भिनत जाताना आरपारही जात असतो आपण एकमेकांच्या...
निखळ पारदर्शी होऊन गेलो एकमेकांना तर ओळख उरेल का एकमेकांची....
तुझा अर्थ उमजेल न उमजेल...
तू माझ्यातल्या आभाळाला माझ्या मुळांशी जोडणारी रेघ आहेस...
तुझ्यापेक्षाही जास्त उत्कट प्रतिमा तुझी...
तुझ्या शब्दांहून गहिरे तरंग मी माझ्या प्रतीबिम्बावर सोसलेले....

इतक्या सहज उमटू देतीयेस मला तुझ्यावर
इतकी का तूही पार गेलीयेस स्वतःच्या कोणीतरी असण्याच्या...
का कळतच नाहीये तुला कि
मी मलाच शोधतोय तुझ्यातही
तुझा संदर्भ तर कधीचाच मिटून गेलेला...

Tuesday, April 27, 2010

विरत जाणारे हळवे सुख. सकाळपासून हि ओळ माझ्या सोबत आहे. रिक्षात बसून येत होतो. पाठी वळून न बघता आईचा निरोप घेतला होता. खरतर ५-६ दिवसांसाठी घरापसून दूर जाणार. घर ते पण काय, स्वतचा कोंडमारच जिथे जास्त जाणवला ती जागा, पण तरीही आई अशी निरोप द्यायला बाहेर आली कि तुटत राहत. काहीतरी ठेवून चाललोय मागे असं जाणवत राहता. आईचे वाटेकडे पाहणारे डोळे जाणवत निघालो. रिक्षा तिच्या गतीने धावत होती. शहरही जागा होऊन धावायला तयार होत होतं. अर्धवट झोप, करायच्या कामांची काळजी, आणि सदैव चालू असणारे बिन लाग्याबंध्यांचे विचार याच्यामध्ये एक सुखद झुळूक जाणवली वार्याची. एक मस्त गार लहर अंगभर. खरतर तासाभरात उन्हाची तल्खली सुरु होणार, मग हा गारवा कुठला. हि येणाऱ्या पावसाची चाहूल का गेलेल्या थंडीची चुकार आठवण. मग हि ओळ आली, कोपर्यात घर कार्रोन बसली, आयुष्याचे संदर्भ आणि ज्या माणसांच्या आठवणीनी प्रत्येक वळण लक्षात ठेवला त्या सार्यांचा अर्थ ह्या ओळीतच उलगडायला लागला.
पण आता रात्र झाली. तशी प्रत्येक दिवसालाच बिलगूनच रात्र येते. पण रात्र म्हणजे दिवसाच्या जाणिवेची वाढ नाही, तिला स्वताचा असा मंथर काळोख असतो, त्या काळोखाला आठवणींच्या डोहाची खोली, आणि त्या खोलीत सापडणारे सल. हि अशी रात्र आली कि कठीण असतं. पर्याय नसतो ह्या अबोध वेदनांचा कैफ दारूमध्ये उतरवण्यावाचून. आता हेही पळून जाणच आहे म्हणा, त्या आठवणीना त्रयस्थपणे पाहू पाहणं चुकीचाच आहे ना. त्यांचा ओझा वागवत राहिला पाहिजे मात्यावर, म्हणजे जगण्याला आकार येतो, आणि एक स्थिर प्रकारही बनतो एकूणच जगण्याचा परिघाचा.
असो.
आता एवढा एकू यात नाहीये कुठलही आवाज माझ्या सभोवतालचा. म्हणजे खूप माणसे आहेत, त्यांचा काही ना काही चालू आहे. नेहेमीच असतं. मी वेगळाही पडलो नाहीये, पण माझ्यापुरता माझा एक जग आखल्यासारखा झाला आहे. माझ्या एका मित्राने कालच स्फिअर थिअरी मांडली. म्हणजे आपला जगणं वेगवेगळ्या स्फिअर मध्ये असतं. एका स्फिअर मधून दुसर्या मध्ये जाण, याच्या मध्ये जे पोकळी असते ना तोच कंटाळा असतो. हे स्फिअर एका केंद्राशी जोडले असले म्हणजे कंटाळा नसतो, कारण तुम्ही कोणत्या ना कोणत्या स्फिअर मध्ये असताच कायम. पण जर असे स्फिअर वेगवेगळे सतील तर मात्र कठीण असतो प्रकार. बरी वाटते ना एकूणच ही थिअरी. तर असा आता माझ्या शब्दांच्या जगात घुसलो आहे. उद्या पार लांब वाटतो आहे, आणि म्हणून जे आहे ते आत्ताच जागून घ्यावा, किमान लिहून घ्यावा असा वाटतं आहे. हे जे येतं ना ते पार तळातून येतं, कुठलेही सोयीस्कर पापुद्रे न चढवता. आता जगण्याचीच नशा झाली असती एवढी तर असा दुसरा काही चढवायला लागलाच नसतं, पण जगणं थेंब थेंब येतं आणि मध्ये एक स्तब्ध कंटाळा, कुठलाच पैल नसणारा. मग ह्या अशा चोरवाटा शोधायला लागतात.
रडायलाही येत नाहीये. म्हणजे खूप पलीकडचा स्थिर वाटतंय अशातला भाग नाही. थोड्या वेळाने येईलच सारा गुंता परत. पण आता एक थंड अलिप्तपणा आहे. मी पाहू शकतो, जमेल तेवढा लिहू शकतो. एका मैत्रिणीचा मेसेज आलेला. ती निरव रात्री चंद्र पहात बसलेली. तिलावाटलं मी कविता लिहीन आणि म्हणून तिने मला मेसेज केला. मी लिहिलं बसलोय दारू पीत. दुखावली ती. म्हणजे एकदा चांगला असणं सुरु केला कि ते बदलायची सोय नाही. आता चंद्र आणि कविता वगेरे ठीक आहे. तशी तीही ठीक आहे. झोपली ती आता. पण तिला कुठून कळणार कि काही मिनिटांपूर्वी मला तिचीच आठवण आलेली. आणि कळला तरी ते कळल्याने काय. जी तडफड आहे आत, जिला या क्षणासाठी सोयीस्कर अमली गुंगारा दिला आहे, तिचं काय.
हे मरणच, लघूमरण. इंद्रियांची जाणीव अस्पष्ट होत जाण, सभोवताल माझ्यावर जे चरे पडतो आहे ते न जाणवणं आणि उद्या नावाचा एक प्रश्नचिन्ह आ वासून उभा राहणार आहे थोड्याच वेळाने त्याचाही विसर पडणं. मरणच. पण म्हणून सगळे सल संपत नाहीत.
.... तुला काहीच सांगू शकणार नाही मी यातलं. माझ्या शब्दांत सापडणारा माझं अधुरं मीपण, त्याचा तू अर्थ लावू पाहशील. मी या जगण्याची एक उन्मुक्त परिभाषा आहे, जी माणसे जगत आली होती. आता आपण संकेतांच्या आणि परंपरांच्या विळख्यात आहोत आणि म्हणून एवढी तत्वाद्य्नाने उभी करतो आपल्याभोवती. पण हे समजणार नाही तुला. तू सार्या वेदना गिळत मूक राहशील, आणितुझं हे अबोल तडफडणं मला जाणवत राहील. पण जाणवूनही मी येवू शकणार नाही तुझ्या परिघात. तू निग्रहाने बाजूला ठेवशील मला. टोकदार संदर्भांचे भाले वापरून मला घायाळ करशील, आणि मग स्वताच्या वेदनांमध्ये हरवून जाशील. आणि जर तुला ह्या आवर्तातून बाहेर काढता येत नाही तर तुला स्पर्शण्याचा मोह मी केलाच का एवढा एक प्रश्न आरपार जात राहील माझ्या. काहीच उत्तर नाही माझ्याकडे, आहे तो एक असहाय्य करुण सल. आणि म्हणून प्रयाणपार जाणवला तरी ह्या सलाचा गुंता सुटणार नाही. माझीच उकल मला होत नव्हती , आणि म्हणून तुझं अठरावा उंट झाला ना. आता कितीही म्हणून कोरडं व्हायचा म्हटला तरी आठवतंय तुझं निर्व्याज हसणं, स्वतात हरवून जाण आणि कधीतरी कोरडठक्क होऊन माझ्याकडे पाहणं.
ग्रेस म्हणून गेला ना,
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया...
तसं ह्या सलांचे कोंभ उगवून येवोत, एकदा तुझ्या निरागस असण्यात मलाही माझं मूळ सापडो आणि मग कुठचाही सुख जाणावताना त्याच्या शेवटच्या टोकाचा विरत जाणारा स्पर्श सोबत करतो ना तसं हे आयुष्य विरत जावो.
तुझ्या आठवणीच्या साठी आता हे एवढंच...

Sunday, April 25, 2010

तुला विसरण्याची अटळ प्रक्रिया सुरू झालीये, बहारानंतर येणारी पानगळ. आता हे वठत चालेल्या झाडावरचे शेवटचे पक्षी. स्थित्यंतराचे भोग हे असेच, आणि म्हणून हे कळून उमजून स्वीकारलेले मौन तुझ्या माझ्यात.
पण शेवट व्हायचा, तर तो खोल असावा, थांग न येणारा. एकमेकांना कुरतडत असा एकमेकांना जखमी करून आपण आठवणींच्या मोरापिसानाही वार्यावर उधळून दिला. तुझं विचार करताना मनाचं निब्बर होणं डाचत राहता. इतके खोल व्रण सोडले मधल्या काळाने आपल्यावर. तरीही आता परत संवादाचे पूल उभे करावेत आणि येणाऱ्या वादळाची वाट पहावी इतकी उभारी राहिलेली नाही. हि शांतताच अखंड राहूदे, आणि तुझ्या आठवणीची वळलेली पानं उडून जावोत ह्या रिकाम्या होत चालेल्या अंगणातून आणि काही सुकलेली फुलं उरोत कवितांच्या पानात, विसरून गेलेली.

Tuesday, April 20, 2010

बराच गोंधळ आहे, आणि त्यातच स्वतःला कशावर तर केंद्रित करण्याचे निष्फळ प्रयत्न चालू आहेत. मुळात हे असं केंद्रित होणं अगदी बरोबर असं काहीतरी बिम्बवलेलाच असतं कदाचित मनावर. पण तसं असल्याने निर्णय घेणं बराच सोपं होतं असही मी शिकलो आहे आता. पण असं उगाच जगाच्या प्रश्नात स्वताची अमूर्त models बनवत राहणं ही एक वेळखाऊ गोष्ट आहे असं मला वाटतंय. अर्थात स्वप्नं चितारायची बरीच सवय असली कि मोडेल बनवणं फारसा कठीण जात नसावा. पण स्वताच्या मनातल्या अमूर्ततेला आकार देण्यासाठी इतरांनी काय काय करून ठेवलाय हेही पाहून ठेवावं लागता, आणि ते नक्कीच कंटाळवाणा आहे.
ब्लोग वाचत होतो बरेच मराठी. मला असं जाणवतंय के आता लिहिणारे बरेच जण अमेरिकेत बसूनच लिहितायेत. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा आवाका फारच रून्दावलेला आहे. संदर्भ बरेच सखोल आहेत, लिहायच्या प्रेरणा ठोकळेबाज नाहीत आणि जगाच्या पसार्याला शब्दांच्या नक्षीत उमटवायचा निर्धारही जोरदार आहे.
आपलंच आपल्यात इतके शब्द असतात ना, तुला लिहिताना थोडेफारच उमटात असावेत त्यातले. आता सध्या जरा पोटापाण्याचे प्रश्न सतावू लागलेत आहेत, आणि जे शिक्षण चाल्लय त्यातून सहीसलामत पास होणं अशी दुहेरी जबाबदारी येऊन पडली आहे. पण म्हणून काही अगदी मेहेनत करू लागलो आहे असं नाही. असं काय हा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे कि उगाच सतत तेच करत बस. म्हणजे घरी गेल्यावर वगेरे वाटतं कि आता थोडा जबाबदार वगेरे व्हायला हवा. पण ते तेवढ्यापुरता.
लिहायचं काय, आणि लिहितोय काय. तर रांगत बसण्याचा आलाय कंटाळा. स्वताच्य असण्यालाच आव्हान देऊन पहिला पाहिजे, म्हणजे खांद्यावर पोतडी टाकून भटकत राहणं, गावात वगेरे जाऊन संथ जीवनाचे कंटाळवाणे मुलुख तुडवणं, किंवा स्वतःची अमूर्त दुनिया बनवणं ज्यात आपणच खेळ खेळायचे. पण म्हणजे काय, तर स्वतःला आवडणारं काम शोधणं हा शोध आता स्वतःला कमीत कमी कंटाळवाणं काम शोधणं असा बनला आहे. आहे कि नाही गम्मत.
मध्ये मध्ये शब्दांच्या प्रवाहात ओढला जातो. मग उगाच अजून जे भोगलं नाही त्या प्रतिमा, त्यांची ओढ, तुझ्या असण्यापासून असून नसण्यापर्यान्ताचे माझ्याच मनात उमटलेले तरंग, किंवा आधीच्याच कोणाच्या शब्दांचा अजून मानेवरून न उतरलेला भूत.
तुला हे सगळे माझे इतके रंग वाटतात का? काही दिवसांनी तू यालाच भिरभिरलेपण म्हणशील. खूप भूमिका करण्यार्या नटाचा खरं स्वभाव कसा असावा हे उलगडण कसा गुंतागुंतीचा असेल ना?
काय लिहू, उगाच नादावालोय. आठवणी पण नाही यात नाहीयेत ना येणाऱ्या दिवसांची कोवळी उत्सुकता. बस या क्षणांशी निवांत स्थिरावलो आहे, कुठेतरी लांबवर राहून गेलेल्यागावाचं चित्र मनात उमटतंय...
ही सार्या शब्दांना दुखाची किनार का आहे ग? हा माझ्या शब्दांचा नक्षत्रयोग म्हणायचा का माझे हात दुखाची काळीशार गर्ता चाचपता चाचपता त्यातच हरवून गेलेत.
येशील तेव्हा एक शांत संध्याकाळ घेऊन ये, जिच टोक मावळतीच्या किरणांपासून खूप दूर असेल.

Sunday, April 18, 2010

हा सगळं उगाच शब्दांचा खेळ बरं. ह्यातून आयुष्याच्या पोकळ ओझ्यात काही फरक पडेल असं नाही. पण जरा २-४ तास बरे जातात. आता अगदी म्हणजे काही वेळेला नकोसाच होतो हा प्रकार हेखरं आहे म्हणा. पण हीच तर मुळात गम्मत आहे ना, कि आपल्याला आवडत नाही त्याच्याशी जास्तीत जास्त जुळवत राहणं, स्वताचे सारे बुरुज शाबूत ठेवणं आणि होईल तेवढा विरंगुळा मिळवणं हेच करायचा ना. मग त्यालाच नाक का मुरडा?
पण आता हे शहाणपण पण नेमक्या वेळी यावा लागता. एकदा शहाण्पानाशीच फटकून वागायची सवय लागली कि मग हळूहळू आपलं कंटाळा सोयीस्कर रित्या दुसर्याच्या पदरात घालायचे बिलंदर उपाय लढवावे लागतात. स्वताच्या भोवती तटबंदी तर उभारता येत नाही कि ज्यामुळे जगाच्या अत्रंग चाळे जामच दिसणार नाहीत, आणि अगदी आपल्याच आत खोल जाऊन पाहता येईल काय आहे काय बाबा हे. पण कान बंद होत नाहीत असे ओपाप, डोळे मिटले तरी प्रतिमांच्या येण्याजाण्याला अडकाव होत नाही. आणि अडवलीत हि दारे जरी, तरी त्यांचा काय ज्यांनी मेंदूचाच ताबा घेतला आहे. मग काय उगाच शहराचे रस्ते गिरवायचे, आयुष्याच्या काळसर कोपर्यात डोकावून दुखालाच नशा करून जगणारीमाणसे पहायची, भोगांच्या उन्मुक्त अविष्कारांकडे लालस होऊन पाहायचा आणि मग आपलंच आपल्या भोवती फाटलेला कोश गुंडाळून डोळे मिटायचे, स्वप्नांच्या जन्मजात शापाला शरण जात.
तुला जाणवतंय हे काय माझे आयाम नव्हेत , हे स्वताच्या भोवती गिरकी घेत नाचणं म्हण. भोवंडून जायला होतं काही वेळा इतकी वेगवान गिरकी.
आता संध्याकाळ येईल, म्हणजे आठवणींच्या तावदानावर अस्तरंग पहायची वेळ. मग रात्र येईल जिचं काय करायचं हे ठाऊक नाहीये मला.
तू हे वाचशील तेव्हा असं वाच जसा कोण दूर देशातल्या लेखकाने लिहिलंय. ओळखींचे संदर्भ जोडले कि अर्थ परका होतो, लिहिणार्याला आणि वाचाण्यार्यालाही. तू अनोळखी बनून सुद्धा सावली होशील माझी?
शांत आहे आता, दूर कुठले आवाज जन्म घेतायेत, तुझे शब्दही आसपास आहेत कुठेतरी,
'तू कुठेही कसाही आणि अगदी दुसर्या कोणाचाही असलास तरी माझा असणारच आहेस, माझं वाट पाहणंही इतका सोपा नाही राजा, वेदनांचे मोती जगण्याच्या संथ चेहर्याखाली अलवार सांभाळून ठेवलेत, जेव्हा तू येशील तेव्हा उधळून द्यायला. ' तू म्हणालेलीस असं कधी.

अर्थविभ्रम

मी देणार तरी काय तुला. मी घेत असतो फक्त माझ्या आवर्तात ओढल्या जाणार्या आणि मग विरून जाणार्या प्रत्येकाकडून. आणि बोलू नये खरं असं स्वताच्याच्याच कोशाला गहिरा करणारं, पण हे आवर्त इतका सोपा नाही जितकी सहज समजतीयेस तू. माझं असणं खूपच फसवं आहे, आणि एकदा असण्याच्या विभ्रमाचे रंग उमटले ना तुझ्या तळहातांवर कि मी नसताना तुला कोराच दिसेल तुझा तळहात. मग प्राक्तनाच्या अदृश्य शब्दांची वाट पाहणं आणि आठवणींचे रावे आवरून धरणं अस्तकालीन उद्रेकांच्या दाहापासून. आता लिहितोय हेही विरोधाभासाच्या प्रत्ययी लयीत. ग्रेस आहे खरा ह्या शब्दांत, पण त्याचे शब्द तरी त्याचे कुठे होते?
हे असं कोणाला सांगण्याची सवय असणं वाईटच. कुठेतरी हरवतोच नितळ आपलेपणा. नाहीतर चांदण्याच्या कुंडलीत हवा जन्म, कि जे माणूस गवसाव तेच असावा सार्या सादांचा प्रतिसाद. आपल्यातच जेव्हा ओळख-अनोळखीचा जीवघेणा खेळ असतो ना, तेव्हा समोरचा माणूसही तेच राहत नाही कायम. कधी मौनाला अर्थ बिलगून येतो आणि कधी मौनात सारेच संवेद तडकून जातात, शब्दाच्या जन्माचं भाग्य न मिळाल्याने. तुला परिणीती हवीये माझी तर्कशुद्ध, का संद्याहीन आकारातही तू पाहू शकतेस रचनेचं मूळ. दुर्बोध होत असावेत माझे शब्द, पण स्वतःला सोप्या गोष्टीत उलगडू गेलो, तर अजून कोणाची गोष्ट बनेल, माझी नाही आणि मग तुझीही नाही.

Saturday, April 17, 2010

Nightingale

मला 'Nightingale' ऐकायचय तुझ्यासोबत. मंदपणे लहारायचं सुरांवर, व्हायोलीनच्या तरंगावर दूर दूर जायचय जिथे तू आहेस, पहाट उमलून येताना रात्रीच्या पोटातून, मला तुझ्या कुशीत शिरून ऐकायचंय शरीराचं स्पंदन बहरून येताना.
आठवतं तुला पहिल्यांदा ऐकवलेला हा सुरांचा आर्त अर्थ. आणि मग तू म्हणालेलीस या नंतर नको वाटतं काही,कुठे जाण, बोलणं, अगदी तूही.
रात्रभर जागू, आधी कसे शब्द शब्द असतील नुसते,ग्रेसच्या कविता, आरती प्रभूंच्या शब्दांची वळणे. सगळं सगळं सांगू ना एकमेकांना. कदाचित सुचणारच नाही काही बोलायला, मग असेच बसून राहू, तुझं माझं जवळ असणं अनुभवत. मग रात्र येईल ना उताराला, तार्यांच्या अंगणात मंद गारवा प्रवेश करेल, तेव्हा हातात हात गुंफून तळ्याकाठी चालायला जाऊ. समोरच्या स्तब्ध, निश्चल पाण्यात प्रतीबिम्बांचे विभ्रम किती काय कोडी घालतील, आपण नुसतीच पाहू. तुझ्या माझ्या असणाच्या कोडयापुढे बाकी सगळीच सोपी आहेत. झाडाशी शेवटची गुजगोष्ट करून काही पानं गळत असतील, वारा उडवत नेईन त्यांना, तेवढ्यापुरता झाड हलेल कदाचित आणि मग नव्या पालवीच्या हर्षाने हरखायला मोकळाही होईल.
मग जेव्हा एकटा वायोलिन वाजेल ना, तेव्हा खूप दिवस सलत राहिलेले काही व्रण पुन्हा जिवंत होतील. श्वासांचा नाद एक लय चुकेल, डोळ्यांच्या कडेशी अलगद चुकार अश्रू येईल, कोण कुठला...
मला ऐकायचं तुझ्यासोबत आपलंच गाणं आणि मग निघून जायचय कधीच परत न यायच्या मौनाच्या देशात....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...